

महाराष्ट्राने एक कृतिशील विचारवंत व बहुआयामी व्यक्तीमत्व गमावले
समाजासाठी भरीव योगदान देणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व
मुंबई, दि. २७:– साहित्यातून, पत्रकारितेतून सामाजिक कार्याचा डोंगर उभा करता येतो, याचे आदर्श उदाहरण ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी घालून दिले. सेवाव्रत सामाजिक कार्यकर्ता, मनस्वी साहित्यिक आणि हाडाचा पत्रकार अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे आपल्यातून निघून जाणे क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. अवचट यांनी मराठी पत्रकारिता आणि साहित्यिक प्रवासात आपल्या अनोख्या लेखनशैलीची महत्वपूर्ण अशी भर घातली. त्याचबरोबरीने त्यांनी सामाजिक कार्य आणि सामाजिक चळवळीतही हिरीरीने सहभाग घेतला. व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी संस्थात्मक आणि भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचे चौफेर लेखन आणि साहित्यकृती, सामाजिक कार्य हे पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आहे. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल.
ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक कृतिशील विचारवंत व बहुआयामी व्यक्तीमत्व गमावले आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
आपल्या शोकसंदेशात पटोले म्हणाले की, मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून अनिल अवचट यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. हजारो लोकांना त्यांनी मुक्तांगणच्या माध्यमातून व्यसनमुक्त केले. केवळ साहित्य विश्वताच नाही तर समाजातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. अवचट हे पत्रकार, लेखक, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत असे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. अनिल अवचट यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी त्यांनी विपुल लिखाण केले. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. आपली पत्रकारीता त्यांनी गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली.
डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी झाली आहे. डॉ. अवचट यांना श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अवचट कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
