फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeblogमोहब्बत की झुठी कहानी पे रोये....

मोहब्बत की झुठी कहानी पे रोये….

वेलेंटाईन डे स्पेशल (भाग-३)

नागपूर,ता.९ फेब्रुवरी २०२६: दिलीप कुमार-मधुबाला यांची प्रेम कहाणी बॉलीवुड मधली सर्वाधिक चर्चित पण तितक्याच दूर्देवी प्रेम कथेतील एक आहे.१९५१ साली ‘तराना’चित्रपटाच्या सेटवर ते पहील्यांदा भेटले.राज-नर्गिस यांच्या सारखंच त्यांचं नातं ९ वर्षापर्यंत आशा-निराशा,वेदना,संघर्षाच्या हिंदाेळ्यावर झुलत राहीलं.ते दोघेही लग्न करु इच्छित होते मात्र,मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांचा चित्रपट निर्माते बी.आर.चोपडा यांच्यासोबत चित्रपट ’नया दौर’च्या चित्रिकरणावेळी उद् भवलेला वाद व पुढे न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात दिलीप कुमार यांनी चित्रपट निर्मात्याची न्यायालयात घेतलेली ‘न्याय’बाजू यामुळे अताउल्लाह खान नाराज झाले व त्या काळातील प्रेक्षकांची अतिशय आवडती जोडी दिलीप-मधूबाला या वादानंतर कायमची वेगळी झाली,ही घटना त्यांच्या चाहत्यांसाठी खूप वेदनादायी ठरली होती.
‘उसके चेहरे की चमक के सामने साधा लगा
आसमाँ मे चाँद पुरा था मगर आधा लगा ‘
असं वाटतं हूस्न की मलिका मधुबालासाठीच हा शेर लिहल्या गेला असावा.भारतीय सिनेसृष्टितील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे मधूबाला..अभिनय,प्रतिभा,सौंदर्य,लाघवीपणा आणि साधेपणाची आज देखील मिसाल दिली जाते.समीक्षक देखील भारतीय सिनेमाची आज पर्यंतची सर्वात महान अभिनेत्री मानतात.तिच्या अभिनय काळाला सुवर्ण युग मानतात..मधूबालाचं सौंदर्य इतकं लाघवी व दैवी होतं की,लोक त्यांना भारतीय मर्लिन मुनरो म्हणायचे.मात्र,बॉलिवूडसाठी ती ‘द ब्युटी ऑफ ट्रेजेडी क्वीन’नावानेच ओळखली गेली..!
परंतु ‘वीनस ऑफ हिंदी सिनेमा’म्हणून गणल्या जाणारी ही अभिनेत्री स्वत:च्या ईच्छेने हिंदी चित्रपटसृष्टित आली नव्हती. मुंबईच्या चकाकणा-या जीवनात प्रवेश करण्या पूर्वी या अभिनेत्रीने आपल्या वडीलांसोबत रस्त्यावरचं जगणं अनुभवलं होतं.एका स्टूडियो मधून दूस-या स्टूडियोमध्ये कामासाठी भटकंती करताना त्यांच्या पायात चप्पल देखील राहत नसे.
संपूर्ण जग जो दिवस ‘प्रेम दिवस’म्हणून साजरा करतात,त्याच १४ फेब्रुवरी १९३३ रोजी अताउल्ला खान व बेगम आयशाच्या पोटी मधुबालाचा जन्म झाला.तिचं नाव मुमताज जहाँ बेगम देहलवी… ठेवण्यात आले. ती ११ भावंडे होती.तिचे वडील पेशावरमध्ये एका बिडी कारखान्यात काम करीत होते.यानंतर ते कुटूंबासोबत दिल्लीत आले.मात्र,दिल्लीत कोणतेही काम न मिळाल्याने ते कुटूंबियांसोबत मायानगरी मुंबईत दाखल झाले.खोडकर मुमताजच्या रास लीला बघून अताउल्ला यांना विश्‍वास होता मायानगरीत एक दिवस तिला नक्की काम मिळेल.
वयाच्या ९ व्या वर्षी बेबी मुमताजला पहीले काम मिळाले.१९४२ मध्ये ‘बसंत’चित्रपटात तिने बाल कलाकारची भूमिका सादर केली.सुप्रसिद्ध अभिनेत्री देविका राणी या चिमुरडीचा अभिनय पाहून खूप प्रभावित झाली.यानंतर बेबी मुमताजचे नामकरण ‘मधुबाला’असे झाले.
