Advertisements

डॉ.गंटावारांची एफआयआर रद्द करण्याची न्यायालयात धाव
लाचलुचपत विभागानेच केला होता २०२० मध्ये गुन्हा दाखज:चार्जशिट दाखल करण्यास टाळाटाळ!
नागपूर,ता.२४ जानेवरी २०२५: महानगरपालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी व बहूचर्चित डॉ.प्रवीण गंटावर व त्यांच्या पत्नी डॉ.शीलू गंटावार यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात रवि मडावी यांनी दिलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक गभणे यांनी वरिष्ठ अधिका-यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबत अहवाल सादर केला होता.यानंतर या विभागाने सीताबर्डी पोलिस ठाण्यात कलम १३(१)(ब)अन्वये १ जुलै २०२० रोजी गुन्हा दाखल केला परंतु चार वर्षे होऊनसुद्धा न्यायालयात या विभागाने आरोपींविरुद्ध चार्जशिट दाखल न केल्याने डाॅ.गंटावार दाम्पत्याने त्यांच्या विरुद्ध एफआयआर रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.
या पूर्वी २६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.गंटावार यांनी उच्च न्यायालयात ही एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती,यावर सरकारी वकीलांनी सहा महिन्यात चार्जशीट सादर करणार असल्याचे न्यायालयात सांगितले होते.परंतू आता याला ही दोन वर्षांचा कालावधी लोटला असल्याने पुन्हा डॉ.गंटावार यांनी दीड महिन्यां पूर्वी ९ डिसेंबर २०२४ रोजी त्यांच्या विरुद्ध एफआयआर रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली.यावर ६ जानेवरी २०२५ रोजी न्यायमूर्तींनी तीन आठवड्यात मंजुरी घेऊन चार्जशिट दाखल करण्याबाबत आदेश दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात अद्याप चार्जशिट दाखल करण्यात न आल्याने हा विभाग आरोपी डॉ.प्रवीण गंटावार यांच्यावर ‘मेहरबान’झाला असल्याचा आरोप पत्रकार परिषद घेऊन पिडीत रवि मडावी यांच्या पत्नी वनिता मडावी यांनी केला.

(छायाचित्र: पत्र परिषदेत माहिती देताना वनिता मडावी व त्यांचे वकील)
डॉ.प्रवीण गंटावार यांनी २०१४-१५ मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जननी योजना या शासकीय योजनेत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.त्यांनी खोटी व बनावट देयके राज्य कर्मचारी विमा निगम गणेशपेठ नागपूर येथे सादर करुन दोन कोटी पन्नास लाख रुपये शासनाचे लाटले,असा आरोप करण्यात आला होता.याबाबत सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग नागपूर यांनी चौकशी करुन १६ मे २०१५ रोजी दिलेल्या अहवालात, डॉ.गंटावार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली होती. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे डॉ.गंटावार यांचे बयाण घेतले असता बयानात डॉ.गंटावार यांनी भ्रष्ट कारभाराचा गुन्हा कबुल केला होता.यानंतर डॉ.सैय्यद हसन मेडिकल रेफरी, राज्य कर्मचारी विमा निगम यांनी, गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली व त्याची एक प्रत तत्कालीन मनपा आयुक्तांना दिली.
डॉ.गंटावार यांनी ५ ते ६ बँकेकडून चुकीचे कागदपत्रे घेऊन जवळपास २० कोटींचे कर्ज घेतले असून या विरोधात रवि मडावी यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे,पोलिस महासंचालक मुंबई यांच्याकडे तक्रार नोंदवून वारंवार स्मरण पत्रे पाठवली.तरी देखील अद्याप डॉ.गंटावार यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यात आली नाही,या विभागाच्या या कृती मागे नेमके काय गौडबंगाल आहे?असा सरळ प्रश्न वनिता मडावी करतात.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा पिडीतां ऐवजी आरोपीला मदत करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
डॉ.प्रविण गंटावार यांच्या अवैध अपसंपदेच्या संदर्भात फॉरेंसिक ऑडिटर मुंबई यांनी ६१ टक्के रक्कम बेहिशेबी अपसंपदा असल्याचा अहवाल दिला होता.२ एप्रिल २०१२ रोजी गुणवंत रामराव खसाले तसेच १३ एप्रिल २०१२ रोजी मंगेश लालाजी वाडीभस्मे यांनी डॉ.प्रविण गंटावार विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.डॉ.गंटावार यांनी आपल्या चल-अचल संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पूर्ण माहिती ही सादर केली नाही तरी देखील हा विभाग गंटावार विरुद्ध न्यायालयात चार्जशिट सादर करण्याबाबत हेतूपुरस्सर विलंब करीत असून,त्यांचा उद्देश्यच न्यायालयाकडून त्यांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याचा असल्याचा गंभीर आरोप याप्रसंगी वनिता मडावी यांनी केला.
