फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजरामटेक कौन जीत रहा..?मोदींच्या प्रश्‍नाला मतदारांचे उत्तर ‘बर्वे‘

रामटेक कौन जीत रहा..?मोदींच्या प्रश्‍नाला मतदारांचे उत्तर ‘बर्वे‘

Advertisements


१९ एप्रिल मतदानानंतर ‘सत्ताधीश’चे विश्‍लेषण अचूक

भाजपचा उमेदवार हमखास झाला असता विजयी: मोदींच्या सभेमुळे मतदानाच्या दिवशी मतदार शोधत होते ‘कमळ‘चे चिन्ह

‘आयात’उमेदवारामुळे घात:मतदारांना गृहीत धरने भाजप,शिंदे गटाला पडले भारी

नागपूर,ता.६ जून २०२४: रामटेक लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार श्‍यामकुमार बर्वे यांनी प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा ८५ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला आणि कळमना कृषि उत्पन्न बाजार समिती येथे उभारल्या मतमोजणी केंद्रात उपस्थितांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरात मुक्कामी असताना,भाजप पदाधिका-यांना विचारलेला एक प्रश्‍नाचे स्मरण झाले,रामटेक मे कौन जीत रहा है?त्यावेळी भाजप पदाधिका-यांनी महायुतीचा उमेदवार जिंकत असल्याचे सांगून वेळ मारुन नेली मात्र,४ जून रोजी मतमोजणीनंतर रामटेक मतदार संघाच्या सहा ही विधानसभेच्या मतदारांच्या मनात, काँग्रेसचे बर्वे हेच जिंकत असल्याचे खरे उत्तर होते,हे मतमोजणीनंतर सिद्ध झाले.

रामटेकसाठी मोठे मन करावे-
रामटेक लोकसभा मतदारसंघ शिवसेना सोडायला तयार नसल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी रामटेकसाठी शिंदे यांनी मोठे मन करावे,असे जाहीर आवाहन केले होते.महायुतीमध्ये ज्या मोजक्या जागांसाठी वाद होता त्यात प्रामुख्याने रामटेक मतदारसंघाचाही समावेश होता.बावणकुळे हे रामटेकसाठी सर्वात जास्त आग्रही होते.महत्वाचे म्हणजे निवडणूका घोषित होण्या पूर्वीच भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधारकर कोहळे यांनी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत रामटेकमध्ये या वेळी कमळ फूलणार असल्याचा दावा केला होता,याचा अर्थ उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे हे भाजपमध्ये येणार असल्याची तयारी पूर्ण झाली होती तसेच पारवे यांना रामटेक मधून भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार होती,असे घडले असते तर कदाचित सुनील केदारांच्या उमेदवाराला श्‍याम बर्वे यांना ही लढत एवढी सोपी गेली नसती.मात्र,राजकारणाच्या सारीपाटावर सोंगट्या नेमका उलट्या पडल्या.शिंदे अखेरपर्यंत रामटेकवरील दावा सोडायला तयार न झाल्याने ऐन वेळी पारवे यांचा पक्ष प्रवेश भाजप ऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेत झाला व इथेच घात झाला.
उद्वव ठाकरेच्या शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने ऐनवेळी शिवसेनेची पारंपारिक मते बर्वे यांच्या दिशेने वळवली,व विजयाचा इतिहास घडवला.

