Homeनागपूर न्यूजयेणा-या निवडणूका युतीमध्येच लढणार ‘फिक्स’:कृपाल तुमाने

येणा-या निवडणूका युतीमध्येच लढणार ‘फिक्स’:कृपाल तुमाने

Advertisements
Advertisements

नवरात्रात मोठा धमाका करणार:किरण पांडव

पूर्व विदर्भातील शिवसेन पदाधिका-यांच्या नियुकत्या जाहिर

मंगेश काशीकर नागपूर लोकसभा संपर्क प्रमुख

नागपूर,ता.६ सप्टेंबर २०२२: विदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालायला सुरवात केली आहे.काल रात्रीच माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली.मागच्या आठवड्यात देखील बैठक पार पडली.विदर्भात शिवसेनेचे संघटन बलकट करण्यासाठी पदाधिका-यांच्या नियुकत्या करण्यात आल्या असून, आजची पत्र परिषद त्यांच्या नावांची घोषणा करण्यासाठीच आयोजित केली असल्याचे सांगून, येणा-या सर्व निवडणूका भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीमध्येच लढणार असल्याचे ‘फिक्स‘झाले असल्याचे रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितले.

ते आज मंगळवार दि.६ सप्टेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.याप्रसंगी आमदार आशिष जयस्वाल व किरण पांडव मंचावर उपस्थित होते.यावेळी बोलताना,कृपाल तुमाने म्हणाले,की गढचिरोली ते नागपूर अश्‍या पूर्व विदर्भात पदाधिका-यांच्या नियुकत्या करण्यात आले असून लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भाचा दौरा करणार आहेत.पूर्व व पश्‍चिम विदर्भात पक्षातर्फे मेळावे होणार आहेत.मुख्यमंत्री रामटेकच्या गड मंदिरात तसेच नागपूर,अमरावतीच्या ऐतिहासिक,धार्मिक स्थळांना देखील भेट देतील.

शिवसेनेचे पक्ष संघटन अगदी ब्लॉकस्तरापर्यंत असून उपविभागात देखील शिंदे गटाच्या शिवसेनेचेच संघटन कार्यरत आहे.येणा-या काळात संघटनेला आणखी बळकटी दिली जाईल.येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणूकांमध्ये भाजप-सेनेची युती लढणार असल्याच्या सूचना आम्हाला देण्यात आल्या असून, भाजप-शिवसेना अगामी सर्व निवडणूकांमध्ये विजयी होणार असल्याचा विश्‍वास तुमाने यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

याप्रसंगी एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी आमचीच शिवसेना ही ‘ओरिजनल’ असल्याचे सांगितले.शिंदे सेना ही हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी शिवसेना असून, दोन तृतीयांश आमदार व खासदारांचा पाठींबा शिंदे सेनेलाच आहे.त्यामुळेच अगामी एका महिन्यात मुख्य निवडणूक आयोगाकडून देखील शिंदे सेनेलाच खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळेल,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.

गेल्या एक महिन्यांपासून बूथस्तरापर्यंत संघटन मजबूत करण्यासाठी जे कार्यकर्ते,पदाधिकारी झटले त्यांनाच नियुकत्या देण्यात आल्या.ठाकरे यांच्या शिवेसेनेच्या कार्यालयांप्रमाणेच शिंदे सेनेच्या कार्यालयांची देखील व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.भाजप-सेना मिळून किमान १२० जागा जिंकण्याचा संकल्प केला असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे सेनेच्या खासदारांना केंद्रात दोन मंत्री पदे मिळणार आहे का?या प्रश्‍नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचे गृहमंत्री अमित शहाच निर्णय घेतील,याबाबत नंतर तुम्हाला कळेलच,असे ते म्हणाले.

