

चार दिवसांनंतर मिळाला होता अल्प दिलासा!
नागपूर,ता. ३ जुलै: महानगरपालिकेच्या संपूर्ण १४० केंद्रांपैकी अनेक केंद्रांवर नागरिकांनी लसीकरणासाठी आज चांगलीच गर्दी केली होती,अनेक केंद्रांवर तर सकाळी १० वा.च्या दरम्यान पोलिसांना व कमांडोजला पाचारण करावे लागले,विशेष:तरुणांनी या केंद्रांवर चांगलाच गोंधळ घातला त्यामानाने ज्येष्ठ नागरिक मात्र त्यांना आज तरी लस मिळणार की नाही याच विवंचनेत असल्याचे आढळून आले.
तब्बल चार दिवसांच्या ‘विश्रांती’नंतर महापालिकेला केवळ ५ हजार लसींचा पुरवठा झाला असे सांगण्यात येते,त्यामुळे प्रत्येक लसीकरण केंद्रांवर सुरवातीला १७ व्हायल्स पुरविण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य अधिका-यांचा मॅसेज येऊन धडकला,मात्र अनेक केंद्रावर फक्त १५ व्हायल्सचाच पुरवठा करण्यात आला,याचा अर्थ एका केंद्रावर सर्वच वयोगटातील फक्त १५० नागररिकांचेच लसीकरण होणार होते मात्र प्रत्येक केंद्रावर हजारोंची गर्दी होती.
सकाळी ७ वा.पासूनच आज तरी लस मिळेल या आशेने नागरिकांनी मनपा केंद्रावर चांगलीच गर्दी केली.मात्र मनपाच्या या सर्व केंद्रावर अतिशय अल्प लशींचा पुरवठा झाला असल्याने चांगलाच गोंधळ उडाला.नागरिकांची ऐकून घेण्याची मनस्थितीच नसल्याने त्यांनी केंद्रावर लसी संपल्या,नंतर या असे उत्तर ऐकून देखील केंद्र सोडलेच नाही,शेवटी दुपारी पुन्हा अनेक केंद्रांवर ५ व्हायल्स आणखी पुरवण्यात आला व यामुळे सायंकाळी ५० नागरिकांचे मनपाच्या आरोग्य कर्मचा-यांना आणखी समाधान करता आले.
उद्या रविवारी पुन्हा सर्वच केंद्रांवर लसीकरण बंद आहे त्यामुळेच नागरिकांचा धीर आज पूर्णपणे सूटला होता, तरुणाई तर ऐकण्याच्या मन:स्थितीतच नव्हती.कोरोनाच्या दुस-या लाटेत दूर्देवाने १८ ते ४५ वयोगटातील अनेक तरुणांना जीव गमावावा लागला,एप्रिल आणि मे महिन्यातील ती भयावहता अद्याप नागरिक विसरले नसल्याने, लस हीच आता जीवनदायी ठरणार असल्याने ५० लाखांच्या जवळपास असणा-या या शहरातील प्रत्येकाला लसीचा पहीला किवा दूसरा डोज लवकरात लवकर हवा होता.
जिल्ह्यात व शहरात १८ वर्षावरील वयोगटात लसीकरण सुरु झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांना डोज देण्यात आले.त्यानंतर सतत एक दिवसाअाड लसीकरण बंद होते.सोमवारी लसीकरण झाल्यानंतर सलग ४ दिवस लसीकरण बंदच होते.यामुळे नागरिकांचा चांगलाच धीर खचला.अनेक लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी आपाल्यापरिने नागरिकांना समजावण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.
मनपाच्या लसीकरण केंद्रावर सर्वच वर्गाचे नागरिक गर्दी करतात,त्यात स्लम भागातील अनेक स्त्रिया या आरोग्य कर्मचा-यांच्या अक्ष् र:शहा विनवण्या करताना आढळल्या.मला मधुमेह आहे मला कोरोना लवकर होईल,काहीही करुन मला एक तरी लस द्या…..अशी याचना करतानाचे दृष्यही मनपा लसीकरण केंद्रांवर उमटले.
दूसरीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने काँग्रेस नगर येथील न्यू इंग्लिश शाळेत सुरु असलेल्या लसीकरण केंद्रावर सकाळी ८ वा.पासूनच मोठ्या प्रमाणात तरुणाईसोबतच नागरिकांनी तूफान गर्दी केली होती!माजी मुख्यमंत्री आज पुन्हा त्यांच्या या केंद्राला भेट देणार असल्यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त ही पहाटेपासून या ठिकाणी होता.
फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघाप्रमाणेच पूर्व नागपूरात आता पाटीदार समाज भवनात उद्यापासून लसीकरण केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे. भाजप आमदारांसह अनेक नगरसेवकांनाही नागरिकांच्या लसीकरणाचे ‘वेध’लागले आहेत. मनपाच्या अनेक लसीकरण केंद्रात तर अनेक भाजप नगरसेवकांची ’लुडबुड’ सातत्याने दिसून येत असल्याची माहिती सूत्राकडून मिळाली.
धंतोली प्रभागात भाजपच्या एका नगरसेविकेने निवडून आल्यानंतर एकदाही कारोनाकाळापूर्वी व नंतर ही, मतदारांना आपला चेहराही दाखवला नाही त्या धंतोली येथील एका लसीकरण केंद्रांवर दररोज आपले ५ ते ७ नातेवाईक लसीकरणासाठी घेऊन येत असल्याची माहिती आहे.याचा अर्थ ऐन कोरोना काळात जनता हाॅस्पीटल्स,बेड्स,ऑक्सीजन आणि रेमडिसिव्हिर अभावी मरत हाेती तेव्हा स्वत:चा जीव वाचवत हे नगरसेवक घरामध्येच बसले होते मात्र नागरिकांच्या लसीकरणासाठी असणा-या मनपाच्या लसीकरण केंद्रांवर आपलीच सत्ता मनपात असल्याने आपलाच पहीला ’अधिकार’ या जाणिवेतून भाजपचे हे नगरसेवक सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काच्या लशींवर डल्ला मारत स्वत:च्या आप्त-स्वकीयांना लस टोचून घेत असल्याचे दृष्य उमटले आहे.

