फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराखीचा सण: कहानी पूरी ‘फिल्मी है...

राखीचा सण: कहानी पूरी ‘फिल्मी है…

Advertisements

रेवती जोशी-अंधारे

(माजी पत्रकार-दैनिक तरुण भारत)

एक हजारों में मेरी बहना है…या गाण्यासकट बॉलीवूडच्या आजवरच्या सगळ्या बहिण-भाऊ नात्याचे बंध उलगडणाऱ्या गाण्यांची आज उजळणी सुरू आहे. आठवणींच्या आंबटगोड चवीचं आणि विश्वासाच्या आश्वासक सुगंधाचा दरवळ असलेल्या या नात्याला भारतीय चित्रपटसृष्टीनं पॉलिश्ड् रूपात समाजापुढे आणलं. सुरुवातीला माहेरच्या साडीपर्यंत मर्यादीत राहीलेलं हे नातं बदलत्या ट्रेंडस् सोबत चकचकीत झालं. भावनिक बंधनाच्या रेशीमधाग्याला आधुनिकतेची सोनेरी किनार मिळाली. स्टार किवा सेलिब्रिटींनाही त्यांचं खासगी आयुष्य असतंच आणि आपल्यासाठी जसं हे भावाबहिणीचं नातं खास असतं ना, तसंच ते त्यांच्यासाठीही असतं. आणि ते बरेचदा सोशल मिडीयावर व्यक्तही होत असतं. आयुष्याच्या चढउतारातही ही भावंडंदेखील आपल्यासारखीच नातं जपत असतात. सदैव अभिनयाच्या मुखवट्यांमध्ये असणाऱ्या या फिल्मी भावंडांच्या जोड्या …खास ‘सत्ताधीशच्या‘ वाचकांसाठी !
…………
चित्रपटसृष्टीतील नेपोटिझम् या विषयावर कितीही उलटसुलट चर्चा होत असली तरी, आपण प्रत्येक क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात हे बघतो आहोतच. आज रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली आठवण येतेय सुशांत सिंग राजपूतची ! त्याच्या बहिणींनी कधी अशा राखीची कल्पनाही केली नसेल. असो ! तर, आपला मुद्दा सोडून चालणार नाही. बॉलीवूडमध्ये बहिणभावांच्या बऱ्याच सुपरहीट जोड्या आहेत. आता त्या का म्हणून सुपरहिट आहेत? हा भाग अलाहिदा ! पण, या क्षेत्रात ग्लॅमरचा स्पर्श झाला की, कर्तृत्त्व वगैरे पडद्याआड जाऊन सेलिब्रिटीची पदवी त्यांना चिकटते. नुसतीच अमक्या हिरोची मुलगी आणि तमकीचा मुलगा असं ग्लॅमर मिळत जातं आणि सेलिब्रिटी घडत जातात.
९० च्या दशकात किवा त्याआधीदेखील कलाकारांचं वैयक्तिक जीवन हा चर्चेचा विषय असला तरी तो दुय्यम असायचा. पण, आता कोण कोणाच्या लग्नात नाचलं? आणि कोणी कोणाकडे बघून नाक मुरडलं? या विषयाचीदेखील चवीचवीनं चर्चा होते. आज राखीपौर्णिमेच्या निमित्तानं, या ग्लोरीफाईड बहिणभावांचं जग बघू या. सध्या चित्रपटसृष्टीत ४० पेक्षा जास्त बहिणभावांच्या जोड्या काम करतायत. काही पडद्यावर तर काही पडद्याच्या मागे !

(सुशांतसिंग राजपूत आपल्या बहीणींसोबत)

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत चरित्र अभिनय करणारी शुभा खोटे आणि विजय खोटे ही जोडी सिनियरमोस्ट म्हटली पाहिजे. संयत अभिनय आणि तितकेच संयमित सामाजिक आयुष्य ! असेच आणखी एक व्यक्तिमत्त्व आहे अमिताभ बच्चन यांचं ! अभूतपूर्व लोकप्रियता लाभलेला हा माणूस जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा आहे. त्यांचा मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता नंदा हे दोघेही सार्वजनिक जीवनात आपलं नातं जपताना दिसतात. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुले सारा आणि इब्राहीम ही आणखी एक प्रसिद्ध जोडी आहे. ग्लॅमर त्यांच्या तीन पिढ्यांमध्ये आहेच. स्वत: सैफ आणि त्याची बहिण सारा अली ही जोडीदेखील मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयामुळे गाजली आहे. पण, सैफची आणखी एक बहिण आहे सबा अली खान ! ती मात्र ग्लॅमरपासून लांब आहे. अनिल कपूरची मुलगी सोनम आणि तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूर हे दोघे सोशल मिडीयावर नेहमी आपल्या नात्याचा परिचय देत असतात. कपूर घराण्यातील मुली-सुना (काही सन्माननीय अपवाद वगळता) मोठ्या पडद्यापासून लांबच राहिल्या आहेत. तरीही त्या कायम चर्चेत राहिल्या. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची मुले रणबीर आणि रिद्धिमा ! युथ हार्टथ्रोब असलेला रणबीर या सख्ख्या बहिणीच्या लग्नात डोक्याला फेटा आणि हात बांधून नम्रपणे उभा असलेला आपण सगळ्यांनीच पाहिला. ‘दबंग’ सलमान खानही बहिणीचे कोडकौतुक करण्यात अजिबात मागे नाही. अर्पिता खानसोबतचं त्याचं नातं पक्कं आहे. फक्त अर्पिताच नाही तर श्वेता रोहिरा या मानलेल्या बहिणीचं कन्यादानही त्यानंच केलंय. काही दिवसांपूर्वी ऋतिक रोशनची बहिण सुनैना हिने काही गंभीर आरोप केले होते. पण, वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील अंतर राखण्याचं कसब असलेल्या तिच्या भावाने विषय सामोपचाराने मिटविला. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे जुळे भाऊ लव-कुश यांच्यातील बंध दृढ असल्याचं नेहमीच दिसतं.