भाजपच्या बालेकिल्ल्यात बर्वेंचे पारडे जड-
भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार तसेच भाजप प्रदेशाध्यक्षांचे पाठबळ असताना देखील पारवे यांना पराभवाचे तोंड बघावे लागले.रामटेक लोकसभा मतदारसंघात येणा-या सहाही विधनसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवा श्‍याम बर्वे यांनी आघाडी घेतली,हे विशेष.२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी ज्या हिंगणा,कामठीतून सर्वाधिक मते घेतली होती त्या मतदारसंघातून यावेळी बर्वे यांनी आघाडी घेतली,इतकंच नव्हे तर ज्या उमरेड विधानसभ मतदारसंघाचे राजू पारवे हे आमदार आहेत त्या उमरेडमध्ये ही ते पिछाडीवर राहीले!१४ हजार ८७९ मतांनी ते स्वत:च्या मतदारसंघात माघारले!
पारवे हे कामठीत १७ हजार ५३४ मतांनी पिछाडीवर राहीले,याच कामठीत २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत कृपाल तुमानेंनी २४ हजार ४६४ मतांची आघाडी घेतली होती.हिंगणा मतदारसंघ भाजपचे आमदार समीर मेघेंच्या मागील दहा वर्षांपासून ताब्यात आहे.मागील निवडणूकीत तुमाने यांना या मतदारसंघातून २५ हजार ९१९ मतांचे मताधिक्य होते.यावेळी पारवे या मतदारसंघात १७ हजार ८६२ मतांनी पिछाडीवर होते.रामटेक विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिंदे सेनेला पाठींबा देणारे अपक्ष आमदार आशिष जयसवाल यांच्या या मतदारसंघातून पारवे ४ हजार ६६८ मतांनी माघारले.सावनेर हा तर सुनील केदारांचा गड मानला जातो,सावनेरमधून आघाडीचे उमेदवार श्‍याम बर्वे यांनी १६ हजार ६०९ मतांची आघाडी घेतली.तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघातून बर्वेंनी ५ हजार १०८ मतांनी आघाडी घेतली.
हे चित्र २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूकीत पार वेगळे होते.युतीचे उमेदवार कृपाल तुमानेंनी काटोलमधून २२ हजार २०३ मतांची आघाडी,सावनेर ७,४५६ मतांची,कामठी २४ हजार ४६४ मतांची,हिंगणा २५ हजार ९१९,रामटेक २३ हजार ०७७ तर उमरेड मधून २२ हजार ९७० मतांची आघाडी घेऊन विजयी झाले होते.
मोदी यांच्या ‘रामटेक से कौन जीत रहा है..’या प्रश्‍नाचे अचूक उत्तर ‘बर्वे’हे मिळाले कारण युतीने चुकीचा उमेदवार त्यांच्या परंपरागत गडात उतरवला व याचा फायदा काँग्रेसने विदर्भात व महाराष्ट्रातून आपली एक जागा वाढवण्यात घेतला,यात शंका नाही. रामटेक लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात भाजपने संघटनात्मकरित्या आपली प्रचंड ताकद वाढवली आहे.गावागावात कार्यकर्त्यांची फौज तयार होती.मात्र,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामटेकच्या जागेसाठी अडून बसल्याने भाजपचा हा कार्यकर्त्या प्रचंड नाराज झाला.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांना यावेळी उमेदवारी मिळेल या अाशेवर कार्यकर्त्यांनी प्रचंड परिश्रमाने रामटेक लोकसभा मतदारसंघात आपली संघटनात्मक ताकद वाढवली होती.महत्वाचे म्हणजे भाजपचे परंपरागत विरोधक सुनील केदारांच्या सावनेर मतदारसंघातही गजभिये यांनी भाजपला मजबूत केले होते.मात्र,ऐनवेळी राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आल्याने या निवडणूकीत भाजपचा कार्यकर्ता,पदाधिकारी व नेते हे ‘मनापासून’लढलेच नाहीत,याची परिणीती महायुतीच्या उमेदवाराच्या पराभवात झाली व काँग्रेसच्या पंजाला देशात ९९ जागा ज्या मिळाल्या त्यात रामटेकचा वाटा मोलाचा ठरला.
पक्षातील पदाधिका-यांनी पारवेंचा विरोध केला होता.भाजपने पारवेंना शब्द दिला होता त्यामुळे शिंदेनी रामटेकसाठी अडवणूक केल्याने वेळेवर २४ मार्च रोजी पारवेंना शिंदे गटात प्रवेश देण्यात आला.१९ एप्रिल रोजी मतदान झाले.अवघ्या २५ दिवसात भाजपच्या कार्यकर्त्यांना मूळ काँग्रेसी असलेले आमदार राजू पारवे यांचा प्रचार करुन त्यांना विजयी करण्याची ‘हिंमत’एकवटलीच नाही,याचा परिणाम पराभवात झाला.भाजपने पारवेंना शब्द दिला होता तर शिंदेनी रामटेकवरील आपला दावा सोडला नाही,मतदार राजाचा कोणताही विचार न करता दोघांनी एकमेकांचा शब्द पाळला असला तरी,मतदार राजाने त्यांच्या सोयीस्कर राजकारणाला ‘शब्दातीत’ कौल दिला व बर्वेंच्या गळ्यात विजयाची माळ घातली.