मधुबालाला पहीला लीड रोल ’नील कमल’मध्ये मिळाला होता मात्र,सिनेसृष्टित चर्चेत आली ती अशोक कुमार यांच्यासोबतच्या ‘महल’चित्रपटानंतर.या चित्रपटाने मधूबालाचे नाव नभातील चकाकणा-या ता-यांमध्यये पोहोचवले.त्या वेळी मधूबाला फक्त १५ वर्षांची होती.हा चित्रपट मधूबालाला ‘फर्श से उठा कर अर्श तक’घेऊन गेला…!.यानंतर मधूबाला यांनी अनेक हिट चित्रपट दिले व मागे वळून पाहिले नाही.
मात्र,जगाला मधुबालाच्या या यशा मागे दडलेल्या एका करकचून बांधलेल्या बंधनाची कल्पना नव्हती ,जे ठरवायचे मधूबाला किती,कोणत्या ,किती वेळ,किती पैशात चित्रपटात काम करेल आणि मधूबालाच्या आयुष्यावरील,आनंदावरील आणि संपूर्ण अस्तित्वरील हे बंधन हाेतं,ते म्हणजे तिचे वडील अताउल्ला खां.
वयाच्या ९ व्या वर्षीच मधूबालाच्या ह्दयात छिद्र असल्याचे भयाण वास्तव अताउल्ला खांला कळले होते मात्र,इतक्या मोठ्या कुटूंबाचा प्रपंच चालवण्यासाठी मधूबालाला सतत काम करत राहणे गरजेचे होते .याच कारणातून फिल्म जगतपासून देखील मधुबालाचा आजार लपविण्यात आला होता.त्यामुळे इतक्या कमी वयात ,तिची शारिरीक क्षमता नसतानाही मधूबाला सतत काम करीत राहीली.डॉक्टरांनी तिला दिलेला आरामाचा सल्ला ही ती वडीलांच्या आज्ञे पुढे पाळू शकत नव्हती. आपल्या जीवनावर ,आपल्या यशावर सर्वात आधी आपल्या वडीलांचा हक्क आहे,सिनेसृष्टित ती जिथपर्यंत पोहोचली त्या मागे तिच्या पित्याचे अथक परिश्रम आहेत,असे मधुबाला मानत होती.
तिला चित्रपट निवडीचे स्वातंत्र्य नव्हते तर ‘फिल्मी’ जीवन देखील तिच्या वाट्याला कधीच आलं नाही.मधुबाला कोणत्याही फिल्मी पार्टीचा भाग राहीली नाही ना तिला या फिल्मी जगात कोणी जवळचे मित्र-मैत्रिणी होत्या.जी सौंदर्यवती आपल्या स्मित हास्याने कोट्यावधींना घायाळ करीत होती तिच्या आनंदाची डोर मात्र,तिच्या वडीलांच्या हातात होती.
१९५२ मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव झाला.या महोत्सवात अमेरिकेचे निर्माते फ्रँक कॉपरा सहभागी झाले होते.त्यांच्यासोबत प्रत्येक भारतीय सिनेअभिनेत्रीने फोटोसेशन केलं मात्र,मधूबाला त्यापासून अलिप्त राहीली.फ्रँक कॉपरा यांनी अमेरिकेत ‘मुव्ही टाईम्सच्या‘ मुख्य पानावर मधुबालाचे छायाचित्र बघितले होते.तेव्हापासून ते मधूबालाला भेटण्यासाठी उत्सूक होते.त्यांना त्यांच्या हॉलिवूडच्या चित्रपटात मधूबालाला साईन करायचं होतं मात्र,अताउल्ला खां यांनी त्यांची ही ऑफर नाकारली आणि मधूबालाला त्यांना भेटू देखील दिले नाही.असं बोलल्या जातं की,अताउल्ला खां यांना मधुबालाला स्वातंत्र्य द्यायचं नव्हतं.त्यांना ही भीती होती परदेशात गेल्यावर मधुबाला स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकेल आणि आम्हाला पैसे देणे बंद करेल.मधूबाला तर हॉलिवूडच्या चित्रपटात झळकली असती तर तिच्या लोकप्रियतेच्या ग्राफ हा आणखी किती तरी उंचीवर असता.
