
हॉकर्समध्ये ३०२ आणि गंभीर गुन्हे असलेले आहेत पण…!

बर्डी आमच्या हक्काची,सगळे मार्ग खुले:संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष कुरेशी यांचा पत्रकार परिषदेत इशारा
ग्लोकल मॉलच्या बिल्डरसाठी बर्डीवरुन हूसकावले:कुरेशी यांचा आरोप
नागपूर,ता.२७ मे : सीताबर्डी मुख्य बाजारातून हटवल्यानंतर मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी व पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी २१ मे रोजी पथ संचलन केले.राज्य सरकारने गेल्या एप्रिल २०२४ मध्ये काढलेल्या राजपत्रातील आदेशानुसार,नागपूर महापालिका आणि नागपूर पोलिस यांच्या संयुक्त कारवाईत सीताबर्डी मेन रोडवरील जवळपास सर्व हॉकर्सना हटविण्यात आले आहे.त्यांना महाराजबाग रस्त्यावर जागा देण्यात आली आहे.यामुळे सीताबर्डी मेन रोड अतिक्रमणमुक्त झाला असून, या ठिकाणी आता दुचाकी व चारचाकी वाहनतळ सुरु करण्यात आले आहे.मनपा आयुक्तांच्या सूचनेनुसार मनपाच्या वाहतूक विभागाच्या विभागाने पट्टे आखून मार्गदर्शक चिन्हांचे फलक देखील या ठिकाणी लावले आहेत.
याशिवाय अतिक्रमण विभागाला दररोज सीताबर्डी बाजारपेठेतील मुख्य रस्ता वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी, रस्त्यावर अतिक्रमण करणा-या तसेच दुकानाबाहेर विक्रीसाठी सामान किवां वस्तू ठेवणा-या दूकानदारांविरोधात कारवाई करण्याची सूचना मनपा आयुक्तांनी केली आहे.मात्र,सीताबर्डी हॉकर्स वेलफेअर असोसिएशने मनपा तसेच पोलिस विभागाच्या या कारवाई विरोधात भूमिका घेतली असून, आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.१३ मे रोजी अचानक पोलिस बंदोबस्तात मनपाच्या पथकाने सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्सला हूसकावून लावले.यामुळे आमचा रोजगार हिरावला गेला.कोणतेही लिखित पत्र न देता आम्हाला हूसकावून लावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.यासंबंधी मनपा आयुक्तांसोबत चर्चा केली असता त्यांनी आम्हाला महाराज बाग रस्त्यावर रोजगार करण्याचा प्रस्ताव दिला.त्या ठिकाणी आमचा कोणताही रोजगार चालणार नसल्याचे सांगत,शहराचा विकास गरिबांचा रोजगार हिसकावून होऊ शकत नाही असे असोसिएशनचे कार्यकारी अध्यक्ष रज्जाद कुरेशी यांनी सांगितले.
तरुणांचा रोजगार हिरावून त्या ठिकाणी कार पार्किंग केल्याने तरुण हे बेरोजगार होतील व याचा परिणाम कायदा सुव्यवस्थेवर होईल,असा इशारा त्यांनी दिला.मूळात सीताबर्डी मेन रोडवरील हॉकर्स झोन हटविण्याचा कोणताही ठराव टाऊन वेंडिंग कमेटीमध्ये झाला नाही, तरी देखील ही कारवाई कशी करण्यात आली?असा सवाल त्यांनी केला.माहितीच्या अधिकारात वाहतूक विभागाला विचारले असता,सीताबर्डी मेन रोड हा पार्किंगसाठी राखीव करण्याचा कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे उत्तर ए.सी.पी भांडारकर यांच्याकडून मिळाले.तसेच गेल्या ४२ वर्षांपासून हा रस्ता वन-वे असताना अचानक दूतर्फी वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.टाऊन वेंडिंग कमेटीच्या २८ नोव्हेंबर २०२३ च्या बैठकीत वाहतूक विभागाच्या डी.सी.पी.तिडके यांनी हा प्रस्ताव मांडला होता ज्याला आम्ही विरोध केला होता,अशी माहिती कुरेशी यांनी दिली.
