
हनुमान मंदिरात ’मिडीयाला बाहेर हाकला‘चे उमटले सूर:कार्यकर्त्यांची दादागिरी
हनुमान चालीसाचे अर्धवट पठण!रवि राणांनी तर फक्त पालटले पुस्तकातले चित्र
हनुमान चालीसा पठणाचा नागपूरात हायप्रोफाईल ‘इव्हेंट!’
नागपूर,ता. २८ मे २०२२: अमरावतीच्या खासदार व अपक्ष आमदार नवनीत राणा व रवि राणा यांचे आज दूपारी १ वाजता नागपूरात आगमन झाले,रामनगर येथील हनुमान मंदिरात त्यांच्याकरवी हनुमान चालीसाचे पठण व आरतीचा(भोंग्यांशिवाय)उपक्रम आयोजित करण्यात आला होता,सध्या देशभर गाजत असणारा हनुमान चालीसा पठणाचा राणा दाम्पत्यांकडून हायप्रोफाईल इव्हेंट आज नागपूरात देखील साजरा झाला मात्र मंदिराच्या आत एवढ्या गोंधळात काही मिडीयाकर्मी पायात वाहण घालून गेले असता, गळ्यात भगवे उपरणे व डोक्यावर भगवी टोपी घालणा-यांनी मिडीयाकर्मीसोबत जोरदार धक्काबुक्की केली एवढंच नव्हे तर त्यांना धक्के देत मंदिरा बाहेर काढल्याची घटना घडली!
राणा यांच्या समर्थकांमध्ये महिला यांचा देखील रुबाब कमी नव्हता,’आधी सगळ्या मिडीयाकर्मींना बाहेर हाकला’ अश्या शब्दात त्या पोलिसांना सांगत होत्या.एका समर्थकाने तर एका प्रादेशिक वृत्त वाहिनीच्या कॅमरामॅनला जोरदार धक्का दिला,ते आपल्या कॅमरासकट पाठीमागे पडले,यावेळी इतर वृत्तवाहिनीच्या मिडीयाकर्मींनी त्या जोरआजमाईश करणा-या कार्यकर्त्याला आवर घालण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्याचा पारा पार चढला होता,त्या मिडीयाकर्मीने चूकून पायातील वाहणे बाहेर न काढता मंदिरात प्रवेश केला होता,एवढ्या गर्दीत आणि एवढ्या हायप्रोफाईल मेलोड्रामाचे चित्रिकरण करण्यात दंग असणारे व रणरणत्या उन्हात आपले कर्तव्य पार पाडणा-या मिडीयाकर्मींवर आज राणा यांच्या समर्थकांकडून चांगलीच धक्काबुक्की झाली.मिडीयाकर्मींसाठी अत्यंत अपमानास्पद शेरेबाजी आतमध्ये मंदिरात सुरु होती. मिडीयाकर्मींना बाहेर हाकला,अश्या शब्दात राणा दाम्पत्याच्या महिला समर्थक बोलत होत्या.
दूसरीकडे मिडीयाकर्मींनी ज्या प्रमाणात हा इव्हेंट कव्हर करायला गर्दी केली होती त्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.एका प्रादेशिक वृत्त वाहीनीचे तर दिल्ली,यवतमाळ,अमरावती व नागपूरातील दोन असे वेगवेगळ्या शहरातूनच एकूण ‘पाच’ प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली.एकच उपक्रम,एकच राजकारणी,एकच ठिकाण मात्र तरीही पाच शहरातून एकाच वृत्तवाहीनीचे पाच-पाच मिडीयाकर्मी राणांना कव्हर करण्यासाठी उपस्थिती दर्शवित असतील तर राणा दाम्पत्यांच्या लोकप्रियतेत मिडीयाकर्मीचा किती मोठा वाटा आहे,याचेच हे ‘आदर्श‘उदाहरण मानावे लागेल!
