फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामनाम जपात अखंड बुडालेल्या सत्ताधा-यांना रामजपाचेच वावडे!

रामनाम जपात अखंड बुडालेल्या सत्ताधा-यांना रामजपाचेच वावडे!

Advertisements

समृद्धी महामार्गावरील विदर्भ ट्रॅवल्स दूर्घटनेतील स्वकीयांना सदर पोलिसांची नोटीस!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील जनसंपर्क कार्यालयासमोर रामनाम जपास पोलिसांची बंदी

नागपूर,ता.१७ जानेवरी २०२४: चिमुरडी आेवी परिणीत बनकर तसेच तिची आई वृषाली वनकर यांच्यासह २५ प्रवाश्‍यांचा विदर्भ ट्रॅव्हल्सच्या मध्यरात्री झालेल्या अपघातात होरपळून मृत्यू झाला आणि अवघे महाराष्ट्र सुन्न झाले.१ जुलै २०२३ रोजी ही दूर्घटना घडली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतकांच्या परिजनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर केली होती,या घटनेला सहा महिन्यांचा काळ उलटला असला तरी अद्याप पिडीतांच्या कुटूूंबियांना शासनाने जाहीर केलेली मदत न पोहोचल्याने, नागपूरात फडणवीस यांच्या देवगिरी बंगल्यासमोर येत्या १९ जानेवरी रोजी ‘रामनाम जप’आंदोलन करण्याची घोषणा पिडीतांच्या कुटूंबियांनी करताच, सदर पोलिस ठाण्यातून १४९ ची नोटीस त्यांना पाठविण्यात आली,परिणामी ज्या रामनामजपात सध्या संपूर्ण देशच भारतीय जनता पक्षाने बुडवून टाकले आहे,त्यांनाच आता ‘रामनाम जपा’विषयी वावडे आहे का?अशा प्रश्‍न चंद्रशेखर मडावी यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

‘जस्टीस फॉर २५ पीपल्स’वतीने मागील ४२ दिवसांपासून वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण केले जात आहे.मागील दोनशे दिवसांपासून सातत्याने शासकीय मदतीसाठी पाठपुरावा केला जात आहे.विशेष म्हणजे,नुकतेच ७ डिसेंबर ते २० डिसेंबर दरम्यान नागपूरात हिवाळी अधिवेशन दरत्यान विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील वर्धा येथील पिडीतांच्या आंदोलनाच्या संदर्भात सभागृहाचे लक्ष वेधले होते मात्र,विधान सभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली पिडीतांच्या वेदनांना वाचा फूटली नाही,असा आरोप चंद्रशेखर मडावी यांनी याप्रसंगी केला.

समृद्धी महामार्गावर १ जुलै २०२३ रोजी २० कुटूंबातील २५ प्रवाश्‍यांचा होरपळून मृत्यू झाला होता.अतिशय वेगाने तसेच निष्काळजीपणाने खासगी बस वाहन चालक दामटत असताना त्याचे स्टेरिंगवरील नियंत्रण सुटले,परिणामी महामार्गावरील रस्ता दुभाजकाला आदळून बसच्या डिजेल टाकीचा स्फोट झाला,क्षणात संपूर्ण अस धू-धू करीत पेटू लागली,वाहन चालक तसेच क्लिनरने केबिनमधून उडी घेत स्वत:चे प्राण वाचवले,मात्र,बसच्या आपातकालीन दारातच अवैधरित्या अवजड सामान ठेवण्यात आल्याने प्रवाशांना ते दार उघडताच आले नाही.परिणामी,एकूण २५ प्रवाशांचा आगीत होरपळून अक्षरश: कोळसा झाला होता.यात चिमुरडी ओवी वनकर तसेच तिच्या आईचा मृतदेह हा समाजमन सुन्न करणारा होता.अंतिम श्‍वासापर्यंत ओवीच्या आईने तिला कवेत कवटाळून ठेवले होते,त्यांचा मृतदेह देखील एकमेकींना घट्ट कवटाळलेल्या अवस्थेत बघून बघणा-यांच्या मनाचा थरकाप उडाला होता.आगीत बसच्या खिडकीच्या काचा या कमकुवत झाल्याने त्या फोडून फक्त आठ जणांना आपले प्राण वाचवता आले होते.
विशेष म्हणजे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये २ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सत्तेत सहभागी झाले होते.ज्या दिवशी अवशेष ही न उरलेल्या ज्या २५ प्रवाश्‍यांच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार केले जात होते,त्याच वेळी राज्यातील सत्तेच्या महानाट्यात राजभवनात अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत होते!