२१ फेब्रुवरी २०२४ रोजी कमेटीची सातवी बैठक पार पडली,यात देखील सीताबर्डी मुख्य रस्त्यावरील हॉकर्स झोन हटविण्याचा प्रस्तावाचा आम्ही विरोध केला.तरी देखील हा प्रस्ताव पारित करण्यात आला.त्या बैठकीत संख्या बळ पुरेसे नसताना असा प्रस्ताव पारित कसा होऊ शकतो?असा सवाल कुरेशी यांनी केला.३० सप्टेंबर २०२४ च्या बैठकीत महाराजबाग झोनचे निरीक्षण न करता हॉकर्स यांना त्या ठिकाणी कसे पाठविले जात आहे?असा सवाल आम्ही केला.त्या ठिकाणी किती हॉकर्स समाविष्ट होतील?राष्ट्रीय महामार्ग विभाग तसेच कृषि विद्यापीठाचे यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले का?टाऊन वेंडिंग कमेटीमध्ये हा प्रस्ताव मंजूर झाला का?असे प्रश्न त्यांनी केले.
न्यायालयात आमच्या तीन याचिका प्रलंबित आहेत ज्यावर अद्याप कोणतेही आदेश आले नाहीत.न्यायालयाला उन्हाळी सुट्या लागताच दुस-याच दिवशी ही कारवाई करण्यात आली.मनपा आम्हाला हटविण्याचा ठराव दाखविण्यास तयार नाही तसेच नव्या झोनचे निरीक्षण पत्र देखील आम्हाला देण्यात आले नाही.कोणत्याही हॉकर्स झोनला स्थलांतरित करण्या पूर्वी बाजारहाटमधील हॉकर्सचे सर्वेक्षण करने,त्यांना परवाने देने आणि त्यांच्या संख्येच्या आधारावर व्यवस्था करने टाऊन वेंडिंग कायद्यानुसार बंधनकारक असल्याचे कुरेशी यांनी सांगितले.
याच कायद्याच्या अनूसूची कलम(२१)२-ग अन्वये कोणताही बाजारहाट हटविण्यासाठी गर्दीचे कारण सांगता येत नाही.दुसरी अनूसूचती कलम -३८ अन्वये रद्द करण्यात आलेले हॉकर्स झोन पुन्हा स्थपित करता येते.ज्या हॉकर्सच्या मतदानाच्या आधारावर टाऊन वेंडिंग कमेटी गठीत करण्यात आली त्यांनाच प्रमाणपत्र देण्यासाठी मनपा मागे फिरत असून त्यांना अनाधिकृत हॉकर्स घोषित करण्याचा प्रयत्न मनपा करीत असल्याचा आरोप कुरेशी यांनी केला.या कमेटीच्या आतापर्यंत १२ बैठका झाल्या ज्यात मनपा आयुक्तांनी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते ,परंतू आजपर्यंत प्रमाणपत्र दिले नाही.एकीकडे कायदा आम्हाला मुख्य रस्त्यांवर रोजगार करण्याचा अधिकार देतो परंतू कमेटीच्या बैठकीत आमच्या हक्कांच्या विरुद्धच निर्णय होत असल्याने आम्ही बैठकींवर बहीष्कार घातला.आम्हाला रोजगार करु दिला नाही तर शहरात गुन्हेगारी वाढेल याची जबाबदारी मनपाची असेल असे सांगून,सीताबर्डी मुख्य रस्त्यावर रोजगार करने आमचा नैसर्गिक हक्क आहे,आम्हाला रोजगार करण्यापासून कोणीही परावृत्त करु शकत नाही,आमचा हक्क परत मिळवण्यासाठी आम्ही कोणतीही नीती अवलंबू,असा इशारा कुरेशी यांनी याप्रसंगी दिला.




आमचे चॅनल subscribe करा