रवि मडावी हे पोलिस शिपाई असून त्यांच्या पहिल्या पत्नीला कर्करोग झाला होता.त्यांनी डॉ.गंटावार यांच्यावर विश्वास ठेऊन धंतोली येथील त्यांच्या ‘कोलंबिया‘ रुग्णालयात पत्नीला दाखल केले होते.खूप कमी खर्चात उपचाराची ग्वाही २०११ मध्ये डॉ.गंटावारांनी रवि मडावी यांना दिली होती.मात्र साढे तीन लाखांच्या खर्चाचे बिल त्यांनी काढले.रवि यांच्या पत्नीला मधुमेह असतानाही त्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली.दहा-बारा दिवसांनंतर त्यांची प्रकृती खूप ढासळली,त्यात संपूर्ण औषधे ही कोलंबिया रुग्णालयाच्या औषध दूकानातूनच घेण्याची सक्ती करण्यात आली.शंभर रुपयांचे औषध कोलंबियामध्ये पाचशे रुपयांचे मिळत होते,असा आरोप रवि यांनी केला होता.अवास्तव बिल काढल्याने रवि यांनी पत्नीला शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्याची परवानगी मागितली मात्र,संपूर्ण बिल भरल्याशिवाय रुग्णाला सुटी देणार नसल्याचे डॉ.गंटावार यांनी बजावले.अखेर रवि यांनी त्यांच्या बँकेत पैसे नसतानाही डॉ.गंटावार यांना धनादेश दिला व लवकरच बँकेत पैसे जमा करण्याचे आश्वासन देऊन त्यांना धनादेश बँकेत न टाकण्याची विनंती केली.
मात्र,गंटावार यांनी सात दिवसात चेक बँकेत टाकला व तो बाऊंस झाला.यातच रवि यांच्या पत्नीचे मेडीकलमध्ये निधन झाले.ते त्याच प्रपंचात अडकले होते.यातच त्यांना चेक बाऊंस झाल्याने नोटीस पाठवण्यात आली,सगळीकडून कोंडी झाल्याने रवि हे हतबल झाले होते.पैश्यांच्या जोरावर रवि यांच्यावर फसवणूकीची केस दाखल करण्यात आली,याशिवाय को-या कागदांवर स्वाक्षरीसाठी त्यांच्यावर सातत्याने डॉ.गंटावार दबाव आणत असल्याचे रवि यांनी त्यांच्या तक्रारीत नमूद केले.
२०१२ साली याच डॉ.गंटावारांचे आणखी एक प्रकरण उजेडात आले होते.मृत झालेल्या महिलेवर उपचार करुन लाखो रुपये उकळल्याची तक्रार नागपूरातील सुप्रसिद्ध समाजसेवी उमेश चौबे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती.भंडाराच्या साकोली गावातील रेणु मंगेश वाडीभस्मे नावाच्या महिलेला तेथील डॉ.अजय तुमसरे यांच्या शिफारिशीवरुन गंटावारांच्या रुग्णालयात नातेवाईकांनी भर्ती केले.एक महिना त्यांच्यावर उपचार करण्यात आले व १५ लाख ५० हजारांचे बिल काढण्यात आले.११ मार्च २०१२ रोजी रेणू यांना कोलंबियामध्ये भर्ती करण्यात आले होते मात्र,वेंटिलेटरवरील रेणूला कोणालाही बघण्याची परवानगी नव्हती.एक महिन्याने रेणू यांचा नातेवाईक आशिष कापते रेणूसाठी नारळ पाणी घेऊन आला,त्यांनाही रेणू जिवंत असून दूरुनच वेंटिलेटरवर असल्याचे दाखवण्यात आले.१३ एप्रिल २०१२ रोजी कोलंबियाचे कर्मचारी रेणू यांचे पती व आशिष यांना गंटावार यांच्या केबिनमध्ये घेऊन गेले.गंटावार यांनी आणखी ४ लाख ११ हजारचे बिल भरण्यास त्यांना सांगितले.पैसे जमा न केल्यास रुग्णास भेटू दिले जाणार नसल्याची तंबी दिली.
