Advertisements

स्वच्छता कर्मचा-याने कापल्या हाताच्या नसा
दिवाळीच्या तोंडावर मेडीकल रुग्णालय को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पदाधिका-यांनी पुसली रवि राठोडच्या तोंडाला पाने
अधिष्ठाता डॉ.रवि गजभिये यांना उशिरा सुचलेले शहापण:कर्मचा-यांच्या पगारातून आता सोसायटी सरळ भरपाई कापू शकणार नाही
नागपूर,ता.१६ ऑक्टोबर २०२५: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात(मेडिकल)मध्ये कार्यरत रवि राठोड नावाच्या एका स्वच्छता कर्मचा-याने वैफल्यग्रस्त होऊन, आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अधिष्ठाता डॉ.रवि गजभिये यांच्या कक्षा समोरच हाताच्या नसांवर शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या धारदार ब्लेडने चिरे मारुन रक्त सांडवले.संपूर्ण फर्शी हळूहळू रक्ताने माखू लागली.उपस्थित कर्मचा-यांनी त्याला ’भाऊ ऐकून तर घे’असे समजवण्याचा प्रयत्न ही केला मात्र,ऐन दिवाळीच्या तोंडावर मेडीकल रुग्णाल्याच्या कर्मचारी को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या पदाधिका-यांनी रवि सोबत केलेल्या असंवेदनशील आर्थिक व्यवहारामुळे रविने सोसायटीच्या पदाधिका-यांवर दोषारोपण करीत, हे टोकाचे पाऊल उचलले,ज्या मेडीकलमध्ये जगभरातील रुग्णांवर उपचार करुन जखमांमधून वाहणारे रक्त थांबववले जाते त्याच मेडीकलमध्ये ऐन अधिष्ठाताच्या कक्षा समोर मनाने रक्तबंबाळ झालेल्या रवि राठोडने संपूर्ण फर्शीवरच रक्त सांडवल्याचे दृष्य काळजाचा थरकाप उडवणारे होते.
रवि राठोड हा अधिष्ठाता कार्यालयाच्या वर असलेल्या पॅथोलॉजी विभागात स्वच्छता कर्मचारी आहे.मागील दहा ते बारा वर्षांपासून तो नोकरी करत आहे.यंदा देखील त्याला पगाराची वाट होती मात्र,गेल्या पाच महिन्यांपासून पगार न झाल्याचा आरोप करीत दिवाळीच्या तोंडावर हाता तोंडाशी जमा झालेल्या पगारातून ‘दी मेडीकल कॉलेज एम्पलॉईज क्रडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी’च्या पदाधिका-यांनी त्याने घेतलेल्या कर्जाची संपूर्ण रक्कम कपात करुन घेतली.हा मानसिक धक्का व पदाधिका-यांची असंवेदनशीलता रविला सहन न झाल्याने तो, ब्लेडने हातावर वार करीत अधिष्ठाताच्या कक्षा समोर पदाधिका-यांवर तोंडाने आसूड ओढत,हातावरील रक्त सांडवित राहीला.
अखेर रवि राठोडच्या काही सहका-यांनी त्याला पकडून मेडिकलच्या कॅज्युल्टीत दाखल केले.त्याच्यावर डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरु केले.कॅज्युल्टीत देखील ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्जाची संपूर्ण रक्कम का कापली म्हणून त्रागा तो करीत होता.
महत्वाचे म्हणजे अवघ्या दोनच महिन्यांपूर्वी सोसायटीच्या निवडणूका पार पडल्यात ज्यात निवडणूक लढणा-या पदाधिका-यांनी विविध आश्वासने कर्मचा-यांना दिली होती.दर दिवाळीला सोसायटीतर्फे कर्मचा-यांना वीस हजारांची रक्कम दिली जात असल्याचे एका कर्मचा-याने सांगितले,ती देखील सोसायटीने कर्मचा-यांना दिली नाही,ना जमा झालेल्या पगारातील रकमेवर व्याज दिला,ना पार पडलेल्या बैठकींचा पाचशे रुपये भत्ता दिला.
महत्वाचे म्हणजे,मेडीकलमधील आपली ड्यूटी संपल्यावर घराचा प्रपंच चालवायला रवि हा मध्यरात्रीपर्यंत ओला टॅक्सी चालवित असतो.
