
२८ ऑक्टोबर पासून सायंटिफिक सभागृहात खासदार करंडक एकांकिका स्पर्धेला सुरवात
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचा उपक्रम
मकरंद अनासपुरे,सुकन्या कुळकर्णी, देवेंद्र दोडके राहणार उपस्थित
नागपूर,ता. २४ ऑक्टोबर:खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे येत्या २८,२९ व ३० ऑक्टोबर रोजी सायंटिफिक सभागृहात सकाळी १० वाजता खासदार करंडक एकांकिका स्पर्धेला सुरवात होत असून एकूण २४ एकांकिका स्पर्धेदरम्यान सादर होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रा.अनिल सोले यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत दिली.३१ ऑक्टोबर रोजी स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा रेशिम बाग येथील भट सभागृहात होणार असून याप्रसंगी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.
नागपूरकरांसाठी गौरवाची बाब म्हणजे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी मराठी चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे,अभिनेत्री सुकन्या कुळकर्णी तसेच ‘माझ्या नव-याची बायको’फेम देेवेंद्र दोडके हे उपस्थित राहणार आहेत.पुरस्कार वितरण सोहळ्या पूर्वी रसिक श्रोत्यांसाठी सुप्रसिद्ध गायक मंजुषा पाटील तसेच आनंद भाटे यांचा नाट्यगीतांचा कार्यक्रम सादर होईल.
शुक्रवार दि. २८ ऑक्टोबर रोजी सायंटिफिक सभागृहात एकांकिका स्पर्धेचे उद् घाटन, संस्कार भारतीच्या अध्यक्षा कांचन गडकरी यांच्या हस्ते होईल.अध्यक्षस्थान वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी भूषवतील.याप्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रभारी अध्यक्ष नरेश गडेकर तसेच दक्ष्ण मध्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष खिरवडकर उपस्थित राहतील.

सलग तीन दिवस चालणा-या देशभक्तीपर एकांकिका स्पर्धेत एकूण २४ एकांकिका सादर होणार असून पहील्या दिवशी २८ ऑक्टोबरला ७,दुस-या दिवशी २९ ऑक्टोबरला ९ तर तिस-या दिवशी ३० ऑक्टोबरला एकूण ९ एकांकिका सादर होतील.
विजेत्या स्पर्धकांना करंडक तसेच ५१ हजार,३१ हजार,२१ हजार तसेच ११ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.याशिवाय १० उत्तेजनार्थ रोख पारितोषिक देखील देण्यात येईल.करोना काळातील प्रदीर्घ काळखंडानंतर खासदार करंडक एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास ३०० कलावंतांची कला-साधना नागपूरकरांना अनुभवता येणार असल्याचे प्रा.सोले यांनी सांगितले.हे सर्व कलावंत नागपूर तसेच नागपूर ग्रामीण भागातून येऊन आपली कला सादर करणार आहेत.
स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने एकांकिकांचा विषय हा देखील देशाच्या अमृत महोत्सवाचे निमित्त साधून देशभक्ती ठेवण्यात आले असल्याचे प्रा.सोले यांनी सांगितले.मायबाप रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने एकांकिका स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
पत्र परिषदेला समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता,उपाध्यक्ष प्रा.मधुप पांडेय,कोषाध्यक्ष राजेश बागडी,सदस्य हाजी अब्दुल कादीर,संजय गुळकरी, रेणूका देशकर,अभय देशमुख,किशोर पाटील,भाेलानाथ सहारे आदी उपस्थित होते.
सर्व एकांकिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर-
विशेष म्हणजे ही संपूर्ण स्पर्धा तसेच मुख्य दोन्ही सोहळे, उद् घाटन व पुरस्कार वितरण सोहळा यांचे ‘फ्लॅकसिगो’या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपण होणार असून देश-विदेशातील रसिक प्रेक्षकांना याचा आनंद घरी बसल्या घेता येणार आहे,अशी माहिती प्रा.सोले यांनी दिली.
या आहेत एकांकिका-
स्पर्धेची सुरवात ‘न्यू होप ऑफ इंडिया’या एकांकिकेपासून होणार असून यानंतर ‘अनंत मी’,‘समर्पिता झलकारी’,‘सुर्यास्त से पहले’,‘ जडे‘,‘फ्रिक्वेन्सी’,‘ टिवाल का खौफ’,‘शहीद‘,‘फकिरनामा‘,‘मिसींग‘,‘आझादी-७५’,’क्रांतीवीर’,‘ती…ते’,‘ झेंडा घ्या हो हाती’,‘दि प्लान अँड वध’,‘नराग्रणी‘,‘आहूती‘,‘माझी बाजू माझा पक्ष’,‘अवतरण’,‘मृत्यूंजय’,‘ समरसौदागिनी’,‘कॅप्टन’,‘विरासत’,‘अगस्त से अगस्त तक’ या एकांकिका सादर होतील.




आमचे चॅनल subscribe करा
