Advertisements

(रविवार विशेष)
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,दि.१५ सप्टेंबर २०२४: राष्ट्रवादीचे अध्यक्ष(शरद पवार गट) शरद पवार यांनी आज राज्यातील लाडक्या बहीणींना पंधराशे रुपयांपेक्षा त्यांच्या अब्रूचे संरक्षण आणि सुरक्ष्ततेची गरज असल्याचे ‘सारगर्भित’विधान केले.अर्थात,बदलापूरच्या घटनेनंतर ज्या पद्धतीने शिंदे सरकारने हे प्रकरण हाताळले,त्याविरुद्ध प्रचंड जनक्षोभ उसळणे स्वाभाविक होते.या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारला ‘राजकीय’कोंडीत पकडण्याची संधी विरोधक कुठेही सोडणार नाहीत,हे स्वाभाविक असून लाडकी बहीण योजनेचा सरळ संबंधच शरद पवारांनी लाडक्या बहीणींच्या अब्रूशी जोडून टाकला. दूसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील काल ’लाडक्या भावाला साथ द्या’अशी साद घालत,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला खोडा घालण्याचे काम विरोधक करीत आहे असा आरोप करीत, त्यांनी ’हप्ते’घेतले आम्ही लाडक्या बहीणींच्या खात्यात ‘हप्ते ’टाकले,अशी उपरोधिक टिका केली,अर्थात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात शिंदे-फडणवीसांची तर गेल्या एका वर्षापासून महायुतीची सरकार अस्त्विात असतानाही, लाडकी बहीण योजना राबविण्याची व तिच्या खात्यात ’हप्ते’टाकण्याची ’सुबुद्धी’या सरकारला लोकसभेच्या महाराष्ट्रातील निकालानंतरच का सूचली?हा लाख मोलाचा प्रश्न महाराष्ट्रातील सुजाण बहीणींना पडणे रास्त आहे.
आता पर्यंत एक कोटी ६० लाख बहीणींना या याेजनेचा लाभ मिळाला असून, या योजनेमुळे राज्यातील ‘कर दाता’मात्र,आतल्या आत ’चरफडत’असल्याचे दिसून पडत आहे.राज्याच्या तिजाेरीतून आतापर्यंत चार हजार ७८७ कोटी रुपये लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा देखील झाले आहे.त्यामुळे या हजारो कोटींच्या खिरापतीचे श्रेय घेण्याची चढाओढ मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये लागली नसती तर नवलच.कुठे ‘दादांचे’ तर कुठे ‘देवा भाऊ’च्या समर्थकांनी मोठमोठे कटआऊ्टस लाऊन लाभार्थी लाडक्या बहीणींना ‘जाणीव’करुन दिली की त्यांच्या खात्यात पोहोचलेले तीन हजार रुपये(जुलै अाणि ऑगस्टचे मिळून)या दादा आणि भाऊंच्या ‘दारशूरतेमुळेच’मिळाले आहेत,एवढंच नव्हे तर वृत्त वाहीन्यांवर या योजनेच्या त्यांच्या‘जाहीराती’बघून तर महाराष्ट्रातील प्रबुद्ध जनता चकीतच झाली!
कुठे लहान मुलाच्या हातात नवी कोरी ‘बॅट ‘तर तर विद्यार्थिनींच्या हातात नवी कोरी शालेय पुस्तके होती,याचा अर्थ लाडकी बहीण योजना लागू होण्यापूर्वी या राज्यातील पालक वर्ग इतका ‘हतबल’ होता की,आपल्या मुलांना ते साधी‘बॅट’देखील विकत घेऊन देऊ शकत नव्हते.विद्यार्थिनींना शिकविण्याची जणू त्यांची कुवतच नव्हती. जाहीरातीतील लाडक्या बहीणींच्या चेह-यावरील हास्य कॅम-यांनी अचूक टिपण्याच्या नादात ते अधिक ’हास्यास्पद’कसे होतील,याचाच वेध घेतल्याचे गमतीदार टोले देखील समाज माध्यमात उमटले.
