मुख्यमंत्र्यांच्या नागपूर शहरात व गृहखाते ज्यांच्या हातात आहे त्यांच्या पोलिस विभागाच्या निष्क्रियतेवर आता संताप व्यक्त केला जात आहे.पोलिसांकडून या सात ही विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार करुन देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदार संघातील बजाज नगर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केली नाही. २०२२ पासून पोलिसांनी एका विद्यार्थिनीची सात परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या विरोधात इतकी गंभीर तक्रार प्राप्त होऊन देखील तिच्या मृत्यूची वाट पाहिली! यशश्रीच्या आत्महत्येनंतर आता आरोपींविरुद्ध १०८ ची कलम जोडण्यात आली मात्र, अद्यापही त्या सात ही आरोपींना त्यांच्या राज्यात जाऊन अटक करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नसल्याची धक्कादायक माहिती मृतक यशश्रीची आई सुषमा शेंडे देतात!२०२२ मध्येच पोलिसांनी व महाविद्यालय प्रशासनाने यशश्रीच्या या आत्मसन्मानाच्या लढ्यात कायदेशीर साथ दिली असती, तर कदाचित यशश्री या वर्षी पदवी घेऊन देशसेवेसाठी तत्पर झाली असती,अशी वेदना सुषमा व्यक्त करतात. शासन,प्रशासन व पोलिस विभाग यांच्या निष्क्रिय व असंवेदनशील धोरणामुळे माझ्या अतिशय हूशार व स्वाभिमानी मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्या करतात.
यशश्रीला तिचे कुटूंबिय नेहमी बलात्कार पिडीतांना मिळालेला न्याय याचे दाखले देत,लढण्याची प्रेरणा देत होते मात्र,यशश्रीच्या उज्जवल भविष्यावर घृणित कुठाराघात करणारे एक -दोन नव्हे तर सात बिहारी विद्यार्थी होते जे तिला महाविद्यालयात सातत्याने बलात्कार करण्याची धमकी देत होते,यशश्री ही नेहमी आपल्या कुटूंबियांना ते ‘सात’ जण असल्यामुळे मी अन्यायाच्या या लढ्यात ‘कमजोर’ असल्याचे सांगत राहीली.यावरुन ती मानसिकरित्या किती खचली होती याचा प्रत्यय येतो.महत्वाचे म्हणजे त्या सात विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून तिने २०२२ साली तृतीय वर्षात एक वर्षाचा ड्रॉप देखील घेतला होता जेणेकरुन ते विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयातून निघून जातील मात्र,दूर्देवाने मुख्य आरोपीने आपले काही पेपर बॅक ठेवले होते.उर्वरित सहा आरोपी विद्यार्थी पदवी प्राप्त करुन परराज्यात शासकीय नोकरीत लागले.परिणामी,अग्निशमन अधिकारी होण्याचे व देशसेवा करण्याचे यशश्रीचे स्वप्न भंगले व ती निराशेच्या खोल गर्तेत सामावली.
नागपुरातील खामला, देवनगर जवळील नेहरू नगर येथील, २२ वर्षीय यशश्री शेंडे ही राजनगर येथे राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिने बारावी बोर्ड परीक्षेत जेईई उत्तीर्ण झाल्यानंतर भारत सरकारच्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालयात २०२० मध्ये प्रवेश घेतला होता. परंतु सरकारच्या नियमानुसार तिला वस्तीगृहात राहणं आवश्यक होते. म्हणून यशश्री वसतीगृहात राहून शिकत होती. सरकारचा हा जाचक नियम देखील यशश्रीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला! या महाविद्यालयात बिहार व उत्तर प्रदेशातील मुलेही शिकत होते.
यशश्रीची योग्यता व बुद्धीमत्ता बघता त्यातील ७ विद्यार्थ्यांनी यशश्रीला त्रास देणे सुरू केले पण यशश्रीने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्रास वाढू लागल्याने यशश्रीने महाविद्यालयातील तत्कालीन प्राचार्य राजेश चौधरी यांच्याकडे या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात १२ मार्च २०२२ रोजी तक्रार नोंदविली होती. परंतु ,प्राचार्याने लक्ष दिले नाही व त्या सातही विद्यार्थ्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे धाडस वाढले.त्याचवेळी प्राचार्य राजेश चौधरी यांनी आरोपी विद्यार्थ्यांवर कारवाई केली असती तर आज यशश्री जगात असतील,असा टाहो यशश्रीच्या आई फोडतात.

हिंदी भाषिक महाविद्यालयातील प्राचार्य व बिहार व उत्तर प्रदेशातील श्रीमंत बापाची अवलाद यांच्यामुळे माझी इतकी गुणी मुलगी आज जगात नाही,अशी वेदना त्या मांडतात.माझ्या मुलीला त्या सात दिवट्यांचा त्रास देणे सुरूच होते. उलट तुझा बलात्कार करु, खून करु, अशा प्रकारच्या धमक्या तिला दिला जात होत्या. तिचे मनोबल खचले परंतू तरी देखील त्या सात विद्यार्थ्यांच्या विरोधात १७ मे २०२२ रोजी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार तिने नोंदवली. ( FIR क्र. 0112 ) पोलिसांनी एवढ्या गंभीर तक्रारीवर कारवाई करीत आरोपींवर ३५४,३५४(ए) आणि ३४ कलमातंर्गत कारवाई करुन कोर्टात केस दाखल केली मात्र,महाविद्यालयकडून कोणतीही कारवाई झाली नाही.त्यानंतर देखील तिला त्रास देणे सुरुच होते.दूसरी पण मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार केली की तिच्या विषयी अतिशय घाणेरडे शब्द नोंदवहीत लिहले जात आहेत,त्यावेळी देखील चौधरी हेच प्राचार्य पदी होते पण,त्यांनी या तक्रारीबाबत देखील कोणतीही कारवाई केली नाही.