फडणवीस यांनी या सत्तानाट्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातील जनतेचा रोष नको या हेतूने,घडलेल्या या महाभंयकर दूर्घटनास्थळी धाव घेतली होती.अपघाताची सखोल चौकशी करुन दोषींना शिक्षा देण्याची घोषणा देखील फडणवीस यांनी माध्यमांसमोर केली होती.परंतु त्यांनी केलेल्या घोषणेनुसार २५ लाखांऐवजी फक्त ५ लाख रुपये मृतकांच्या परिवाराला मिळाले असून, उर्वरित २० लाख रुपयांच्या निधीबाबत तसेच अपघाताची चौकशी करण्याबाबत अद्याप ही राज्य सरकार मौन पाळून असल्याचा अारोप याप्रसंगी मडावी यांनी केला.

या संदर्भात मागील साडे सहा महिन्यांपासून पिडीत कुटूंबियांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदन दिले मात्र,याची कोणतीही दखल प्रशासनाने तसेच राज्यकर्त्यांनी घेतली नाही.१ जुलै २०२३ च्या या अपघाताबाबत ९ जुलै २०२३ रोजी सर्वात आधी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनासोबत त्यांनी स्वत:चे पत्र जोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात पाठवले.१२ जुलै २०२३ रोजी वर्धा लोकसभा क्षेत्रचे खासदार रामदास तडस यांनी निवेदन स्वीकारले व लोकसभेत ३७७ अन्वये याची चर्चा केली.२० जुलै २०२३ रोजी वर्धा जिल्हयाचे जिल्हाकिधारी राहूल कर्डिले यांनी पिडीतांच्या कुटूंबियांशी सविस्तर चर्चा केली.वर्धा विधासभा आमदार डॉ.पंकज भोयर यांनी २३ जुलै २०२३ रोजी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी लावून या प्रश्‍नाकडे शासानाचे लक्ष वेधले होते.

मात्र,या सर्व प्रयत्नातून काहीही निष्पन्न न झाल्याने ,देशाच्या स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व पिडीतांच्या कुटूंबियांनी एकत्रित येऊन ’भावपूर्ण श्रद्धांजली’चा कार्यक्रम वर्धेत आयोजित करुन खासदार,आमदार,जिल्हाधिकारी यांना प्रश्‍न विचारले,मात्र,उपस्थितांचे उत्तर नकारात्मक होते.

३० ऑक्टोबर २०२३ रोजी अपघाताविषयीच्या तपासाबाबत गांर्भीयच नसल्याने तसेच फडणवीस यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ डिसेंबर पासून वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिडीतांचे कुटूंबिय हे साखळी उपोषणास बसले आहेत.

९ डिसेंबर २०२३ रोजी राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे वर्धा येथील दौ-यावर असताना त्यांनी पिडीतांच्या शिष्टमंडळासोबत विशेष बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या,परंतू त्यांच्यास्तरावर देखील समाधान ते करु शकले नाहीत.दोषी वाहनचालक,क्लिनअर तसेच विदर्भ ट्रॅवल्सचा मालक यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसून, विदर्भ ट्रॅवल्सची खासगी बस पुन्हा समृद्धी महामार्गावर धावत असल्याची माहिती देखील यावेळी सांगण्यात आली.यावरुन मृतकांविषयीच्या बोथट संवेदना दिसून पडतात,असा आरोप करण्यात आला.

