फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामटेक लोकसभेचा गड भाजपच करणार सर!

रामटेक लोकसभेचा गड भाजपच करणार सर!

Advertisements


जिल्हाध्यक्ष सुधाकर काेहळे यांचा दावा

मोदींच्या मनातले ‘गाव चलो अभियान’४ फेब्रुवरी पासून

गडकरी धापेवाडा तर फडणवीस यांचा पांढुरण्यात मुक्काम

नागपूर,ता.३ फेब्रुवरी २०२४: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती अगदी ग्रामीण भागातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामीण भागात संपर्क साधण्याचे अभियान राबविण्याचे लक्ष्य ठेवले अाहे.मोदींच्या मनातील ‘गांव चलो अभियान’भारतीय जनता पक्षातर्फे उद्या दिनांक ४ फेब्रुवरी पासून तर ११ फेब्रुवरीपर्यंत राबविण्यात येणार आहे.हे पाच दिवस हे अभियान यशस्वी करुन येत्या लोकसभा निवडणूकीत रामटेकचा गड भाजपच सर करणार असल्याचे ‘सूचक’ विधान आज भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत केले.

सध्या रामटेक लोकसभेतून शिंदे गटातील आमदार कृपाल तुमाने हे खासदार आहेत,परिणामी कोहळे यांच्या सूचक विधानामुळे अनेक प्रश्‍न उपस्थित झाले.महायुतीत जागा वाटप ठरले का?असा प्रश्‍न केला असता,ते माझे काम नाही,असे मिश्‍किल उत्तर कोहळे यांनी दिले.लोकसभेच्या निवडणूकीची तयारी सुरु झाली का?असा प्रश्‍न केला असता,भाजपची संघटना नेहमीच निवडणूकीसाठी तयार असते,असे ते म्हणाले.रामटेकमधून तुमची तयारी झाली आहे का निवडणूक लढण्याची?असा प्रश्‍न केला असता,‘कमळाची’तयारी झाली आहे,पुन्हा असे मिश्‍किल उत्तर त्यांनी दिले.रामटेक दोन वेळा जिंकलो,पुढे ही जिंकू असे सूचक उत्तर त्यांनी दिले.निवडणूका जाहीर झाल्याबरोबरच अगदी बूथवरील कार्यकर्ताही तयार असतोच,असे त्यांनी सांगितले.

भाजप रामटेकचा गड सर करणार,याचा वेगळा अर्थ खा.कृपाल तुमाने हे भाजपमध्ये प्रवेश घेणार असा आहे का?असा प्रश्‍न केला असता,ते त्यांनाच माहिती,असे उत्तर सुधाकर कोहळे यांनी दिले. यावर,सावनेर तसेच काटोलमध्ये अनुक्रमे काँग्रेसचे आमदार सुनील केदार तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनिल देशमुख हे सिटींग आमदार असून भाजपची या दोन्ही विधान सभेच्या जागेवरील रणनीती काय आहे? असा प्रश्‍न केला असता,सावनेर विधान सभेची जागा हे केदार अपात्र झाल्यामुळे रिक्त झाली आहे,भाजप सावनेर आणि काटोलही जिंकणार असल्याचा दावा याप्रसंगी सुधाकर कोहळे यांनी केला.

वंचित तसेच महाविकासआघाडीची युती होणार असल्याकडे लक्ष वेधले असता,भाजप हे देशाच्या १४० कोटी जनतेच्या विकासासाठी धावत असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही ‘चेहरा’नाही विकासाकडे बघतो,असे ते म्हणाले.भाजपचा देशाच्या केलेल्या विकासावर इतका विश्‍वास आहे तर ‘गांव चलो अभियान’यासारखे उपक्रम घेण्याची गरजच काय?असा प्रश्‍न केला असता,आमचे लक्ष्य ५१ टक्के मतदान घेण्याचे आहे.यासाठी भाजपचा कार्यकर्ता हा जनतेच्या सतत संपर्कात राहीला पाहिजे.मतदार हा राजा आहे,त्याच्यापर्यंत विकासाची कामे पोहोचली पाहिजे यासाठी अश्‍या उपक्रमाची गरज असल्याचे कोहळे म्हणाले.