१९५० च्या दशकात मधुबालाचे काही चित्रपट हे फ्लॉप झाले.यानंतर तिच्यावर टिकेची झोड उठली.मधुबालाला अभिनय येत नाही फक्त सौंदर्याच्या भरवश्‍यावर त्यांना चित्रपट मिळत असल्याची टिका सुरु झाली.मात्र,वास्तव असे नव्हते.अताउल्ला खां हेच मधुबालासाठी चित्रपटांची निवड करीत होते.पैशांच्या लोभात त्यांनी अनेक दर्जाहिन चित्रपट देखील साईन केले हाेते ज्यात मधूबालासारख्या समर्पित अभिनेत्रीला करण्यासारखे काहीच नव्हते.अनेक चित्रपटांची शुटिंग सुरु असल्याने मधूबालाची शारिरीक क्षमता देखील अपुरी पडत होती त्यामुळे देखील त्या चित्रपटांवर याचा नकारात्मक परिणाम झाला.
चित्रपटाच्या याच प्रवासात त्या काळातील सुपर स्टार असलेले दिलीप कुमार यांच्यासोबत मधूबालाचं गहन नातं जुळलं. १९५१ च्या ‘तराना’चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी त्यांच्यात प्रेमाची भावना बहरली.दिलीप कुमार यांचे मधूबालावर इतकं प्रेम जडलं की ते मधूबालाच्या प्रत्येक सिनेमाच्या सेटवर दिसू लागले.दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच नियतीला मात्र मधुबालाचे हे सुखं बघितल्या गेलं नाही.ही दोघेही नऊ वर्ष नात्यात होती आणि आयुष्यातील नऊ वर्षे हा कोणाच्याही जीवनात कमी महत्वाचा काळ नसतो..दोघांनी एकमेकांशी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या.मात्र,अचानक घडलेल्याय एका घटनेने त्यांच्या नात्यात दूरावा निर्माण केला.
‘तराना’च्या सेटवर ते जेव्हा पहिल्यांदा भेटले त्यावेळी त्यांच्या ह्दयाने एकमेकांप्रति प्रेमाची स्पंदने हेरली होती.एकमेकांसाठी त्यांच्या नजरेत प्रेम दाटून आले.मधुबालाने दिलीप कुमारच्या मेकअप रुममध्ये एक चिठ्ठी व एक गुलाब पाठवले.या चिठ्ठीत तिने ‘अगर आपको मुझसे मोहब्बत का इकरार हो तो इस गुलाब को कुबूल फरमाएं’असे लिहले होते.दिलीप कुमारच्या चेह-यावर प्रेमाचे इतके सुंदर शब्द वाचून हास्य फूलले.
‘नया दौर’चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी मधूबालासोबत उद् भवलेल्या वादातून बी.आर.चोपडाने पुढे मधूबाला ऐवजी वैजयंती मालाला ‘नया दौर‘मध्ये घेतले आणि मधुबालाच्या नावा समोर फूली मारलेली जाहीरात वृत्तपत्रात प्रसिद्ध केली.अताउल्ला खां यांनी देखील मधूबालाचे चित्रिकरण सुरु असलेल्या सर्व चित्रपटाच्या नावासह वृत्तपत्रात जाहीरात दिली त्यात ‘नया दौर‘समोर फूली मारलेली होती.या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी दिलीप कुमार यांनी न्यायालयात सर्वांसमोर बेबाकपणे हे मान्य केले की ‘मी मधूबालावर खूप प्रेम करतो आणि करत राहील’मात्र,या घटनेनंतर दोघांच्याही नात्यात खूप गहीरी दरार पडली,जी कधीच भरु शकली नाही.
बी.आर.चोपडा यांच्या ‘नया दौर’च्या शुटिंगसाठी मधुबालाला मध्यप्रदेशच्या ग्वाहलेरमध्ये मध्ये दोन दिवसांसाठी पाठविण्यास अताउल्ला खां यांनी नकार दिला व चोपडा यांना इतर ठिकाणी शुटिंग करण्यास सांगितले.चोपडा यांनी ते अमान्य केले.दिलीप कुमार व मधुबालासोबत आधीच करारनामा साईन झाला होता.त्यांनी दिलीप कुमारला मधूबालाला समजावण्यासाठी सांगितले मात्र,मधूबाला आपल्या वडीलांच्या निर्णया विरोधात मुळीच जायला तयार नव्हती.त्यामुळे अताउल्ला खां यांच्या या निर्णया विरोधात बी.आर.चोपडा हे न्यायालयात गेले.दिलीप कुमार यांनी अताउल्ला खां विरोधात निर्मात्याची बाजू उचलून धरली यामुळे मधुबालाला मानसिक धक्का बसला.
