फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमी विझल्यावर त्या राखेवर....

मी विझल्यावर त्या राखेवर….

Advertisements


इतवारी,अत्तर दूकानातील त्या दुर्घटनेतून काय घेणार धडा?

‘सत्ताधीश’ऑन द स्पॉट:(भाग-१)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.९ ऑगस्ट २०२४: सुप्रद्धि कवि बा.भो.बोरकर यांची एक कविता आहे.‘मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे,विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे,मी विझल्यावर….!या कवितेची आठवण होण्याचे कारण बुधवार ७ ऑगस्ट रोजी इतवारीतील अत्यंत दाटीवाटीच्या खापरे मोहल्ला भागातील तीन मजली इमारतीमधील अत्तराच्या दूकानाला लागलेली आग.त्यात अवघ्या १७ वर्षीय अनुष्का बाकडे हिचा झालेला दूर्देवी मृत्यू,१५ वर्षीय तिचा भाऊ हा गच्चीवर धावल्यामुळे सुदैवाने बचावला मात्र,वडील व त्या घराचे मालक प्रवीण बाकडे व आई प्रिती बाकडे हे अद्याप मेडीकल रुग्णालयात असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे तेथील डॉक्टर्स सांगतात.काळाकुट्ट धूर अर्थात मोठ्या प्रमाणात कार्बन फूफ्फूसामध्ये जमा झाल्यामुळे बेशुद्धावस्थेतून बाहेर येण्यास वेळ लागणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.१५ वर्षीय मुलगा याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्यातील पीआय संदीप बुवा यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना दिली,तो अद्याप जबरदस्त मानसिक धक्क्यात असल्याचे ते सांगतात.एक हसते-खेळते कुटूंब रात्रीच्या काळोखात अचानक गडद काळ्या धूरामध्ये अडकतात,सैरभैर होतात,संपूर्ण घरात अंधार झालेला,फक्त धुराचेच साम्राज्य,कुठे दार आहे,कुठे गॅलरी आहे,कुठे गच्ची आहे,कुठे पळावे,काहीच सूचले नाही,पती-पत्नी गॅलरीत आले मात्र,प्रवीण यांना गॅलरीतून तर प्रिती यांना गॅलरी व खोलीच्या मधल्या दारतून बेशुद्धावस्थेत अग्निशमन विभागाच्या जवानांनी रेस्क्यू केले.गडद अंधारलेल्या,धूराने भरलेल्या घरात अनुष्का कुठेही दिसली नाही.अखेर स्नानगृहाचे दार तोडल्यानंतर अनुष्कालाही रेसक्यू करुन बाहेर आणण्यात आले पण?

‘सत्ताधीश‘ने आज ऑन द स्पॉट या दूर्घटनास्थळी भेट दिली असता,त्या इमारतीला लागून असणा-या सर्व दूकानांमध्ये नेहमीचाच व्यवहार तसाच सुरु होता.पती-पत्नीची प्रकृती आता कशी आहे?अशी विचारणा त्या दूकानदारांना केली असता,आम्हाला काहीच माहिती नाही,कोणाला इतका वेळ आहे!असे उत्तर मिळाले.बा.भो.बोरकर म्हणाले तसे ‘मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरितीप्रमाणे,विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे,मी विझल्यावर….!एक सुखी कुटूंब एका रात्रीत एवढ्या भीषण दूर्घटनेला सामोरे गेले,एक तरुणी जिचे आयुष्य ख-या अर्थाने सुरु ही झाले नव्हते,ती जग सोडून निघून गेली होती,किती तरी वर्षे ती त्या व्यवहारिक लोकांच्या नजरेसमोरुन घराची ती माडी चढली होती,खांद्यावर कायमची निघून गेली,एक अवघ्या १५ वर्षाचा मूलगा जो मानसिक धक्क्यातून माहीती नाही कधी सावरेल,कसा सावरेल,बाकडे पती-पत्नी जे अद्याप जीवन-मृत्यूसोबत लढा देत आहेत तरी देखील आज त्या इमारतीलाच लागून असणा-या इमारतीतील शेजा-यांमध्ये सामान्य जीवन सुरु होते,इमारत परिसरातील सर्व दूकानांमधील सर्व ‘भौतिक‘व्यवहार ही तितकाच सामान्य होता,एक व्यक्ती मात्र अस्वस्थ होता तो म्हणजे ज्याचे अत्तराचे दूकान होते ते प्रशांत शहा.. जळून खाक झालेल्या मालामध्ये काही उरले आहे का?याचा शोध घेतल्या जात होता,उरला सुरला माल श्‍मशान झालेल्या इमारतीच्या फाटकाच्या आत टाकून फाटकाला कुलूप लावण्याची सूचना आपल्या कर्मचा-याला केली जात होती..त्या फाटकाच्या आत आता काहीच नव्हते शिवाय काळवंडलेल्या भिंतीशिवाय,भग्न झालेल्या त्या इमारतीमधून आज ही उग्र धूराचा दर्प जाणवत होता,सर्वत्र पाण्याचा मारा केल्याने जळालेल्या वस्तूंचा चिखल झाला होता…आगीने त्या तीन मजली इमारतीचा पायवाच जणू कायमचा हलवला होता.

