फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणमुख्य निवडणूक आयोगाचे ’हे‘पत्र लोकशाहीवर कुठाराघात करणारे: नाना पटोले

मुख्य निवडणूक आयोगाचे ’हे‘पत्र लोकशाहीवर कुठाराघात करणारे: नाना पटोले

Advertisements
मतदानाचे पुरावे,दस्तावेज सर्वसामान्य नागरिकांना देता कामा नये: मुख्य निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला पत्र!

पंतप्रधान मोदींनी अवघ्या ४८ तासात हरियाणा विधानसभा निवडणूकीत पुरावे मिळू नये यासाठी कलम १९ मध्ये केले ६ बदल 
मोदी व मुख्य निवडणूक आयोग करतात आहे दिवसाढवळ्या लोकशाहीची हत्या:पटोले यांचा आरोप
दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत नाचणारा नेता नाशिकमध्ये आता भाजपच्या पक्षात:बडगुजर यांच्या टाळला उल्लेख
भ्रष्टाचारातून शासकीय एअर इंडिया डबघाईस आणनारे आता भाजपसोबत सत्तेत: प्रफूल्ल पटेल यांचे नाव न घेता हाणला टोला
भाजप ‘चिवडा ’पार्टी वरुन आता झाली ‘बिर्याणी’ पार्टी:पटोले यांचा भाजपच्या आर्थिक विकासाच्या दाव्यावर टोला
ॲड.सतीश उके यांच्यावर अन्याय झाला :पटोले यांची स्पष्टोक्ती
नागपूर,ता.२० जून २०२५: मे महिन्याच्या ३० तारखेला मुख्य निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानासंबंधी माहिती,व्हिडीयो रेकॉडिंग व दस्तावेज हे सर्वसामान्य लोकांना देऊ नये असे पत्र पाठवले आहे.निवडणूक आयोगाची ही कृती लोकशाहीच्या मूळावर घाला घालणारी असून, पाशवी बहूमताच्या आधारावर मोदी सरकार हे लोकतंत्राचा गळा घोटत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे माजी खासदार व नेते नाना पटोले यांनी आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.याप्रसंगी काँग्रेसचे पश्‍चिम नागपूरचे आमदार व शहराध्यक्ष विकास ठाकरे व गिरीश पांडव उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना नाना पटोले म्हणाले,की निवडणूक दस्तावेज व पुरावे हे ४५ दिवस निवडणूक आयोगाला सांभाळून ठेवणे बंधनकारक आहे मात्र,ते दस्तावेज व पुरावे निवडणूकीत सहभागी उमेदवारांनाच या पुढे देता येईल,सर्वसामान्य लोकांनी,ज्यांचा निवडणूकीशी कोणताही संबंध नाही अश्‍यांना या पुढे आता ते पुरावे व दस्तावेज मिळणार नाही,कारण ते या माहितीचा दुरुपयोग करतात! निवडणूक आयोगाचा हा आदेश सर्वसामान्यांच्या मूलभूत व संवैधानिक अधिकारांचे हनन करणारा असून, मतदान तसेच निवडणूक प्रक्रियेवर देशातील कोणताही मतदार हा आक्षेप घेऊ शकतो.निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या शब्दात जरी ‘प्रक्रिया’असली तरी ती या देशातील लोकशाहीचा ‘आत्मा’ असल्याचे ते म्हणाले.देशाच्या लोकशाहीचा पायाच या प्रक्रियेवर अवलंबून असल्याचे ते सांगतात.
निवडणूक आयोग नेमकी हीच लोकशाही बदलण्याची प्रक्रिया अवलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला.मागील वर्षी २०२४ मध्ये महाराष्ट्राच्या निवडणूकी पूर्वी हरियाणा विधान सभेच्या निवडणूकीत अायोगाने केंद्रातील मोदी सरकारच्या संगमताने हाच खेळ खेळला.हरियाणाच्या निवडणूकीत धांधली करुन भाजप सत्तेवर आली.मतदानाच्या टक्केवारीवर आक्षेप घेऊन पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात या विरोधात दाद मागितली गेली.९ डिसेंबर २०२४ रोजी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला याचिकाकर्त्यांना मतदानासंबंधी पुरावे व दस्तावेज देण्याचे आदेश दिले.
तातडीने निवडणूक आयोगाने याचिकाकर्त्यांना ते पुरावे न देता ,केंद्रीय न्यायिक मंत्रालयाकडे दाद मागितली व आम्हाला या नियमात सुधारणा करुन देण्याची मागणी केली.पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाचे पत्र आल्यावर अवघ्या ४८ तासात निवडणूक संबंधी कलम ९३ मध्ये सुधारणा करुन त्यातील ६ नियम बदलले!अधिसूचना काढून निवडणूक आयोगाला दिली.एकीकडे देशातील सर्वसामान्य माणूस हा त्याच्या विरोधातील धोरणांमध्ये बदल करण्यासाठी पराकोटीचा लढा देत असताना, मोदी धोरणात्मक निर्णय बदलत नाही मात्र,देशातील लोकशाही जिवंत ठेवणा-या नियमांमध्ये अवघ्या ४८ तासात सुधारणा करण्याची किमया घडवतात,अशी टिका त्यांनी केली.