दिलीप कुमार व मधूबाला यांच्या प्रेमाचे किस्से त्याकाळी सर्व फिल्मी मॅगझीन्समध्ये चर्चेचा विषय ठरला होता.९ वर्षांत प्रेमासारखं गहन नातं त्यांच्यात रुजलं होतं. त्यामुळे मुंबई पासनू दूर मध्य प्रदेशमध्ये गेल्यावर दिलीप कुमार व मधूबाला गुपचूप लग्न करुन टाकतील,अशी भीती अताउल्ला खां यांना होती.त्यामुळे मध्यप्रदेश हा डाकूंचा प्रदेश असल्याचे व आपल्या मुलीच्या सुरक्षेच्या कारणावरुन  त्यांनी मधूबालाला ‘नया दौर’च्या दोन दिवसांच्या शुटिंगसाठी पाठविण्यास नकार दिला,असं सांगितलं जातं.
दिलीप कुमार हे त्याकाळी सुपरस्टार होते व मधुबाला-दिलीप कुमार यांचा धर्म एकच होता.त्यामुळेत्यांनी लग्न जरी केले असते तरी अताउल्ला खां यांना अडचण नव्हती.त्यामुळेच अताउल्ला खां यांचा हा निर्णय सर्वांना अचंभित करणारा होता.अताउल्ला खां यांना मधूबालाच्या पैसांपासून हात धूवावे लागेल या भीतीतून त्यांनी मधूबालावर कठोर बंधने लादली होती,असे अनेकांचे म्हणने होते.दिलीप कुमार व मधूबालासारख्या खूप मोठ्या तारकांना लग्न करण्यापासून रोखणे हे इतकं सोपं नव्हतं.दिलीप कुमार यांनी अताउल्ला खां विरोधात भूमिका घेतल्याने मधूबालाच्या मनात दिलीप कुमारसाठी नाराजीची भावना निर्माण झाली.रागाच्या भरात दिलीप कुमार यांनी मधूबालाच्या वडीलांना ‘हूकूमशहा’असे म्हटले.वडीलांना सोडले तरच आपलं लग्न होणार अशी अट देखील दिलीप कुमार यांनी टाकली.आपल्या वडीलांच्या आज्ञेत आयुष्य काढणा-या मधूबालाला ही अट मान्य करणे शक्यच नव्हते.प्रेमापेक्षा वडीलांचा अपमान तिच्या जास्त जिव्हारी लागला होता.
या सर्व कोर्ट कचहरी नंतर देखील दिलीप कुमार यांनी फक्त एकदा घरी येऊन अताउल्ला खां यांची गळाभेट घ्यावी व त्यांची माफी मागावी,अशी अट मधूबाला यांनी दिलीप कुमार यांना घातली जी दिलीप कुमार यांनी साफ ठूकरवली.वडीलांचा तथाकथित अपमान व प्रियकराचा अहंकार यात भरडल्या गेली ती मधूबाला आणि तिचं खूप भावूक मन,तिची स्वप्ने,तिचं प्रेम….!‘मोहब्बत की झूठी कहानी पे राेये..बडी चोट खाई जवानी पे रोये..जवानी पे राेये!‘
पुढे ‘मुगल-ए-आजम’च्या चित्रिकरणासाठी ते दोघेही एकत्रित आले मात्र,त्यांच्यातील संवाद हरवला होता….!खूप मोठा दुरावा त्यांच्यामध्ये आला होता…!ह्दयात छिद्र असल्यामुळे व अत्यधिक शारिरीक श्रमातून मधुबालाची तब्येत खराब होऊ लागली होती.‘मुगल-ए-आजम’च्या चित्रीकरणाच्या वेळी अनेक तास साखळदंडामध्ये अडकल्याचे दृष्य करताना मधूबालाच्या नाका तोंडातून रक्त आले व ती बेशुद्ध झाली.यानंतर ती लंदनमध्ये उपचारासाठी गेली मात्र,फार उशिर झाला होता.लंदनमधील निष्णात डॉक्टर्सनी देखील मधूबालाची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला कारण त्यांना हे माहिती होते,मधूबाला यांच्या ह्दयाची स्थिती इतकी वाईट आहे की ती शस्त्रक्रियेच्या टेबलावरच दम तोडून देईल…!
