फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममुख्यमंंत्र्यांच्या शहरात भूमाफियांची दहशत!

मुख्यमंंत्र्यांच्या शहरात भूमाफियांची दहशत!

Advertisements
दिलीप ग्वालबंशीने हडपडली ऐंशी कोटींची जमीन!

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला पोलिसांनी दाखवली केराची टोपली
आरोपींकडून फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी
आरोपींच्या पाठीशी काँग्रेसचा आमदार: गायकवाड कुटूंबियांचा धक्कादायक आरोप
१ नोव्हेंबर पासून संविधान चौकात करणार आमरण उपोषण
नागपूर,ता.२८ नोव्हेंबर २०२५: प्रमिला किशोर गायकवाड यांची वडीलोपार्जित शेतजमीन मौजा गोरेवाडा येथे असून त्याची अंदाजे किंमत सत्तर ते ऐंशी कोटी रुपये आहे.नागपूरातील कुख्यात भूमाफिया दिलीप ग्वालबंशी व नेताजी को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे दिपक विठ्ठलप्रसाद दुबे व रश्‍मी जोशी यांनी सरकारी कर्मचा-यांसोबत संगममत करुन त्या जमीनीवर अवैध प्लॉट पाडून जमीन विकली.या विरोधात मानकापूर पोलिस  ठाण्यात फियार्दी यांची तक्रार दाखल झाली..ग्वालबंशी याला अटक देखील झाली मात्र,अवघ्या पंधरा दिवसात जामीनावर बाहेर आल्यावर गुन्हेगार पार्श्वभूमीच्या भूमाफियाने गायकवाड कुटूंबियांना धमकावण्यास सुरु केल्याने, गायकवाड कुटूंबियांचा आता पोलिस,प्रशासकीय अधिकारी व सरकार यांच्यावरील विश्‍वास पार उडाला असून, न्यायासाठी येत्या १ नोव्हेंबर पासून संविधान चौकात ते आमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती गायकवाड कुटूंबियांनी आज प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी बोलताना राम सोळंखे म्हणाले की,भूमाफिया दिलीप ग्वालबंशी यांच्या गैरकृत्याविषयी गायकवाड कुटूंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील १३ ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदन दिले होते.विषयाचे गांर्भीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी निवेदनावर लाल पेनने सूचना लिहून उचित कारवाई करण्याचे आदेश दिले.ते निवेदन पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्याकडे पाठवण्यात आले.मात्र,दोन आठवडे होऊन देखील आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने, गायकवाड कुटूंबियांनी सिंघल यांची भेट घेऊन चौकशी केली असता त्यांनी ते निवेदन झोन-४ कडे पाठवले असल्याचे उत्तर दिले.मूळात ही झोनस्तरावरील बाब नसतानाही पोलिस आयुक्तांनी इतक्या गंभीर आरोपाचे निवेदन झोनस्तरावर पाठवले कसे?असा प्रश्‍न त्यांनी केला.

(छायाचित्र: पत्रकार परिषदेत माहिती देताना गायकवाड कुटूंबिय)