नवनीत राणा यांना आपल्या कार्यकर्त्यांची व समर्थकांची गर्दी किती प्रिय आहे याची चूणूक त्यांचे नागपूरात १ वाजून १५ मिनिटावर आगमन होताच नागपूर विमानतळावरच दिसली.तेथील कर्तव्यावर असणा-या पोलिसांनी मिडीयाकर्मींसाठी एका टेबलची व्यवस्था केली ज्यावर समस्त वृत्तवाहीन्यांचे,स्थानिक वृत्त वाहिन्या व डिजिटल मिडियाचे बूम ठेवण्यात आले हाेते मात्र नवनीत राणा यांनी मिडीयाकर्मींकडे येण्याऐवजी त्यांच्या समर्थकांकडे गर्दीकडे धाव घेतल्याने आपापले बूम उचलून मिडियाकर्मींना त्यांच्या मागे धाव घ्यावी लागली!यामुळे विमानतळावरच मिडीयाचाही गोंधळ उडाला व पोलिसांचीही तारंबळ उडाली.
यानंतर राम नगर येथील हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याचे आगमन ढोल ताश्याच्या गजरात झाले,तत्पूर्वी आज नागपूरच्या रणरणत्या उन्हात त्यांची वाट बघत तातकळत उभ्या असणा-या मिडियाकर्मींचे घामाचे लोट अविरत वाहत होते.मंदिराच्या आत आणि बाहेर आधीच राणांच्या कार्यकर्त्यांची व समर्थकांची अलोट गर्दी उसळली होती.
अनेक मिडीयाकर्मी हे तर बाहेरच्या भागात प्रसादाचे वाटप करणा-या लाकडी टेबलवर चढून आतील भागाचे छायाचित्रण करीत होते.राणा यांच्यासमवेत त्यांचे केंद्रिय सुरक्षा बलाचे जवान हे पायातील वाहणे न काढताच मंदिराच्या आत प्रवेशकर्ते झाले,जे कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टिने योग्य ही होते मात्र तोच न्याय एवढ्या गोंधळात काही मिडीयाकर्मींनाही लागू होत असताना ,काही समर्थकांनी मात्र मिडीयाकर्मींना धक्के देऊन मंदिरा बाहेर काढले.हिंदू धर्मात ‘आपाद् ’धर्म सांगितला गेला आहे,संकट किवा अडचणींच्या वेळी प्रथा,परंपरांना फाटा देण्याची सूचना या आपाद् धर्मात आहे तरी देखील अनावधानाने पायातील वाहणे न काढता गोंधळात काही मिडीयाकर्मींनी मंदिरात प्रवेश घेतला असेल तर असे कोणते संकट अवघ्या मानवजातीवर कोसळले होते?एकीकडे भगवंत हा निर्गुण,निराकार,अस्पर्श व चराचरामध्ये व्यापलेला असल्याची शिकवण हिंदू धर्मशास्त्रात देत असतानाच चूकून पायातील वाहणे आपले कर्तव्य बजावत असताना मंदिर प्रवेशाच्या वेळी राहील्यास चराचरात व्यापलेल्या भगवंतांला त्याचा विटाळ होतो?यासाठी त्याच्या भक्तगणांना चक्क मिडीयाकर्मींनाच मारहाण करण्याचा परवाना मिळतो?
एवढंच नव्हे तर राणा दाम्पत्याला गराडा करुन बाईट घेणा-या मिडीयाकर्मींमुळे त्यांना त्यांच्या लाडक्या राणा दाम्पत्यांसोबत संवाद साधता येऊ शकत नसल्याने काही महिला समर्थकांनी मिडीयाला चांगलेच लक्ष केले.वारंवार पोलिसांना त्यांनी मिडीयाला आधी मंदिरा बाहेर काढण्याची सूचना केली,पोलिसांनी देखील पुढाकार घेत मिडीयाला मंदिरा बाहेर जाऊन राणा दाम्पत्यांसोबत संवाद साधण्याची सूचना केली.
बाहेरील उन्हाच्या काहीलीत,अत्यंत गोंगाटात जो-तो आपापला बूम धरुन नवनीत राणा व रवी राणा यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करु लागला मात्र ’एक ना धड भाराभार चिंध्या’या म्हणी प्रमाणे ते काय बोलत होते,ते अवाक्षर ही कोणाच्या कानावर पडत नव्हते.
