फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशराहूल गांधी जिंदाबाद नाही ‘संविधान’जिंदाबाद...

राहूल गांधी जिंदाबाद नाही ‘संविधान’जिंदाबाद…

Advertisements

राहूल गांधी देशाचे ‘राजकुमार’ नाहीत,जामिनावर असलेले आरोपी

आंदोलन म्हणजे सत्याग्रह नाही

इंदिरा गांधी आणि राहूल गांधींच्या आंदोलनाचा ‘योगायोग’

नागपूर(Nagpur),ता.१३ जून २०२२: काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी व पक्षाचे खासदार राहूल गांधी (Rahul Gandhi)यांना सक्तवसुली संचालयानाने(ईडी) मंगळवार १ जून रोजी समन्स बजावले होते.यामुळे देशातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दोन हजार कोटींच्या नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्रासंबंधी आर्थिक घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ईडीने या दोघांना नोटीस बजावली होती.दिल्ली उच्च न्यायालयाने हे दोन्ही आरोपी, समाजाशी जुळलेले असल्याने ते न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही बाधा उत्पन्न करणार नाही, व केंद्रिय तपास यंत्रणेने जेव्हा कधी चौकशीसाठी बोलवेल तेव्हा ते यंत्रेनेला सहकार्य करतील या अटीवर जामीन मंजूर केला होता मात्र १ जून रोजी ईडीने या दोघांनाही समन्स बजावताच राहूल गांधी हे आज ईडीसमोर ज्या अर्हिभावात उपस्थित झाले व फक्त चौकशीसाठी गेले असता संपूर्ण देशभर ’सत्याग्रह’च्या नावावर जाे धुडगुस घालण्यात आला,ते बघता काँग्रेस पक्षाच्या तथाकथित सत्याग्रहात जरी ‘राहूल गांधी जिंदाबाद’चे नारे लागत होते तरी त्या ऐवजी ’देशाचा संविधान जिंदाबाद’चे नारे लागले असते तर ते जास्त सार्थक ठरले असते.

देशातील एका उच्च न्यायालयाने एका प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला आहे,कायदा समाेर सर्व समान असतात त्यामुळे धुडगुस घालून,शक्ती प्रदर्शन करुन,जिंदाबाद,मुर्दाबादचे नारे लावण्या ऐवजी स्वाभिमानाने चौकशीस सामोरे गेले असते तर त्यांच्या विषयी निदान सहानुभूतीची आणि आदराची भावना मना-मनात तरी निर्माण झाली असती.

राहूल गांधी या देशाचे ‘अभिषिक्त सम्राट किवा राजकुमार’नाहीत,ते एक लोकप्रतिनिधी आहे हे विसरुन चालणार नाही.गांधी परिवार म्हणजे देशाचा भाग्यविधाता ही नाही मात्र आज ज्याप्रमाणे एवढ्या गरिमामय पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी गांधी घराण्याप्रति चाटूकारितेची सीमा ओलांडली ते बघता या पक्षाचे राजकीय पतन एवढ्या वेगाने का झालं?याचं उत्तर मिळतं.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना २०१९ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात अटक झाली,१०६ दिवस ते तुरुंगात होते त्यावेळी गांधी घराण्याला रस्त्यावर उतरुन आपल्या या ज्येष्ठ नेत्यासाठी ‘सत्याग्रह’करण्याची गरज भासली नाही.चिदंबरम यांचे पुत्र कार्तिकेय यांना देखील २०१८ मध्ये अटक झाली,ते २२ दिवस तुरुंगात होते मात्र पक्ष स्तरावर ‘खामोशीच’होती.यापूर्वीही काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्यावर स्वत:चे सरकार वाचविण्यासाठी खासदारांना विकत घेतल्याचे गंभीर आरोप झालेत त्यावेळीही काँग्रेस पक्षाच्या अस्तिमेसाठी रस्त्यावरचा ’सत्याग्रह’नदारद होता.