नेते काेमात कार्यकर्ते जोमात-
१९ एप्रिल रोजी मतदान असताना रामटेकसाठी महायुतीकडून उमेदवाराची घोषणाच झाली नव्हती.रामटेकसाठी भाजप-सेनेत घमासान सुरु होते.शिवसेनेच्या पदाधिका-यांनी राजीनाम्याची घोषणा करता आयात उमेदवार लादल्यास राजीनाम्याचे अस्त्र उपसण्याचा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला.२७ मार्च उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता.भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कृपाल तुमानेंच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला होता.सुरवातीपासून जिल्ह्यातील पदाधिका-यांनी भाजपला रामटेकमधून उमेदवारी मिळावी,अशी भूमिका घेतली होती.भाजपकडून मतदारसंघाचे प्रभारी अरविंद गजभिये तसेच नागपूरातील भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांचे नाव समोर आले होते.
दरम्यान,कुठल्याही स्थितीत ही जागा सोडू नये,अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदीप इटकेलवार व अन्य  पदाधिका-यांनी मुंबईतील पार पडलेल्या बैठकीत घेतली.त्याच वेळी तुमाने यांच्या नावाच्या घोषणेनला विलंब होत असल्याने शिवसैनिकांनी राजीनामे देण्यास सुरु केले व शिंदे यांच्यावरील दडपण वाढवले.लोकसभा मतदारसंघाचे संघटक अमोल गुजर यांनी आपला राजीनामा शिंदेंना पाठवला.दुसरीकडे अरविंद गजभिये यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी भाजपचे कार्यकर्ते गावोगावी बैठकांचे सत्र घेत होते.दोन्ही पक्षाच्या पदाधिका-यांनी परस्परांविरोधात दंड थोपटले होते.जुन्या सुत्रानुसार विदर्भातील १० जागांपैकी ६ जागांवर भाजपचे तर यवतमाळ-वाशिम,बुलडाणा,अमरावती व रामटेक या ४ जागांवर शिवसेनेचा दावा होता.अमरावतीमध्ये सेना उमेदवाराचा पराभव नवनीत राणांनी केला होता.यंदा राणा या अमरावतीतून भाजपच्या उमेदवार असल्याने रामटेकमधील जागा पुन्हा भाजपसाठी सोडण्यास शिंदे तयार नव्हते.
शिंदे यांची विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची तिकीट कापण्याची मुळीच ईच्छा नव्हती .शिवसेनेतून बाहेर पडल्यावर विदर्भातून तुमाने यांनी शिंदे यांची साथ दिली होती.मात्र,त्यांना उमेदवारीच नाकारल्याने त्यांच्या निष्ठेचे काय?असा प्रश्‍न तुमानेंच्या समर्थकांना पडला.
शिंदेच्या हट्टापायी भाजपने रामटेकमधून माघार घेतली असली तरी खासदार तुमाने यांच्या नावाला भाजपने प्रचंड विरोध केला होता.परिणामी,अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी रामटेकमधून पारवे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना उमेदवारी नाकारल्यानंतर,मी कुणालाही वा-यावर सोडलेले नाह,असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७ एप्रिल रोजी केले.रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांना आपण खासदारकीपेक्षा ही मोठा  सन्मान देऊ,अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.पारवे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पादधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा नागपूरातील देशपांडे सभागृहात पार पडला,त्या मेळाव्याला संबाेधित करताना शिंदे यांनी अशी ग्वाही दिली.याच मेळाव्यात तुमाने यांनी मनातील खदखद बाहेर काढली.माझ्याबद्दल शिंदेना चुकीचे भरवण्यात आले.आमची संघटना नाही,तुमाने बाहेर फिरत नाहीत,ते घरातच बसतात,अशी खोटी माहिती दिली.याच संघटनेच्या भरवश्‍यावर आम्ही काँग्रेसचे दिग्णज मुकुल वासनिकांचा पराभव केला.मला उमेदवारी दिली असती तर मी गेल्यावेळभ पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलो असतो,मात्र आता मी पारवेंसाठी काम करेल.पूर्व विधानसभेतून शिवसेनेचे किमान १० आमदार राहतील,याची खात्रीच तुमानेंनी दिली.