वरुन ‘रक्ताचा थेंब असेपर्यंत ‘लाडकी बहीण ’योजना सुरुच राहणार’ असल्याची भीमगर्जना हा ‘कळस’होती कारण ही गर्जना जळगाव येथील सागर पार्क मैदानावर महिला ‘सशक्तीकरण’ अभियानात करण्यात आली होती!एकीकडे ‘सशक्तीकरण’अभियानात ‘फूकटीकरणाचे’वचन ऐकून जळगावकरांवर डोक्याला हात मारुन घेण्याची वेळ आली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर,सर्वसामान्य कुटूंबातील महिलांच्या ‘सक्षमीकरणासाठी’ ही योजना असल्याचा सूतोवाच करुन, फक्त निवडणूका डोळ्या समोर ठेऊन ही योजना आणलेली नाही,असे साळसूदपणे सांगूनच टाकले!उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,विरोधक कितीही आमच्या विषयी खोटे बोलू द्यात,बहिणींचे सुरक्षा कवच(मतांच्या रुपाने!) आम्हाला आहे,आमचे कोणी वाकडे करु शकत नाही.दर महिना पंधराशे रुपये राज्यातील महिलांना देऊन भाऊबिजेची ओवाळणी देत आहे,बहीणींच्या प्रेमातून उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे,माझ्या बहीणींनो सावत्र भावांच्या (मविआच्या)भूलथापांना बळी पडू नका,असे आव्हानच त्यांनी केले.मात्र,ही भाऊबिजेची ओवाळणी विधान सभेच्या निवडणूका दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यावरच कशी काय मिळाली?याचा उलगडा करण्याचा प्रयत्न आता महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली केला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीचा लोकसभेचा निकाल इतका जिव्हारी लागला की त्यांनी आपल्या जनसन्मान यात्रेदरम्यान,बारामतीत बहीणीच्या विराेधात पत्नीला उमेदवारी दिली,चूकच झाली अशी जाहीर कबुली दिली अर्थात,बारामतीचा निकाल अजित पवारांच्या बाजून लागला असता तर कदाचित अशी उपरती त्यांना कधीच झाली नसती,हा भाग अलहदा.यावर १३ ऑगस्ट २०२४ रोजी सुप्रिया सुळे यांनी देखील भावाला टोला हाणत,भाऊ लाडका नसला तरी विश्वासू असावा,असे बोल ‘जिव्हाळ्याचे’बोल सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत योजनेच्या नावातून ‘मुख्यमंत्री’हा शब्दच वगळण्यात आला!यावर बरीच गरमागरम चर्चा मंत्रीमंडळ बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी ‘घडवून’आणली.योजनेचा प्रचार करताना ‘जबाबदारीने’वागण्याची सूचना कार्यकर्त्यांना दिली जाईल आणि महायुतीचा धर्म पाळल्या जाईल असे आश्वासन देतानाच मंत्री तानाजी सावंत यांना झालेल्या ‘ओकारी’चा विषय पाठोपाठ येणे स्वाभाविक होता!
राज्यावरील कर्जाचा बोजा एकीकडे साढेसात लाख कोटींवर गेला असताना,महसुली तुटीचा आकडा अंदाजे २० हजार कोटीवर पोहोचला असताना,लाडक्या बहीणींच्या ’मतांसाठी’मध्यप्रदेश,तमिळनाडू,केरळ इ.सारख्या राज्यांसारख्या या याजेनवर महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी‘ राज्यावर ४३ हजार कोटींचा नवा भार पडणार आहे.
परिणामी,या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदारांनी लाडक्या बहीणींना ‘दमदाटी’करने हे देखील स्वाभाविक होते.अमरावतीचे आमदार व भाजपचे लाडके रवी राणा यांनी तर १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना‘विधानसभा निवडणूकीत आर्शिवाद न दिल्यास लाडकी बहीण योजनेची रक्कम खात्यातून परत घेईन’असा सज्जड दमच दिला होता!आमदार महेश शिंदे यांनी ‘विधानसभेत विरोधात काम केल्यास लाडकी बहीण योजनेमधून नाव कमी करण्यात येईल’अशी धमकीच देऊन टाकली.परिणामी,लाडकी बहीण बाबत आमदार व मंत्र्यांनी सांभाळून बोलण्याची तंबीच मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना या ‘वाचाळवीरांना’ द्यावी लागली.मात्र,स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकमध्ये ९ ऑगस्ट रोजी ‘राज्य सरकारच्या योेजना सुरु ठेवायच्या असतील तर तुम्ही निवडणूकीत आमचं बटण दाबलं पाहिजे’असे वादग्रस्त विधान केले !दूसरीकडे फडणवीस यांनी अकोला येथे जनसंवाद सभेत भाजपच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना‘लोकसभेप्रमाणे विधानसभेत घडू नये’असे आवाहन केलेे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे येथे १७ ऑगस्ट रोजी .मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यात बोलताना’आमच्या महायुती सरकारला आर्शिवाद दिला तर दीड हजार रुपयांचे पावणे दोन हजार रुपये,त्याचे पुढे दोन हजार,अडीच हजार करु,त्या पुढे जाऊन तीन हजार रुपयांपर्यंत रक्कम वाढवू,आमचे सरकार आणखी मजबुत झाले तर मदत देताना हात आखडता घेणार नाही’असे राज्याच्या तिजोरीचा विचार न करता आश्वासनच(आमिष!)देऊन टाकले.
