

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखेचे पुरस्कार जाहीर
अनिरुध्द वनकर यांना श्रेष्ठ झाडीपट्टी रंगकर्मी पुरस्कार
नागपूर,ता. १२ एप्रिल: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेचा वर्धापनदिन व पुरस्कार सोहळा येत्या १४ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता वर्धापन दिनाचा कार्यक्रम शासनाने दिलेल्या कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून अतिशय साध्या पद्धतीने मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत शाखेच्या कार्यालयात संपन्न होणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात मराठी रंगभूमीवर आपले विशेष योगदान देणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील कर्तृत्ववान यशस्वी रंगकर्मींचा सन्मान व सत्कार दरवर्षी नागपूर शाखेतर्फे करण्यात येतो. मात्र या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा कोणत्याही विशिष्ट जागेवर न घेता सत्कारमूर्ती यांच्या सन्मानार्थ त्यांच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करन साजरा करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व मानधन असे आहे.
मराठी रंगभूमी वर केलेल्या यथोचित कार्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमासाठी या सत्कार मूर्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा नागपूर मनापासून अभिनंदन करीत आहे.
यंदाच्या पुरस्काराचे मानकरी-
लक्ष्मीकांत देशपांडे ( अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखा पुरस्कृत ) जीवन गौरव,
मृणाल पुराणिक – ( भाऊसाहेब सप्रे स्मृती पुरस्कार ) ज्येष्ठ रंगकर्मी,
देवेंद्र दोडके – ( देवाशिष रॉय स्मृती ) श्रेष्ठ रंगकर्मी
श्याम पेठकर – ( राम गणेश गडकरी स्मृती ) सर्वोत्कृष्ट लेखक ,
चारुदत्त जिचकार – (स्व. कुसुमताई भुसारी स्मृती ) रंगसेवा पुरस्कार ,
दिलीप वढे – ( स्व. सुमंत गडेकर स्मृती ) झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी,
अनिरुध्द वनकर – ( स्व. सुमंत गडेकर स्मृती ) झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार
राम भाकरे ( स्वर्गीय. दिनकर देशपांडे स्मृती) नाट्य समिक्षा गौरव
सत्कारमूर्तींचा अल्पसा परिचय-
लक्ष्मीकांत देशपांडे
लक्ष्मीकांत देशपांडे हे नाट्य सृष्टीत एल. वाय. म्हणून ओळखले जातात. अनेक नाटकात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून यशस्वी कार्य त्यांनी केले. गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव मधून रंगकर्मी या नात्याने कार्य करतानाच कामगार नाट्य स्पर्धा, राज्य नाट्य महोत्सव, व्यावसायिक नाटक असा त्यांचा प्रवास सुरू झाला. अर्ध्याच्या शोधत दोन,एक पप्पा एक मम्मी, संगीत देवमाणूस, ही नाटके त्याकाळी विशेष गाजली. का? असं का? या नाटकापासून खऱ्या अर्थाने दिग्दर्शना ला सुरुवात झाली. अनेक पारितोषके प्राप्त नाटक ‘विदूषक’ हे नाटक रसिकांच्या कायम स्मरणात राहील. या नाट्य प्रवासात पहिला राजा, मिकी मेमसाब,सरी ग सरी, कन्यादान, कमला आणि यकृत या नाटकांचा विशेष उल्लेख करावा लागेल. वाळूचं घर या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला होता. ती फुलराणी, छुमंतर, खरं सांगायचं तर,नटसम्राट या नाटकांचे यशस्वी दिग्दर्शन. लक्ष्मीकांत देशपांडे दिग्दर्शित नातीगोती आणि सविता दामोदर परांजपे या नाटकांनी वेगळी उंची गाठली.

मृणाल पुराणिक-
मृणाल पुराणिक यांचा ४५ वर्षांचा नाट्य क्षेत्रातील अभिनेत्री म्हणून यशस्वी प्रवास आहे. हिंदी आणि मराठी नाट्य स्पर्धेत उत्कृष्ठ अभिनयासाठी अनेक सुवर्ण पदक त्यांना प्राप्त झाली आहेत. स्मिता पाटील स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मराठी रंगभूमी वरील ज्येष्ठ अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर यांच्या सोबत ’तो मी नव्हेच’ या नाटकात भूमिका.फय्याज, रमेश भाटकर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम .एकापेक्षा एक सरस अश्या नामांकित दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनात अभिनय. नागपूर दूरदर्शन, दूरदर्शवरील मालिका तसेच मराठी चित्रपटातून सुध्दा मृणाल पुराणिक यांनी काम केलं आहे.

देवेंद्र दोडके-
देवेंद्र दोडके यांनी नाटक, चित्रपट आणि मालिका या क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून विशेष ओळख निर्माण केली आहे. जवळपास २५ वर्षांहून अधिक झाडीपट्टीच्या रंगभूमीची सेवा करीत हजारोंच्या वर प्रयोगात अभिनेता, लेखक, दिग्दर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य. ‘ते दोन दिवस’ या मराठी चित्रपटाचं त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केलं आहे. नुकतंच व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं व सामाजिक भान जपणारं, कोरोना सारख्या ज्वलंत विषयावर ‘गोविंदा इन लॉकडाऊन’ हे नाटक लिहिलं. आघाडीची झी टीव्हीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत देवेंद्र दोडके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

