फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेश्राम यांच्या दोन महिन्याच्या मूलाचाही जीव होता धोक्यात:गाेयल-गंगाची भाडेकरु हूसकावण्याची ‘दाऊद स्टाईल’

मेश्राम यांच्या दोन महिन्याच्या मूलाचाही जीव होता धोक्यात:गाेयल-गंगाची भाडेकरु हूसकावण्याची ‘दाऊद स्टाईल’

Advertisements

(भाग-५)

२०१२ पासून अजूनही न्यायाच्याच प्रतिक्षेत

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर २०२१: महानायक अमिताभ बच्चनच्या एखाद्या एंग्री इमेजच्या चित्रपटाच्या कथानकात शोभावं असंच कथानक महाराष्ट्राच्या उपराजधानीत २०१२ साली घडलं,एवढंच की महानायकाचे कथानक ‘आभासी’असतात तर गोयल-गंगा बिल्डर,दिलीप बुटी व नागपूर सुधार प्रन्यासच्या एका अभियंताने ज्याप्रकारे, बुटी चाळीतील चार पिढ्यांपासून वास्तव्यास असणा-या भाडेकरुंना हूसकावलेे ते आभासी नसून, अनेकांचे आयुष्य उधवस्त करणारे धगधगते ‘वास्तव’होते.

त्याचं नाव संजय मेश्राम.बुटी चाळीत भाडेकरु म्हणून राहत असणारी ही त्याची चौथी पिढी.जागेचा ‘जीआर’ही त्यांच्याकडे होता.पहील्या पिढीने बुटींना ६० पैसे घरभाडे दिले. यानंतर ३५ रुपयांपर्यंत घरभाडे पोहोचले.मेश्राम यांच्यासोबतच बुटी चाळीतील १५ ते २० कुटूंब हे पोस्टाने बुटींना घरभाडे पाठवित असत.२०१२ पासून मात्र मेश्राम यांच्यासोबतच इतर भाडेकरुंच्या जीवनात ‘गाेयल-गंगा’नावाचा जीवघेणा भूकंप आला.गपगुमान १० ते १५ लाख घ्या आणि चालते व्हा,असे फर्मान या सर्व भाडेकरुंना मिळाले.ज्यांची सामाजिक,आर्थिक ‘पत’चांगली होती त्यांनी तेवढी रक्कम स्वीकारली आणि घर रिकामे केले, ज्यांना त्याच जागेत मालकी हवी होती, त्यांच्या वाट्याला मात्र ‘नरक यातना’आली.त्यातीलच एक होते संजय मेश्राम आणि त्यांचे इतर आठ कुटुंबातील सदस्य.त्यात गर्भवती पत्नीही होती.

९ मे २०१३ रोजी पहाटेच त्यांना घर रिकामे करावे लागले.बुटी चाळीत त्यांचे ‘संजय ढोकला भांडार’म्हणून प्रसिद्ध दूकान होते. मात्र घर रिकामे करण्यासाठी वारंवार बुटी व बिल्डरचे गुर्गे, गुंडागर्दी करीत त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चालून येऊ लागली.तोपर्यंत मेश्राम यांचे बाळ दोन महिन्यांचे झाले होते.गपगुमान हे घर रिकामे होत नसल्याचे बघून बिल्डरने त्याच्या घराच्या चारही बाजूने ४ ते ५ फूट खड्डे खोदून ठेवले.त्याच्या दूकानात येण्याचा ग्राहकांचा मार्ग मुद्दामुन जायंबद केला.

मेश्राम यांच्या जवळील कागदपत्रांमध्ये त्यांचा व त्यांच्या काकांचे मिळून १६००-१६०० असे ३२०० चौ.मी जागा त्यांच्या ताब्यात होती मात्र नागपूर सुधार प्रन्यासचे एक ‘सुविज्ञ’सब इंजिनियर प्रमोद धनकर यांच्याकडील कागदपत्रामध्ये फक्त साढे नऊ चौ.मी.जागाच मेश्राम यांची होती!धनकर यांच्याकडील कागदपत्रांमध्ये नमूद असणारी जागा चूक असल्याचे सांगण्यास मेश्राम कुटुंब नासुप्रमध्ये गेले असता त्यांना बघताच धनकर हे दूसरीकडे उठून गेलेत.एक सज्जन अधिकारी देशपांडे नावाचे, यांनी मेश्राम यांना सांगितले ’तुमच्यासोबत धोकाधडी झाली पण मी मात्र मध्ये बोलू शकत नाही….!