बाकडे यांची ही पुश्‍तेनी इमारत.अत्तराची दूकान वीस लाखाला शहा यांना विकून त्यांनी इमारतीच्या पॅसेजमध्ये स्वत:ची खेळ्ण्याची दूकान थाटली होती असे तेथील रहीवासी सांगतात..पहील्या मजल्यावर चपलांचे तसेच ज्यूटच्या पिशव्यांचे गोदाम होते.दूस-या मजल्यावर बाकडे कुटूंबिय राहात होते तर तिस-या माळ्यावर फक्त एक खोली बांधून ठेवली होती.पहाटे अत्तरच्या दूकानातील मीटरला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.गाढ झोपेत असणा-या बाकडे कुटूंबियांना कळलेच नाही दूस-या मजल्यावरील गोदाम कधी जळून खाक झाले, कधी तिस-या मजला ही धूराने कवेत घेतले,बोहरा समाजातील एका व्यक्तीने पहाटे साढे चार वाजता नमाजसाठी उठले असता,इमारतीतून प्रचंड धूर निघत असल्याचे बघितले आणि एकच हल्लकळोल माजला.बाकडे दाम्पत्य काळ्याकुट्ट धूरातून वाट शोधित गॅलरीत आले मात्र,लोकांच्या आरडाओरडीतून आणखीनच घाबरले,मुलगी अनुष्का ही देखील गॅलरीत आली असल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.तिला ही पुढच्या भागाला खूप धूर आहे तू मागे जा,असं म्हणून लोक ओरडले,ती परत अंधारात ,धूरात घराच्या आत गेली,कोनाडा शोधला,अखेर स्नानगृहाचे दार तिला सापडले,स्नानगृहाच्या आत धूर येणार नाही,असा भाबडा समज तिचा झाला अन्..इथेच घात झाला….!

यानंतर सुरु झाली अग्निशमन जवानांची कसरत.एवढ्या दाटीवाटीच्या गल्लीतून अग्निशमन दलाचे वाहन जाणे अशक्यप्राय होते.मुख्य रस्त्यावरच अग्निशमनच्या सात गाड्या थांबवण्यात आल्या कारण आत संर्कीण गल्ली बोळ्यात अग्निशमनच्या गाड्या जाऊच शकत नव्हत्या. अग्निशमन विभागाला आधी लोकेशन शोधायलाच वेळ लागला.मग,पाईपला पाईप भराभर जोडल्या जाऊ लागले.५०० फूटांच्या अंतरापासून जोडलेल्या त्या पाईपमधून पाण्याचा मारा अग्निशमनचे जवान करु लागले.सुरवातीला इमारतीच्या खालच्या भागातील आग आटोक्यात आणल्या गेली. मग शिडीच्या सहाय्याने दूस-या मजल्यावरील माणसांकडे जवानांनी धाव घेतली.बशुद्धावस्थेत त्यांना खाली आणण्यात आले.

या घटनेने या भागात घडलेल्या जुन्या अनेक घटनांना उजाळा दिला.इतवारीच्या दाटीवाटीच्या गल्लीबोळ्यातील अनेक दूकानांमध्येही या पूर्वी देखील आगीच्या घटना घडल्या आहेत,त्यातून प्रशासनाने काय बोध घेतला?असा सवाल आता विचारला जात आहे.