‘मुघल-ऐ-आझम’हा त्यांचा एकत्र काम केलेला शेवटचा व सर्वात सुपरहिट चित्रपट होता,‘नया दौर’च्या घटनेनंतर दिलीप-मधूबाला वेगळे झाल्याचे दिलीप कुमार यांच्या बहीणीने एका मुलाखतीत सांगितले असले तरी विक्की लालवानी यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी मधूबाला व दिलीपकुमार यांच्या प्रेमभंगाविषयी बोलताना,दिलीप कुमार यांना मूल हवं होतं.त्यांना लहान मूले खूप आवडायची,परंतू मधूबालाच्या ह्दयात छिद्र असल्यामुळे गर्भारपणाचा व बाळंतपणाचा भार सहन करण्यास अक्षम असल्याचे आधीच सांगितले होते त्यातुळे मधूबाला ‘आई’होऊ शकणार नसल्यानेच दिलीप कुमार यांनी मधूबालासोबत नातं तोडून त्यांच्या पेक्षा २२ वर्ष लहान असलेल्या सायरा बोनोसोबत लग्न केलं,असा धक्कादायक खुलासा मुमताज यांनी केला.
प्रेम…ही भावना जेव्हा व्यवहार आणि स्वार्थाच्या पातळीवर येते तेव्हा त्या हळूवार नात्याचा अंत  असाच होत असतो.वडीलांचा स्वार्थ असो किंवा प्रियकराचा अंहकार,आतून तुटली ती मधूबालाच….!मधूबाला यांनी दिलीप कुमारवर फक्त प्रेमच केलं नव्हतं तर..त्या दिलीप कुमारसाठी वेड्या झाल्या होत्या.एका अहंकाराने घात केला.चित्रपटसृष्टितील या दोन महान तारकांचं लग्न झालं असतं तर जगात यशस्वी प्रेमाचं उदाहरण दिलीप-मुधबालाचंच दिल्या गेलं असतं.
लंदनमधून भारतात आल्यानंतर मधूबालाने एक खूप मोठा निर्णय घेतला व त्यांनी तिचा खूप चांगला मित्र असलेल्या किशोर कुमारसोबत लग्न केलं.लग्नानंतर ९ वर्ष मधूबाला ही सौंदर्याची देवी अंथरुणात होती.२३ फेब्रुवरी १९६९ रोजी मधूबालाने या जगाचा निरोप घेतला.मृत्यू समयी तिचे वय फक्त ३६ वर्ष होते.मात्र,आपल्या मागे ७१ चित्रपटांचा खजिना सोडून गेली व एक असे सुहास्य.. जे भारतीय सिनेप्रेमींच्या मनात खोल..खूप खोलवर कायमची काेरल्या गेली…!
इमाम बख्स नासिकचा एक शेर आहे ’तेरे सुरत से किसी की नही मिलती सुरत,हम जहाँ में तेरी तस्वीर लिये फिरते है ।’डोळ्यात खोडकरपणा आणि ओठांवर स्मित हास्य घेऊन जेव्हा-जेव्हा मधुबाला पडद्यावर झळकली,प्रेक्षक तिच्या या रुपावर भाळून मदहोश होऊन जात होते.त्यांच्या सौंदर्याच्या डंका फक्त भारत नव्हे तर जगभरात वाजत होता.‘थिएटर आर्ट्स‘नावाच्या अमेरिकेच्या एका मासिकाने मधूबाला यांचे छायाचित्र पहील्या पानावर छापून मधूबालाला ’द बिगेस्ट  स्टार इन द वर्ल्ड’चा खिताब दिला होता.एका अतिशय सामन्य व गरीब कुटूंबात जन्मापासून ‘सिल्वहर स्क्रीनची महाराणी ‘बनण्यापर्यंत मधूबालाचा प्रवास हा थक्क करणारा होता.मधूबालाचा आणखी एक गुण होता तो म्हणजे ती प्रत्येकासोबत खूप नफासत आणि तहजीबने पेश येत होती.