मेश्राम यांनी फक्त नागपूरच्या कोणत्याही कोप-यात एका घराची मागणी केली होती,त्यांना पैश्‍यांच्या रुपात मोबदला नको होता.मात्र त्यांना एक खडकू ही न देता ९ मे २०१३ रोजी त्यांच्या पूर्वजांची,त्यांच्या हक्काची बुटी चाळ सोडावी लागली कारण आता प्रकरण त्यांच्या दोन महिन्याच्या मूलाचा जीव घेण्यापर्यंत येऊन पोहोचले होते!

मेश्राम यांच्या घराच्या तीन्ही बाजूला ४ ते ५ फूट खोल खड्डा बिल्डरने खोदून ठेवला,त्यांची नळाची लाईन कापली.वीज कापली.रात्री-अपरात्री घरावर दगडे यायची.नळ कापल्यामुळे संजय हे रात्री ९ वाजता आपल्या ढोकल्याचे दूकान बंद करुन ९ ते रात्री २ पर्यंत कुटुंबियांसाठी सीताबर्डी पोलिस ठाण्याजवळील मनपाच्या सार्वजनिक नळावरुन पाणी भरत असे.

सततच्या धमक्या आणि जीवाच्या भीतीमुळे मेश्राम हे सीताबर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यास गेलेत तर….तेथील एका पोलिस अधिका-याचे शब्द होते ‘यानंतर इथे दिसला तर हात-पाय तोडून देईल!’२०१२ साली कर्तव्यावर असणा-या व ‘सज्जनांचे रक्षण करण्याचे’ब्रीद वाक्य मिरविणा-या त्या पोलिस अधिका-याचे नाव काय होते?’सत्ताधीश’ने हा प्रश्‍न विचारता ‘माहीती नाही,सगळे खाकी वर्दीत एकसारखेच तर दिसते’असे भाबडे उत्तर त्याचे होते.

गुंडागर्दीविरुद्ध आणि जिविताच्या रक्षणासाठी भारताचे संविधान, भारताच्या नागरिकांना ज्या शासकीय विभागाकडे तक्रार नोंदवण्याचे संवैधानिक अधिकार देतात, त्या पोलिस ठाण्यातच एका हतबल,निराश,भ्रष्ट व्यवस्थेशी लढणा-या सामान्य नागरिकाला हा अधिकार नेहमीसारखाच नाकारण्यात आला!

पोलिस ठाण्यानंतर सामान्य माणूस न्यायासाठी चढतो ती न्यायालयाची पायरी. २०१३ साली संजय मेश्राम यांनी वकीलाच्या मार्फत बिल्डरविरुद्ध खटला दाखल केला.पण?बिल्डरने त्याच्या वकीलालाच आपल्या गोटात घेतले.यानंतर ‘राष्ट्र निर्माण संघटनेचे’अध्यक्ष नीलेश नागोलकर यांची मेश्राम यांना मदत मिळाली.ॲड.पाटील यांनी अल्पकाळ केस बघितली नंतर त्यांनी ही धोका दिला.ॲड.भूषण जोशी यांच्यामार्फत आतापर्यंत न्यायासाठी ही लढाई हायकोर्टात सुरु आहे.

एक पैसा ही न देता पहाटे ६ वा.दाेन महिन्याचे निरागस मूल,पत्नी,आई,भाऊ,काका यांच्यासह एका क्षणात बेघर झालो,कुठे जायचं?मानेवाडा रोड येथे बहीण राहायची तिच्या घरी एवढ्या जणांनी आसरा घेतला!