परिणामी वर्धा येथे भव्य असा मूकमोर्चा काढून शासानाचा निषेध नोंदविण्यात आला.राज्यकर्ते आणि मुर्दाड प्रशासनाने पिडीतांच्या आर्त संवेदनांची कोणतीही दखल न घेतल्याने, ५ जानेवरी २०२४ रोजी ‘शर्म करो’हे एक दिवसीय आंदोलन करुन शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.सुधीर मुनगंटीवार हे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने दौ-यावर असताना पिडितांच्या कुटूंबियांनी शासकीय विश्रामगृहात त्यांची भेट घेतली तसेच राणाभीमदेवी थाटात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक मृतकांच्या कुटूंबियांना २५ लाखांची मदत देणार असल्याचा १ जुलै रोजीचा घटनास्थळावरील व्हिडियो त्यांना दाखविण्यात आला.त्यांनी देखील फडणवीसांनी ही घोषणा केली असल्याचे मान्य केले.फडणवीस यांच्याशी बोलून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन याप्रसंगी त्यांनी दिले.तसेच सदर अपघात हा अतिशय गंभीर असल्याने दोन दिवसात चौकशी समिती गठीत करण्याचे आश्‍वासन ही त्यांनी दिले.

न्यायाच्या मागणीसाठी पिडीतांचे कुटूंबिय साखळी उपोषण करीत असून उपोषणाला ४२ दिवस लोटले.महाराष्ट्रातील जवळपास सर्वच दिग्गज नेत्यांचे उंबरठे पिडीतांच्या कुटूंबियांनी झिजवले मात्र,अद्याप कोणाकडूनही न्याय मिळाला नाही.परिणामी,सध्या संपूर्ण देश प्रभू श्रीराम यांच्या चरणी भक्तीरसात रंगले असताना, शासनातील मंडळी देखील या जयघोषात सहभागी झालेली आढळते.यामुळेच रामभक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरातील देवगिरी या जनसंपर्क कार्यालयापुढे रामनाम जपाचे आयोजन करण्यात आले आहे.कदाचित यामुळे तरी २० कुटूंबातील २५ मृतकांच्या पिडीतांची, भयाण आणि उधवस्त वेदनांची जाणीव फडणवीसांना होऊ शकेल असे सांगत, फडणवीस यांच्या कार्यालयासमोर ११०० वेळा रामनाम जप करणार असल्याचा निर्धार मडावी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

सदर पोलिस ठाण्यातून रामनाम जपधारकांना १४९ ची नोटीस देण्यात आली असून, रामनाम जप पोलिसांतर्फे प्रतिबंधित करण्यात आले असल्याचे मडावी यांनी सांगितले.आम्ही कोणतेही आंदोलन करत नसून,भगवान श्रीरामाचा जप हा या देशात आता गुन्हा झाला आहे का?असा प्रश्‍न त्यांनी केला.१९ तारखेला कोणत्या वेळी फडणवीस यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जप करणार असल्याचे पोलिस विचारणा करीत आहेत मात्र,आम्ही अद्याप कोणतीही वेळ ठरविली नसल्याचे याप्रसंगी मडावी यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत संजय गुप्ता,कल्पना गुप्ता,रसिका मार्कंडे,परिजा मार्कंडे,निरु सोमकुवर,अजहर शेख,मदन वंजारी,मीना वंजारी,ओमप्रकाश गांडोळे,दिनकर खेलकर,रामदास पोकळे,निलिमा खोडे,निलू तायडे,शंकर गोठे,अजय जानवे,निहाल पांडे आदी उपस्थित होते.

(व्हिडिओ सौजन्य – जनसत्ता)

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक-
चंद्रशेखर मडावी- ९६५७७९१७५०
अजय जानवे- ७७१९९१११३३
………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या