मधूबाला फक्त आपल्या कामाप्रतीच खूप प्रामाणिक नव्हती तर शुटिंगच्या वेळेसाठी देखील ती खूप प्रमाणिक राहत होती.हा गुण तिने आपल्या वडीलांकडून घेतला होता.एकदा मुंबई पावसाळ्यात तुंबली होती.ट्रेन,बसेस सगळी वाहतूक ठप्प असताना मधुबाला ठरल्याप्रमाणे सकाळीच स्टूडियोमध्ये शुटिंगसाठी पोहोचली.तिला बघून स्टूडियोचा चौकिदारही आश्‍चर्यात पडला,संपूर्ण मुंबई पावसामुळे ठप्प पडली होती,जिथे -तिथे झाडे उन्मळून पडली होती,रस्ते बंद होते,वीज गेली होती अश्‍यात मधूबाला कोणत्या रस्त्याने इथपर्यंत पोहोचली?हा प्रश्‍न त्याला चक्रावून गेला.मात्र,ही घटना मधुबालाचं तिच्या कामाप्रतिचं प्रेम व समर्पण भाव सिद्ध करते.
नादिरा यांनी एका मुलाखतीत सांगितले,मधूबाला ही सौंदयाची खाण होती.अनेकदा असं होंत की ज्यांना सौंदर्य मिळाले त्यांना अभिनयाची जाण नव्हती मात्र,मधूबाला एकमेव अशी अभिनेत्री होती  अलौकिक सौंदर्यासोबतच कसलेेला अभिनय जिच्या रोमारोमात भिनलेला होता.आशा भोसले यांनी देखील मधूबाला यांच्या सौदर्यांचं कौतूक करताना,त्यांच्या एका गाण्यावर मधूबाला ही नृत्याचे परिधाण करुन सेटवर आली,तिचे सौंदर्य बघून माझेच रोंगटे उभे झाले.माझी ही अवस्था झाली तर बिचा-या पुरुषांची काय अवस्था होत असेल,अशी मिश्‍किली त्यांनी केली.
असं असलं तरी मधूबालाची जीवनी बघता ते एक ‘शापित सौंदर्य’होतं,असंच आता म्हणावं लागेल.

ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारने ७ जुलै २०२१ रोजी वयाच्या ९९ व्या वर्षी जगातून एक्झीट घेतली.सहा दशके दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टित काम केले.एकूण ६३ चित्रपटात काम केलं मात्र,हिंदी सिनेमाला अभिनय कलेची नवी परिभाषा ते शिकवून गेले.दिलीप कुमार यांनी ‘गंगा जमुना’मध्ये अडाणी नायकाची भूमिका जितकी सहजपणे केली तितकाच न्याय ’मुगल-ए-आजम’मध्ये सलीमच्या भूमिकेशी केला.आपल्या आत्मकथेत दिलीप कुमार लिहतात,मधुबाला अत्यंत मोकळ्या स्वभावाच्या होत्या.माझ्यासारख्या लाजाळू,संकोची व्यक्तिशी संवाद सुरु करण्यात त्यांना कोणताही अडथळा वाटत नसे.परंतू मधुबाला यांच्या वडीलांमुळेच ही प्रेमकथा संपुष्टात आली…!

दिलीप कुमार यांनी आपल्या ’दि सब्सटेंस एंड दि शैडाे’या आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केल्याप्रमाणे आजारी व मृत्यूशी झूंज देत असलेल्या मधूबालाला भेटण्यासाठी ते एकदा तिच्या घरी गेले होते असे सांगितले.सायरा बानोचा एक खूप चांगला स्वभाव आहे की ती नेहमीच जिवनात पुढे बघते,भूतकाळातील गोष्टीत रमत नाही.जुन्या गोष्टी विसरुन पुढे बघ,अश्‍या तिच्या स्वभावामुळेच मी मधुबालाला शेवटचा भेटू शकलो.सायरासोबत लग्न झाल्यावर आम्ही मद्रासमध्ये राहत होतो.एक दिवस मला मधुबालाची चिठ्ठी मिळाली तिला मला बघायचं आहे.मी सायराला ही गोष्ट सांगितली.तिने सांगितले,तुला मधूला भेटायला गेलं पाहिजे,होऊ शकतं ती काेणत्या तरी गोष्टीमुळे अडचणीत असेल.दिलीप मधूबालाला भेटण्यासाठी गेले असता ती खूप अशक्त झाली होती व तिचा चेहरा पूर्ण पिवळा पडला होता.तिला बघून मला खूप दु:खं झालं पण मला बघून तिच्या ओठांवर हास्य फूलले व डोळ्यात चमक आली.मला म्हणाली,‘हमारे शहजादे को उनकी शहजादी मिल ही गई,मै बहोत खूश हूं’आम्ही त्या दिवशी खूप वेळ बोलत बसलो,मला भेटल्यावर मधू खूप खूश होती,असे दिलीप कुमार आपल्या आत्मचरित्रात सांगतात.
