

‘जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’चे शनिवारी थाटात उद्घाटन
नागपूर, २ एप्रिल: जनआक्रोश हा आत्मप्रेरित गट असून सामाजिक बांधिलकी जपत रस्ते अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जनआक्रोशचे ट्रॅफिक स्कूल माध्यमिक व महाविद्यालयीन मुलांमध्ये जनजागृती करण्याचे काम करणार आहे, ही चांगली बाब आहे. त्यासाठी जनआक्रोशने महाविद्यालयांशी करार करावा, मनपातर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले.
ट्रॅफिक पार्क, धरमपेठ येथे राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ‘जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’चे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार समीर मेघे, नॅशनल इन्शुरन्सचे उपमहाव्यवस्थापक बाबुलाल सोनकर व जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्दड यांची उपस्थिती होती. ट्रॅफिक स्कूलची धुरा सांभाळणारे रमेश शहारे व ज्ञानेश्वर पाहुणे यांचा यावेळी मनपा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राधाकृष्णन बी. म्हणाले, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा चांगला उपक्रम सुरू होत असून लाखो लोकांचा जीव वाचवण्याच्या जनआक्रोशच्या या मिशनला यश मिळावे, अशा शुभेच्छा देताना राधाकृष्णन बी. यांनी अपघातामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी जाणली पाहिजे, असे सांगितले.
समीर मेघे यांनी नितीन गडकरी यांनी कशी रस्ते सुरक्षा समिती स्थापन केली व त्याद्वारे कसे कार्य केले जाते याची माहिती दिली. युवावर्गाच्या अपघाताचे प्रमाण अधिक असून त्यांच्यामध्ये जनजागृती करणे जास्त महत्वाचे आहे. ते काम ट्रॅफिक स्कूल करेल, असे ते म्हणाले. बाबुलाल सोनकर यांनी रस्ते अपघात विमाबद्दल या स्कूलद्वारे माहिती दिली जावी, असे सांगत जनआक्रोशला जनरल इन्शुरन्सच्यावतीने एक बस भेट दिली.
प्रास्ताविकातून संजय डबली यांनी ‘जनआक्रोश ट्रॅफिक स्कूल’च्या कार्याची माहिती दिली. मनपाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार असून शहरातील पाच महाविद्यालयांशी जनजागृती संदर्भात करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. असे प्रशिक्षण व मार्गदर्शन अमरावती, इंदौर, भोपाळ येथेही दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.
सूत्रसंचालन दत्तात्रय कुळकर्णी यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अनिल लद्दड यांनी केले.




आमचे चॅनल subscribe करा
