फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजम्हणे प्राध्यापकांचं करियर असतं आणि या तरुण मुलींचं काहीच नसतं का ...

म्हणे प्राध्यापकांचं करियर असतं आणि या तरुण मुलींचं काहीच नसतं का ?

Advertisements

(अतिथीस्तंभ)

अरुणा सबाने
[अध्यक्ष माहेर संस्था]

सध्या महाविद्यालयं , विद्यापीठ हे स्त्रियांवर,मुलींवर अत्याचार करण्याचे अगदीच योग्य ठिकाण आहे की काय असे मला वाटायला लागले आहे.

केवळ या एका महिन्यातली ही आठवी केस प्राध्यापकाविरुध्दचीच. आता तर अनोळखी नंबर स्क्रीन वर दिसला की मला धस्स होतंय. कुठली मुलगी? कोण असेल तो नराधम ?

यावेळचा विषयही तसाच नाजूक आहे आणि अन्याय करणारे महान साहित्यिक वगैरे आहेत. कवी, समीक्षक अशी बिरुदं त्यांच्यामागे लागलेली आहेत. मुख्य म्हणजे ते डॉ . आहेतच. तर विषय आहे चक्क मुंबई विद्यापीठाचा. आता मुंबई विद्यापीठात मी कशाला कडमडायला गेले हा प्रश्न माझ्या काही मित्रांच्या मनात आलाच असेल, पण मी नाही बरं तिकडे कडमडायला गेले. अहो तीच बिचारी मुलगी माझा शोध घेत इकडे आली. तिला मी म्हणालेही, ‘अ ग बाई मुंबईत तर केवढ्या मोठमोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांची मदत माग. ” तर म्हणाली, ”मॅडम, सगळ्यांची दारं ठोठावून झालीत. कुणी मला मदत करायला तयार नाहीत. सारे त्याच नालायक पुरुषाच्या पाठीशी आहेत. हे बरे आहे पुरुषांचे आणि या बायांचेही. म्हणतात, ”अगं आधीच ‘आपली माणसे’ या व्यवस्थेत भरडून निघाली आहेत. आता आपणच आणखी त्यांच्या विरोधात जायचे काय? जाऊदे बाळा, विसर. त्यांनी सॉरी म्हटले ना? जाऊ दे. त्याच्या करिअर चा विषय आहे.” मॅडम, मला सांगा, व्यवस्थेत ते भरडून निघालेत आणि आम्ही स्त्रिया, मुली नाही का भरडून निघालो? म्हणे सॉरी म्हटले. त्या सॉरीला काय अर्थ आहे? एक मेसेज टाकला आणि झालं काय? हिम्मत असेल तर सर्वांसमोर सॉरी म्हणावं ना. त्यांची प्रतिमा, त्यांचं करियर महत्वाचं, आणि आमचं? आम्हा दलित मुलींना करियर, शील काही नसतं काय?”
०००
तर असा हा संघर्ष. एकंदरीत काय तर तिला मुंबईत न्याय मिळाला नाही म्हणून ती नागपुरात माझ्याकडे आली.

मुंबई विद्यापीठात कार्यरत असलेले डॉ. महेंद्र भवरे हे मराठी विभाग प्रमुख आहेत. पीएचडी ची एक विद्यार्थिनी त्यांच्याकडे डीटीपी ऑपरेटर चे काम करायची. महिनाभर काम केल्यानंतर तिला त्यांचे बदललेले वागणे लक्षात आले. स्त्रीजातीला ते लक्षात येतच. पुरुष आपल्या वाढत्या वयाचा कितीही फायदा घेऊ बघत असले तरी बापाची नजर आणि भामट्याची नजर यातला भेद तिला कळला च. कालपर्यंत बरे असलेले आपले सर असे अचानक कसे बदलले याचा ती विचार करायला लागली आणि आता ती सावध वावरू लागली. ते तिला सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावू लागली. तिच्या खुर्चीला खेटून बसने, तिला चोरटे स्पर्श करणे, तिच्याकडे बघत राहणे भवरेचें सुरु झाले. एक दिवस शेजारच्या केबिनमध्ये कुणी स्त्री सहकारी नाही, हे लक्षात येताच डॉक्टरसाहेबांनी डाव साधला आणि तिच्या अंगचटीला येऊन अचानक त्यांनी तिला कपाटाजवळ ढकलत नेले आणि तिचा जबरदस्ती किस / मुका घेतला. ती ‘अहो सर हे काय करता’ असे म्हणून त्यांना जोरात ढकलून देऊन तेथून कशीतरी तिने स्वतःची सुटका करून घेतली, आणि तेथून पळ काढला. ती खूप घाबरली. की कुणाला सांगावे, तिला कळेना. तरी हिम्मत करून तिच्या दोन मैत्रिणी आणि त्याच कॉलेज मध्ये असलेल्या प्रा.वंदना महाजन मॅडम यांना तिने आपबिती सांगितली. त्यांच्या मार्गदर्शनाने तिने त्याच कॉलेजच्या निरगुडकर मॅडमकडे लेखी तक्रार दिली. तक्रार केली म्हणून पुढे आजपर्यंत तिलाच त्रास देणे सुरु आहे. कॉलेज मध्ये अर्थातच दोन गट पडले. कुणीही मुलीच्या बाजूला बोलायला तयार नाहीत. वंदना महाजन किंवा प्रज्ञा पवार सारखी एखादी बोलली की जातीयवादी हे बिरुद तिला लगेच लागत आहे.