 मात्र,अनेक टिकाकार  दिलीप कुमार आजारी मधूबालाला भेटण्यासाठी कधीही गेले नसल्याचे सांगत,याच गोष्टीवर दिलीप कुमार यांच्यावर खूप टिका झाल्यामुळेच आपल्या आत्मचरित्रात त्यांनी ही ‘सारवा-सारव’केल्याचा आरोप करतात.
खरं काय खोटं काय?हे नातं जगणारे ते दोन प्रेमींच सांगू शकतात जे कायमचे अनंतात विलिन झाले.मात्र,जेव्हा जेव्हा चित्रपटसृष्टित प्रेमावर चर्चा होईल तेव्हा राज-नर्गिस,मीना कुमारी-कमाल अमरोही, मधूबाला-दिलीप कुमार,देव आनंद-सुरैया,गुरुदत्त-वहीदा रहमान यांचेच ‘प्रेम’ चर्चिले जात राहील..हे त्रिकालबाधित सत्य आहे…!
१९५६ साली मधुबालाने किशोर कुमारसोबत ‘ढाक के महल’या चित्रपटात काम केलं.सिनेमाच्या सेटवर त्यांची भेट झाली. याशिवाय ’चलती का नाम गाडी’ सहअनेक सिनेमांमध्ये काम करताना मधुबालाला किशाेर कुमार यांचा मनमोकळा व निखळ स्वभाव आवडू लागला. मधूबालाच्या ह्दयरोगाविषयी किशोर कुमार यांना माहिती होतं तरी देखील पुढे जाऊन त्यांनी मधूबालासोबत विवाह केला.मधूबालाने किशोर कुमार यांना ‘तिला अविवाहीत मरायचं नाही’ही ईच्छा बोलून दाखवली व आयुष्याकडे कायम खोडकरपणे बघणा-या किशोर कुमारने तिच्यासोबत लग्नगाठ बांधायचा ‘धाडसी’ निर्णय घेतला.

मधुबाला- किशोर कुमार यांचा विवाह १६ ऑक्टोबर १९६० रोजी झाला.मात्र,किशोर कुमार यांच्या घरी हा निर्णय मान्य नव्हता कारण ती परधर्मिय होती.लग्नाच्या वेळी मधूबालाचे वय अवघे २७ वर्ष होते.मधूबालासोबत लग्न करण्यासाठी किशोर कुमार यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याची अफवा बरेच काळ चर्चेत होती मात्र,मधुबाला यांची बहीण मधूर भूषण यांनी एका मुलाखतीत सांगितले,किशोर कुमार हे हिंदू होते व हिंदू म्हणूनच ते हे जग सोडून गेले…!’

लग्नानंतर केवळ १० दिवसातंच किशोर कुमार यांनी उपचारासाठी मधूबालाला परदेशात पाठवले होते.लग्नानंतर मधूबाला खूप आजारी असायची.रक्ताच्या उलट्या आणि ऑक्सिजन सिलेंडरवर अवलंबून तब्बल ९ वर्षे या दोन्ही महान तारकांचा संसार चालला.किशोर कुमार यांनी बांद्राच्या कार्टर रोडवरील फ्लॅटमध्ये मधुबालाला स्वतंत्र ठेवले होते.देखभालीसाठी एक नर्स देखील ठेवली होती.फार तर मधूबाला दोन वर्ष जगू शकेल असे लंदनच्या डॉक्टरांनी सांगितले होते मात्र,मधूबाला त्याच उत्साहाने चित्रपटात काम करीत राहीली.वडिलांना देखील मधूबालाने सांगितले,‘मी पूर्णपणे बरी आहे,तुम्ही चित्रपट साइन करा,माझ्या तारखा घ्या’यावर किशोर कुमार नाराज झाले व त्यांनी मधूबालाला तंबी दिली,’मधू ही गंमत नाही आहे,कृपया असे करु नको,निदान ६ महिने तरी आराम कर’.मधुबाला यांची जगण्याची जिद्द पहाता त्या दोन नव्हे तर नऊ वर्ष जगल्या.अति व्यस्तेमुळे किशोर यांनी मधुबालाला त्यांच्या वडीलांकडे आणून सोडले होते.पण मधुबालाला किशोर सोबत राहायचे होते.आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर मधुबाला यांनी खूप एकटेपणा सहन केला होता….!

