

घटस्फोटीत महिलेचा विश्वासघात
नागपूर. कोराडी पोलिसांनी एका घटस्फोटीत महिलेच्या तक्रारीवरून तिच्या प्रियकराविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने महिलेला जाळ्यात अडकवले. 5 वर्षांपर्यत तिच्यासोबत राहिला आणि पैसेही उकळले. नंतर लग्न करण्यास नकार दिला. पोलिसांनी रंगारीपुरा, वणी, यवतमाळ निवासी विवेक गुलाब बिलोरिया (32) विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय पीडितेने आपल्या पहिल्या पतीला घटस्फोट दिला होता. तिला पोटगी म्हणून चांगले पैसे मिळाले होते. 2014 मध्ये तिची ओळख विवेकशी झाली. विवेकने तिला आपल्या प्रेमपाशात अडकवले. एकदिवस शीतपेयात मादक पदार्थ मिळवून तिला बेशुद्ध करीत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून तो लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने तिचे लैंगिक शोषण करीत होता. दोघेही पती-पत्नीप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.
दरम्यान वेगवेगळे कारण सांगून विवेकने महिलेकडून 14 लाख रुपये घेतले. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता 2 महिन्यांपूर्वी त्याने स्पष्ट नकार दिला. तिला जातीवाचक शिविगाळ करून धमकावले. पीडितेने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी विवेकविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि अॅट्रोसिटी अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.




आमचे चॅनल subscribe करा