‘सत्ताधीश’ने मिडीया कॅमरामन याला मारहाण करणा-या समर्थकाच्या नावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता कमलेश बोंबलीवार असे त्याचे नाव असल्याचे सांगितले जात आहे.मिडीयाकर्मींवर मंदिराच्या आत दादागिरी करणारे महिला व तरुण समर्थक हे बजरंग दलाचे कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे.आसावरी नावाच्या महिलेने मिडियाविषयी अत्यंत बेजवाबदार विधाने केलीत.बजरंग दलाचे शहरातील जवाबदार पदाधिकारी यांच्याशी ‘सत्ताधीश’ने संवाद साधला असता,आम्ही तेथे फक्त वैयक्तीकरित्या उपस्थित होतो,असे सांगण्यात आले,संघटनेतर्फे आमची उपस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले.भगवे उपरणे व भगवी टोपीवर बजरंग दल लिहले असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते ‘बजरंग दल’ लिहले नसून ‘बजरंगबलीचे ’नाव असल्याचे त्यांनी सांगितले.
तरुणी मिडीयाकर्मीच्या डोळ्यात अश्रू-
हातात बूम घेऊन मंदिराच्या आत शिरण्याचा प्रयत्न करणा-या एका तरुणी मिडीयाकर्मीला पोलिसांनी ऐन प्रवेशद्वारावरच अडवून ठेवलं.आतमध्ये घूसण्यात यशस्वी झालेल्या मिडीयाकर्मींसोबत तिलाही तिच्या वृत्तवाहीनीसाठी बाईट घेणे अत्यावश्यक व अपरिहार्य असतानाही तिला आत प्रवेश दिला जात नव्हता,यामुळे तिथेच तिला रडू कोसळले,एका महिला राजकारणीसोबत वेगळा व्यवहार व एका महिला मिडीयाकर्मीसोबत एवढा वाईट व्यवहार तुम्ही कसे काय करु शकता?असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला,यावर तुम्ही उशिरा आलात,असे चमत्कारिक उत्तर प्रवेशद्वारावरील पोलिसांनी दिले.
एकतर मंदिराच्या आतमध्येच राणा यांचे समर्थक,अमरावतीवरुन आलेले भरमसाठ कार्यकर्ते,नागपूरातील समर्थकांचीच एवढी गर्दी होती की मिडियाकर्मींसाठीच उभे राहायला देखील जागा शिल्लक नव्हती.तरीही पोलिसांनी मिडीयाकर्मींना मंदिराच्या आत प्रवेश करण्यापासून रोखले तर त्याच पोलिसांनी राणा यांच्या समर्थकांच्या सूचनेवरुन मिडीयाला अक्षरश:मंदिराच्या बाहेर ही काढले.
एवढा सगळा मेलोड्रामा हा अनेक कॅम-यात चित्रबद्ध झाला त्यात नवनीत राणा यांनी अर्धीच हनुमान चालीसा वाचल्याचे निर्दशनास आले तर दुसरीकडे रवि राणा हे फक्त हनुमान चालीसा पुस्तकातील छायाचित्रे चाळताना दिसून पडलेत.यानंतर आरती झाली व मेलोड्रामा संपला.
मंदिराच्या पदाधिका-यांना मिडीयाकर्मींबाबत घडलेल्या घटनांबाबत विचारले असता त्यांनी देखील मिडीयालाच दोषीकरार देत,मिडीयाकर्मी मुळीच ऐकत नाहीत ते फार हेकेखोर आहेत अशी टिपण्णी केली!आम्ही मिडीयाला रोखण्याचा प्रयत्न केला असता एका मिडियाकर्मीने उलट आम्हालाच ’तुमच्या मंदिरात साधे कुत्रे देखील फिरकत नाहीत’अशी टिपण्णी केल्याचा आरोप केला.
