

नवनीत राणांच्या एमआरआय प्रकरणात उच्च विद्याभूषित डॉक्टर्स वर्ग दोन तास वेठीस
अवघ्या महाराष्ट्राने बघितला हाय प्रोफाईल मेलोड्रामा:‘सत्ताधारी’ शिवसेनेच्या वर्तनात कोणतीही सुधारणा नाही
नागपूर,ता.९ मे २०२२: ‘खासदार‘नवनीत राणा व अमरावतीचे आमदार रवी राणा यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी हनुमान चालीसा पठणावरुन झालेला राडा हा आता महाराष्ट्रातील जनतेला मुखोद् गत झाला आहे.यात ‘कायदेशीररित्या व फायदेशीररित्या’ देशाच्या या खासदार व आमदारांना महराष्ट्रात अटक ही होते,खटला ही चालतो,कारागृहाची शिक्षा ही होते,अटी व शर्थींसह जामीन ही मिळतो यानंतर नवनीत राणा या मुंबईच्या सुप्रसिद्ध लीलावती रुग्णालयात दाखल ही होतात,त्यांचा एमआरआयही काढला जातो,तो काढत असताना ‘फोटो सेशन’ही होतो,ते फोटो माध्यमांमध्ये व्हायरल ही होतात यानंतर मात्र यानंतर सत्ताधारी शिवसेनेची पाळी येते, शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे व मुंबई मनपाच्या महापौर किशाेरी पेडणेकर,शिवसेनेच्या युवा संघटनेच्या ‘इंग्रजी’ बोलणा-या कार्यकर्त्यांसोबत सरळ लीलावतीत धडक देतात,या रुग्णालयातील प्रशासनातील वरिष्ठ व सन्माननीय विभूतींना रांगेत उभे केले जाते व राणा यांचा एमआयआर खरा की खोटा?असा जाब विचारला जातो.शिवसेनेच्या दोन जबाबदार महिला लोकप्रतिनिधींकडून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात आज जे काही ‘महानाट्य’ घडवण्यात आलं ते बघून अवघा महाराष्ट्र संतप्त झाला आहे. शिवसेनेच्या या दोन महिला लोकप्रतिनीधिंनी स्वत:कडे न्याय निवाडा करणा-या ‘प्रति न्यायाधीशांची’ भूमिका घेऊन समाजातील ज्येष्ठ व सन्मानीय वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्सवर आरोप-प्रत्यारोप ठेऊन, तब्बल दोन-अडीच तास गोर गरीब गरजू रुग्णांना वेठीस धरुन, रुग्णालयातच ज्या पद्धतीने ‘न्यायालय’भरवले,ते बघून महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाला मात्र या दोन महिला लोकप्रतिनिधींचा पराकोटीचा तिटकारा आला.

एमआरआय हा दार बंद करुनच काढला जातो,यावेळी रुग्णासोबत कोणीही नसतं मग नवनीत राणांसोबत नेमकं फोटो काढायला आत कोण होता?आम्हाला सीसीटीव्ही फूटेज द्या,ते सीसीटीव्ही फूटेज आमच्याकडे आधीच आलेले आहेत मात्र रुग्णालयाने अधिकृतरित्या ते आम्हाला आताच्या आता उपलब्ध करुन द्यावे, तोपर्यंत आम्ही येथून हलणारा नाही असं एक महापौर लीलावतीलच्या संचालकांना हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत ऐकवत होत्या.महापौर हे पद म्हणजे ज्यांच्याकडे शहरातील नागरिकांचं पालकत्व असतं,अश्या महापौरांचं शहरातील एका नामांकित रुग्णालयात अश्या प्रकारे ठिय्या मांडून बसणं व डॉक्टर्स,परिचारिका व संबंधित स्टाफला दमदाटी करणं,धमकावणे,इशारा देने,घालून पाडून बोलणे हे भारतातीलच काय जगातील कोणत्याही महापौर पदावर असणा-या लोकप्रतिनधीला न शोभणारं वर्तन होतं.
आमदार मनीषा कायंदे या त्यांच्याही दोन पाऊले पुढे जाऊन ज्या तार सप्तकात डॉक्टर वर्गाला दमदाटी करीत होत्या,नियमांवर बोट ठेवीत होत्या,एमआरआय काढताना नवनीत राणा यांनी बेल्ट घातला नव्हता,त्यांनी नेमकी मान कशी काय उंच केली,स्पॉनडिलीसीसचा रुग्ण मान उंच करुन फोटो काढू देऊ शकतो का?अश्या प्रश्नांचा त्यांनी कीस पाडला ते बघून मुंबई व महाराष्ट्रातले सगळे प्रश्न संपलेत का?अशी आशा पल्लवीत झाली!