अद्याप सर्वोच्च न्यायालयात ‘खरी’ शिवसेना कोणाची?याचा निकाल लागला नसतानाही शिंदे सेना स्वत:च्या पक्षाला खरी शिवसेना कशाच्या आधारावर म्हणवते?हा न्यायालयाचा अवमान नाही का?या प्रश्‍नावर बोलताना,विधान सभेत अध्यक्षांनी शिंदे सेनेला शिवसेना म्हणून मान्यता दिली आहे या शिवाय लोकसभेत देखील लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटातील खासदारांना शिवसेना म्हणून मान्यता दिली असल्याने न्यायालयाची कुठेही अवहेलना झाली नसल्याचे तुमाने यांनी सांगितले.याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने कुठेही आपल्या निर्देशांमध्ये शिंदे गटाला स्वत:ला शिवसेना म्हणू नका,असे निर्देश दिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दोन तृतीयांश आमदार आणि खासदार ज्या गटासोबत असतो तोच खरा पक्ष असतो,असा खुलासा त्यांनी केला.

मंत्री मंडळ विस्तार कधी?यावर ते मुख्यमंत्री शिंदे सांगतील,असे सांगून त्यांनी प्रश्‍न टोलवला.
इतर पक्षाचे बरेचशे कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात आहेत.नवरात्रात मोठा धमाका करणार असल्याचा सूचक इशारा याप्रसंगी किरण पांडव यांनी दिला.पूर्व विदर्भात तर एक मोठा धमाका होणार असल्याचा सूतोवाच त्यांनी केला.

याप्रसंगी नागपूर,नागपूर जिल्हा,वर्धा,चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया जिल्हयात शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या नियुकत्या त्यांनी जाहीर केल्या.

मंगेश काशीकर हे नागपूर लोकसभा मतदार संघात संपर्क प्रमुख पदी नियुक्त झाले तर सुुरज गोजे यांची महानगर प्रमुख,पश्‍चिम,मध्य व उत्तर नागपूरसाठी नियुक्ती करण्यात आली.
.
नागपूर जिल्ह्यासाठी संदीप ईटकेलवर यांची जिल्हा प्रमुख पदी तर पुरुषोत्तम घोटे यांची उपजिल्हाप्रमुख,काटोल विधानसभा क्षेत्रासाठी निवड झाली. नरखेड तालुका प्रमुख म्हणून अजय बालपांडे,मिलिंद देशमुख,जिल्हा संघटक,नागपूर ग्रामीण,रितेश हेलोंडे,संघटक,काटोल विधानसभा क्षेत्र अशी नियुक्ती झालेल्यांची नावे आहेत.

चंद्रूपर जिल्ह्यात सहसंपर्क प्रमुख पदी बंडूभाऊ हजारे व जिल्हा प्रमुख पदी नितीन मते यांची नियुक्ती करण्यात आली.

गडचिरोली जिल्हा हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आवडता जिल्हा असून ते या जिल्हाचे पालकमंत्री देखील आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार या जिल्ह्यात संपर्क प्रमुख पदी संदीप बरडे,सहसंपर्क प्रमुख हेमंत जंभेवार,महिला संघटिका पदी पोर्णिमा इस्टाम,अमिता मडावी,जिल्हा संघटक पदी राजगोपाल सुलावार,तालुका प्रमुख पदी पप्पी पठाण,चार्मोशी,तालुका प्रमुख पदी गौरव बाला,मुलचेरा यांची नियुक्ती झाली.

भंडारा जिल्ह्यात जिल्हा प्रमुख पदी अनिल गायधने यांनी नियुक्ती घोषित करण्यात आली.

गोंदिया जिल्ह्यात जिल्हा प्रमुख पदी मुकेश शिवहरे तसेच सुरेंद्र नायडू यांची नियुक्ती झाली.

वर्धा जिल्ह्यात जिल्हा प्रमुख पदी गणेध ईखार तर जिल्हा संघटक पदी संदिप इंगळे,सहसंपर्क प्रमुख पदी राजेश सराफ यांच्या नियुकत्या करण्यात आल्या.

Latest बातम्या