ऐन नवतपात आज शहरामध्ये अनेक भरगच्च राजकीय उपक्रम होती.यात मिडीयाकर्मींची सर्वात जास्त धावाधाव झाली,यातच एका वृत्तवाहीनीच्या कॅमरामॅन याला भोवळ देखील आली.तातडीने त्यांना हनुमान मंदिरातून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
जीवावर उदार होऊन मिडीयाकर्मी आपल्या प्रेक्षकांना,वाचकांना लाईव्ह बातमी देण्याचा प्रयत्न करीत असतात,अश्यावेळी काही राजकारण्यांच्या व हिंदूत्वावाद्यांच्या अतिशहाणपणामुळे एखाद्या मिडियाकर्मींच्या जीवावर देखील बेतू शकतं,याचे भान सर्वांनीच जपणे अत्यावश्यक आहे.ज्यांनी राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन रामनगर येथील हनुमान मंदिरात केले त्यांचे नियोजन अत्यंत ढिसाळ व संतापजनक होते,असेच आता म्हणावे लागेल.
राणा दाम्पत्यांना एकीकडे त्यांच्या प्रत्येक कृतीला मिडियाकडून प्रसिद्धीची अपेक्षा असते दूसरीकडे त्यांच्या उपक्रमांमध्ये मिडीयाकर्मींनाच अश्या पद्धतीने अवमान सहन करावा लागत असल्यास प्रसिद्धीलोलूप या दाम्पत्यांच्या उपक्रमांना किती फूटेज द्यावे?याचा विचार आता माध्यकर्मींनीच करण्याची खरी गरज आहे.
नवनीत राणांनी केली मुख्यमंत्र्यांची तुलना शनि देवतेशी!
माध्यमांना प्रतिक्रिया देताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्राला जी शनिची पिडा लागली आहे ती लवकर सुटो अशी टिपण्णी करुन नकळत शनि देवतेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत केली.त्यांच्या या हनुमान चालीसा पठणाच्या उपक्रमानंतर सर्वांनाच संकटमोचक हनुमंतांची आठवण येऊ लागली,चांगले आहे सर्वांनी हनुमतांची आठवण ही काढलीच पाहिजे,यात कोणीही आडकाठी आणू शकत नाही,असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री ठाकरे हे त्या सर्वांना थांबवतात जे हनुमंतांचे नाव घेतात,त्यांचा या कृत्याचा विरोध केल्यास त्यांना तुरुंगात डांबतात,त्यामुळेच त्या नागपूरात आल्या व संकटमोचन हनुमंताच्या देवळात चालीसा पठण केले व शनी देवतेची आरती केली.शनि महाराजांनी आता लवकरात लवकर महाराष्ट्राच्या सत्ताकारणातून दूर व्हावे व राज्यातील जनतेचे कल्याण करावे अशी पुश्तीही त्यांनी जोडली.आम्ही याच राज्यातील सुपुत्र आहोत,मुस्लीम संघटनांकडून त्यांना विगत दहा दिवसांपासून धमक्या मिळत असूनही ही लढाई सुरुच राहणार आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या धमक्यांना घाबरणारे नाही,असे त्या म्हणाल्या.
रवि राणा यांनी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांचा अहंकार आणि दर्पोक्तीचा प्रत्यय नागपूरात आल्याचे सांगितले.पोलिसांच्या करवी आम्हाला थांबविण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांनी आम्हाला शांततापूर्वक आरती करण्याची परवानगी बहाल केली. राम भक्त आणि हनुमान भक्त हेच आता मुख्यमंत्र्यांना सबक शिकवतील.महाराष्ट्रात भगवान श्री राम व हनुमंतांचे नाव घेण्यास मनाई आहे,हे संपूर्ण देश बघतच आहे,असे ते म्हणाले.
हनुमंतांकडे नेमकं काय मागितलं?यावर बोलताना देशातील बेरोजगारी संपू देत,शेतक-यांची खुशहाली होऊ देत असे साकडे घातले असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.




आमचे चॅनल subscribe करा
