

आज पाचव्या दिवशीच्या शोकसभेत मृतक ओमप्रकाश पुरोहितच्या नातेवाईकांचा आक्रोश
मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशींच्या अल्पवयीन मुलाच्या बेदरकार वाहन चालनाने अवघ्या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू!
३ जुलैला होते लग्न: पाच आजोंबांचा एकच होता नातू:वंशाचाच झाला अंत!
किरकोळ जखमी आरोपी अद्यापही ‘आयसीयूत ’ दाखल!
मृतकांच्या बहीणींचे केंद्रिय मंत्री नितीन गडकरींना न्यायासाठी साकडे
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ मे २०२२: मागच्या गुरुवारी १८ मे रोजी सायंकाळी साढे सात वाजताच्या दरम्यान नागपूर शहरात एक दूर्देवी अपघात घडला.सीताबर्डी येथील रहीवासी ओमप्रकाश उर्फ ओमी पुरोहित हा २९ वर्षीय तरुण, अली हतीम चार्टेड अकाऊंटंट यांच्याकडे काम संपवून नेहमीप्रमाणे घरी परतला यानंतर तो त्याच्या मित्रांना नेल्को साेसायटी,टी-पॉईन्ट राणाप्रताप पोलिस स्टेशनअंतर्गत भागात भेटण्यास गेला. याच ठिकाणी आपल्या दुचाकीसह एका वळणावर उभा असतानाच नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांचा १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा, मयंक राम जोशी याने आपल्या भरधाव दुचाकीने ओमी याला जोरदार धडक दिली.ओमी हा दुभाजकावर आदळला व यात त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली.त्याला तातडीने त्रिमूर्तीनगर येथील विवेका हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले मात्र त्याची गंभीर प्रकृती बघता धंतोली येथील सुप्रसिद्ध न्यूरॉन रुग्णालयात त्याला दुस-या दिवशी सकाळी दाखल करण्यात आले मात्र २२ मे रोजी सकाळी साढे सात वाजता त्याचा दु:खद मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूला सर्वस्वी मयंक जोशी हा जवाबदार असून अल्पवयीन मुलाच्या हातात वाहन परवाना नसताना १५० सीसीची दूचाकी देणारे त्याचे पालक राम जोशी व रंजना राम जोशी हे देखील कायदेशीररित्या या मनुष्यवधासाठी तितकेच दोषी असल्याने त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करावी व मृतकाच्या कुटुंबियांना न्याय द्यावा,अशी मागणी आज मृतक ओमी याच्या शोकसभेत कुटुंबियांनी केली.

ओमी हा अविवाहीत होता याशिवाय त्याच्या अश्या पद्धतीने जग सोडून गेल्यामुळे त्याच्या दोन्ही विवाहीत बहीणी,आप्त-स्वकीय,मित्र मंडळी ही फार मोठ्या मानसिक धक्क्यात अाहेत. त्यामुळे हिंदू अंत्यविधीच्या चालीरितीप्रमाणे मृतकाचा दहावा आणि तेरवी,चाैदावीचे विधी टाळून आज पाचव्या दिवशीच, शंकरलाल पचेरीवाल धर्मशाळा,टेंपल बाजार रोड,सीताबर्डी,बुटीवाडा समोर, या सभागृहात अत्यंत शोकाकुल वातावरणात ओमी याची शोकसभा पार पडली.यावेळी भरगच्च असणा-या सभागृहात फक़्त हूंदके आणि अश्रू, संताप आणि आक्रोश हेच दृष्य उमटले होते.ओमी हा आजोबा व चार चुलत आजोबा मिळून पुरोहित वंशात एकुलता एक वंशज होता.लवकरच त्याचा विवाह होणार होता,त्यामुळे पुरोहितांचा वंश तो समोर नेणार याच आनंदात असणा-या नातेवाईक व कुटुंबियांच्या नशीबी नियतीने त्याच्या मृत्यू पश्चात शोकसभेत एकत्रित येण्याचा डाव साधला!
अत्यंत निष्काळजीपणाने आपले वाहन दामटून एका बड्या बापाच्या बिघडैलजाद्याने एक होनहार,मनस्वी,कर्तबगार तरुणालाच आयुष्यातून उठवले,एवढंच नव्हे तर एका तरुणीच्या स्वप्नांचा देखील अक्षरश: चुराडा केला! या अपघाताच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितले की हा अपघात घडला त्यावेळी मयंक जोशी याला हाताला फक्त खरचटले होते,त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नव्हती.आता तर त्याच्या हाताची खिपली देखील बरी झाली असेल,असे असतानाही मयंक याच्यासाठी कायदेशीररित्या पळवाट शोधण्यासाठी व गुन्ह्यापासून संरक्षण देण्यासाठी त्याला आयसीयूत दाखल करुन ठेवण्यात आले असल्याचा आरोप मृतकाच्या कुटुंबियांनी केला.