०००

या मुलीने तक्रार केल्याबरोबर आणखी तीन मुली समोर आल्या आणि तोंडी तक्रार करणाऱ्या तर खूपच आहेत, असे या विद्यार्थीनीचे म्हणणे आहे. या आधीच्या कॉलेजमध्येही भवरेंनी हाच पराक्रम गाजवला असेही ती सांगते . कुणा मुलीवर मागून झडप घालणे, कुणाचे केस पिंजराने, तिचे केस स्वतःच्या हाताने उडवणे , मुलींकडे एकटक बघत राहणे असे अनेक प्रकार हळूहळू पुढे येऊ लागले.
कॉलेजमध्ये शिकवणारा शिक्षक एक जबाबदार व्यक्ती असली पाहिजे. तिच्यावर अनेक मुलांचे भवितव्य अवलंबून असते. तो अनेकांना घडविणारा शिल्पकार असतो. अनेक विद्यार्थ्यांचा आदर्श असतो. त्यातही तो साहित्यिक, कवी असेल तर त्याच्याबद्दलचा आदर आणखीच दुणावतो. समीक्षक म्हणजे तर अति विद्वान. कवी माणूस म्हणजे इतरांची दुःख जाणून घेणारा. इतके सारे गुण एकाच प्राध्यापकाच्या अंगी असल्यावर त्याची जबाबदारी किती असायला हवी? तोच प्राध्यापक आपल्या मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीचा जबरदस्ती किस घेत असेल तर त्या बापाविना मुलीने कुणाकडे आदराने बघावे? या कोवळ्या वयात या मुलींच्या मनात पुरुषांबद्दल आदर, प्रेम , आपुलकी राहील? साहित्यिकाबद्दल त्या काय विचार करतील? का आपण वयाने वाढलो, आपली पोस्ट मोठी आहे म्हणून कुणी आपलं काही वाकडं करूच शकत नाही, हा

माज येतो पुरुषाच्या मनात हळूहळू? की या मुली काय आपल्याच साठी आहेत. यांना तर मी सहज माझ्या जाळ्यात ओढू शकतो, हा भ्रम असतो? काय आहे हा डीएनए नेमका? काय प्रॉब्लेम आहे नेमका या पुरुषांचा? अरे मित्रांनो , रिकाम्या जागा खूप आहेत, त्या भरा ना हवं तर. खूप स्त्रियांना प्रेमाची गरज आहे, तिथे जाऊन कड मडा. पण ज्या मुलींना, तुम्ही नकोच आहात , तिथे जाऊन का त्यांचे शोषण ? या कोवळ्या मुलींचे भावविश्व का तुम्ही कुस्करता? का त्यांच्या मनात पुरुषजाती बद्दल द्वेष पेरण्याचे काम करता?

०००

”माझा लैंगिक छळ झाला’‘ असे धाडसाने सांगणाऱ्या या मुलीची मदत करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करण्याचे काम मुंबई विद्यापीठाने तर केलेच , पण मुंबई परिसरातल्या अनेक नामवंत स्त्री पुरुष साहित्यिक आणि स्वतःला सामाजिक कारकर्ते म्हणवणार्यांनीही भवरे ला पाठीशी घातले याची खंत वाटते. म्हणजे नागपूर विद्यापीठ असो, अमरावती असो, पुणे का मुंबई सगळे सारखेच. नाही म्हणायला नेहमीसारखे नाटक इथेही झालेच. विद्यापीठाने समिती नेमली, विमेन्स डेव्हलपमेन्ट सेल कडे हे प्रकरण पाठविण्यात आले. चौकशीअंती भवरे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी तीन मुलींनी समितीसमोर आपली आपबिती सांगितली. त्यात भवरेंवर कारवाई व्हावी अशी स्पष्ट सूचना दिली गेली. त्यानंतरही विद्यापीठाने मात्र प्राध्यापकालाच झुकते माप देऊन त्याची शिक्षा कमी केली. आणि नंतर तर ती संपवलीच. आजही मुलींशी चाळे करणारा प्राध्यापक त्याच खुर्चीवर आहे. यांच्यापासून अन्य मुलींना धोका नाही काय? मुलींच्या चारित्र्याची, त्यांच्या भावभावनांची यांना काहीच काळजी नाही काय?
०००

मुलींचे शोषण होऊ नये म्हणून नियम आहेत, समित्या आहेत, पण मुलींचा त्रास थांबत नाही. याचे कारण काय? हे आता समाजानेच शोधायचे आहे. आज ती भरडली गेली, उद्या तुमच्याही घरातली मुलगी भरडणारच नाही याची शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही. कारण ही अशी श्वापदं युगानुयुगे आहेतच, मुली आता बोलायला लागल्या आहेत, त्यांचे मी स्वागत करते. आणि प्रा. महेंद्र भवरे यांना कडक शिक्षा व्हावी, करावी अशी विद्यापीठाला विनंती करते.
मित्रांनो तुम्हाला काय वाटते ?

……………………………………………………………

अरुणा सबाने
अध्यक्ष माहेर संस्था , ५०६, गणेश गौरी, कोतवाल नगर,
नागपूर १५
मो ९९७००९५५६२

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या