
अनिल अहीरकर यांचा मनपा अधिका-याला इशारा
अतिक्रमण विभागाच्या कारवाईविरुद्ध जनक्षोभ उसळणार
अशोक पाटील माणुसकी नसणारे कसाई:ज्वाला धोटे यांचा घणाघात
हाच का मोदी यांचा ‘आत्मनिर्भर’ भारताचा फॉरम्यूला?ज्वाला धोटे यांचा संताप
नागपूर,ता. २८ डिसेंबर २०२१: नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे काल ज्या पद्धतीने शहरातील तीन झोनमधील हॉकर्स,चहा टपरी,पातोडीवाले,नर्सरीवाले,भाजी व फळांच्या लहान दूकानदारांचे ट्रकभर सामान जप्त करण्यात आले,भर रस्त्यात भाजी व फळे फेकून देण्यात आली ते बघता ,अतिक्रमण विभागाचे प्रमुख अशोक पाटील यांच्या अंगात उन्माद आलेला दिसून पडतो,महत्वाचे म्हणजे अशोक पाटील गेल्या अनेक दशकांपासून एकाच विभागात एकाच पदावर कार्यरत आहेत,त्यांची बदली न होण्या मागे भ्रष्टाचाराचा संशय येतो,कालचा त्यांनी या शहरातील गरीब,गरजू लोकांसोबत जो उन्माद केला,त्यांच्या पोटची भाकर हिरावली,ते बघता राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आता, हातावर पोट असणा-यांना सोबत घेऊन अशोक पाटील यांच्या घरावर मोर्चा नेणार व तिथेच ठिय्या मांडून बसणार असल्याचा गंभीर इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत दिला.
याप्रसंगी मंचावर राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्षा व अन्याय निवारण समितीच्या ज्वाला धोटे,राष्ट्रवादीचे श्रीकांत शिवणकर,विशाल खांडेकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना अहीरकर म्हणाले,की एकीकडे या देेशाची लोकसभा नागरिकांना राेजगाराचा अधिकार(राईट टू एम्प्लॉयमेंट) प्रदान करते ,दुसरीकडे याच देशातील एक शासकीय अधिकारी गरीबांचा रोजगार हिरावतो आहे.नागपूर महानगरपालिका रोजगार देऊ शकत नाही तर रोजगार हिरावण्याचा देखील मनपाला कोणताही हक्क नाही.रस्त्याच्या कडेला हे गरीब,गरजू हॉकर्स रहदारीला कोणताही अढथळा निर्माण न करता रोजगार करीत होते मात्र ज्या अमानवीय पद्धतीने मनपाच्या अतिक्रमण विभागाने त्यांचे सामान जप्त केले व भाजीपाला,फळे उधळून लावली ते कदापि समर्थनीय नाही.
एवढंच नव्हे तर ट्रकभर जप्त केलेल्या सामानाचे देखील पुढे काय होतं?या ट्रकभर जप्त सामानाच्या कारवाईत देखील भ्रष्टचार दडलेला असल्याचा आरोप त्यांनी केला.मी स्वत: ४० वर्षांपूर्वी पदवीधर झाल्यानंतरही रस्त्याच्या कडेला फूटपाथवर चहाची दूकान चालवत होतो.त्या वेळी सामान,वजन काटे,ठेले उचलून नेण्याची प्रथा नव्हती.माझ्या पोटाची भाकर अशी नेली असती तर मी किती अगतिक झालो असतो म्हणून सामान उचलून नेण्याची वेदना त्यामुळेच मी समजू शकतो.
अशोक पाटील हे नागपूरचे समीर वानखेडे असून ज्याप्रकारे समीर वानखेडे यांनी भ्रष्टाचारातून प्रसिद्धी आणि पैसा प्राप्त केला तोच कित्ता नागपूरात अशोक पाटील गिरवत आहेत.केवळ आणि केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच व सत्ताधा-यांचे हात ओले करण्यासाठी त्यांची वर्षानूवर्ष बदली केली जात नसल्याचा घणाघाती आरोप अहीरकर यांनी यावेळी केला.
प्रचार-प्रसार माध्यमांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख अशोक पाटील यांना समीर वानखेडे याच्यासारखे प्रसिद्ध करु नये,अशी विनंती माध्यमांना करीत, आपल्या कोणत्याही वृत्तात अशोक पाटील यांचे नाव प्रसिद्ध न करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.