नुकतेच नागपूरातील वकील वर्गाने ईव्हीएमच्या विरोधात केलेल्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता,गेल्या पंधरा वर्षांपासून ईव्हीएम विरोधात ओरड होत आहे मात्र,काँग्रेस तेलंगणा,कर्नाटक जिंकतात तेव्हा ईव्हीएम मध्ये गडबड नसते का?असा प्रतिप्रश्‍न कोहळेंनी केला.संविधान चौकात आशा वर्कर तसेच आंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाकडे लक्ष वेधले असता,केंद्राने त्यांच्यासाठी भरीव योजना घोषित केल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी देखील त्यांचे प्रश्‍न गांर्भीयाने घेतले असून निश्‍चितच आम्ही देखील सहकार्य करु,असे आश्‍वासन त्यांनी दिले.

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहूल पाटीलवर उल्लास नगर येथील ऐन पोलिस ठाण्यात, पोलिस अधिक्षकाच्या कक्षात बसून केलेला गोळीबार,यावर प्रश्‍न विचारला असता,यावर उत्तर देण्यास मी सक्षम प्रतिनिधी नसून मी जिल्हास्तरावरील प्रश्‍नांचीच उत्तरे देऊ शकतो,यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

‘गांव चलो अभियान’या उपक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच जिल्हा पदाधिकारी, आमदार, माजी आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार असल्याची माहिती कोहळे यांनी दिली.

कार्यकर्ता हा जनतेच्या सतत संपर्कात असला पाहीजे या दृष्टीने विवीध अभियान भाजप कडुन राबवण्यात येतात. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील प्रत्येक कार्यकर्त्यांने बुथ वर जावुन ’संपर्क से समर्थन’ कार्यक्रमात स्वत:ला सर्मपित केले पाहीजे असे आर्वजुन सांगतात. जनतेशी असलेल्या सतत संपर्कामुळे व पंतप्रधान नरेन्द्र मोदींमुळे सामान्य माणसाला वाटते की त्यांच्या मताला किंमत आहे.
तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागच्या १० वर्षातील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची केलेली पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोहोचण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. मोदीजींची गॅरंटी काय आहे? हे प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या १० वर्षातील मोदी सरकारच्या योजना व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देणारी पत्रके वितरित करण्यात येणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले..

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा (ता. काटोल )येथे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा (ता. कळमेश्वर ), प्रदेश अध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे वडोदा (ता.कामठी)या अभियानात सहभागी होणार आहेत. शहरी भागात वॉर्ड निहाय हे अभियान राबविले जाईल. जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी देखील उमरगाव (ता.नागपुर ग्रामिण) आणि खापा (ता.नरखेड) येथे सहभागी होणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले.

या अभियाना अंतर्गत जिल्हयातील १५०० गावांमध्ये शहरी भागातील वार्ड अशा २,००० क्षेत्रामध्ये भाजपाचे एक हजार प्रवासी नेते, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत. पक्षाचे आजी व माजी आमदार ,जि.प सदस्य यांच्यासोबतच सर्व नेतेमंडळी जिल्हयातील प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रवास करतील व त्यांना एक हजार सुपर वॉरियर्सचे देखील सहकार्य मिळेल. गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण ३.५ लाख घरांना भेटी
देण्याचे उद्दिष्ट असल्याचे सुधाकर कोहळे यांनी नमूद केले.

प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने युवकांसाठी ‘नमो चषक’ तसेच महिलांसाठी ‘शक्ति वंदन कार्यक्रम’ देखील राबवण्यात येत आहे. लवकरच पंतप्रधान मोदी हे शक्तिवंदन कार्यक्रमाद्वारे महिला बचत गट प्रतिनिधींशी संवाद साधणार असल्याची माहिती सुधाकर कोहळे यांनी दिली.

अभियानाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यशाळा नुकतीच कोराडी येथे प्रदेश अध्यक्षचंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. मंडलश: कार्यशाळा देखील नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. पंचायत समीती क्षेत्रश: कार्यशाळा दिनांक ४ फेब्रुवरी व ५ फेब्रुवरी या कालावधीत करण्यात येणार असुन प्रत्यक्ष अभियान ६ ते ११ फेब्रुवरी या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत आदर्श नंदलाल पटले]अरविंद गजभिये रिंकेश गजानन चवरे,अशोकराव धोटे,आ.टेकचंदजी सावरकर रमेश मानकर
डॉ.राजीव पोतदार, आनंद राउत,अजय बोढारे,सुधीर पारवे नरेश चरडे,मल्लीकार्जुन रेडडी, डॉ. शिरीष मेश्राचरणसिंग ठाकुर, संजय टेकाडे
अनिल निधान नितीन राठीसंध्या गोतमारे अविनाश खळतकर दिनेश ठाकरे किशोर रेवतकर आदि उपस्थित होते.

या अभियानात प्रवासी कार्यकर्त्यांना पुढील नुसार कार्य करणे अपेक्षीत आहे-
१)बूथ कमिटी मीटिंग:- बूथ कमिटीची बैठक ज्यामध्ये पन्ना प्रमुख देखील उपस्थित राहणे
बूथ कमिटी आणि पन्ना प्रमुखांसाठी कार्य निश्चित करणे
 नवीन मतदारांची नोंदणी करणे.
व्हॉट्स ॲप ग्रुप्सची तपासणी करणे, अस्तित्वात नसल्यास ते तयार करणे.
मतदार यादीचे पुनरावलोकन, सरल ॲप डाउनलोड करणे.
विकसित भारतचा ब्रँड ॲम्बेसेडर बनवणे,
मागील निवडणूक आणि भाजपला मिळालेल्या मतांच्या आधारे निवडणूक प्रचाराचा आढावा.२०२४ मध्ये ५१ टक्क्यां पेक्षा जास्त मतांचे लक्ष्य निश्चित करणे, जर आधीच ५१ मते मिळाली तर
लक्ष्य वाढवायचे.
विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान त्या गावातील/शहरातील नोंदणीकृत व्यक्तीची माहिती घेणे.
२) जनसंघाच्या काळातील व विद्यमान भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटणे.
३) विचार परिवारातील कार्यकर्त्यांना भेटणे.
४) युवक, शेतकरी गट आणि व्यावसायिक गटांना भेटणे.
५) होतकरू विद्यार्थी, क्रीडा व्यक्ती आणि विद्यार्थी नेत्यांची बैठक.
६) शाळेत विद्यार्थी आणि शिक्षकांना भेटणे.
७) प्रभावशाली सामाजिक आणि धार्मिक व्यक्ती आणि पुरस्कारप्राप्त व्यक्तींना भेटणे.
८) स्वयंसेवी संस्था आणि बचत गटांच्या व्यक्तींना भेटणे.
९) धार्मिक स्थळांना भेटी देणे.
१०) अनु.जाती तसेच जनजाती मोहोल्ला परिसरांना भेट देणे.
११) लाभार्थ्यांशी संपर्क साधणे आणि ते सोशल मीडियावर अपलोड करणे.
१२) लोकप्रतिनिधींची बैठक उदा. पंचायत, स्थानिक संस्था आणि सहकारी.
१३) शहीदांच्या कुटुंबियांना भेटणे, नक्षल हिंसाचार आणि राजकीय हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांना भेटणे.१४) स्थानिक कर्मचा-यांना भेटणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे (पटवारी, अंगणवाडी, आशा, पोस्टमन.
१५) स्वच्छता मोहीम, पर्यावरण संवर्धन आणि अमृत सरोवर स्वच्छता असे कार्यक्रम हाती घेणे
१६) अलीकडेच पक्षात सामील झालेल्या व्यक्तीला भेटणे.
१७) प्रमुख नेत्यांना भेटणे. शक्य असल्यास इतर राजकीय पक्ष.
१८) स्थानिक खेळ आणि उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे.
अभियानात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांना फिडबॅक फार्म पक्षाच्या सरल ॲपवर अपलोड करण्या बाबत सांगण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या