केंद्रातील मोदी सरकार व मुख्य निवडणूक आयोग दोघांच्या संगमताने देशातील लोकशाही व्यवसथा उधवस्त करण्याचे ‘पाप’घडवत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.
त्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणूकीत देखील मोदी यांनी मुख्य निवडणूक आयोगाला हाताशी धरुन दिवसाढवल्या  लोकशाहीची हत्या केल्याची जळजळीत टिका याप्रसंगी नाना पटोले यांनी केली. महाराष्ट्रात फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर जनतेने उत्साह दाखवलाच नाही कारण हे जनतेचे सरकारच नाही,असा दावा त्यांनी केला.महाराष्ट्रातील हे सरकार ईव्हीएमच्या कृपेने मतांची टक्केवारी वाढवून व मतांची चोरी करुन बनले असल्याचा आरोप त्यांनी केला.
एखाद्याला न्यायालयात जायचे असल्यास त्याच्याकडे पुरावाच राहणार नाही कारण निवडणूक आयोग ४५ दिवसांनंतर ईव्हीएममधील तपशील नष्ट करतो.परिणामी,मुख्य निवडणूक आयोगाच्या या पत्रा विरोधातील चळवळ ही फक्त राज्यातील विरोधी पक्षाची नसून देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठीची चळवळ असल्याचे ते म्हणाले.लोकशाहीवर दरोडा टाकण्याचे काम मोदी सरकार करीत आहे.आम्ही मुख्य निवडणूक आयोगाच्या या पत्राच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर इतक्या उशिरा का आक्षेप घेत आहात?असा प्रश्‍न केला असता,आम्ही सातत्याने यावर आक्षेप घेत असल्याचे ते म्हणाले.जागतिकस्तरावर देशाची अर्थव्यवस्था पंतप्रधान मोदींनी चवथ्या क्रमांकावर आणली असून लकवरच ती तिस-या क्रमांकावर येणार असल्याचा दावा भाजपतर्फे केला जात आहे,याकडे लक्ष वेधले असता,अर्थव्यवस्था नव्हे तर भाजप निश्‍चितच आर्थिकदृष्टया मजबूत झाली असल्याचा टोला त्यांनी हाणला.देशातील जनता मात्र,दहशतीत वावरत आहे.शेतकरी आज देखील आत्महत्या करत आहे,बेरोजगारीचा प्रश्‍न देशात गहन झाला आहे,सार्वजनिक संस्थांचे मोठ्या प्रमाणात खासगीकरण केले जात आहे त्यामुळे भाजप आर्थिकदृष्टया मजबूत झाली आहे यात काहीच वाद नाही.एकेकाळची ‘चिवडा’पार्टी आता ‘बिर्याणी’पार्टी झाली असल्याचा टोला त्यांनी हाणला.
येत्या २५ जून रोजी भाजप देशभरात आणिबाणिच्या विरोधातील काळा दिवस साजरा करणार अाहे,आणिबाणिच्या काळात तुरुंगात गेलेल्या सेनानींचा तसेच ते हयात नसतील तर त्यांच्या कुटूंबियांचा सत्कार करणार अाहे,यावर लक्ष वेधलेअसता,भाजपने स्वातंत्र्य सेनानींची व्याख्याच बदलली असल्याचा टिका नाना यांनी केली.
काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष पद आणखी योग्य व्यक्तीकडे द्यायला हवे होते,अशी खासगीत काँग्रेसचे कार्यकर्ते चर्चा करतात,यावर प्रश्‍न केला असता,सपकाळ यांना अवघे सहा महिने झाले आहे पद स्वीकारुन,त्यांना आणखी अवधी द्यायला हवा,ते संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहे,त्यांच्या प्रयत्नात विघ्न येऊ नये याची काळजी काँग्रेस कार्यकर्त्यानी घ्यावी,असे आवाहन पटोले यांनी केले.
अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातावर बोलताना,एकेकाळी नागरी उड्ाण मंत्री असताना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ज्यांच्यावर भाजपने सातत्याने केले,ज्यांनी एअर इंडिया ही सरकारी हवाईसेवाच बुडवली तेच आता भाजपसोबत सत्तेत असून, मांडीला मांडी लावून बसले असल्याचा टोला पटोले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार व ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांचे नाव न घेता हाणला.एअर इंडिया ही सरकारी विमानसेवा त्यांच्याच कृपेने खासगी कंपनीच्या हातात गेल्याचे ते म्हणाले.
विधान सभेत नाशिकच्या ज्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या विरुद्ध हातात छायाचित्रे घेऊन ते दाऊदचा हस्तक सलीम कुत्तासोबत नाच करीत असल्याचे दाखवले गेले,गृहमंत्र्यांनी ज्याच्यावर अधिवेशनात चांगलेच तोंडसुख घेतले तेच आता गृहमंत्र्यांचे व भाजपवासी झालेत,असा सुधाकर बडगुजर यांचे नाव न घेता पटोले यांनी भाजपच्या या कृतीवर चिमटा काढला.