हायकोर्टात ‘गणगौर’चे मालक मेहता यांनी बोलावले असल्यामुळे गेलो असता नीलेश नागोलकर दिसले नाहीत,चूकून मी ६ व्या माळ्यावर पोहोचलो तेव्हा मागाहून येणारे बिल्डरचे बाऊंसर आपापसात बोलत होते ‘याला येथूनच खाली फेकून देऊ!’घामाघूम झालेले संजय मेश्राम हे लगेच एका केबिनमध्ये दडून बसले आणि नीलेश यांना फोन केला,मगच केबिनच्या बाहेर पडलो…..!

‘ॲड.नामदेवराव जुनघरे’हे एक असे नाव होते ज्यांच्या भरवश्‍यावर बुटी चाळीतील भाडेकरुन एवढ्या बलाढ्य अश्‍या तीन-तीन प्रस्थापितांशी लढत होती.बुटी,नासुप्र आणि बिल्डर….!एक दिवस अचानक ॲड.जुनघरे यांचा ऐन सीताबर्डी पोलिस ठाण्यासमोरच ‘अपघात’ झाला आणि यात ते मृत्यूमुखी पडलेत…..!त्यांचा मुलगा रमेश जुनघरे हे ही त्यामुळे खचले….सगळंच विस्कटलं…जोपर्यंत ॲड.नामदेवराव जुनघरे जिवंत होते,बुटी आणि गाेयल-गंगाची माणसे वाड्यात शिरण्याची हिंमत ही करीत नसे…..!‘मेन व्यक्तीलाच उडवून दिलं’….असे शब्द संजय मेश्राम यांचे होते.

राजकारण्यांचे झिजवले उंबरठे-
२०१३ साल होता,२०१४ च्या निवडणूकीला अवधी होता….तेव्हाचे आमदार नितीन गडकरी,देवेंद्र फडणवीस,राज ठाकरे या सर्वांचेच उंबरठे झिजवले.खूप त्रासून गेलो होतो.रात्र-रात्रभर जागून कुटुंबियांचे रक्षण करीत होतो.त्या रात्री दूकानासमाेरील पडक्या जागेवर अनेक माणसे अंधारात बसलेली दिसली.आईने लगेच आवाज दिला,दूकान बंद करुन आत ये.घरात जाताच खिडकीतून काहीतरी पेटणारी वस्तू आतमध्ये भिरकावण्यात आली.नंतर कळले ते अकोल्याहून बोलावलेले नामचीन गुंड होते.अशीच व्यथा एकट्या राहणा-या ‘जामदार’आडनावाच्या महिलांची होती.आई वृद्ध तर घरातील पुरुष मतीमंद.त्यांच्याही घराच्या चारही बाजूला खोल ६ फूटांचा खड्डा खोदण्यात आला.१५ दिवस पाण्यावाचून होते,घरा बाहेर ही पडू दिले नाही,अखेर त्यांनी बिल्डरसमोर हार मानली.

रडलो….गडकरींसमाेर..फडणवीस यांच्यासमोर…माझी आईसुद्धा सोबत होती,मिळाले धीराचे शब्द पण?कृती काहीच नाही,उलट!त्यांच्या घरी बिल्डरची माणसे दिसायची…..!प्रत्येकावरुन विश्‍वास उडाला,महत्वाचे म्हणजे ज्या भाडेकरुंसाठी लढलो त्यांनीच मुर्खात काढले..घर सोडून निघून गेलेत…मी…एकटाच पडलो….!