अपघात झाल्यावर मंयक हा तीन तास साधारण केच्यूअलटीमध्ये बसला होता मात्र त्याच्या वडीलांची ‘पत’ नागपूरातील सर्वच खासगी रुग्णालयात असल्याने व महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे ते कायदेशीर सर्वेसर्वा असल्याकारणाने, खासगी रुग्णालयांना अडचणीत आणू शकतील या दबावाखालीच विवेका रुग्णालयाने मयंक याला आयसीयूत दाखल करुन ठेवले आहे,ही मृतक ओमी या जगात नसणा-या अवघ्या २९ वर्षीय तरुणाला न्याय न मिळू देण्याचीच खेळी असून मृतकाच्या कुटुंबियांची एक प्रकारे प्रतारणाच केली जात असल्याचा आक्रोश त्यांनी व्यक्त केला.
कोविडच्या महाभयंकर प्रकोपाच्या काळात मनपाचे अति.आयुक्त राम जोशी यांचे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांसोबत जे ‘अर्थपूर्ण’ साटेलोटे होते त्या सर्व बातम्या प्रसार-प्रचार माध्यमातच प्रसिद्ध झाल्या आहेत.त्यामुळेच मयंक, विवेका रुग्णालयामध्ये पोहोचण्याआधीच राम जोशी तिथे त्याचे स्वागत करण्यास सज्ज होते,असा तीव्र संताप यावेळी मृतक ओमीच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.
एवढंच नव्हे तर ओमीच्या अपघातानंतर ओमीचे नातेवाईक हे जेव्हा राणाप्रताप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले तेव्हा राम जोशी हे वरील माळ्यावर परिमंडळ-३ चे उपायुक्त लोहित मतानी व पोलिस निरीक्षक चव्हाण यांच्यासोबत कॉफी पीत बसले होते,असा धक्कादायक आरोप याप्रसंगी नातेवाईकांनी केला.
राम जोशी हे सरकारी नोकर आहेत.आपली सरकारी नोकरी सोडून ते एका तरुणाचा ऐन तारुण्यात अकाली जीव घेणा-या आपल्या अपराधी मुलाला कायदेशीर बाबींपासून वाचविण्यासाठी, नागपूरकर जनतेसाठीचे आपले सरकारी काम सोडून, पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते,यासाठी त्यांनी नियमानुसार सुटी टाकली होती का?मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांची परवानगी घेऊन आपले सरकारी काम सोडून ते खासगी रुग्णालय व राणा प्रताप नगरच्या पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते का?असा संततप्त सवाल त्यांनी केला..
सामान्य जनतेला एक न्याय व सरकारी नोकरशाहीला या देशात वेगळा न्याय,असे आम्ही होऊ देणार नाही,आम्हाला न्याय हवा आहे,मयंकच्या अल्पवयीन असण्याबाबत देखील त्याचे वय लपविण्याचा प्रयत्न राणा प्रताप पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचा आणखी एक धक्कादायक आरोप यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी केला.एफआयआरमध्ये हेतूपुरस्सर मयंक याच्या वयाचा उल्लेख टाळण्याचा प्रयत्न करण्यात अाला होता,असे त्यांनी सांगितले.
आश्चर्यकारक बाब म्हणजे ओमीचा मृत्यू हा २२ मे रोजी सकाळी साढे सात वाजताच्या दरम्यान झाला असताना राणा प्रताप पोलिस ठाण्यातील अहवालात १८ तारेखालाच मृत्यू व शवविच्छेदन झाल्याचे नमूद करण्यात आले!ओमीच्या नातेवाईकांनी ओमीचा मृत्यू २२ तारखेला झाला असून त्याच दिवशी शवविच्छेदन झाले असल्याची ‘खरी’कागदपत्रे पोलिसांना दिली व आपल्या अहवालात राम जोशीच्या मुलाला झुकते माप देण्यापासून रोखले असा धक्कादायक आरोप देखील याप्रसंगी ओमी याच्या नातेवाईकांनी केला.
आठच दिवसांपूर्वी मयंकने सीपी क्लबसमोर देखील केला होता अपघात!