९ डिसेंबर २०१३ रोजी इतवारीतील जागनाथ बुधवारी भागात केमिकल गोदामाला आग लागली होती.मस्कासाथ,भारतामाता चौक,इतवारी,गांधीबागसारख्या रहीवाशी भागात केमिकलसारखे ज्वलनशील पदार्थ तसेच प्लास्टिक मटेरियलचे गोदाम हे तेथील रहीवासी व दूकानदार कसे ‘बारुद के ढेर पर’आयुष्य कंठत आहेत,याचे ज्वलंत उदाहरण ठरले होते.यानंतर चौकशी अहवालात त्या भागातील ३४ गॅस गाेदामांकडे ना-हरकत प्रमाणपत्रच नव्हते हे वास्तव समोर आले होते.या पूर्वी ५ डिसेंबर २०१३ रोजी १४६ कोटींच्या घोटाळ्यात चर्चेत आलेली नागपूर जिल्हा सहकारी बॅंक(एन.डी.सी.सी) व त्यासोबत दिपक एजंसीच्या फोमच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली.या भागातील इमारतींमध्ये कोणतीही सुरक्षेची उपकरणेच आढळली नाही.गांधी बाग झोनच्या अधिका-यांनी आर्थिक लाभातून ‘धृतराष्ट्राची‘भूमिका स्वीकारल्यामुळे आज ही इतवारी भागातील देवघर मोहल्ला,खापरे मोहल्ला,लोहा ओली,बोहरा मस्जिद गल्ली,बांगडे मोहल्ला,कसारपुरा,लाल इमली गली,भिसीकर मोहल्ला,जलालपुरा,गुड ओली,रेशम ओली,निकालस मंदिर,नमकगंज,धारस्कर रोड,लालगंज,नाईक गल्ली,भाजीमंडी,बुधवारी,जुना भंडारा रोड इत्यादी भाग ‘बारुद के ढेर पर‘च असलेला आढळतो.

अत्यंत दाटीवाटीच्या या गल्ल्यांमध्ये कॉस्मेटिक,ऑईल पेंट्स,फरनेस ऑईल,बुट चपलांची दूकाने,प्लास्टिक,खेळणे,टेड्डी बिअर खेळण्यांची अगणिक दूकाने,किराणा,इलेक्ट्रानिक वस्तू,रेडिमेड कापड,रबर फोमची गोदामे असलेली आढळतात.२०१७ मध्ये या भागातील २,३०० बहूमजली इमारती असेच ९० इमारती या धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या मात्र,कोणतीही कारवाई झाली नाही.महत्वाचे म्हणजे अत्यंत दाटीवाटीच्या या गल्लीबोळ्यात एखाद्या दूकानाला आग लागल्यास तिथपर्यंत अग्निशमन दलाचे वाहनच पोहचू शकत नाही,याशिवाय एवढ्या मोठ्या बाजारपेठ परिसरात कोणत्याही दूकानांमध्ये तसेच इमारतींमधील दूकानांमध्येही अग्निविरोधक यंत्राचा कुठेही पत्ता नव्हता.असे काही यंत्र स्वत:च्या व इतरांच्या जिवितेच्या व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी अत्यावश्‍यक आहे,ही मानसिकताच येथील व्यापारी वर्गामध्ये आढळली नाही.