कोल्हापूरात बोलताना शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत खोडा घालणा-या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा म्हणजे ते पुन्हा तुमच्या वाटेला येणार नाहीत’असे आवाहन केले.लाडकी बहीण योजनेने इतर सर्व योजनांचे रेकॉर्ड मोडले आहेत,त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे,योजना बंद करण्यासाठी काँग्रेसचे वडपल्लीवार हे न्यायालयात गेले असून, ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसने केलेले हे षडयंत्र असल्याचे सांगितले.तर दूसरीकडे जुलै महिन्यात कॅगच्या अहवालात राज्याच्या जमा आणि खर्चातील तफावत लक्षात घेता, महसुली तुटीविषयी गंभीर विश्लेषण करुन उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याची शिफारस करण्यात आली.राज्यातील महसुली जमा आणि महसुली खर्च यातील तफावतीमुळे एक हजार ९३६ कोटींची महसुली तुट असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे!मात्र,मुख्यमंत्री सांगतात,महायुतीची ताकद वाढेल तशी ओवाळणीची रक्कम वाढवू!
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामविकास विभागाचे तब्बल ८४१ कोटी रुपये इतका निधी ‘अखर्चित‘राहीला.सामाजिक न्याय विभागाचे १७३ कोटी,सरकार व वस्त्रोधोगचे ३०३ कोटी तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे १२० कोटी अखर्चित राहीले असून,हा सर्व अखर्चित निधी ,मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी देण्यात आल्याची खासगीत चर्चा आहे!
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेऊन जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’या महत्वाकांक्षी योजनेमुळे राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख कोटींवर पोहोचण्याची शक्यता खुद्द वित्त विभागानेच व्यक्त केली आहे.ही ४६ हजार कोटींची योजना राबविण्यासाठी ५ टक्के प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.त्यानुसार ही योजना राबविण्यासाठी दर वर्षी २ हजार २२३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.त्यावर देखील वित्त विभागाने तीव्र आक्षेप घेतला असून ही रक्कम खूप जास्त असल्याचा ‘शेरा ’मारला आहे.याचाच अर्थ राज्याचे पुरते आर्थिक दिवाळे काढण्यासाठी ही लाडकी योजना सक्षम झाली आहे,असाच याचा अर्थ होतो.
या ही पुढे जाऊन राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’सुरु करण्यात आली असून,यासाठी साढे पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.याशिवाय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना,मोफत गॅस सिलेंडर योजना,यासारख्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी देखील दहा हजार रुपये प्रति माह तरुणांना देण्याची योजना शिंदे सरकारने आणली असून यावर देखील हजारो कोटी खर्च होणार आहेत.
सातारामध्ये तर एका पती-पत्नीने एकाच आधारकार्ड क्रमांकावरुन तब्बल २६ बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे बळकावल्याची घटना समोर आली.याचा अर्थ १७ ऑगस्ट रोजी पहील्या टप्प्यात १९ ऑगस्ट रोजीच्या राखी पोर्णिमेच्या सणा पूर्वी, लाडक्या बहीणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची इतकी घाई सरकारला झाली होती की,या योजनेत नोंदणी केलेल्या खात्यांची छाननी करण्याचा वेळ देखील सरकारकडे नव्हता.नुकतेच छाननी समितीने तपासलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील ९२ हजार ९८ अर्जा पैकी १२ अर्ज चक्क पुरुषांनी महिलांचे छायाचित्र लाऊन भरल्याचे वास्तव समोर आले आहे.
थाेडक्यात,याच महाराष्ट्रात बांबूच्या झोळीतून आठ किलोमीटरपर्यंत गर्भवती महिलेचा जीवघेणा प्रवास घडल्याची घटना नुकतीच नंदूरबार येथे घडली.गडचिरोलीतील अनेक जिल्ह्यांचा तर पावसाळ्यात शहरांशी संपर्कच तुटत असतो.रस्त्यांच्या अभावी,पावसाळी नदीतून वाट काढीत अनेक गर्भवती महिलांचा जीवघेणा प्रवास,मृतांचे पार्थिव,रुग्णांचा झोळीतून प्रवासाच्या दाहक घटना याच पुरोगामी महाराष्ट्रात घडताना दिसून पडतात मात्र,मायबाप सरकारच्या लेखी सर्वात महत्वाकांक्षी योजना ठरते ती म्हणजे,‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना!’स्वत: काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहूल गांधी यांनी देखील ‘महालक्ष्मी’योजनेतून दर माह महिलांच्या बँक खात्यात ‘खटाखट खटाखट’साढे आठ हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले आहे.परिणामी,खरंच पुरोगामी म्हणून बिरुद मिरविणा-या महाराष्ट्राला अश्या याेजनांची गरज आहे का?याचे उत्तर तर विधान सभेच्या निकालानंतरच महाराष्ट्राच्या जनतेला मिळेल,तोपर्यंत या योजनेचे ‘कवित्व’संपणार नाही,हेच खरे.
…………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