या घटनेच्या आठच दिवसांपूर्वी राम जोशी यांच्या अल्पवयीन कर्तबगार सुपुत्राने सिव्हिल लाईन्स येथील सीपी क्लबसमोर देखील एका चारचाकीवाल्याला ठोकले असल्याची माहिती समोर आली आहे.ओमी याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांमध्ये घडलेल्या चर्चेत ही बाब समोर आली असल्याचे खास ‘सत्ताधीश’ला सांगण्यात आले.त्या घटनेत कारवाल्यासोबत पैश्यांची देवाण-घेवाण करुन प्रकरण मिटविण्यात आले अशी माहिती कानी पडली असल्याचे ओमी याच्या काही नातेवाईकांनी सांगितली.आम्ही याचे पुरावे देखील गोळा करण्याचे प्रयत्न केले मात्र त्या दूर्घटनेची तक्रारच पोलिसांकडे नोंदवण्यात आली नसल्याने पुरावे मिळू शकले नाही,असे त्यांनी सांगितले.
मात्र राणा प्रताप पोलिस ठाण्यात राम जोशी,रंजना जोशी व मयंक जोशी याच्याविरुद्धची तक्रार नोंदविण्यास गेेले असता तिथे आधीपासूनच राम जोशी बसलेले होते,यासोबतच त्यांना पोलिसांकरवी मिळत असलेली ‘व्हीआयपी’ वागणूक बघून ओमीच्या नातेवाईकांचा संताप अनावर झाला व पोलिसांसमोरच राम जोशी यांना काही नातेवाईकांनी या अपघातापूर्वी सीपी क्लब समोर घडलेल्या घटनेबाबत विचारले असता त्यांनी अशी कोणतीही घटना घडली नाही,असा स्पष्ट नकार दिला मात्र त्यांच्या चेह-यावरचा रंग उडालेला होता,ते खोटे बोलत होते,असे या नातेवाईकांचा आरोप आहे.
गडकरींकडूनही न्यायाची अपेक्षा-
मृतक ओमीच्या दोन्ही विवाहित बहीणींनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे निवेदन तयार केले असून नागपूर शहराचे खासदार म्हणून त्यांनी जातीने या घटनेत लक्ष घालावे व पिडीतांना न्याय मिळवून द्यावा,अशी अपेक्षा त्या व्यक्त केली.नागपूर शहर हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याच पक्षाची गेल्या पंधरा वर्षांपासून सत्ता असणा-या नागपूर महानगरपालिकेतील एखाद्या मुजोर नोकरशाहाचा बेजवाबदार दिवटा, हा बेदरकारपणे दुचाकी चालवून एखाद्या उमद्या तरुणाचा जीव घेत असेल तर खासदार म्हणून त्यांनी आपल्या नागरिकांच्या न्याय हक्काच्या पूर्ततेसाठी पुढाकार घ्यावा व आम्हाला न्याय मिळवून द्यावा,असे ओमी याच्या कुटुंबियांनी सांगितले.
उद्या २७ मे रोजी गडकरी यांचा ६६ वा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी हातून कोणतेतरी पुण्यकर्म घडावे अशी संतांची शिकवण आहे त्यामुळे गडकरी यांनी राम जोशी यांच्यासारख्या पुत्रावर आंधळे प्रेम करणा-या व निष्पापांचा जीव घेणा-या ‘धृतराष्ट्राला‘मनपातून तडीपार करावे,अशी आमची ईच्छा असल्याचे हे संतप्त आप्त सांगतात.
राम जोशी यांच्यासारख्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या सनदी अधिका-याला कोणता राजकीय पक्ष व कोणते नेते सातत्याने पाठीशी घालत आहेत?त्यांची चंद्रपूरला झालेली बदली रद्द करुन पुन्हा नागपूरकरांच्या जीवावर उदार होण्यासाठी त्याच पदावर कायम ठेवण्यास कोणकोणत्या राजकीय नेत्यांना स्वरस्य होतं?जनतेला सर्व माहिती आहे,जनता इतकी मूर्ख नाही,असा संताप व्यक्त करीत राम जोशी यांची बदली सत्ताधा-यांनी आघाडी सरकारला साकडे घालून थांबवली नसती तर कदाचित आज…..ओमी जिवंत असता….अशी देखील हताशा या वेदनामयी काळजातून व्यक्त झाली….!ओमीवर आपल्या ७० वर्षीय मोठ्या आईची जवाबदारी होती,त्या मोठ्या आईची अवस्था शब्दात ही वर्णिता येत नाही.या वयात त्या पुन्हा एकदा ओमीच्या जाण्याने निराधार झाल्या आहेत!