पक्षाचे सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी न्यू इंग्लिश शाळेत २६ जून ते ७ जुलैपर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत मोफत लसीकरणाचा ‘इव्हेंट’ठेवला असतानाही व ते लसीकरण भाजपच्याच कार्यकर्त्यांंसाठी सुरु करण्यात आल्याची ‘वल्गना’केली असतानाही, भाजपचे अनेक नगरसेवक मनपाच्या विविध लसीकरणकेंद्रांवर आपल्या नातेवाईकांचा नंबर आधी लावत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
विशेष म्हणजे पुन्हा मनपा प्रशासनाने आज सर्व लसीकरण केंद्रांवर एकाच दिवशी रेकॉर्ड लसीकरण झाले असल्याचे सांगून पुन्हा एकदा आपली पाठ थोपटून घेतली आहे.मनपा आणि शासकीय केंद्रे मिळून आज २७,६०८ नागरिकांना लस मिळाली तर खासगी मध्ये ३,०८६ असे एकूण ३०,६९४ नागरिकांना लस टोचून मिळाली,मात्र दुसरीकडे ५० लाखांच्या लोकसंख्येत हे आकडे कितपत समाधान मानून घेण्यासारखे आहे?हे तारतम्य नोकरशाही बाळगण्यास असमर्थच आहे असेच आता म्हणावे लागेल,कारण आज हजारो नागरिक हे निराश होऊन लसीकरण केंद्रांवरुन परतले आहेत,हे वास्तव मनपा प्रशासनाच्या आकड्यासमाेर झाकाळू शकत नाही.
जीवाच्या भीतीने रांगेत असणा-या हताश,निराश आणि वैतागलेल्या जनतेला मात्र सगळं कळतं ‘ये पब्लिक है ये सब जानती है ये जो पब्लिक है,अजी अंदर क्या है..अजी बाहर क्या है’रांगेत उभे असणा-या तरुणाईने म्हणनूच राजकीय नेत्यांच्या भल्या मोठ्या कटआऊटकडे अंगुली निर्देश करताना ‘लस आणि मत’याचा काही एक संबंध नसल्याचे ठणकावून सांगितले……!
नागपूरकर जनता आज जीव वाचवण्यासाठी ‘याचक ’तर भाजपचे नेते,आमदार व नगरसेवक हे ‘प्राणदात्यांच्या’भूमिकेत वावरत असतील तर…..असेच उत्तर अपेक्षित आहे….!




आमचे चॅनल subscribe करा