अर्थात तुमानेंनी पारवेंसाठी किती परिश्रम घेतले,हा संशोधनाचा विषय आहे मात्र,रामटेकच्या निकालानंतर मनमानेल तो कारभार करणारे नेते हे ’कोमात’गेले असून या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ‘जोमात’असल्याचे चित्र उमटले आहे.
रश्‍मी बर्वे,सूडाचे राजकारण आणि जातप्रमाणपत्राचा लढा-
यावेळी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्‍मी बर्वे यांची घोषणा झाली.राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी उर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांचे पुत्र,प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता मात्र, पक्षाने नितीन राऊत यांनाच रामटेकमधून लढण्याचे फर्मान काढले.तत्पूर्वी,माजी मंत्री सुनील केदार यांनी रश्‍मी बर्वे यांनाच उमेदवारी घोषित करावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने रश्‍मी बर्वे यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवावा यासाठी केदारांनी दबाव टाकला.दरम्यान,भाजपच्या वतीने बर्वे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले.त्यांच्या जात प्रमाणपत्रावार आक्षेप घेऊन अखेर त्यांचा उमेदवारी अर्जच बाद करण्यात भाजपला यश मिळाले.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघातून रश्‍मी बर्वे यांच्या उमेदवारी अर्ज बाद झाल्याने त्यांच्या ऐवजी त्यांचे पती श्‍यामकुमार बर्वे निवडणूकीच्या रिंगणात उभे राहीले.काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का होता.रश्‍मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनी अवैध ठरवले.खबरदारी म्हणून काँग्रेसने रश्‍मी बर्वे यांच्यासोबतच त्यांचे पती श्‍यामकुमार बर्वे यांचा ही उमेदवारी अर्ज खबरदारी म्हणून भरुन ठेवला होता.त्यांच्या अर्जासोबत ए.बी.फॉर्म सुद्धा जोडला होता.ही खबरदारी घेतली नसती तर इतर कोणाला तरी समर्थन देण्याची वेळ काँग्रेसवर आली असती.रश्‍मी बर्वे या तगड्या उमेदवार मानल्या जात होत्या.पारवे यांच्या विजयात बर्वे या फार मोठा अडथळा ठरत होत्या.त्यामुळेच सुरवातीपासून त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी भाजपने अनेक खटाटोप केले.
एका अधिका-याने तर त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते.मात्र,उच्च न्यायालयात धाव घेऊन बर्वे यांनी हा आदेश मागे घेण्यास भाग पाडले.रश्‍मी बर्वे या केदारांच्या कट्टर समर्थक असून त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी केदारांनी काँग्रेसच्या शीर्षस्थ पदाधिका-यांना अंगावर घेतले होते.विरोधकांच्याही मनात धास्ती निर्माण केली होती.बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राचा लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाेहोचला.मात्र,त्यांना दिलासा मिळाला नाही,दूसरीकडे अमरावतीच्या भाजपच्या उमेदवार व माजी खासदार नवनीत राणा यांचे जात वैधताप्रमाणपत्र हे ३ एप्रिल रोजी वैध ठरवण्यात आले.
रामटेकचे आमदार आशिष जयसवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन बर्वे यांच्यावर गंभीर आरोप केले,यावर माझा जन्म मध्यप्रदेशात झाला असेल आणि जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटे प्रमाणपत जोडले हे सिद्ध केल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल,असे खुले आव्हान रश्‍मी बर्वे यांनी दिले. या स्तराच्या राजकारणामुळे ग्रामीण मतदारांमध्ये रश्‍मी बर्वे यांच्यासाठी सहानुभूती निर्माण झाली. अर्थात मतदानामध्ये ही बाब प्रभावी नसली तरी शिंदे गट व उबाठा गट यांच्यातील विस्तवाचा फायदा काँग्रेसला विजयश्री खेचून आणण्यात झाला,यात दुमत नाही.
या सर्व घडामोडींवर पराकोटीचा नाराज असलेला मतदार राजा यांनी १९ एप्रिल रोजी आपला कौल दिला.४१.३ अंश तापमानात देखील रामटेक मतदारसंघातील ग्रामीण भागात मतदारांनी रांगा लावल्या.एकीकडे शिंदे गटाचे पदाधिकारी संदीप इटकेलवार यांनी आमच्याकडे सक्षम उमेदवार असताना आयात उमेदवारासाठी काम करणार नसल्याचा इशारा दिला होता.रामटेक मतदारसंघाची जनता ही शिवसेना व तुमानेंसोबत असल्याचा त्यांचा दावा होता.