ज्या यंग इंडिया शेअर होल्डरशी जुळलेल्या प्रकरणासंबधी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पवनकुमार बंसल यांना ईडीने समन्स बजावला व त्यांची प्रदीर्घ चौकशी केली.हरियाणाचे मुख्यमंत्री हूडा यांना वारंवार ईडीसमोर हजर व्हावे लागले तेव्हा ही कॉग्रेसचा रस्त्यावरचा सत्याग्रह कुठेच दिसला नाही मात्र सोनिया गांधी व राहूल गांधींना चौकशीसाठी समन्स जाताच ते ‘कायदा आणि संविधानापेक्षाही’किती तरी मोठे ठरतात!

आज देशभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सत्याग्रहाच्या नावाने जो ‘धुडगुस’घातला त्याला तर आंदोलनाच्या श्रेणीत ही बसवता येत नाही.आंदोलने हे आपल्या न्याय मागणीसाठी शांततेत केले जाते,भाषणे होतात,भूमिका मांडली जाते,देशातील जनतेला आंदोलनामागील भूमिका पटवून दिली जाते मात्र आज असे घडले का?सोनिया व राहूल हे देशाचे महान नेते आहेत त्यामुळे ते देशातील कायद्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत,त्यांना कोणत्याही चौकशी यंत्रणेनी चौकशीसाठी बोलावू नये,न्यायालयांनी शिक्षा करु नये,असेच काँग्रेसच्या काही पराकोटीच्या चाटूकार नेत्यांना,पदाधिका-यांना व कार्यकर्त्यांना देशातील जनतेला दाखवून द्यायचे होते का?हे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन ठरत नाही का?का म्हणून त्यांचा जामीन रद्द होऊ नये?

यापूर्वी २०१० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे मुख्यमंत्री असताना दंगली संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या एसआयटी समोर चौकशीसाठी उपस्थित रहावे लागले होते.मुख्यमंत्री पदी असतानाही ते राहूल गांधींसारखा लावाजामा सोबत घेऊन गेले नाहीत,ना गुजरातच्या जनतेने कोणतेही शक्ती प्रदर्शन केले.ते एकटेच आपल्या वाहनाने चौकशी समितीसमोर हजर झालेत.पाण्याची बाटली ही त्यांनी सोबत नेली होती.समितीने चहाचा दिलेला प्रस्तावही त्यांनी नाकारला आणि कोणताही खंड न पाडता सलग मला प्रश्‍न विचारा,अशी विनंती त्यांनी समिती सदस्यांना केली.९ तास मोदी यांची चौकशी करण्यात आली.

तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारला काहीही करुन मोदींना दंगलीच्या आरोपात गोवायचे होते मात्र चौकशी समितीच्या अध्यक्षांनी मोदी यांना क्लिीन चिट दिली,यामुळे दिल्लीश्‍वर अर्थात गांधी घराणे पराकोटीचे नाराज झाले.या चौकशी समितीचे प्रमुख आर.के.राघवन होते,राघवन यांनी लिहलेल्या आपल्या पुस्तकात ’मोदी यांना क्लिन चिट दिल्याने माझीही हेरगिरी करण्यात आली,माझे फोन टॅप करण्यात आल्याचा खुलासा केला आहे!

कालाय तस्मै नम:’आज १२ वर्षांनंतर कालचक्र पूर्णपणे फिरले असून सत्ताधारी हे चौकशीच्या फे-यात अडकले आहेत तर संशयित आरोपी ‘सत्ताधीश’ झालेत.भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची बाबरी मज्सिद प्रकरणात १९९६ ते १९९८ दरम्यान अनेकदा चौकशी समितीसमोर हजर व्हावे लागले,त्यांनी लगेच उपपंतप्रधान पदाचा राजीनामा दिला व मी निर्दोष सिद्ध होईपर्यंत पद स्वीकारणार नाही,असे जाहीर केले.तत्कालीन दिल्लीचे मुख्यमंत्री मदनलाल खुराणा यांनीही चौकशी सुरु असल्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला.अर्थात ही बाब नैतिकतेला धरुनच होती.आज ही देशात लोकप्रतिनिधींची छवि ही स्वच्छ असायलाच हवी अशी मतदारांची अपेक्षा असते.राहूल गांधी हे देखील याच देशाचे एक लोकप्रतिनिधी आहेत त्यामुळे केंद्रिय तपास यंत्रणेसमोर चौकशीसाठी उपस्थित राहने,हा त्यांनी एखाद्या देशाच्या राजकुमाराप्रमाणे ‘अहंकाराचा’प्रश्‍न करने योग्य नव्हते,महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या आव्हानाला एवढ्या गरिमामय पक्षाच्या सुजाण पदाधिका-यांनीही प्रतिसाद द्यायला नको होता..