पैसे नसल्याने को-या स्टॅम्प पेपरवर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.वीस मिनिटांनंतर सांगितले रेणू यांची हार्टअटॅकने मृत्यू झाला!रेणूच्या नातेवाईकांनी डॉ.गंटावारांच्या या फसवेगिरीच्या विरोधात धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.मात्र,गंटावार दाम्पत्यांनी रेणू यांच्या पती व नातेवाईकांच्या विरोधात रुग्णालयात तोडफोडीची खोटी तक्रार नोंदवली.यानंतर मृतक रेणूचे नातेवाईक यांनी उमेश चौबेची भेट घेतली.
याच गंटावारांकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकल्यानंतर अनेक गावातील घरे व शेतीच्या रजिस्ट्री देखील त्यांना सापडल्या!३ जुलै २०२० रोजी गंटावार यांच्या रामदासपेठेतील फॉरच्यून रेसिडन्सी येथील फ्लॅटवर धाड टाकल्यानंतर पथकाला दहा कोटींच्या संपत्तीचे दस्तवेज,सोन्याचे दागिने आढळले होते.याशिवाय दोन लॉकर्सची झडती घेण्यात आली.गैरमार्गाने मालमत्ता जमविल्याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने डॉ.गंटावार दाम्पत्याविरुद्ध सीताबर्डी पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा दाखल केला होता.एसीबीच्या पथकाने त्यांच्या कोलंबिया हॉस्पीटलची झाडाझडती घेतली असता सात कोटी रुपये किमतीची रजिस्ट्री,२०१३ मध्ये ९० लाख रुपयांचा घेतलेला फ्लॅटची रजिस्ट्री तसेच अन्य एका व्यक्तीच्या नावे असलेल्या भूखंडाचे दस्तावेज आढून आले.याशिवाय २०० ग्रॅम सोन्याचे दागिनेही आढळली ज्याची किंमत दहा कोटीहून अधिक होती.एसीबीच्या अधिक्षक रश्मी नांदेडकर,अति.अधिक्षक राजेश दुद्वलवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक मोनाली चौधरी यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.आता याच विभागाला न्यायालयात गंटावार विरुद्ध न्यायालयात चार्जशिट दाखल करण्याची सवड मिळत नाही आहे!
डॉ.गंटावार दाम्पत्याने गैरमार्गाने कोट्यावधी संपत्ती जमविल्याची तक्रार शहर पोलिस दलातील एका हेडकॉन्सटेबलने एसीबीकडे सप्टेंबर तक्रार केली. २०१४ मध्ये या तक्रारीवर कारवाई करुन डॉ.गंटावार दाम्पत्याची उघड चौकशी करण्याचा प्रस्ताव अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठवला.२१ दिवसांनंतर डॉ.गंटावार यांची उघड चौकशी करण्याची परवानगी एसीबीला मिळाली.चौकशी दरम्यान गंटावार दाम्पत्याने मिळकतीपेक्षा अधिक अडीच कोटींची संपत्ती जमविल्याचे स्पष्ट झाले होते.