दुसरीकडे केदार यांचा उजवा हात असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी ऐन लोकसभा निवडणूकीत फडणवीस यांचा हात धरुन ‘कमळ ‘हातात घेतले.सातत्याने गटा-तटाचे राजकारण करुन केदार यांनी सावनेर मतदारसंघाला विकासापासून दूर ठेवल्याचा वरुन आरोप ही केला.हे केदारांना आणखी डिवचण्याचे काम झाले. सावनेर विधानसभेच्या धनानंदाला खाली खेचण्यासाठी भाजपला चंद्रगुप्तचा शोध लागल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते,परिणामी भाजपचा हाच चंद्रगुप्त असल्याच्या चर्चेला त्यावेळी उधाण आले.

 

पारवे ना घरके ना घाटके…
पारवे यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्हानमध्ये १० एप्रिल रोजी प्रचारसभा घेतली अंगात नाही बळ,चिमटा काढून पळ,अशी उपरोधिक टिका शिंदे यांनी विरोधकांवर सभेत केली तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तर काँग्रेसचे उमेदवार श्‍यामकुमार बर्वे यांना अप्रत्यक्षपणे ‘रेतीचोरास निवडून देणार का?’असा टोला हाणला.(संपूर्ण पट्ट्यात रेती चोरी नव्हे तर तस्करी करणारा व पोलिस यंत्रणा,प्रशासनाला गुंडाळून ठेवणारा नेता कोण?हे ग्रामीण भागातील शेंबड्या पोराला देखील माहिती आहे,हा भाग अलहदा)आता देशात मोदी यांचे सरकार असून ठोकशाही खपवून घेतली जाणार नाही,असा इशाराच केदारांना दिला होता.रेतीचोरास कोण संरक्षण देत आहे,हे सांगण्याची गरज नाही,हे आता खपवून घेतले जाणार नाही,ठोकशाही संपली आहे,मी राज्याचा गृहमंत्री असून कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा फडणवीस यांनी त्या सभेत केदारांना दिला.तर रामदास आठवले यांनी ‘संविधान बदलण्याची भाषा करणारेच बदलतील,मोदींचा प्रयत्न संविधान मजबूत करण्याचा असल्याचे सांगितले.
या सर्व घटनांमुळे केदारांनी रामटेकची निवडणूक आणखी प्रतिष्ठेची केली.त्यांनी एकट्यानीच बलाढ्य अश्‍या महायुतीसोबत थेट लढा दिला.
मोदी यांनी देशभरात एक घटना लागू करण्याचे धाडस काँग्रेसने दाखवले नसल्याची टिका केली.मतदाराचे प्रत्येक मत महायुतीला विजयी करणारे आणि इंडिया आघाडीला शिक्षा देणारे असेल,असे ते म्हणाले.२०२४ बाय ७ ते २०४७ हे माझे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.अातापर्येतची दहा वर्षे म्हणजे ‘ॲपेटायझर’असून पुरी थाली आला अभी बाकी आहे,असा पुनरुच्चार त्यांनी केला.मोदी रामटेकला आले होते,असे सांगत प्रत्येक घरात माझा नमस्कार पोहोचवा.तुमचे आर्शिवाद लाभतील तर मला कामासाठी उर्जा मिळेल.गोसेगुर्दसाठी काँग्रेसने अनेक दशके लावली.पेयजल,सिंचन ही मोदींची गॅरेंटी आहे,असा दावा त्यांनी केला.
रामटेकमध्ये नरेंद्र मोदी,सिनेस्टार गोविंदा,बावणकुळे,सुनील केदार,अनिल देशमुख,कन्हैयाकुमार,प्रकाश आंबेडकर यांच्याही सभा झाल्या.मोदींच्या सभांमुळे मतांमध्ये वाढ होईल,असा होरा फडणवीसांनी व्यक्त केला होता.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन सभा घेतल्या तसेच रोड शो करुन मोटरसायकलवरुन पारवेंना घेऊन फेरफटका ही मारला.मोदींच्या गॅरेंटीवर जनतेला विश्‍वास असल्याचे मोदींसोबतच्या सभेत पारवे म्हणाले.मात्र,गेल्या ७५ वर्षात भारत देशात प्रगल्भ झालेल्या लोकशाहीत कोणत्याही निवडणूकीत एकच गॅरेंटी शंभर टक्के काम करते ती म्हणजे,मतदारांची गॅरेंटी.कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून द्यायचे हे मतदार राजा पोटचे पाणी ही हलू न देता अर्थात कोणालाही कळू न देता करेक्ट कार्यक्रम करतो.