असे न घडता उलट आज दिवसभर काँग्रेसच्या सोशल मिडीयावर ही सामान्य बाब ‘असामान्य’म्हणूनच ट्रेंडमध्ये राहीली.काँग्रेसच्या ट्टीटर हँडलवर तर ’तानाशाह कान खोलकर सुनले ये गांधी का वंशज है,इसे रोक नही पाओगे,सच की लडाई में राहूल से जीत नही पाओगे’’राहूल गांधी से भाजपाई हूकूम का डर’असे मॅसेज व्हायरल होत होते.मूळात राष्ट्रपिता महात्मा गांधींचे राहूल गांधी हे कोणत्या अर्थाने वंजश होतात?हा प्रश्‍न मॅसेज व्हायरल करणा-यांनाही पडला नाही.महात्मा गांधींनी भारत देशात त्यांच्या ता-हयातील कोणते संवैधानिक पद घेतले होते?महात्मा गांधींनी त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला त्यांचा राजकीय वारसदार बनवला होता?उलट इलाहबादच्या लोकसभेच्या निवडणूकीत महात्मा गांधींचे खरे वंशज म्हणजे त्यांचे नातू राजमोहन गांधींना राहूल गांधींचे वडील राजीव गांधींनी पराभूत केले होते!महात्मा गांधींचे खरे वंशज   ‘गांधी’आडनावाच्या एका तथाकथित वंशजाकडून लोकशाहीत पराभूत झाले होते आणि हीच या लोकशाही देशाची गौरवास्पद बाब आहे.

राहूल गांधींना आज महात्मा गांधींचे ‘वंशज’ठरविणारे साेशल मिडीया क्रियेटर्सला राहूल गांधींचे पितामह राजीव गांधी हे कोणाचे अपत्य होते?याचे तरी भान उरले का? राहूल गांधी यांची आजी स्वर्गीय इंदिरा गांधी व आजोबा फिरोज गांधी यांचा तरी इतिहास माहिती आहे  का?फिरोज शाह गांधी यांच्या वडीलांचे नाव जहांगीर फरदून गँडी(GHANDY)होते व ते पारसी समुदायाचे होते.१२ सप्टेंबर १०१२ साली फिराजेशाह गांधींचा जन्म झाला.त्यांच्या जन्मप्रमाणपत्रावरही ‘गँडी‘हेच आडनाव आहे मात्र त्याकाळी स्वातंत्र्य आंदोलनाची धग संपूर्ण देशभर पेटली होती आणि फिरोजशाह हे महात्मा गांधींच्या आंदोलनामुळे प्रेरित झाले होते.त्यांनी महात्मा गांधींच्या आडनावात आपला राजकीय आश्रय शोधला,त्याकाळी सर्व वृत्तपत्रातही फिरोजशहा गँडींचे आडनाव ‘गांधी’छापून येत असे यामुळे फिरोजशहा हे देखील सुखावत असे.मात्र कोणत्याही अर्थाने राहूल गांधी हे महात्मा गांधींचे वंशज होत नाही तर ते पंडित जवाहरलाल नेहरुंचे वंशज ठरतात.

