फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमयुवकाचा मृत्यू:कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड

युवकाचा मृत्यू:कुणाल हॉस्पीटलमध्ये तोडफोड

Advertisements

डॉक्टरांनाही मारहाण

नागपूर,ता. २७ जानेवारी २०२२: शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीकृष्ण धाम परिसरात राहणाऱ्या २८ वर्षीय युवकाचा आज मृत्यू झाला. राहुल इवनाते असं या तरुणाचं नाव असून हा मृत्यू कुणाल हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत मृत युवकाच्या नातेवाईकांनी आज रुग्णालयात प्रचंड तोडफोड केली.एवढंच नव्हे तर त्यांनी कुणाल रुग्णालयातील डॉक्टरला देखील जबर मारहाण केली.

आज सकाळी कुणालच्या छातीत अचानक दुखायला लागल्यामुळे त्याच्या घरच्यांनी त्याला जवळच्या कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मृत युवकाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर राहुलचा ईसीजी काढण्यात आला. यानंतर १५ मिनीटांनी डॉक्टरांनी रुग्ण मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. परंतू डॉक्टरांनी दिलेला ईसीजी रिपोर्ट हा एका महिला रुग्णाचा असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्या रिपोर्टरवर नाव खोडून राहुलचं नाव लिहीण्यात आलं होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर राहुलच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना याबद्दल विचारणा केली. यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांना आपल्यासमोर राहुलचा ईसीजी रिपोर्ट काढायला लावला. या रिपोर्टमध्ये राहुल जिवंत असल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. दुसरा रिपोर्ट समोर आल्यानंतर डॉक्टरांनी माफी मागितल्याचंही राहुलच्या नातेवाईकांचे म्हणने आहे. कुणाल हॉस्पीटलमधील डॉक्टरांच्या या हलगर्जीपणावर चिडलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रचंड तोडफोड केली. दरम्यान यानंतर राहुलला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, परंतू तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला आहे. राहुलचा मृतदेह यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधारे यांनी दिली.

रुग्णालयात आणण्यापूर्वीच राहूलचा मृत्यू:डॉक्टरांचा दावा

कुणाल रुग्णालयाचे संचालक डॉ.शिशिर श्रीवास्तव यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की युवक हा रुग्णालयात येण्यापूर्वीच मृत पावला होता.आमच्या रुग्णालयात त्याच्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाही किवा रुग्णालयातर्फे काेणतेही शुल्क ही आकारण्यात आले नाही.आमच्या छातीरोग तज्ज्ञ डॉक्टरने डॉ.नातिक परवेज यांनी युवकाला तपासताच मृत घोषित केले.यावर नातेवाईकांनी प्रक्षृब्ध होऊन डॉ.परवेज यांनाच जबर मारहाण केली.त्यांच्या डोळ्याला व नाकाला इजा झाली.नाकाचे हाड मोडले.पंधरा ते वीस मिनिटे तर त्यांना काहीच दिसत नव्हते.नाकातून रक्त वाहू लागले होते.आम्हीच त्यांची लगेच सीटी स्कॅन केली,तेवढ्यात पोलिस ही पोहोचले व त्यांना मेडीकलमध्ये तपासणी करण्यासाठी घेऊन जाण्यात आले.त्यांना अंतर्गत कोणत्या दुखापती झाल्या हे तपासणी अहवाल आल्यावरच कळेल.त्यांचे सायनस डॅमेज झाले की ब्रेनमध्ये दुखापत झाली,नाकातून रक्त येण्याची कोणती कारणे आहेत याची माहिती अहवालावरुन कळू शकेल.

(छायाचित्र-डॉ. परवेज यांना झालेली मारहाण)

मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाची कोणतीही बाजू ऐकून न घेता संपूर्ण रुग्णालयाची तोडफोड केली.त्यांना जे-जे दिसत गेले त्याची तोडफोड तीस ते चाळीस युवकांनी मिळून केली.रुग्णाच्या मृत्यूमध्ये रुग्णालयाचा कोणताही दोष नसताना रुग्णालयाचे प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आले.महागड्या मशीन्सची तोडफोड करण्यात आली.आमची ईसीजी मशीन,शॉक देण्याची मशीन,माॅनिटर तोडले.खुर्च्या,फर्निचर,खिडक्यांची तोडफोड केली.पार्टिशन्स तोडले, परिसरातील सामानांची देखील नासधूस करण्यात आली.ते काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते.रुग्णालयाची प्रचंड प्रमाणात तोडफोड करुन त्यांनी मृतदेह मेयोमध्ये नेला.

आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही पोलिसांसोबत मेयोमध्ये पोहोचलो मात्र तिथे देखील रुग्ण हा मृत पावल्याचे सांगताच त्यांनी परस्पर मृतदेह मेयोमधूनही घेऊन गेल्याची माहिती डॉ.श्रीवास्तव यांनी दिली.डॉक्टरांचा कोणताही दोष नसताना तीस ते चाळीस युवक हे अश्‍यारितीने डॉक्टरांवर हल्ला करतील तर भविष्यात डॉक्टर काय करतील?असा सवाल त्यांनी केला.

आधीच मृत रुग्ण रुग्णालयात आणला जातो,डॉक्टरांनी मृतकाला तपासून तो मृत असल्याचे सांगताच अश्‍यारितीने जर हिंसक प्रतिक्रिया उमटत असेल तर डॉक्टर्स यांनी काय करावे?अशी हताशा देखील त्यांनी व्यक्त केली.पोलिसांकडे आम्ही हीच मागणी केली की मृतकाचे शवविच्छेदन करुन सत्य समोर आणावे व आमच्या रुग्णालयावर जे खोटे आरोप लावले जात आहे त्याचे निराकरण व्हावे,अशी आमची पोलिसांकडे मागणी आहे.

आम्ही सीसीटीव्ही फूटेज हे पोलिसांनाही दिले असून उद्या शुक्रवार दि.२८ जानेवारी रोजी सकाळी प्रेस क्लब येथे ११.३० वाजता पत्र परिषद घेऊन वस्तूस्थिती सांगणार असल्याचे डॉ.शिशिर श्रीवास्तव यांनी सांगितले.

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या