सरकारने देखील तातडीने प्राचार्याला शिक्षा करण्या ऐवजी त्यांची बदली करुन कर्तव्याची इतिश्री मानली.यशश्री हिने पुन्हा मानकापूर पोलीस ठाण्यात ३० सप्टेंबर २०२२ रोजी तक्रार नोंदविली होती,हे विशेष!
तक्रार केल्यामुळे यशश्रीचा मानसिक छळ व तिच्याशी गैरवर्तन परोकाटीचे वाढले,महाविद्याल्याच्या प्रवेश द्वारावर नोंदवहीत लिहल्या जाणा-या तिच्या नावासमोर अतिशय अश्लील व घृणित वाक्ये ते सात नराधम स्वत:चे नाव न लिहता लिहित होते.इतकंच नव्हे तर यशश्रीवर बलात्कारही करण्याचा प्रयत्न झाला पण यशश्री ही खूप धाडसी होती. गुन्हेगारांना तिने त्यांच्या घृणित कृत्यात यशस्वी होऊ दिले नाही.
मात्र,२०२५ उजाडले तरी तिला ना सरकार ना पोलिसांकडून न्याय मिळाला. त्या मुलांच्या नावे ’आता करुन घ्या तुम्हाला काय करायचं आहे ते!’हे शीर्षक टाकून तिने म्हणून तिने ७ एप्रिल २०२५ रोजी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. दूपारी पावणे चार वाजता तिचा फोन सुरु होता मात्र,सायंकाळी ६ वाजता तिच्या कुटूंबियांना ती पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसली!जिच्या नावातच ’विजय ‘होता ‘यश’हाेते,ती सरकार व प्रशासन नावाच्या मुर्दाड व्यवस्थेला बळी गेली!
आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तिच्या सोबत जो अन्याय, अत्याचार झाला त्यांच्या विरोधात तिने ठामपणे लिहून ठेवले त्यामध्ये वीरेंद्र सिंग तू माझ्यासोबत फार चुकीचा वागला,तू हे चांगलं केलं नाहीस,असे लिहून,अभिषेक कुमार, अनुराग सिंग, अनुज सिंह, शशांक शेखर, हर्ष लोचक आणि शशांक पांडे यांच्या त्रासाला कंटाळून जिवनाचा शेवट करत असल्याचे यशश्रीने चिठ्ठीत नमूद केले! या प्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असला तरी, आजपर्यंत आरोपींना परराज्यातून पकडून आणण्यासाठी एक महिना लोटला तरी मुख्यमंत्र्यांची पोलिस गेली नाही!
(छायाचित्र : यशश्रीची आत्महत्या करण्यापूर्वीची चिठ्ठी,यात शिक्षणाच्या आड माणूसकीला काळीमा फासणा-या सात ही आरोपींची नावे उघडपणे तिने लिहली आहे!)
बजाजनगर पोलीसांनी गांभीर्याने या प्रकरणात लक्ष वेधून कठोर कारवाई करावी. अशी मागणी सुषमा शेंडे व एकुलता एक भाऊ सुयश शेंडे यांनी पत्रपरिषदेत केली आहे.
थोडक्यात, शासनाच्या प्रत्येक विभागातच नव्हे तर खासगी आस्थापनेत देखील विशाखा समिती असावी असा सज्जड दमच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिला आहे.अग्निशमन महाविद्यालयात या समितीचे अस्तित्व आहे का?तसेच या राज्यातील महिला आयोग हा एखाद्या सरकारी आस्थापनेसारखा असंवेदनशील झाला असून, राष्ट्रवादी अजित पवार गटापुरती सीमित झाला आहे का?हा सवाल पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत विचारला जात आहे….!नसल्यास यशश्री या विद्यार्थिनीला किमान मृत्यूनंतर तरी न्याय मिळण्यास राज्य महिला आयोगाने पुढाकार घेण्याची मागणी केली जात आहे.
यशश्रीचे कुटूंबिय हे अतिशय साधे सरळ असून मनसेचे परप्रांतीय विरोधातले धोरण त्यांना माहिती नव्हते किवा राज्यात महिलांच्या हक्कांच्या व जिवितेच्या संरक्षणासाठी असा कोणता आयोग असतो,हे देखील त्यांच्या खिजगणतीत नव्हते.ते पूर्णपणे पोलिसांवर न्यायासाठी अवलंबून होते आणि त्याचे मोल त्यांनी आपली अतिशय गुणवान,विद्वान,कर्तृत्ववान मुलीला कायमचे गमावून चुकवले!
…………………….
[+91 77750 72954 सुयश शेंडे…मृतक यशश्रीचा भाऊ यांचा संपर्क क्रमांक]