गडकरी यांच्यासोबतच पोलिस आयुक्त अमितेशकुमार,विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी या सर्वांकडे निवेदन देणार असल्याचे ते सांगतात.काहीही झाले तरी आम्हाला ओमीच्या आत्म्याला न्याय मिळवून द्यायचा आहे,त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,असा निर्धार ते व्यक्त करतात.
शांततापूर्ण मेणबत्ती मोर्च्यालाही पोलिसांनी दिली गल्लीपर्यंतच परवानगी!
ओमी याच्या दूर्देवी मृत्यूनंतर सीताबर्डी येथील संपूर्ण परिसरातील नागरिकांतर्फे विशाल मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला मात्र सीताबर्डी पोलिसांनी त्यांना फक्त गल्लीतून झीरो माईल चौकापर्यंतच मोर्चा काढण्याची परवानगी बहाल केली.यावर देखील संतप्त नागरिकांनी पोलिसांची सूचना झुगारुन हा मोर्चा व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत नेला व या ठिकाणी ‘राम जोशी हाय-हाय’चे जोरदार नारे लावले.
एकीकडे राजकीय पुढा-यांना विशाल सभा घेण्यासाठी सहज परवानगी प्रदान करणारा पोलिस विभाग मात्र एका मृतक तरुणाच्या न्याय हक्कासाठी शांततापूर्ण निघणा-या मोर्च्याला हेतुपुरस्सर अडविण्याचा प्रयत्न करतात यावर देखील चांगलाच संताप व्यक्त झाला.
मयंक राम जोशीवर कलम २७९,३३८ व ३०४(अ)अन्वये गुन्हे दाखल-
मयंक राम जोशी या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणावर राणा प्रताप नगर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम २७९ म्हणजे अपघाताचे कलम,कलम ३३८ म्हणजे जिवित आणि वित्त हानी करणारे कृत्य करने तसेच कलम ३०४(अ) म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे मात्र असे असले तरी मयंक हा अल्पवयीन असल्याने त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही असे उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ॲड.सुधीर माळोदे सांगतात.कलम ३०४(अ)या गुन्ह्यासाठी तर ७ ते ८ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तो अल्पवयीन गुन्हेगार असल्याने त्याला अटक देखील होणार नाही.त्याला बाल न्यायालयात घेऊन जाण्यात येईल.न्यायालयात त्याच्या पालकांकडून बॉण्ड लिहून घेण्यात येईल की पुन्हा अशी कृती त्याच्याकडून घडणार नाही,हे हमीपत्र लिहून घेण्या पलीकडे मयंक याला शिक्षा होणे दुरापस्तच असल्याचे ॲड.माळोदे सांगतात.
मात्र मयंक हा तरी अल्पवयीन असला तरी परिवहन विभागातून संकलित केलेल्या नोंदीप्रमाणे अपघातात वापरण्यात आलेली दुचाकी ही राम जोशी यांच्या पत्नी रंजना जोशी यांच्या नावे आहे.त्यामुळे सेक्शन १९९(अ) मोटर व्हिकल एक्ट अंडर ड्रायव्हिंग गारर्डियन्स लायबल फॉर इन्प्रिसनमेंट अंतर्गत मयंक याच्या आई-वडीलांना तीन वर्षांची शिक्षा व २५ हजार रुपयांपर्यंत दंड मिळावा यासाठी आमचा न्यायालयीन लढा सुरु असणार आहे,असा निर्धार देखील ओमी याच्या शोकसभेच्या वेळी त्याचे आप्तस्वकीय व्यक्त करतात.
आज भरगच्च भरलेल्या आेमीच्या या शोकसभेत प्रत्येकाचे डोळे अश्रूंनी भारलेले होते.ओमीची तरुण मित्र मंडळी सैरभैर झाली होती.वयस्क आप्तजन आपली मति जणू हरवून बसले होते,ओमीच्या दोन्ही बहीणी विलाप करत होती,ओमीच्या परिसरातील नागरिकांनीही या सभागृहात दाटीवाटीने जागा मिळवली व ओमीच्या छायाचित्राला नजर भरुन बघत होती.शब्द हरवले होते,कंठ दाटला होता,मन वेदनेने दग्ध होते,प्रत्येकाला फक्त त्यांचा ओमी परत हवा होता.राजबिंडा,हसरा,मनमिळावू ओमी…!
या सभागृहातून बाहेर पडताना एका मशहूर शायरीच्या ओळी नकळत कंठात दाटून आल्या ’ना रोने की सजा है ना रोते रहने की सजा है,ये जिंदगी तो सिर्फ दर्द को सहने की सजा है…..!




आमचे चॅनल subscribe करा