निर्माता-दिग्दर्शक साजिद खान आणि त्याची बहिण फराह खान, अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिचा भाऊ अश्मित पटेल, बालाजी टेलिफिल्म्सची एकता आणि तिचा भाऊ तुषार कपूर, शाहीद कपूर आणि त्याची बहिण सना या काही चर्चेत असलेल्या बहिणभावांसोबतच काही भावंडं अशी आहेत की, ज्यांच्यातील एक सिनेसृष्टीवर राज्य गाजवतो तर दुसऱ्याला कोणी ओळखतही नाही. शहनाज लालारूख ! नाही ओळखलंत? या आहेत, बादशहा शाहरूख खानची मोठी बहिण ! विशेष म्हणजे ती शाहरूख सोबत त्याच्याच बंगल्यात राहते पण, मिडीयाच्या नजरेपासून लांब ! विश्वसुंदरी ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य राय हादेखील माध्यमांपासून लांब राहतो पण, आपल्या बहिणीशी त्याचं नातं अगदी घट्ट आहे. अशीच काहीशी गोष्ट आहे प्रियंका आणि सिद्धार्थ चोप्रा या भावंडांची ! एकीकडे प्रियंका बॉलीवूडसोबतच हॉलीवूडला गवसणी घालत असताना, सिद्धार्थ चोप्रा पंचतारांकीत हॉटेलमध्ये शेफ होता. आता तो पुण्यात स्वत:चं रेस्टॉरंट चालवतो. विवेक ओबेरॉयची बहिण मेघना हिला सिनेसृष्टीचं अजिबात आकर्षण नाही आणि ती मुंबईतच गृहिणी म्हणून आनंदाने राहतेय. रणबीर सिंगची बहिण रितीका भवनानी हीदेखील आपलं वैयक्तिक आयुष्य भावाच्या सेलिब्रिटी असण्यापासून दूर राखून आहे.

या सगळ्या कलाकारांच्या खासगी आयुष्यात डोकावताना, हे गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, भारतीय कुटूंबव्यवस्था मजबूत आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक नात्याला एक दिवस दिला आहेच. केवळ सामान्य भारतीयच नाही तर भारतीयत्व राखून असलेल्या सेलिब्रिटीही नात्यांचा हा आनंद मनमुराद लुटतात. हिंदी चित्रपटसृष्टीच नाही तर संपूर्ण भारतवर्षासाठी अभिमान असलेल्या लता दिदींनी आज सकाळी राखीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांना धाकटा भाऊ म्हणून संदेश पाठवला. ‘आपला देश खूप उंचीवर नेईन’ असं वचन त्यांना मागितलं. पंतप्रधानांनीदेखील दिदींना विश्वासानं हे आश्वासन दिलं आहे. बहिणभावांच्या नात्याची ही आपली परंपरा. स्टेटसच्या कचकड्या बंधनापलिकडे वृद्धींगत होवो, हीच राखीची शुभेच्छा !

(रेवती जोशी अंधारे या दैनिक तरुण भारतातील माजी पत्रकार असून गेल्या दहा वर्षांपासून त्या सांस्कृतिक क्षेत्रातल्या अग्रगण्य पत्रकार मानल्या जातात.’सत्ताधीश’च्या वाचकांसाठी येत्या शुक्रवारपासून त्या चित्रपटसृष्टितील अनेक कांगोरे आपल्या लेखणीतून उलगडणार आहेत तसेच चित्रपटगृह उघडल्यानंतर ’फस्ट डे फस्ट शो’ यासाठी स्तंभलेखन करणार आहे.‘सत्ताधीश’च्या वाचकांसाठी त्यांचे लिखाण ही एक पर्वणीच राहणार असून त्यांच्या लिखाणाचा आनंद घेण्यासाठी ‘सत्ताधीश‘च्या बातम्या नियमित वाचित रहा.)

संपादक-डॉ.ममता खांडेकर
‘सत्ताधीश’
…………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या