शिवसेनेचे धडाडीचे युवा सेनेचे पदाधिकारी हे देखील ज्या भाषेत व ज्या आवाजाच्या पट्टीत लीलावतीच्या सन्माननीय डॉक्टर्स लोकांवर डफरत होते,प्रश्नांचा भडीमार करुन त्यांना कोंडीत पकडत होते ते बघून ’कुठे नेऊन ठेवला शिवसेनेने माझा महाराष्ट्र!’अशी म्हणायची वेळ मराठी माणसांवर आली.
मूळात नवनीत राणा या,या देशातील खासदार आहेत त्या काही सामान्य रुग्ण नाहीत,त्यांना केंद्राने सुरक्षा देखील प्रदान केली आहे,त्यांच्यासोबत रुग्णालयातील त्यांच्या कक्षात अगदी आतपर्यंत कोण कोण जातंय हे पाहण्यासाठी लीलावतीचे संचालक,डॉक्टर्स व स्टाफकडे इतका रिकामा वेळ तरी होता का?नवनीत राणा यांनी देखील कारागृहातून सुटका झाल्यानंतर ज्याप्रकारचे नाट्य घडवले ते लीलावतीच्या डॉक्टर्स व स्टाफला अडचणीत आणनारेच होते.नियम हे सर्वांसाठीच सारखे असायला हवे मात्र म्हणतात ना ’कायदा सर्वांसाठी समान असतो मात्र काहींसाठी तो जास्त समान असतो!’तेच या प्रकरणात देखील घडले.
लीलावतीच्या प्रशासनाने नियमांचे पालन करायलाच हवे होते,यात कोणालाही शंका नाही मात्र फक्त यासाठी शिवसेनेच्या दोन जबाबदार महिला लोकप्रतिनीधींना रुग्णालयातच चक्क ’न्यायालय’थाटण्याचा, वैद्यकीय क्षेत्रातील सन्मानित व्यक्तींसोबत अरेरावी करण्याचा,धमक्या देण्याचा,संपूर्ण मिडीया समोर पानउतारा करण्याचा हक्क या देशाचा संविधान त्यांना देतो का?
नवनीत राणा यांच्यावर उपचार करताना किवा त्यांचा एमआरआय काढताना नेमके कोण-कोण त्यांच्या कक्षात होते?याची हजेरी या शिवसैनिकांनी ज्या पद्धतीने घेतली ते बघून व ऐकून राज्यातील सुजाण व संवेदनशील मनाच्या नागरिकांनाही अतिशय चीड आली,सगळेच्या सगळे हे न्यायाधीश बनले,सगळेच्या सगळे हे लीलावतीच्या त्या वैद्यकीय अधिका-यांना धमकीवजा सूरात न्यायनिवाडा करण्यास बसले होते,ते बघून या देशात न्याय निवाडा करणारी न्यायालये तरी ’अस्तित्वात’आहे की नाही?असा प्रश्न नागरिकांना पडला.
शिवसैनिकच जर कोणत्याही नियमांचा भंग झाल्यावर न्याय निवाडा करणार असतील तर महाराष्ट्रात न्यायालये तरी कशाल हवीत?नवनीत राणा यांनी तुमच्यावर दबाव टाकला,त्या फोटोग्राफरला आपल्या कक्षात नियमात बसत नसताना सोबत आत घेऊन गेल्या,फोटो,व्हीडीयोज काढले हे ’कबूल’करा असा घोषा या शिवसैनिक रणरागिणींनी लावून धरला.जोपर्यंत तुम्ही हे कबूल करणार नाही,तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही.नवनीत राणा यांच्यावर पोलिस तक्रार करण्यासाठी तुमच्यावर दबाब आणला हे सिद्ध झालंच पाहिजे,असा अट्टहास त्यांनी कायम ठेवला.आताच्या आता सीसीटीव्ही फूटेज देता की नाही?महापौरांचे असे बोलणे म्हणजे ज्या नियमांच्या भंग झाला यासाठी त्यांनी एवढ्या प्रसिद्ध रुग्णालयात ’न्यायालय’भरवले त्या रुग्णालयाकडूनच नियमांचा भंग करुन घेणे त्यांना अपेक्षीत होते का?न्यायालयाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही फूटेज राजकारण्यांच्या हाती देण्याचा नियम भंग करण्यास मात्र वारंवार त्याच बजावत होत्या,हे दृष्य बघून यांना ’नियम’पाळून घ्यायचे आहेत की ज्येष्ठ वैद्यकीय मंडळींकडून नियम तोडून घ्यायचे आहे?असा प्रश्न पडला.