महत्वाचे म्हणजे आपले मूळ आडनाव ‘गँडी’मुळे कोणाताही राजकीय फायदा होऊ शकत नाही हे लक्षात घेऊनच आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी,प्रियंका गांधी व राहूल गांधी हे फिरोजशाह गांधींच्या पुण्यतिथी किवा जयंतीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर ‘दिसत’ नाहीत!इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त ट्वीटरवर सक्रिय असणारे वर्तमान गांधी कुटुंबिय फिरोजशहा गांधींच्याबाबतीत मात्र ‘मौन रागात’असलेले आढळून येतात.

दोन हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या दोन लोकप्रतिनिधींना केंद्रिय तपास यंत्रणा चौकशीसाठी बोलावते,याविरुद्ध आंदोलन करण्याचा काँग्रेसला संवैधानिक हक्क देखील आहे मात्र ज्याप्रकारे त्यांनी आपल्या पक्षीय आंदोलनाला ‘सत्याग्रहाचे’नाव दिले ते मुळीच समर्थनीय नाही.‘डिअर मोदी ॲण्ड शहा ये राहूल गांधी है,झूकेना नही’आंदोलनात ठिकठिकाणी झळकणारी ही फलके काय अधोरेखित करते?राहूल गांधी हे देशाच्या संविधानापेक्षाही मोठे आहेत,कायद्यापेक्षाही मोठे आहेत,हे सिद्ध करायचे होते का?ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे ते ’देश के लिये लड रहे है’’आगे बढो हम तुम्हारे साथ है’काय सिद्ध करतात?चौकशी समितीसमोर जाने म्हणजे देशासाठी लडने झाले?मग देशाच्या सीमेवर वीर सैनिक काय करीत आहेत?

२०१५ मध्येही सोनिया व राहूल गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलावले असता अशाच प्रकारचा ‘तमाशा’‘देशभर मांडला गेला होता. गांधी परिवारावर खूप मोठा अत्याचार केल्या जात असल्याची फलके झळकली होती.एका राष्ट्रीय पक्षाचे ते सर्वेसर्वा आहेत यामुळे त्यांना कायदापासून सूट मिळावी,व्हीआयपी वागणूक मिळावी अशी अपेक्षा बाळगणे म्हणजेच ‘लोकशाही’आहे का?मोठे नेते राज करतील आणि कार्यकर्ते पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खातील!गुन्हे दाखल होऊन न्यायालयाच्या चकरा मारत राहतील?आज राहूल गांधी यांना ईडीने तीन तास विचारपूस केली. आज त्यांना ५० प्रश्‍ने विचारण्यात आली,एका सामान्य आरोपीप्रमाणे त्यांची चौकशी करण्यात आली. उद्या पुन्हा सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. याचा अर्थ उद्या पुन्हा दिल्लीत देशभरातील नेत्यांची ‘मांदियाळी’दिसणार,जनतेच्या किती प्रश्‍नावर हे नेते एकत्रित येऊन आंदोलने करतात?

काय आहे नॅशनल हॅरोल्ड प्रकरण?
१९३८ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरु व काँग्रेस(Congress)च्या काही मोठ्या नेत्यांनी मिळून यंग इंडियन प्रा.लि.ही कंपनी स्थापन केली.ही कंपनी ‘नॅशनल हॅरोल्ड‘नावाचे काँग्रेसचे मुखपत्र असणारे वृत्तपत्र चालवित होती.या कपंनीला देशभरात अतिशय स्वस्त किमतीत आपल्या उपशाखा स्थापित करण्यासाठी जागा मिळवून देण्यात आल्या होत्या.याच जागांची किंमत दोन हजार कोटी आहे.या यंग इंडियन कपंनीत राहूल गांधी व सोनिया गांधी यांची भागीदारी प्रत्येकी ३८-३८ अर्थात ७६ टक्के होती.काँग्रेसने (एजेएल) कपंनीला ९० कोटींचे ऋण दिले होते.काँग्रेसकडून घेतलेले ९० कोटींचे ऋण नॅशनल हॅरोल्डचे प्रकाशन करणा-या असोसिएट जर्नल्स लिमिटेड(एजेएल)ने न फेडल्याने एजेएलने आपली मालकी गांधी कुटुंबियांच्या यंग इंडियनच्या नावे केली.यासाठी यंग इंडियाने एजेएलला फक्त ५० लाख रुपये दिले.त्यानंतर गांधी परिवाराने एजेएलची दोन हजार कोटीं रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली.स्वामी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सोनिया व राहूल यांनी न्यायालयाकडून २०१५ मध्ये जामीन मिळवला आहे.प्रत्येकी ५० हजार रुपयांचे वैयक्तीक हमीपत्र व प्रत्येकी एक जामीनदाराच्या जामीनाने त्यांना जामीन मिळाला आहे.

भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी २०१३ मध्ये एक खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या आधारे प्राप्तिकर विभागाने यंग इंडियन प्रा.लि.विरोधात केलेल्या तपासाची दखल न्यायालयाने घेतली होती.त्यानंतर ईडीने ‘पीएमएलए‘मधील(प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट)तरतुदींच्या आधारे एक नवीन तक्रार दाखल केली.काँग्रेसप्रणीत यंग इंडियन प्रा.लि.व तिच्या मालकीच्या नॅशनल हॅरोल्डमधील आर्थिक अनियमिततेबाबत ईडीची चौकशी सुरु आहे.याच संदर्भात १ जून २०२२ रोजी ईडीने २ जून रोजी राहूल गांधींना तर सोनिया गांधींना ८ जून रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस दिली होती.

मात्र ‘मी सध्या देशात नसल्याने मला ५ जूननंतरची तारीख द्यावी’असे राहूल गांधींनी ईडीला कळवले होते तर सोनिया गांधी यांनी सुरवातीला उपस्थित राहणार असे सिंघवीमार्फत कळवले होते मात्र लगेच त्यांच्या करोना चाचणीचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना विलगीकरणात राहावे लागले.आता प्रकृतीच्या कारणावरुन त्यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशात जे पेरले तेच उगवले……
१३ जून अाज देशात राहूल गांधी परिवाराच्या समर्थनार्थ लोकशाही व संविधान ताक वर ठेऊन देशभर आक्रमक आंदोलने झालीत,हाच तो दिवस आहे जेव्हा राहूल गांधी यांच्या आजी व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनीही १९७५ साली देशभर आंदोलन पेटवले होते.तेव्हाही त्यांच्या विरोधात १२ जून १९७५ रोजी इलहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमाेहनलाल सिन्हा यांनी भारत देशाच्या लोकशाहीवर दूरगामी परिणाम करणारा,उत्तरप्रदेश राज्य विरुद्ध राज नारायण खटल्यात आपला ऐतिहासिक निर्देश दिला होता.त्यांनी इंदिरा गांधी यांची निवडणूक अवैध घोषित केली व पुढील ६ वर्षे त्यांच्यावर निवडणूक न लढण्याची बंदी घातली.आजच्याच दिवशी म्हणजे १३ जून १९७५ रोजी दिल्लीत इंदिरा गांधींच्या निवासस्थानासमोर असेच शेकडो आंदोलनकारी जमा झाले होते.इंदिरा गांधी या स्वत:ला त्यावेळी देश,संविधान आणि कायद्याच्याही वर मानत होत्या.पैश्‍यांचा दुरुपयोग करुन गांधी यांनी निवडणूक जिंकली असल्याचा ठपका अलाहबाद उच्च न्यायालयाच्या न्यामूर्तींनी ठेवला होता.इंदिरा गांधी यांना हा निकाल त्यांच्याविरोधात जाणार असल्याची कल्पना होतीच.

यामुळे त्यांनी यंत्रणांचा दुरुपयोग करुन न्यायमूर्ती जगमोहन सिन्हा यांची हेरगिरी केली.एवढंच नव्हे तर त्यांना प्रलोभन देण्याचाही प्रयत्न करण्यात आला.निकालाच्या एक दिवस आधी म्हणजे ११ जूनच्या रात्री केंद्रिय तपास यंत्रणेचे(सीआयडी) आधिकारी हे न्या.जगमाेहन सिन्हा यांचे पीएस ‘मन्ना लाई’ यांच्या घरी पोहोचले.काहीही करुन त्यांना इंदिरा गांधी विषयीचा निकाल आधीच माहिती करुन घ्यायचा होता.न्यायमूर्तींनी हा निकाल जुलैपर्यंत लांबवावा असा ही दबाव टाकण्यात आला.