या निवडणूकीत अगदी पहील्या टप्प्यापासूनच प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब होते आणि एकमेकांवर कुरघोडी करणारी,खालच्या स्तरावरील टिका,धमकीवजा भाषा हाच प्रचाराचा स्तर जनतेने अनुभवला.कन्हान मधील प्रचार सभेत संविधान बदलाची भीती दाखवत विरोधक जनतेला मुर्ख बनवित असल्याचा आरोप मोदी यांनी केला.
माझे राजकीय जीवन संपवण्यासाठी विरोधक अधिका-यांचा वापर करीत आहेत मात्र,कोणासमोरही झुकणार नाही.एकेकाला बघून घेईल,असा इशाराच केदारांनी २७ मार्च रोजी आपल्या भाषणात दिला होता.घडले ही तेच.काँग्रेसमुक्त झालेल्या लोकसभा क्षेत्रात बाहूबली विरोधकांच्या नाकावर टिच्चून केदार यांनी आपला उमेदवार, ७८ हजारांच्यावर मताधिक्याने जिंकून आणल.अगदी २१ सा व्या फेरीपर्यंतच्या मतमोजणीत श्‍यामकुमार बर्वे हे आघाडीवर होते.
परिणामी,काँग्रेस सोडून कमळ हातात घेऊ पाहणारे मात्र,धनुष्यबाण हातात घेतल्याने पारवे हे या निवडणूकीनंतर ‘ना घर के ना घाट के’राहील्याची चर्चा ऐकू येत आहे.
दस्तूरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा व अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी नागपूरात मुक्कामी आले असताना,रामटेक मे कौन जीत रहा है…असा प्रश्‍न पदाधिका-यांच्या बैठकीत २० एप्रिल रोजी केला.त्यांनी ११ एप्रिल रोजी रामटेकसाठी कन्हान मध्ये सभा घेतली होती त्यामुळे त्यांना उत्सुकता होती तसेच १९ एप्रिल रोजी नागपूर तसेच रामटेकसह पहील्या टप्प्यातील मतदान आटोपले होते.
पदाधिका-यांनी महायुतीचा उमेदवार विजयी होणार असल्याचे लगेच मोदींना सांगितले!
भाजप पदाधिका-यांनी जरी मोदींना खोटे उत्तर देऊन वेळ मारुन नेली असली तरी मतदार राजांनी मोदींना खरे उत्तर दिले,रामटेकमध्ये बर्वे जिंकत आहेत…..!
रामटेक…मतदानाची तुलनात्मक टक्केवारी-
सावनेर (२०१९ ) ६२.५६२-(२०२४ )६१.४४
काटोल (२०१९) ६४.२९- (२०२४) ६२.९६
हिंगणा (२०१) ५८.४२-(२०२४)५४.१६
कामठी (२०१९) ५८.६०-(२०२४ )५८.६९
उमरेड (२०१९)६७.१५-(२०२४)६७.१६
रामटेक (२०१९) ६४.५८(-२०२४) ६६.३७
रामटेक…एकूण उमेदवार २८
एकूण मतदार: २०,४६ हजार,४३५
पुरुष: १०,४३ हजार ६०१
महिला:१०,०२,७८०
तृतीयपंथी: ५४
मतदान केंद्र: २,४०५
झालेले मतदान: १२,४९ हजार,८६४
पुरुष:झालेले मतदान:६,६६,३०२(टक्केवारी: ६३.७७)
महिला:झालेले मतदान: ५,८३,५५६(टक्केवारी: ५८.११)
इतर: ६
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रथम ५४.११,नंतर ५४.६८ असे आकडे दर्शविण्यात आले.यानंतर मतदानाच्या १३ दिवसांनंतर निवडणूक आयोगाने रामटेकमध्ये ६२ टक्के मतदान झाल्याचे घोषित केले.
………………………………………………………..
[तळटीप- रामटेकमध्ये काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष् किशोर गजभिये यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरला.यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या व वंचितने आपला अधिकृत उमेदवार शंकर चहांदे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत गजभिये यांना पाठींबा जाहीर केला.दूसरीकडे उबाठाचे पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे यांनी देखील रामटेकमधून बंडाचे निशाण फडकवले मात्र,नंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली.बसपाचे संदीप मेश्राम यांना देखील प्रभावी कामगिरी करता आली नाही.हे सर्व उमेदवार रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत निष्प्रभावी ठरले.]
हे ही वाचा….
https://sattadheesh.com/uprjdhni/20705/20/
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या