महिन्यातून एक-दोन वेळाच ते मधूबालाला भेटण्यासाठी जात होते.यामुळे चित्रपटसृष्टित चर्चाही झडत असे.अनेक वर्षानंतर किशेार कुमार यांनी याबाबत खुलासा केला की मधुबाला त्यांना पाहल्यानंतर खूप रडत होती,इतकं जास्त रडणं तिच्या ह्दयासाठी चांगलं नव्हतं.त्यामुळे मी फार कमी वेळा तिला भेटत होतो….!
रेडिफला दिलेल्या मुलाखतीतमधूबालाच्या बहीणीने सांगितले की,किशोर कुमार यांच्यासोबत ही मधुबालाचं नातं सुरळीत नव्हतं.किशोर कुमारसोबत लग्न करुनही मधुबाला ही दिलीप कुमारला विसरली नव्हती.दिलीप कुमार यांनी जो अहंकार दाखवला होता,त्या रागातून मधुबालाने किशोर कुमारसोबत लग्नाचा निर्णय घेतला.लग्नासाठी किशोर कुमार यांनी प्रपोज केलं होतं,असे ही त्या म्हणाल्या.जेव्हा किशोर कुमार यांनी लग्नासाठी १९६० साली प्रपोज केलं तेव्हा मधुबाला उपचारासाठी लंदनमध्ये जात होत्या.१९५७ साली मधुबालाच्या ह्दयात छिद्र(व्हेंट्रिक्यूलर सेप्टल डिफेक्ट)असल्याचं निदान झालं होतं व त्यांच्याकडे दोनच वर्ष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असल्याने, मधुबाला यांनी किशोर कुमारसोबत लग्नाचा निर्णय घेतला.आजार सोबत असतानाही मधुबाला या यशाच्या शिखरावर होत्या.त्यांचे एकापाठोपाठ सिनेमे हिट होत होते.भौतिक सुखं,प्रसिद्धी व यश मधुबालासमोर लोटांगण घालत असताना ह्दयाने मात्र,अधिकचे श्‍वास देण्यास नकार दिला होता.
मधूबालाची बहीण मधूर भूषण हिने मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे,मधूबालाचा शेवटचा काळ खूप कठीण परिस्थितीतून जात होता.ऑक्सिजन सिलेंडर,बेशुद्धी आणि रक्ताच्या उलट्या…फेब्रुवरी १९६९ मध्ये तिची प्रकृती खूप जास्त खालावली.अताउल्ला खां यांनी किशोर कुमार यांना फोन केला.त्यावेळी ते एका कार्यक्रमात होते.मधूबालाकडे वेळ नाही,येऊन जा तातडीने,असा निरोप त्यांनी दिला मात्र,किशोर कुमार येऊ शकले नाहीत.अखेर २३ फेब्रुवरी १९६९ रोजी या शापित सौंदर्याची जगातील सर्व दु:खं व एकाकीपणातून कायमची मुक्ती झाली….!
‘मला जगायचं आहे..मरायचं नाही’हे मधुबालाचे शेवटचे शब्द होते.असं तिची नातेवाईक शाहिदा यांनी सांगितले.याच वेळी मीना कुमारी लिवर सिरोसिने गंभीर आजारी होती.तरी देखील मीना कुमारी यांनी मधुबालाचे घर गाठले मात्र,तिचे पार्थिव जुहूच्या मुस्लिम कब्रिस्तानमध्ये घेऊन जाण्यात आल्याचे तिला कळले.याच ठिकाणी मधुबालाला तिच्या खासगी डायरीसोबतच दफन करण्यात आले….!
‘प्यार किया कोई चोरी नहीं कीं छूप छूप कर आहें भरना क्या..जब प्यार किया तो डरना क्या…!’
……………………………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या