या दवाबाचा परिणाम हा झाला की न्यायमूर्तींनी १२ जून रोजीच निकालाचे वाचन केले.तत्कालीन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री हेमवंतीनंदन बहूगुणा यांची संपूर्ण शासकीय यंत्रणा हा निकाल रोखण्यासाठी राबत होती मात्र इमानदार व लोकशाहीची बूज राखणा-या न्यायमूर्तींनी तो निकाल कोणाच्याही हातात पडू दिला नाही.न्यायमूर्तींना इंदिरा सरकार काय-काय करु शकते यांचा अंदाज असल्यानेच त्यांनी इंदिरा गांधीविरुद्धचा निकाल आपल्या पेशकारकडून न लिहून घेता स्वत: हाताने लिहला!

स्वत:ला संविधानापेक्षाही मोठ्या समजणा-या इंदिरा गांधींनी शेवटी संविधानाचा गळा घोटत देशात जून मध्येच आणिबाणि लागू केली.अनेक मोठ्या नेत्यांची धरपकड झाली,त्यांना तुरुंगात डांबले.जार्ज फर्नाडिस हे परांगदा झाले तर त्यांचे मोठे बंधू लॉरेंस फर्नाडिज यांच्यावर पोलिसांनी थर्ड डिग्रीचा वापर केला.त्यांची नखे मूळासकट उखडण्यात आली.

इंदिरा गांधी यांनी १९७१ ते १९७६ दरम्यान संविधानात एकूण ३९ संशोधन केले!त्यावेळी इंदिरा गांधी यांना त्यांच्या चाटूकारांच्या टोळीने देशापेक्षाही मोठे करीत ‘इंदिरा ईज इंडिया ॲण्ड इंडिया ईज इंदिरा’असा नारा दिला.इंदिरा गांधींनी पायउतार व्हावे म्हणून दिल्लीत रामलीला मैदानात विरोधकांनी मोठ्या रॅलीचे आयोजन केले.या रॅलीत सहभागी होण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षाचे नेते जयप्रकाश नारायण यांना दिल्लीत पाहोचू न देण्याची तजवीजच इंदिरा गांधींनी केली व ऐन वेळेवर त्यांचे विमानच रद्द केले.

याचा अर्थ येनकेन प्रकरणे, सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसपक्षाने साम,दाम,दंड,भेद या सर्व नीतींचा मुक्त हस्ताने वापर तर केलाच मात्र त्याहीपेक्षा भयंकर बाब म्हणजे केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांच्या विरोधात करण्याचा पायंडा देशात पाडला!गुप्तहेर लावणे,फोन टॅपिंग करने,राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपती पदाचाही वापर आपल्या पक्षीय हितासाठी करने,आज देशात मोदींवर जे-जे आरोप होत आहेत त्याची ‘मुर्हूतमेढ’ एकेकाळी काँग्रेस पक्षानेच केली होती,हे ही विसरता येत नाही.

शेवटी जे पेरतो तेच उगवते,हाच निसर्गाचाही नियम आहे.काँग्रेसने गेल्या ५६ वर्षात देशात जे पेरले त्याचेच फळ आज मोदी सरकार चाखत आहे.आजचे काँग्रेसचे आंदोलन ही त्यामुळेच ‘ कॉंग्रेसीय इतिहासाचे एक वर्तुळ ‘पूर्ण करणारेच ठरले’असेच आता म्हणावे लागेल,नशीब आजच्या आंदोलनात ‘राहूल ईज इंडिया ॲण्ड इंडिया ईज राहूल‘चे नारे लागले नाहीत…..!

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या