Advertisements

‘यांचे’वाजले की बारा…
नागपूरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयात लावणी नृत्याचा ठेका
समाज माध्यमात संतापाची लाट:रुपाली चाकरणकरांचे हेच का मार्गदर्शन!
नागपूर,ता.२७ ऑक्टोबर २०२५: भारतीय संस्कृतीतील वेद,वेदांग व उपनिषदांमध्ये चौदा विद्या व चौष्सट कलांचा उल्लेख आढळतो.मूळात ‘कला’ही सृजनाची जननी असल्याचं म्हटलं जातं,मात्र,या कला कोणी,कुठे,कश्याप्रकारे सादर कराव्या याचे देखील शास्त्रीय नियम आहेत.जगभरातील राजकारणी मात्र या सर्व शास्त्रीय पंरपरांना अपवाद ठरताना दिसून पडतात.नागपूरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या कार्यालयात काल सायंकाळी दिवाळी-स्नेह मिलनच्या कार्यक्रमात चक्क महाराष्ट्राची लोकपरंपरा असलेली लावणी सादर करण्याचा सोहळा पार पडला अन् नागपूरच्या राजकारणात दिवाळीचे फटाके फूटले.
दोनच महिन्यांपूर्वी प्रशांत पवार यांच्याकडून शहराध्यक्ष पदाचा पदभार काढून घेण्यात आला त्यांना पक्षाचे सरचिटणीस पद बहाल करीत,अनिल अहिरकर यांच्याकडे पुन्हा शहराध्यक्ष पद सोपवण्यात आले.तेव्हा पासून अहिरकर हे जोमात होते.नुकताच त्यांचा वाढदिवस देखील थाटात साजरा झाला.कार्यकर्ते व माध्यमकर्मी यांच्यासाठी स्नेहभोजनाचा बार उडाला.शहराध्यक्ष पद पुन्हा बहाल झाल्यानंतर ही पहिलीच दिवाळी असल्याने त्यांचा उत्साह देखील ओसंडून वाहत होता.समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे पद मिळाले आहे,याचे भान देखील सुटले.
चक्क पक्ष कार्यालयातच लावणी साम्राज्ञीने ’वाजले की बारा’या लावणीवर नृत्य सादर केले व अहिरकर व इतर पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व महिला-पुरुष कार्यकर्त्यांनी त्यावर चांगलाच ठेका धरला.हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला व समाज माध्यमात तीव्र संतापाची लाट उसळली.
मैत्रीणी किंवा कौटूंबिक कार्यक्रमात नृत्य,गायन किवा कोणतीही कला दिलखुलासपणे सादर करण्याची मुभा असते मात्र,एखाद्या राजकीय पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातच जेव्हा ‘वाजले की बारा’सारखी लावणी सादर होते तेव्हा त्या पक्षाच्या विश्वासहर्तेचेही ‘बारा’वाजायला वेळ लागत नाही.
नुकतेच पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याच पक्ष कार्यालयात महिलांना मार्गदर्शन केले होते.समाजातील महिलांवरील अन्याय,अत्याचाराविरोधात लढा देत त्या सोडविण्यास प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले होते.
दूसरीकडे त्यांच्याच पक्ष कार्यालयात त्यांच्याच पदाधिकारी पुरुषांसमोर लावणी सादर करण्याचा महाप्रताप घडला.लावणी सादर करणा-या या पक्षाच्याच कार्यकर्ता असल्याची मखलाशी अनिल अहिरकर यांनी केली असली, तरी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्तीला पुरुषांसमोर हावभावांसह लावणी सादर करण्याची मुभा त्यांनी देणे अशोभनीय कृत्य होते.अजित दादा पवार यांचे लाडके पदाधिकारी नागपूरात दिवाळी निमित्त अतिशय उत्तम उपक्रम राबवित असल्याची टिका शहरातील शिवेसना पक्षाच्या नेत्या मनीषा पापडकर यांनी केली.येणा-या नगरपालिकेसाठी अजित दादांचे पदाधिकारी उत्तम तयारी करीत असल्याचा खोचक टोला देखील त्यांनी हाणला.
हा व्हिडीयो व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अहिरकर यांना सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.अहिरकर यांनी हा व्यवसायिक कार्यक्रम नसून पक्षाचा दिवाळी-स्नेहमिलनाचा कार्यक्रम असल्याची बतावणी केली असली तरी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात अश्या प्रकारचे कृत्य हे पक्षाची प्रतिमा समाजात खराब तर करतातच त्यासोबतच पक्षाच्या विश्वासहर्तेवर गंभीर प्रश्न देखील निर्माण करतात.
एकीकडे संपूर्ण मराठवाड्यात शेतकरी वर्ग अतिवृष्टिमुळे हवालदिल झाला असून, पूर्णत: उधवस्त झाल्याची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.दररोज होणा-या शेतकरी आत्महत्या या अन्नदात्याची नाजूक झालेली आर्थिक व मानसिक स्थितीचे भयाण वास्तव दर्शवतात.दूसरीकडे उधवस्त बळीराजाला मदत करण्या ऐवजी राजकीय पक्षातील पदाधिकारी हे एखादे जवाबदारीचे पद मिळताच ज्या प्रकारचा उन्माद अंगात अाणतात त्याचा आता महाराष्ट्रातील नागरिकांना तिटकारा वाटू लागला आहे.
अहिरकरांनी दिवाळी मिलनच्या कार्यक्रमात मराठवाड्यातील २९ जिल्ह्यातील उधवस्त बळीराजासाठी असे थिल्लर कार्यक्रम आयोजित करण्या ऐवजी आर्थिक सहाय्य गोळा करुन त्यांना मदत पोहोचली असती तर त्याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या राजकीय जीवनात झाले असते.सरकार आपल्या परीने मदत करण्याचा प्रयत्न करते मात्र,स्वत: सत्ताधारी पक्ष असताना सुद्धा जो संकटात संकटग्रस्तांच्या पाठीशी उभा राहत नाही त्यांना हा समाजाच घरी बसवण्याचे काम करतो,हा इतिहास आहे.
नागपूरात तसेच विदर्भात आधीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कोणतेही प्रभावी अस्तित्व नाही.अनिल देशमुख यांनी मंत्री पद भूषवले असल्याने शरद पवार गटाची ओळख त्यांच्या पूरतीच मर्यादित राहीलेली दिसून पडते.
परिणामी,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर आल्या असताना ,पक्ष वाढीचे आव्हान समोर दिसत असतानाही, पुन्हा बहाल झालेल्या शहराध्यक्ष पदाच्या उन्मादातून पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातच चक्क लावणीचा बार उडवणे व त्यानंतर समाज माध्यमांत झालेली प्रचंड टिका यावर पक्षश्रेष्ठी आता कोणती कार्यवाही करतात,याकडे आता नागपूरकरांचे लक्ष लागले आहे.
(बातमीचा व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