श्याम पेठकर-
श्याम पेठकर यांनी इ टीव्हीवरील ‘टिकल ते पोलिटिकल ’या प्रहसनात्मक मालिकेसाठी लेखन केलं आहे. ‘रगतपिती’ नावाचं नाटक ३९ व्या राज्य नाट्य स्पर्धेत महाराष्ट्रातून सर्वाधिक पारितोषिक प्राप्त करून प्रथम आले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या बहुभाषिक राष्ट्रीय फेस्टिवल मध्ये लिखित नाटकाचा प्रयोग झाला. एक होता माणूस,बंदी क्रमांक सत्तावन्न-त्र्याण्णव या वेगळ्या विषयावरील नाटकांचे त्यांनी लिखाण केले . कथा,कादंबरी,चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि संपादकीय कार्य ही त्यांची जमेची बाजू.‘दाभोळकरांचे भूत’ हे नाटक अत्यधिक चर्चेचा विषय ठरला हाेता. ‘तेरवं’ नाटक श्याम पेठकर यांच्या लेखणीला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.

दिलीप वढे-
दिलीप वढे हे झाडीपट्टी रंगभूमी वरील नाटककार. व्ही. दिलीपकुमार म्हणून ओळखले जातात. लेखक,दिग्दर्शक,अभिनेता म्हणून विशेष ओळख. १९८५ साला पासून त्यांनी नाटक लिहायला सुरूवात केली. ‘शापित सौदर्य’ हे पहिलं नाटक. आतापर्यंत ५८ नाटकांचे लेखण.‘वंदे मातरम्’ या नाटकांचे असंख्य प्रयोग करत वेगळा इतिहास त्यांनी निर्माण केला आहे. पेटली मशाल क्रांतीची,नशीब, माझा काय गुन्हाख विध्वंस,तपस्या,अग्निकुंड, घेऊन जागे मारबत.यांसारख्या प्रत्येक नाटकांचे ५०० पेक्षा अधिक प्रयोग करण्याचा मान दिलीप वढे यांच्या नाटकाला मिळाला आहे.

अनिरुध्द वनकर –
अनिरुध्द वनकर हे मूळचे चंद्रपूरचे रहिवासी असून राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील रेपर्टरी कंपनी मधे कलाकार म्हणून त्यांनी संपूर्ण भारतात नाटक सादर केलेले आहे. नागपूर विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागातून पदवी प्राप्त केली तसेच समाजशास्त्रात एम्. ए. केले आहे. नेहरू सेंटर मुंबई येथील ‘डिप्लोमा इन ड्राम्याटिक’ व लोककला अकादमी मुंबई येथील पी. जी. डिप्लोमा पदवी शिक्ष ण त्यांनी घेतले आहे. शाहीर अमर शेख अध्यासन केंद्रातून त्यांनी समन्वयक म्हणून विदर्भाची लोककला दंडार यावर संशोधन केले आहे. झाडीपट्टी रंगभूमी वर अभिनेता,गायक, दिग्दर्शक, निर्माता अश्या विविध भूमिकांमधून त्यांनी आजपर्यंत २५ वर्षात आपली कारकीर्द गाजवली आहे. झाडीपट्टी रंगभूमी वर घायाळ पाखरा,मूठभर तांदूळ, स्मशान पेटलं आहे, प्ल्याटफॉर्म नंबर तीन. हंबरडा, आईचं काळीज अशी अनेक नाटकं सादर केली आहेत. निर्मिती केलेल्या नाटकांचे भारत रंग महोत्सव नवी दिल्ली व आसाम, मणिपूर,मुंबई,पुणे,राजस्थान व केरळ येथील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सादरीकरण.डॉ. प्रकाश बाबा आमटे, तिचं चुकलं तरी काय,ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस या चित्रपटातून भूमिका. अनिरुद्ध वनकर यांना महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी व्यसन मुक्ती सेवा पुरस्कार बहाल.याशिवाय आंबेडकर रत्न पुरस्कार व लोकसूर्य पुरस्कारांचे मानकरी.

चारुदत्त जिचकार-
चारुदत्त जिचकार हे तसं पाहिलं तर संगीत क्षेत्रातील आघाडीचं नाव. अनेक वर्षांपासून त्यांचं संगीत,नाटक,नृत्य क्षेत्रातील कार्य खूप मोठं आहे. बोटांवर मोजता येणार नाही अश्या असंख्य नाटके तसेच महानाट्यांना संगीत व पार्श्वसंगीत त्यांनी दिले. प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होत असलेल्या अनेक नाटकांना त्यांच्या ढोलकीची साथ मिळाली आहे. एक उत्तम ध्वनिमुद्रक आहेत. निव्वळ संगीतच नाही तर अनेक महानाट्यांना त्यांच्या आवाजातील संवादाची साथ मिळाली आहे. कवी,संगीतकार अश्या वेगवेगळ्या भूमिका पार पाडत आहेत.

राम भाकरे-
पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव असलेले राम भाकरे गेल्या २० वर्षांपासून सातत्याने नाटकांचे समीक्षण करत आहेत. नाटकाचे सखोल अभ्यासक म्हणून अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील नाटक असो वा व्यावसायिक रंगभूमी वरील नाटकांचे समीक्षणाची जवाबदारी चोखपणे ते निभावत असतात. स्वतः एक उत्तम शास्त्रीय गायक असलेले राम भाकरे यांचे नाट्य समीक्षण पश्चिम महाराष्ट्रातील तसेच विदर्भातील रसिक मंडळी, कलावंत मंडळी व वाचक वर्ग मोठ्या आवडीने वाचतात.




आमचे चॅनल subscribe करा