नागपूर मिहान परियोजनेनंतर ऑरेंज सिटीमध्ये रियल इस्टेटचा धंदा हा पराकाष्ठेला पोहोचलेला आढळून येतो.यावर कहर केला तो एकात्मिक सडक विकास योजनेने.शहराचे झालेले सौंदर्यीकरण व सिमेंट काँक्रिटचे रस्ते यामुळे नागपूर शहर देशपातळीवर विविध उद्योजकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले.कोट्यावधी रुपयांचा निवेश रिेटेल क्षेत्र,हॉटेल(पंचतारांकित)मल्टीफ्लैक्स यासोबतच टाऊनशिपमधील गुंतवणूकीला उद्योजकांनी प्राधान्य दिले.या मुळे वाढलेला व्यापार आणि जमीनीला आलेली सोन्याची किंमत नागपूर शहरालाही भोगून द्यावी लागली.इतवारी,गांधीबाग,मस्कासाथ,देवघर मोहल्ला इत्यादी संपूर्ण बाजार परिसर व्यापा-यांची पहीली पसंद बनले.फक्त दोनच दशकांपूर्वी मोजका व्यापार होणा-या क्षेत्रात आता ‘हाऊसफूल’चे फलक लावण्याची गरज निर्माण झाली आहे.मुख्य मार्गावरील दूकानांच्या जमीनीच्या किंमती या स्थिर असल्या तरी आतील गल्ली बोळ्यात आता लाखो रुपये प्रति वर्ग फूटाची किंमत पोहोचली आहे.यातूनच या परिसरातील सर्वच बाजार परिसरातील गल्ल्या या गायबझालेल्या आढळतात.अनेक व्यवसायिकांनी दूकांनांवर अनाधिकृत बांधकाम करीत मजले चढवले.व्यापार आणि रहीवाशी क्षेत्र हे एकाच ठिकाणी निर्माण झाल्याने ‘डेव्हलपमेंट कंट्रोल‘ नियमाची सर्रास धज्जीया या ठिकाणी उडालेली दिसून पडते.महाराष्ट्र रिजनल टाऊन प्लानिंग एक्ट १९६६ च्या कलम ५३(१),५४,५४(२)चे सर्रास उल्लंघन झाले असून, गांधी बाग झोन व मनपा आयुक्तांचा ‘मौन राग‘हा कोणालाची अस्वस्थ करीत नाही.चटई क्षेत्र सूचकांक,फ्लोर स्पेस इंडक्स(एफ.एस.आई)चे या बाजारपेठांमध्ये तर कोणी वालीच दिसून पडत नाही,इतके अनाधिकृत बांधकाम,अनाधिकृत बेसमेंट,अनाधिकृत पार्किंग,अनाधिकृत ओटे,शेड,अतिक्रमण आणि डिस्प्ले यांची भरमार मोकळ्या जागांवर झाली आहे.मायबाप धोरणकर्त्यांनी जुनी मंगळवारीच्या प्रकल्पाला ‘पायलट प्रोजेक्ट’ची उपमा दिली,या ठिकाणच्या दाटीवाटीच्या गल्ली बोळा हे या प्रकल्पातून मोठ्या होतील,मात्र,महात्मा गांधी व गांधी बाग वार्डातील दाटीवाटींच्या ‘जीवघेण्या’गल्ली बोळांचे काय?असा प्रश्‍न येथील रहीवाशी विचारतात.

(छायाचित्र : दोन वेळा आगीची घटना घडलेले इतवारीतील होलसेल क्लॉथ मार्केट)

बोहरा गल्लीत तर संक्रांतच्या दोन दिवसांपूर्वी वाणेचं सामान घेण्यासाठी इतकी गर्दी होते की महिलांचा श्‍वास देखील गुदमरतो.याच वर्षी जानेवरी महिन्यात तेथील एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना याची वर्दी दिली.पोलीस आयुक्तांनी साध्या वेषात पोलिककर्मी पाठवले.त्यांनी बाजारातील संर्कीण गल्लीत घुसून हळूहळू तेथील महिलांना बाहेर जाण्यास प्रवृत्त केले. त्या गल्लीतून बाहेर पडल्यानंतर अनेक महिलांना श्‍वास घेण्यास त्रास होत होता.दर वर्षी हाच नजारा त्या बाजारपेठेत असतो असे ते सामाजिक कार्यकर्ते सांगतात.माता-भगिनींना आवाहन आहे त्यांनी संक्रातीच्या दोन दिवस नव्हे तर आठ दिवस आधीपासून वाणाचे सामान येथून विकत घ्यावे मात्र,एकाच दिवशी गर्दी करु नये.सुवासिंनींचे लेणे हे कितीही पवित्र असले तरी,मुजोर आणि निष्काळजी प्रशासनला त्याची ‘किंमत’कळत नाही,अशी विनंती ते करतात.अनेक रहीवाशींनी ‘सिलिंग‘अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

याच दाटीवाटीच्या गल्लीत बी.ए.राऊत जनरल स्टोअर्स आहे ज्या दूकानात ८० कर्मचा-यांचा स्टाफ आहे!कोण करणार अग्निशमन यंत्रणेविषयी चौकशी?कोणाची जबाबदेही आहे?लोहा ओलीची देखील तिच गत आहे.याच भागात ‘आलिशान’चे मोठे शो रुम आहे.आकर्षक सजावट समोरील भागात असली तरी,अग्निशमन यंत्रणेची तपासणी कोणीही करीत नाही.हे शो रुम देखील मजल्यावर मजले असे आहे!कापड आणि आग यांचे सख्य अग्निशमन विभागाच्या हूशार अधिका-यांना सांगण्याची गरज आहे का?‘आलिशान’शो रुमच्या या गल्लीमध्ये देखील जगातील कोणतेही अग्निशमन दलाचे वाहन पोहोचू शकत नाही,हे त्या शो रुमचे वैशिष्ठ आहे.ग्राहकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर आहे?
याच महिन्याच्या पहील्या बुधवारी येथील आहूजा स्टेशनरी दूकानाला आग लागण्याची घटना घडली.त्या गल्लीत देखील अग्निशमन दलाची गाडी पोहोचू शकली नाही,त्यावेळी जवळपास ७०० मीटर अंतरावरुन पाईप नेणे अग्निशमन दलाच्या जवानांना भाग पडले.मागच्या वर्षी मार्च २०२३ मध्ये एका ऑईल पेंटच्या दूकानाला मध्यरात्री आग लागली,पेंट आणि अग्निशमन दलाने फवारलेले पाणी संपूर्ण रस्त्यावर विखुरले होते.कित्येक महिने रस्त्यावरुन जाताना नागरिकांच्या पादत्राणांना पेंट चिपकत राहीला होता.