अधिष्ठातांना उशिरा सुचलेले शहापण-
या घटनेनंतर मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.रवि गजभिये यांनी एक पत्र जारी करुन या पुढे कोणत्याही कर्मचा-यांच्या पगारातून को-ऑपरेटीव्ह सोसायटी परस्पर पगारातील रक्कम कापणार नाही,असा आदेश जारी केला.मेडीकलमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचा-यांच्या वेतनातून कर्मचारी हे स्वत:कर्जाची रक्कम भरतील,असे यात नमूद करण्यात आले.मूळात कर्मचा-यांना आर्थिक पाठबळ देणारी संस्थाच जेव्हा कर्मचा-यांचे आर्थिक शोषण करण्यास सज्ज होते त्यावेळी रवि राठोड सारख्या कर्मचा-याची सहनशीलता संपून, स्वत:चे रक्त सांडणारे कृत्य त्यांच्याकडून घडत असतं,हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.डॉ.रवि गजभिये यांच्या एकूणच कारभाराविषयी अनेक कर्मचा-यांची तक्रार आहे मात्र,मायबाप सरकारला या तक्रारींची नोंदच घ्यावीशी वाटत नाही,असा संताप आज व्यक्त झाला.

( छायाचित्र : मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांनी रवि राठोडच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर जारी केलेले पत्र)
रवि राठोड याला दोन मुले असून,मी मेलो तर चांगलेच होईल माझ्या पत्नीला माझ्यानंतर नोकरी मिळेल,असे रवि सतत बडबडत होता.
दंत महाविद्यालयाच्या घटनेची झाली आठवण-
आपल्या कष्टकरी कर्मचा-यांच्या प्रति मुजोर अधिकारी हे किती असंवेदनशील असतात याचा प्रत्यय या आधी देखील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत एका स्वच्छता कर्मचा-याच्या आत्महत्येवरुन सिद्ध झालं होतं.मागच्याच महिन्यात ३ सप्टेंबर २०२५ रोजी दंत महाविद्यालयात कार्यरत अजय मलिक नावाच्या स्वच्छता कर्मचा-याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता,दूर्देवाने यात त्याचा नंतर मृत्यू झाला.अजय याची आई शासकीय दंत महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर अनुकंपातत्वावर अजयला स्वच्छता कर्मचा-याची नोकरी कोरोना पूर्वी मिळाली होती मात्र,तो अनियमित राहत असल्याने पुन्हा रुजू होण्यासाठी दंत महाविद्यालयात खेटा घालत होता.महाविद्यालयातील प्रशासकीय अधिका-याने त्याची फाईल अजयच्या अंगावर भिरकावली,यामुळे तो दुखावला गेला व त्याने घरी येऊन टोकाचे पाऊल उचलले.
मूळात अधिका-यांसारखा भरघोस पगार चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना नसतो.या शिवाय पदावर असलेले सगळेच अधिकारी हे इमाने-इतबारे कर्तव्य पार पाडतात व कर्मचारीच फक्त चुका करतात,असे देखील भारतात कुठेही घडत नाही,परिणामी,मानवी स्वभावातील दोष समजून घेऊन अशी प्रकरणे संवेदनशीलपणे हाताळणे कुण्या प्रशासकीय अधिका-यांना जर जमत नसेल, तर सरकारने तात्काळ त्यांची उचलबांगडी करुन अशासकीय कामावर त्यांना रुजू करावे,असा संतप्त सूर आता उमटत आहे.
मेडीकल को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे हे आहेत अकरा पदाधिकारी-
संदीप सुरेश मुरकूट(अध्यक्ष)अर्चना प्र.मसराम(उपाध्यक्ष)शैलेश रामटेके(सचिव)ईश्वर जी.राठोड(कोषाध्यक्ष)सदस्य-मृगेन्द्र आर.तेले,अमोल बी.फाटे,शाहदाज बाब खान,अतुल व्ही सिक्कलवार,अहर्निश ए.अभ्यंकर,मेघा मेश्राम,जुल्फेकार शेख करीम
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official युट्युबवर उपलब्ध)
…………………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