इलेक्ट्रानिक्स गुड्सच्या एका दूकान मालकासोबत अतिक्रमण विभागाच्या अधिका-याने अशीच अरेरावी करीत,त्याचे सामान जप्त केले.विभागासोबत कर्तव्यावर असणा-या पोलिसांनी देखील दूकान मालकाला उगाच खाकी वर्दीचा धाक दाखवला.या दूकान मालकाने मनपाच्या फूटपाथावर आपला फलक ठेवला नव्हता तर कायद्याप्रमाणे,दूकानासमोरील पाच फूट जागा ही दूकान मालकाचीच असते. या दूकानादाराने आपला फलक आपल्याच हद्दीत ठेवला होता,तरी देखील त्या पोलिसाने दूकानदारालाच दमदाटी करीत,तू सामान चोरी करुन नेत होतास अशी तक्रार नोंदवील म्हणून धमकी दिली, पद व अधिकाराचा दुरुपयोग सर्वसामान्य दूकानदार,हॉकर्स व गरीब,गरजू भाजीवाले,फळवाले,चहा टपरीवाले,नर्सरीची दूकान थाटणारे,पातोडीवाले,खेळेणे विकणारे यांच्या विरुद्ध धाक दडपशाहीचा कारभार मनपाचा अतिक्रमण विभाग करतो.या विरोधात राष्ट्रवादी पक्ष आता पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे अनिल अहीरकर म्हणाले.
कोणतीही नोटीस न देता किवा सामान उचलण्याची संधी ही न देता या विभागाचे कर्मचारी अशोक पाटील याच्या हूकूमाचे पालन करतात.यांच्या सवयी फार खराब झाल्या आहेत.अश्या मगरुर आणि भ्रष्ट अधिका-याच्या घरावर आता मोर्चा नेणार असल्याचे सांगून, रात्रीच्या जेवणाची गरीबांची भ्रांत कशी होते,हे अशोक पाटीलला कळायला हवे,असे अहीरकर म्हणाले.
गेल्या १५ वर्षांपासून मनपात भाजपची सत्ता आहे मात्र या शहरात पार्किंगसाठी कोणतेही नियोजन या पक्षाच्या सत्ताधा-यांनी केले नाही.स्वत:महापौर दयाशंकर तिवारी यांनी इतवारी मध्ये पार्किंग प्लाझा करणार असल्याची वल्गना केली होती मात्र मनपाची बंद पडलेली शाळा किवा सोख्ता भवन सारखे ठिकाण व्यवसायिकांच्या घश्यात घालण्याचे उद्योग सुरु आहे.या बंद पडलेल्या भवनात किवा शाळेत नागपूरकर जनतेला पार्किंग का उपलब्ध करुन दिली जात नाही?असा सवाल अनिल अहीरकर यांनी उपस्थित केला.
सर्वाधिक कर इतवारी भागातून व्यवसायिक मनपाला देतात मात्र सर्वाधिक कचरा याच भागात पडलेला दिसून पडतो.इतवारीला येणा-या माणसाला टेलिफोन एक्सचेंज चौकात गाडी ठेऊन ऑटोने इतवारीत यावे लागत आहे,हीच भाजपची स्मार्ट सिटीची वलग्ना असल्याची टिका अहीरकर यांनी केली.
जिल्हाधिकारी यांची उलचबांगडी करण्याची मागणी-
ऐन क्रिसमससारख्या सणाच्या दिवशी जिल्हाधिकारी विमला आर.यांनी जो घोळ घातला तो अक्षम्य असून त्यांनी रात्री फक्त ९ वाजेपर्यंत सर्व दूकाने व हॉटेल्स यांना परवानगी असल्याची नोटीस जारी केली.सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत हॉटेलमध्ये जाऊन जेवणारे यांचा जिल्हाधिकारी यांच्या या अादेशामुळे पराकोटीचा हिरमोड झाला.मात्र ९ वाजेच्या अर्धा तास आधी जिल्हाधिकारी महोदया दूसरी नोटीस जारी करुन,अजून हा निर्णय लागू झाला नसल्याचे सूचित करतात मात्र हॉटेल मालकांचे जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले होते.
चुकीमुळे आधीचे आदेश देण्यात आले असे जिल्हाधिकारी महोदया आपल्या दुस-या आदेशात नमूद करतात.एवढ्या संवेदनशील प्रशासकीय निर्णयाबाबत जिल्हाधिकारी या अश्या बेफिकीर वृत्तीने कश्या वागू शकतात?लोकांचे रोजगार,नागरिकांचा आनंद त्यांच्या एका चुकीच्या नोटीशीसोबत जुळला होता,क्रिसमससारख्या ऐन सणाच्या दिवशी जिल्हाधिकारी यांनी हा तुघलकी घोळ घातला.