मोदींनी पहलगाम घटनेची जबाबदारी स्वीकारायला हवी होती असे सांगून मुंबईत २६/११ घडले त्यावेळी मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तातडीने राजीनामा दिला होता.मोदींनी तर मुंबईत घटनास्थळी जाऊन पत्रकार परिषद घेऊन आमच्या सरकाच्या नाकर्तेपणावर भाषण ठोकले होते,तेच आता पहलगाम घटनेवर गप्प असल्याची टिका पटोले यांनी केली.आता त्यांना पहलगाम आतंकवादी हल्ला ‘अपघात‘वाटतो.
पंतप्रधानाचे काम आता रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्याचे राहीले आहे,असा टोला त्यांनी हाणला.
राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्ती लादली जात आहे का?असा प्रश्‍न केला असता,मुद्दा भाषेचा नाही तर ही राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील ‘मॅच फिक्सिंगचा’ आहे,असे ते म्हणाले.मुंबईतील सेवेन स्टार हॉटेलमध्ये ते राज ठाकरेंसोबत बैठक घेतात,याविषयी सूचकरित्या माध्यमांना माहिती पुरवली जाते.महाराष्ट्राच्या मूळ प्रश्‍नावरुन जनतेचे लक्ष भरकटवलं जात आहे,आता हिंदी विरुद्ध मराठीचे भांडण लाऊन मुंबई दर पावसळ्यात पाण्यात का तुंबते,बरोजगारीचा प्रश्‍न,शेतक-यांच्या ,महागाईच्या प्रश्‍नांवरुन जनतेचे लक्ष विचलित करण्याचा डाव साधला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.भाषेचा वाद घालून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा घाट घालण्यात आल्याचे ते म्हणाले.एकीकडे ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातील सरकारी शाळांची दयनीय अवस्था आहे.अनेक शाळांमध्ये वर्ग खोल्या नाहीत.विद्यार्थी झाडांखाली व गाईच्या गोठ्यात बसून शिक्षण घेताना आढळतात.गरिबांच्या मुलांना शिक्षण दुरापस्त झाले आहे.ग्रामीण भागात चांगले रस्ते देखील नाही मात्र,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे ८० वर्ष नागपूरचे सिमेंट-काँक्रिटचे रस्ते चालतील असा दावा करताना दिसून पडतात.गडकरी यांचे रस्ते १२ महिने देखील चांगल्या अवस्थेत राहत नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
नागपूरात विमानतळाजवळील अनेक इमारतींच्या उंचीकडे लक्ष वेधले असता,त्या धोकादायक असून नागपूरात किती उंचीच्या इमारती बांधल्या जायला हव्यात,त्याचे जनतेवर,पर्यावरणावर काय परिणाम होतील,याचा अभ्यास झाला पाहिजे,असे ते म्हणाले.
भंडारामध्ये सहकारी दूध संघाच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पटोले यांच्यासोबत युती करुन निवडणूकीत बाजी मारली,यावर प्रश्‍न केला असता्गों प्रफूल्ल पटेल यांच्या गोंदियाचा संघ आधीच बंद झाला आहे,तीच स्थिती भंडाराच्या दूध संघाची आम्हाला करायची नव्हती त्यामुळे भोंडेकर यांच्यासोबत युती करुन आम्ही दूध संघ वाचवला असल्याचे पटोले म्हणाले.‘भोंडेकर हे आमचेच आहेत‘असे सूचक विधान देखील याप्रसंगी त्यांनी केले.
ॲड.सतीश उके यांच्यावरील ईडीची कारवाई व गेल्या तीन वर्षांपासून त्यांना जामीन देखील मिळाला नाही,राज्याच्या पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात ते पटोले यांचे वकील होते.याशिवाय पटोले यांनी गडकरी यांच्या निवडणूकीला देखील न्यायालयात आव्हान दिले होते.ॲड.उके यांना ३१ मार्च २०२२ रोजी पहाटे पाच वाजता ईडीने अटक केली होती.तेव्हा पासून ते मुंबईच्या तुरुंगात आहेत,त्यांना जामीन देखील मिळाला नाही,यावर प्रश्‍न केला असता,ज्या पद्धतीने ईडीने त्यांना अटक केली,अनेक खोट्या केसेसमध्ये त्यांना तुरुंगात डांबून ठेवले आहे,तो उके यांच्यावर अन्याय आहे,असे ते म्हणाले.फोन टॅपिंग प्रकरण अद्याप सुरु आहे,आम्ही तो मुद्दा सोडलेला नाही,अशी पुश्‍ती त्यांनी जोडली.राज्याच्या पोलिस महासंचालक असलेल्या रश्‍मी शुक्लांची तब्येत खराब असतानाही त्यांना पदावर ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा अट्टहास हा त्यांच्या ‘पाशवी’बहूमताची साक्ष देत असल्याचा आरोप त्यांनी केला.या सरकारला माज आला असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो sattadheesh official या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे)
……………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या