प्रशांत पवार यांच्यावरही ठेवला होता विश्‍वास!
२०१२ साली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नागपूरात आले होते.रात्री ते रविभवनात मुक्कामाला होते.मोठ्या अाशेने तिथे पोहोचलो. ते रात्रीचं जेवण करुन शतपावली करत होते.त्यांच्यापर्यंत पोहोचणार तेच प्रशांत पवार यांनी अडवले.‘काय मॅटर अाहे’विचारले,माझा रडवलेला चेहरा बघून अंधारात कोप-यात घेऊन गेले.संपूर्ण कहाणी ऐकून घेतली.साहेबांना सगळं सांगतो म्हणाले आणि आश्‍वासित करुन घरी पाठवले.दूस-या दिवशी काय बघतो तर…..?मलिक बंधू ज्यांना बिल्डरनी हॅरिटेज बुटी बावळीवर ‘मलिक डेकॉर’बांधून दिले त्यांच्या दूकानात जाताना ते दिसले…माझ्या उधवस्त घरात ढूंकूनही पाहीले नाही…..काय समजायचे ते समजलो…..!

पत्रकारांची असंवेदनशीलता-
खामल्याचे सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पंजू तोतवानी यांच्याकडे देशातील मोठ्या सामाजिक कार्यकर्ता ‘नंदिता दास’ आल्या होत्या.आयुष्यातून उधवस्त झालेला माणूस हा बायको-मुलासाठी कोणाच्याही दारावर नाक घासू शकतो तसाच मी या ठिकाणी पोहोचलो.पत्रकार परिषद सुरु होती,मला एकदम भरुन आलं मी दास यांच्या समोर जाऊन सरळ त्यांच्या पायावर डोकं ठेवलं…..!त्यांनाही काहीच सूचलं नाही त्या एकदम उठल्या आणि पत्रकारांना उद्देशून म्हणाल्या,या माणसाच्या काय व्यथा आहे कृपया तुम्ही समजून घ्यावे आणि त्या निघून गेल्या…!बस…तेथे उपस्थित पत्रकार एकदम भडकले…तुझ्यामुळे त्या निघून गेल्या…!असभ्य बोललेत काही छायाचित्रकार तर मला मारायला धावलेत….!

एक माणूस अचानक येऊन सेलिब्रिटीच्या पायावर डोके ठेऊन ढसाढसा रडतोय,त्याचे काय दू:खं आहे हे समजून घेण्याऐवजी.. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाचे वर्तन… एखाद्या असंवेदनशील व्यवसायिक नोकरशाहीप्रमाणेच होते…..!

ज्या काळात बुटी चाळीतील अनेक भाडेकरु आयुष्यातून उधवस्त होत होते त्याच वेळी… नागपूरातील सर्व प्रसार माध्यमात ‘गाेयल-गंगा‘च्या मोठमोठ्या जाहीराती अखंडीतरित्या झळकत होत्या……..!

त्या दिवशी बिल्डरच्या बुलडोजरने जोरात पंजा घरावरच्या टिनावर मारला अन्….आधीच भुसभुशीत झालेल्या घरावरचा एक मोठा दगड दोन महिन्याच्या मुलाच्या अगदी बाजूला येऊन पडला…..!त्या दगडाचा नेम चूकला असता तर…..!पण? दगडालाही ‘काळीज’होतं पण भ्रष्ट व्यवस्थेला असतं का काळीज?

एक ही नोटीस न देता पहाटे ६ वाजता एका क्षणात मला या व्यवस्थेने बायको-मुलासह,कुटुंबियांसह बेघर केलं.नीलेश नागोलकर यांच्यामुळे अजून ही न्यायाची आस संपली नाही,जोपर्यंत माझ्या खटल्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत लढत राहणार…..!

(संपर्क क्रमांक-नीलेश नागोलकर- ९८२२७३९७३८)
………..

(भाग-६)

पीएचएल बँकेकडून बिल्डरने घेतले २२५ कोटींचे कर्ज!

नागपूर,ता. १२ ऑक्टोबर २०२१: चार कोटी ४० लाखांच्या जागेवर ‘गाेयल-गंगा‘बिल्डरने पंजाब नॅशनल बॅंकेची शाखा असणा-या पीएचएल बँकेतून २२५ कोटींचे कर्ज घेतले.यासाठी बिल्डरने जी कागदपत्रे गहाण ठेवली त्यात १०,६०० चौ.फूट जागेचाच उल्लेख आहे हे विशेष!