गंटावार यांचे मनपातील नोकरीत आणखी एक गाजलेले प्रकरण म्हणजे एलक्सिस रुग्णालयात एका डॉक्टरला धमकाविण्याचे कृत्य करणा-या राकांचा नेता साहिल सैयद याची एक ऑडियो क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती.हे प्रकरण देखील करोना काळातील असून जुलै महिन्यात सर्व प्रचार-प्रचार माध्यमांनी ठलकपणे ही बातमी प्रसिद्ध केली होती.या ऑडियोमध्ये सहिल सैय्यद हा त्याच्या एका पंटरला ‘गंटावार साहब की जमानत कराने के लिये कोर्ट को मॅनेज करना पडा’असे सांगत होता!हे सरळ-सरळ न्यायपालिकेच्या विश्वासहर्तेवर भयंकर आक्रमण होते.या ऑडियो क्लिपची माहिती सकाळपासूनच हायकोर्टच्या अधिका-यांपर्यंत पोहोचली,याची सत्यता पडताळ्यानंतर हायकोर्टने यावर कठोर कारवाईचे संकेत दिले होते.महत्वाचे म्हणजे शहरातील आणखी एक बहूचर्चित आबू नावाच्या आरोपीला देखील जामीन मिळण्याबाबत त्याच वेळी चर्चेला उधाण आले होते.याच ऑडियो क्लिपमध्ये जामीनासाठी न्यायमूर्तींना देण्यात आलेल्या रकमेचा देखील उल्लेख होता!
डॉ.गंटावार यांनी मनपाचे वैद्यकीय अधिकारी पदावर असताना एलक्सिस रुग्णालयात मशीन्सच्या तपासणीच्या नावावर मोठी खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला होता.ती न मिळाल्याने या रुग्णालयातील मशीनरीच्या खोलीला गंटावार यांनी सील केले होते.साहिलच्या मदतीने शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयात गंटावार यांचा हा गाेरखधंदा सुरु होता.
याच डॉ.गंटावार दाम्पत्याला मनपा आयुक्तांनी मनपात
‘मानाचे’पद देऊन ऐन कराेनाच्या काळात ही जनतेच्या पैशांवर
‘पोसले’ होते.अनेक तक्रारींनंतर देखील गंटावार दाम्पत्याला मनपा आयुक्तांनी हात देखील लावण्याची तसदी घेतली नव्हती! सत्ता पक्ष नेते
दयाशंकर तिवारी
यांनी तुकाराम मुंडे मनपा आयुक्त असताना व संदीप जोशी महापौर असताना मनपाच्या सर्वसाधारण सभेत गंटावार दाम्पत्यांच्या सर्व गैरकृत्यांचे पुराव्यानिशी वाभाडे काढले होते.
अश्या या गंटावार दाम्पत्याला मनपामध्ये कोणाचा आश्रय होता?या शहरात इतर कोणताही प्रामाणिक डॉक्टर या पदाच्या लायकीचा नागपूर महानगरपालिकेला सापडलाच नव्हता का?कोणाच्या सत्ता काळात डॉ.गंटावार व इतर भ्रष्ट वैद्यकीय अधिकारी हे मनपात रुजू झाले?यासाठी कोणत्या नेत्याला किती रक्कम पोहोचविण्यात आली?ऐन करोनाच्या काळात नागपूरची जनता जेव्हा मरणासन्न अवस्थेत होती त्या ही वेळी गंटावार दाम्पत्य,जनतेच्या घामाचा सरकारी गलेलठ्ठ पगार घेत असतानाही ,स्वत:च्या कोलंबिया रुग्णालयात करोना रुग्णांकडून लाखोची लयलृट करण्यात व्यग्र होते,अश्या या किर्तीवान गंटावार दाम्पत्यावर सरकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग देखील ‘मेहरबान’झाल्याचा आरोप करीत अखेर पिडीत रवि मडावी यांच्या पत्नीने आपल्या वकीलांसोबत पुन्हा एकदा काल पत्रकार परिषद घेऊन त्या चर्चेला वाचा फोडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात जर त्यांच्याच अधीन असणारा विभाग दोषी,आरोपी व भ्रष्टाचा-यांना वाचवण्यासाठी सरसावत असेल तर पिडीतांनी न्याय कोणाला मागावा?असा सरळ सवाल रवि यांच्या पत्नी वनिता करतात.
……………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