आवक-जावक टेबलावरील पोलिस कर्मचा-यालाही स्वत:राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनिशी पाठविण्यात आलेल्या निवेदनावर काय कारवाई झाली?असा प्रश्‍न केला असता,मुख्यमंत्र्यांच्या सहीनिशी आमच्याकडे दररोज शंभर निवेदन येतात,असे असंवेदनशील उत्तर पोलिस कर्मचा-याने दिले,असे सोळंखे यांनी सांगितले.निवेदनातील विषय तरी वाचला का?असा प्रश्‍न देखील त्यांनी पोलिस कर्मचा-याला केला.निवेदनात आम्ही एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आहे,अशी माहिती त्यांनी पोलिस कर्मचा-याला दिली.मात्र,पोलिस प्रशासन सामान्य नागरिकांप्रती असलेले आपले संवैधानिक कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री असलेले फडणवीस यांच्याच  शहरात सामान्य नागरिकांना,पिडीतांना त्यांचा गृहविभाग न्याय देत नसेल तर,इतर शहरात काय घडत असेल,असा सरळ प्रश्‍न ते करतात.दिलीप ग्वालबंशी हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर ३३-३४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.माझे कोणीही काहीही बिघडवू शकत नाही,अशी उघड धमकी देणारा गुन्हेगार आमचेही मुडदे तो सहज पाडू शकतो,त्याच्या हाताने मरण्यापेक्षा आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर संविधान चौकात आमरण उपोषण करुन मरु,असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महत्वाचे म्हणजे आमचा भूखंड अवैधरित्या लाटणारे आरोपी नेताजी को-ऑपरेटीव्हचे दिपक दुबे व रश्‍मी जोशी यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेने फक्त ४२० ची कलम लाऊन कागदाेपत्री कारवाई केली तसेच त्यांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन देखील मिळाला. त्यांच्यावर कठोर कलमे लावली असती तर आरोपी आज तुरुंगात असते,असे ते म्हणाले.न्यायासाठी आम्ही पोलिस आयुक्तांपासून तर पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,आर्थिक गुन्हे शाखा सर्वांकडे निवेदन सोपवले.मात्र,निवेदन स्वीकारण्या पलीकडे कोणीही दखल घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्याच शहरात न्याय मागूनही मिळत नाही म्हणूनच १ नोव्हेंबर पासून आम्ही अन्नत्याग उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
७० ते ८० कोटींची गोरेवाडा येथील जमीन एक भूमाफिया हडपतो.पोलिस प्रशासन व सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा आमच्यासारख्या पिडीतांसमोर मरणाशिवाय दूसरा पर्याय उरत नसल्याची खंत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केली.
ग्वालबंशी याने २००४ मध्ये खोटे दस्तावेज तयार करुन खोटा शंकर श्रावण जाधव नावाचा माणूस उभा करुन आमची जमीन स्वत:च्या नावावर केली.२०१७ मध्ये त्याला न्यायालयाने तुरुंगात धाडले.तेव्हापासून जामीनावर आरोपी तुरुंगा बाहेर आहे.या संदर्भात २०२५ मध्ये त्याच्या विरोधात आम्ही मानकापूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली.काँग्रेसचा एक आमदार,एका अनोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेची अध्यक्षा व ग्वालबंशी यांचा पुतण्या आरोपीसाठी स्वत:पोलिस आयुक्तांना व एसीपीला भेटले होते,असा गंभीर आरोप याप्रसंगी त्यांनी केला.
मुख्यमंत्र्याची पोलिस काँग्रेस आमदाराच्या दबावात काम करीत असल्याचा खळबळजनक आरोप याप्रसंगी गायकवाड कुटूंबियांनी केला.नेताजी को-ऑपरेटीव्हच्या नावाने १५२ सेल डीड झाल्या असून या सर्वांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.आमचा भूखंड अवैधरित्या हडपून,भ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांना हाताशी धरुन या सोसायटीने प्लॉट धारकांच्या रजिस्ट्री लावल्या,हा गंभीर गुन्हा नाही का?असा सवाल ते करतात.४२० कलम लावणे हीच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या कर्तव्याची इतिश्री होती का?नेताजी को-ऑपरेटीव्ह सोसायटी,दूबे व जोशी विरोधात मानकापूर पोलिस ठाण्यात एकूण ७ तक्रारी दाखल आहेत, एका ही प्रकरणात त्यांना पोलिसांनी अटक केली नाही,त्यांना न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा केला,असा आरोप गायकवाड कुटूंबियांनी केला.
नेताजी को-ऑपरेटीव्ह सोसायटी,दिपक दुबे व रश्‍मी जोशीच्या नावे भूखंड नसताना नागपूर सुधार प्रन्यास व इतर प्रशासकीय विभागाच्या भ्रष्ट अधिका-यांनी आमच्या भूखंडवर ले-आऊट्स पाडून प्लॉट्स विकण्याची मंजूरी कोणत्या नियमात दिली?असा प्रश्‍न त्यांनी केला.१६९ प्लॉट्सची विक्री कुठलेही शासकीय कागदपत्रांवर नाव नसताना झाली.यावर कहर म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने(ई.ओ.डब्ल्यू)च्या चौकशीत त्यांच्यावर फक्त ४२० चा गुन्हा दाखल होतो व प्रकरण मानकापूर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात येते!याच मानकापूर पोलिस ठाण्यात आधीच सात एफआयआर सोसायटी, दुबे व जोशीविरुद्ध दाखल असतानाही त्यांना कधीही अटक झालीच नाही!याला गृहमंत्र्यांच्या’कायद्याचे’ शहर म्हणू शकतो का?असा सवाल ते करतात.
परिणामी,या संर्पूण प्रकरणात पोलिस विभाग,नासुप्र,एन.ए विभाग तसेच सिटी सर्व्हे विभागाच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीच्या मागणीसाठी तसेच गुन्हेगारांना अटक होत नसल्याने व आमच्या जीवाला भीती असल्यानेच आम्ही येत्या १ नोव्हेंबर पासून संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकार परिषदेत गायकवाड कुटूंबियांनी दिला.
पत्रकार परिषदेत राम सोळंखे,मंगेश गायकवाड,प्रमिला गायकवाड,सुशीला गायकवाड,रमेश जाधव आदी उपस्थित होते.
…………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या