नोकरशाहीला भरगच्च पगार हा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा मिळत असतो.हॉटेल इंडस्ट्रीचे जे अपरिमित नुकसान जिल्हाधिकारी विमला आर.यांच्या एका चुकीच्या निर्णयामुळे झाला ते नुकसान त्या भरुन देणार आहेत का?असा प्रश्न करीत असे निर्णयक्षमता नसलेल्या जिल्हाधिकारी यांची तातडीने नागपूर शहरातून उचलबांगडी करण्याची मागणी आघाडी सरकारला करणार असल्याचे अहीरकर यांनी सांगितले.
अतिक्रमण विभाग हा कत्तलखाना-ज्वाला धोटे यांचा घणाघात
मनपाचा अतिक्रमण विभाग हा कत्तलखाना असल्याचा घणाघाती आरोप करुन या विभागाचे अधिकारी व कर्मचारी हे माणूसकी नसणारे कसाई आहेत,असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला.गरीबांचे खिसे कापून भ्रष्टाचाराने स्वत:चे घर भरणारा हा विभाग आहे.एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा बुलंद करतात दुसरीकडे जे गाेर गरीब,रस्त्याच्याकडेला भाजीपाल,पातोडी,फळे,झाडे ,चहा विकतात त्यांना बेरोजगार करण्याचे काम अशोक पाटील नावाचा एक शासकीय अधिकारीच करत असल्याचा घणाघात त्यांनी केला.
मुंबईची फॅशन स्ट्रीट कुठे भरते?लिंकिंग रोडवर भरणारा बाजार मुंबईत हा फूटपाथवर नसतो का?दिल्लीत कनॉट प्लेस,पॅरोल बाग किवा चोर बाजार कुठे भरतो?मग नागपूरातच गोर गरीबांना फूटपाथवर रोजगार करण्याची संधी का नाही?अशोक पाटील हे कोणत्या अधिकाराने त्यांच्या पोटावर गदा आणतात?अशोेक पाटील यांना महिला,तरुणांचे रोजगार हिरावून शहरात गुन्हेगारी वाढवायची आहे का?
एकीकडे नागपूरचे खासदार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे ॲग्रोव्हिजन प्रदर्शनी भरवून शेतक-यांसाठी मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करतात दूसरीकडे त्याच शेतक-यांनी पिकवलेला माल त्यांच्याच पक्षाची सत्ता आसणारी मनपा रस्त्यावर उधळून लावते, यात शेक-यांचा अपमान नाही का?गेल्या १५ वर्षांपासून मनपाची तिजोरी भाजपने पोखरुन काढली.आता तर दररोज मनपातील भ्रष्टाचाराचे किस्से सुर्योदयासोबतच बाहेर येत आहेत.
भाजपच्या कार्यकाळात मनपाच्या तिजोरीला उधई लागली आहे.कर मिळवण्यासाठी अशोक पाटीलसारख्या अधिका-याला नेमण्यात आले आहे जो गोर गरीब रोजगार करणा-यांना लृटण्याचे काम करतोय .अतिक्रमणाच्या नावाखाली गोर गरीबांचे खिसे कापणारा अशोक पाटील हा कसाई असल्याचा घणाघात याप्रसंगी ज्वाला धोटे यांनी केला.
दाेन हजारांचं सामान जप्त करतो,दंड म्हणून पाच हजार मागतो,दंडाची एवढी रक्कम नाही देऊ शकत म्हटल्यावर अतिक्रमण विभागाचे अधिकारी ५०० आणि हजार रुपयात गरीबांसोबत मांडवली करतात.गरीबांकडून अतिक्रमणाच्या नावाखाली हप्ता खाण्यासारखी दूसरी ‘नीचता’नाही,असा संताप धोटे यांनी व्यक्त केला.
अशोक पाटील यांची देहबोली,बोलण्याची पद्धत ही एखाद्या माफिया डॉनसारखी असून त्यांच पद हे खंडणी उकळण्याचा स्त्रोत असल्याचा घणाघाती आरोप धोटे यांनी केला.मोठमोठ्या धनदांडग्यांचे अतिक्रमण त्यांना दिसत नाही,गरीबांचं अतिक्रमण बरोबर दिसतं,या शहरातल्या हॉकर्स बंधू-भगिनींसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आता पेटून उठणार आहे अशा इशारा देत मनपाच्या अतिक्रमण विभागासमोर राष्ट्रवादी लवकरच आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी विधान सभेत नुकतेच पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या जागेवर धन दांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणावर नोटीस लावली,त्यांना अनाधिकृत बांधकाम असतानाही मनपा वीज,पाणी,ड्रेनेज लाईन्स पुरवते,दूसरीकडे पार्किंगच्या नावाने सामान्य वाहनचालकांकडून जबर दंड वसूलते,असेही त्या म्हणाल्या.




आमचे चॅनल subscribe करा
