
१८ वर्षीय जान्हवी चिंचुलकरचा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे अकाली मृत्यू
नागपूर,ता. २ सप्टेंबर २०२१: परिसरातील दुर्गंधीमुळे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे उपचारा अभावी १८ वर्षीय तरुणीचा दूर्देवी मृत्यू झाला.
नरसाळा परिसरातील गारगोटी येथील राष्ट्रसंत नगरमधील १८ वर्षीय तरुणी जान्वही चिंचुलकरचा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे बुधवारी मृत्यू झाला. मृतक जानवी चिंचुलकरची मंगळवारी रात्री प्रकृती बिघडली. परंतु परिसरातील रस्ता हा पाण्याखाली गेला असल्यामुळे दवाखान्यात जाण्यासाठी मोठी समस्या निर्माण झाली.यामुळे तिला वेळेवर उपचार मिळाले नाही व अखेर बुधवारी सकाळी तिचा मृत्यू झाला. महाराष्ट्राच्या उपराजधानीत रस्ता पाण्याखाली बुडाल्याने आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने एका उमलत्या वयाच्या तरुणीचा जीव जाणे ही पुरोगामी महाराष्ट्रासाठीच लजिरवाणी बाब ठरली.
जान्वहीचा लहान भाऊ हा देखील परिसरातील दुरावस्थेमुळे गंभीर आजारी आहे. अस्वच्छतेमुळे या भागात रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
प्रशासनाला वारंवार येथील समस्यांची माहिती देऊनही येथे कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आल्या नाही. त्यामुळेच अद्याप ख-या जीवनाला सुरवात ही न झालेल्या तरुण मुलीला नाहक आपले प्राण गमावावे लागल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.
मृतकाच्या नातेवाईकांनी महानगरपालिकेकडून ५० लाख रुपयांची तत्काळ मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. याकरिता त्यांनी हनुमाननगर झोन येथे आंदोलन केले. जेव्हापर्यंत मृतकाच्या नातेवाईकांना मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असे सामाजिक कार्यकर्ता दीपक मुळे यांनी सांगितले.
यावेळी हनुमाननगर झोन्या सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मृतकाच्या कुंटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. योग्य तपासणी करून बिल्डर तसेच दोषी असणा-यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. नाल्याचे लवकरात लवकर काम सुरू करण्याचेही आश्वासन यावेळी त्यांनी दिले. यानंतर रात्री आठ वाजता तरुणीवर अंतिम संस्कार करण्यात आले.
परिसरातील ‘टेक ऑफ सिटी’ ही वसाहत वसवणा-या बिल्डरने ही वसाहत बांधताना नाल्याचा प्रवाह वळवल्याने नाल्याचे पाणी वस्तीत शिरत असतं. बिल्डरने येथील खुल्या भूखंडावर गडरचे पाणी सोडल्यामुळे येथील रस्त्यांना चक्क तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या परिसरात अनेक प्रकारचे आजार पसरले आहेत.
या विषयी येथील नागरिकांनी काही दिवसांपूर्वी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता लिना उपाध्याय यांचीही भेट घेतली होती. तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. परंतु आतापर्यंत काहीही झाले नसल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. अश्या या प्रशासकीय अनास्थेचा जान्हवी नाहक बळी ठरली.
हाच परिसर एखाद्या मंत्री किवा आमदाराचा असता तर?प्रशासनाने अशीच अनास्था दाखवली असती का असा संताप जान्हवीचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत.बिल्डरला नेमके कोणाकोणाचे अभय आहे याचा ही शोध घेऊन त्यांच्यावर सदोष मनुष्य वधाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
नाल्याचे काम लवकर सुरू न झाल्यास पुन्हा आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा दीपक मुळे व परिसरातील नागरिकांनी दिला.
विशेष म्हणजे नुकतेच महानगरपालिकेतर्फे शुक्रवारी तलावाच्या ५४ कोटींच्या सौंदर्यीकरणासाठी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले मात्र मनपा प्रशासनाला शहराच्या आऊटर भागातील नागरिक हे कोणत्या जीवघेण्या यातनेत जगत असतात,याचे कोणतेही सोयरसूतक नाही.पूर्वीच्या नरसाळा ग्रामपंचायतीचा हा भाग आता नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत आला आहे.येथील राष्ट्रसंत नगर,प्रभाग क्र.२९ येथील रहीवासी गेल्या अनेक महिन्यांपासून अतिशय दुरावस्थेत जीवन यापन करीत आहेत,मात्र नागपूर महानगरपालिकेच्या प्रशासन व सत्ताधा-यांना कोट्यावधीचा खर्च तलावांच्या सौंदर्यीकरणावर करण्यात रस आहे,नागरिकांची नरकयातनेतून सुटका करण्यात नाही,त्यांना रस्ते,स्वच्छतासारखी अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविण्यात नाही,जान्हवी हीच्या अकाली मृत्यूने हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.




आमचे चॅनल subscribe करा