(छायाचित्र : होलसेल क्लॉथ मार्केटमधील दूमजली इमारतींमध्ये ज्वलनशील बॅट-या.यावरच वातानुकुलीन यंत्रणा ही चालविली जाते!)

कोणी तर घ्यावी या सर्व घटनांची जबाबदेही?असा ‘आक्रांत’ आता येथील रहीवासी करीत आहेत.निदान नवीन बांधकाम तरी थांबवा.मनपाच्या गांधी बाग झोनच्या अधिका-यांना मनपा आयुक्तांनी निदान जाब तर विचारावा,अनाधिकृत इमले चढवणा-या आणि अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसलेल्या इमारती ते सील का करीत नाही?या मागे काय गौडबंगाल आहे.गांधी बाग झोनचे मनपा अधिकारी हे सर्वाधिक ‘श्रीमंत’ असल्याची मिश्‍किल कोटी देखील ऐकू येते.एका निष्पाप १७ वर्षीय तरुणीचा जीव हकनाक गेला,सुरक्षेचे कोणतेही उपाय त्या इमारतीमध्ये नव्हते.आता तरी प्रत्येक इमारत आणि प्रत्येक दूकानामध्ये अग्निरोधक यंत्रे बसविण्याचा तकादा गांधी बाग झोनचे अधिकारी व मनपाचे अग्निशमन विभागचे अधिकारी लावतील का?एक निश्‍चित एरिया फिक्स करा.४०० फूटांच्या दूकानात किमान दोन अग्निराेधक यंत्राचे सिलेंडर तर ८०० फूटांच्या दूकानांमध्ये ४ सिलेंडर सक्तीचे करण्यात यावे.ज्या दूमजल्या,चार मजल्या ईमारतींमध्ये अग्निशमनचे नियम पाळले गेले नाही,त्या इमारातींना तातडीने सील करण्याची कारवाई केली जावी.

दाटीवाटीच्या या बारुदच्या ढेरवर वसलेल्या बाजारहाटमध्ये ज्वलनशील व लवकर पेट घेणा-या वस्तूंचा सर्व्हे करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहे?मनपाच्या बाजार विभागातील कागदपत्रांमध्ये ज्या गल्लीबोळा १२ फूटांच्या आहेत त्या प्रत्यक्ष ८ ते ४ फूटांच्या कश्‍या झाल्या?अनेक इमारतींना वीजेचे खांब अगदी चिपकून आहे,यातून घडणा-या दूर्घटनांना कोण जबाबदार असणार?अनेक इमारती अतिशय जीर्ण झाल्या असताना देखील त्याच व्यापार उद्दीम सुरु आहे,यावर कारवाई कधी करणार?या संपूर्ण बाजार परिसरात दिवसभर गाड्या लोडींग-अनलोड होताना आढळतात,यामुळे आणखी वाहतूकीची कोंडी होते,वाहतूक विभागाने किमान दिवसा या प्रकाराला आळा घालावा,अशी मागणी येथील रहीवासी करतात.तहसील पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सतत या भागांवर नजर राखावी.
दाटीवाटींच्या या गल्ली बोळांमध्ये अनाधिकृत बांधकामांचा विळखा असाच पडत राहीला तर पुढील काही दिवसात अग्निशमन दलाला हजार फूटांचा पाईप लाऊन आग विझवावी लागेल,असा इशारा येथील रहीवासी देतात.
………

(भाग -२ उद्याच्या बातमीत:इतवारीच्या इमारतींमधील बेसमेंट की मृत्यूचे सापळे?)

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या