न्यायालयाच्या परवानगीशिवाय सीसीटीव्ही फूटेज राजकारण्यांना देेणे हे कोणत्या नियमात बसतं?
आता लीलावतीच्या प्रशासनानेच शिवसेनेच्या या सर्व पदाधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे.राणा यांना उशी कशी दिली?बेल्ट कुठे होता?मान कशी उंच केली?सुरक्षा होती की नाही?नावे आताच्या आता सांगा,सीसीटीव्ही फूटेज आताच्या आता द्या,राणा यांची एमआरआय रिपोर्ट द्या,राणा यांना अटेण्ड करणा-या स्टाफची नावे द्या,आताच्या आता त्यांना आमच्यासमोर बाेलवा,त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करा,शिवसैनिकांचे हे संगळं अतिशय आेंगळवाणं व संताप येण्यासारखं दृष्य होतं.या सगळ्या दवाबाळा बळी पडून लीलावतीचे संचालक म्हणाले,मी दोषींना कारणे दाखवा नोटीस बजावतो मात्र त्यातही, ही राजकारणी मंडळी ऐकेच ना,त्यांना फक्त जणू राणा यांना रुग्ण म्हणून हाताळणा-यांना,त्यांच्या एमआरआय काढणा-या डॉक्टर व स्टाफला फाशीच द्यायची होती,असाच या दोन्ही महिला राजकारणी व युवा कार्यकर्त्यांचा होरा होता.त्यांच्या हातात असते तर ते ही करुन मोकळे झाले असते.
रुग्णालयात कोणी कसेही वागले ते आम्हाला चालणार नाही,असे महापौर म्हणाल्या मात्र शिवसैनिक हा राज्यात सत्ताधारी असल्याकारणाने ते कुठेही कसेही वागले तरी महराष्ट्राच्या जनतेने ते मुकाट्याने खपवून घ्यायचे,असा अविर्भाव त्यांच्या सूरात दडला होता.
नवनीत राणा यांचे दुखणे हा ‘पार्ट ऑफ ड्रामा’हे जरी सत्य मानले तरी आज शिवसेनेच्या दोन जबाबदार महिला राजकारणी व युवा सेनेच्या सचिवांनी लीलावतीमध्ये जो ’तमाशा’केला तो ही काही राणा यांच्या ड्रामापेक्षा कमी संताप आणणारा नव्हता.
लीलावतीत जाताना या दोन महिला पदाधिका-यांनी सगळा मिडीया आपल्यासोबत रुग्णालयात नेला.त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं होतं? सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका प्रकरणात राजकारण्यांच्या अश्याच मुजोर व मगरुर वृत्तीवर अतिशय कठोर ताशेरे ओढत,तुम्ही लोकप्रतिनिधी आहात याचा अर्थ तुम्ही जनतेचे मालक नाही व जनता तुमची गुलाम नाही असे म्हटले होते.लोकप्रतिनिधी झालात म्हणजे संसाधनावर तुमची मालकी प्रस्थापित होत नाही तर तुम्ही फक्त त्याचे राखणदार असता,अशी कान उघाडणी केली मात्र शिवसेनेवर याचा कोणातही असर झाला नसल्याचे आजच्या घटनेवरुन सिद्ध झाले.
नवनीत राणा व रवी राणा यांच्यासारखे खासदार-आमदार तर कारागृहातून सूटून मुंबईला ’बाय-बाय’म्हणत निघून गेलेत मात्र ज्या रुग्णालयात त्या दाखल झाल्या त्या गोर गरीबांच्या रुग्णालयातील डॉक्टर्स मंडळी व स्टाफला शिवसेनेच्या मगरुर वृत्तीला तब्बल दोन-अडीच तास,त्यांचा कोणताही दोष नसताना सामोरे जावे लागले,संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर जगासमोर बेइज्जत व्हावे लागले.
संपूर्ण देशाच्या आयएमआयने शिवसेनेच्या या मुजोरवृत्तीचा निषेघ नोंदवित,लीलावतीच्या वैद्यकीय अधिका-यांनी आता नियमांचे भंग केले म्हणून नवनीत राणावर तसेच त्यांच्यासोबतच शिवसेनेच्या या सर्व पदाधिका-यांवर अब्रू नुकसानीचा दावा ठाेकावा व दमदाटी केल्याचा,धमक्या दिल्याचा,रुग्णांना वेठीस धरण्याचा,मोलाच्या वेळेचा अपव्यय केल्याच्या गुन्हा नोंदवावा अशीच महाराष्ट्राच्या जनतेशी ईच्छा आहे.




आमचे चॅनल subscribe करा