इतर ही अनेक बँकेतून हीच कागदपत्रे सादर करुन कोट्यावधीचे कर्ज उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे मात्र मूळ मालक नागपूर सुधार प्रन्यास असताना व त्यांचे ‘ना-हरकत ’प्रमाणपत्र कागदपत्रांना जोडलेले नसताना, पीएचएल बँकेने ‘ग्लोकल मॉल’ची जागा गहाण ठेऊन घेतली कशी?हा तांत्रिक प्रश्‍न या बँकेच्या अधिका-यांना पडलाच नाही.

१० हजार ६०० चौ.फू.च्या जागेवर २२५ कोटींचे कर्ज या आकड्यांचा भागाकार केले असता प्रत्येक फूट किती लाखात पडले?रॉय नावाच्या दिल्लीतील बँकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य अधिका-यांनीच या कागदपत्रांवर एवढ्या कोटींचे कर्ज देण्यास मान्यता दिली असल्याचे माहिती अधिकारात कळले.

मूळात बिल्डरची ही जागाच नसताना ४ कोटी ४० लाखांची जागा ही २२५ कोटींमध्ये बिल्डरने गहाण कशी टाकली?नासुप्रच्या ना-हरकत प्रमाणपत्रावर बुटींनी आधीच कर्ज उचलले होते मग नासुप्रकडून त्याच मालमत्तेससाठी ‘ना-हरकत‘ प्रमाणपत्र मिळाले नसताना कोट्यावधींचे कर्ज या बँकेने मंजूर कसे केले?

एखाद्या नागवलेला शेतकरी १०-२० हजारांचे कर्ज बँकेकडून घेण्यासाठी पार मेटाकूटीस येतो पण?बिल्डर लॉबीचे ’हात किती लंबे’असतात याचाच प्रत्यय पीएचएल बँकेचा व्यवहार बघून येतो.बॅंकेत सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये देखील बिल्डरने ५ माळ्यांचीच जागा दाखवली आहे,प्रत्यक्षात तिथे आता ६ नसून ७ माळे झालेतही!

तारण ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये पहील्या माळ्यातील ५० कोटींची जागा ही भाडेकरुंना देण्यात आल्याचे नमूद आहे.पण?यात कोणते भाडेकरु?यांची नावेच नाहीत.फक्त काेणती जागा विकली एवढाच उल्लेख आहे,कोणाला विकली ती नावे मिस्टर इंडियासारखी ‘अदृष्य’ आहेत.

या संपूर्ण मॉलसाठी १५ हजार २९६ केवी वीज लागणार आहे,एवढी वीज या ‘ग्लोकल’ मॉलला ट्रांसफॉर्मर पुरवू शकते का?नुकतेच एका बैठकीत बिल्डरला या भूखंडावर बंधनकारक असणारी ३७७ झाडे लावण्यासाठी आता जागाच उरली नसल्याने, त्यांनी ही सर्व झाडे ‘कूंडीत’लावली असल्याचे नासुप्रच्या बैठकीत सांगितले.त्यावर नासुप्रच्या इमारत अभियंताने ही झाडे जमीनीवरच लावण्याचे आदेश बिल्डरला दिले आहेत.बिल्डर आता ही झाडे कुठे लावणार?ढगात?

पर्यावरण गेलं खड्डयात अश्‍या मनोवृत्तीच्या आणि प्रत्येक चौ.मी.मधून फक्त लाभ कमावण्याची मानसिकता असणा-या बिल्डरची चौकशी आता तरी होईल का?‘ग्लोकल गंगा’प्रकल्पातून अनेक गंभीर प्रश्‍न उद् भवले आहेत,या संपूर्ण निमयबाह्य कृतींमुळे उद्या शासनाने ही जागा परत आपल्या ताब्यात घेतल्यास हा प्रश्‍न नासुप्र कसा सोडवणार?ज्या बँकेने संपूर्ण नियम-कायदे गुंडाळून प्रकल्पासाठी कर्ज दिले त्या बँकेच्या अधिका-यांची चौकशी होईल का?असा प्रश्‍न आता नागपूरकरांना पडला आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या