Advertisements

नागपूरात ओबीसींचा विराट महामोर्चा
भंडारा,गोंदिया,चंद्रपूरातील माळी समाजाच्या अनेक नेत्यांची वडेट्टीवारांच्या मंचावर उपस्थिती
गेल्या पंधरा वर्षात विदर्भ,नागपूरात माळी समाजाचे नेतृत्व उभे राहूच दिले नाही:सभा स्थळी चर्चा
नागपूर,ता.१० ऑक्टोबर २०२५: महायुती सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयामुळे राज्यातील ओबीसी समाज अस्वस्थ झाला.हा शासन निर्णय रद्द करावा यासाठी आज नागपूरात यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या मोर्चात विदर्भातील हजारो ओबींसींनी उपस्थिती लावली.काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विराट मोर्चा निघाला.महत्वाचे म्हणजे वडेट्टीवारांच्या मंचावर कुणबी समाजाच्या व्यतिरिक्त भंडारा,गोंदिया,चंद्रपुर अश्या अनेक शहरातील माळी समाजाच्या .विविध संघटनांच्या किमान आठ ते दहा नेत्यांची उपस्थिती होती. यातून,विदर्भातील मायक्रो ओबीसी वडेट्टीवारांकडे झूकत असल्याचे दिसून पडत असून, भविष्यात भारतीय जनता पक्षासाठी निश्चितच ही धोक्याची घंटा ठरेल का,हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मराठ्यांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी जातप्रमाणपत्र देणारा २ सप्टेंबरचा शासन आदेश मागे घेण्यासाठी आणि २०१५ पासून मराठा समाजाला देण्यात आलेल्या ओबीसी प्रमाणपत्राबाबत श्वेतपत्रिका काढण्यात यावी,या मागण्यांसाठी विविध संघटनांनी सकल ओबीसी महामोर्चा स्थापन केला.त्यांच्यातर्फे विविध ओबीसींमधील विविध जातींना मोर्चात येण्याचे आवाहन करण्यात आले.राज्याच्या कानाकोप-यातील गावखेड्यांमधून तसेच जिल्हा पातळीवर ओबीसी संघटनांच्यावतीने महामोर्चात सहभाग नोंदविण्यात आला.

संविधान चौकात महामोर्चा आल्यानंतर महामोर्चाचे सभेत रुपांतर झाले.यात वडेट्टीवारांनी महायुती सरकार तसेच मराठ्यांचे नेते जरांगे पाटील यांच्यावर विखारी टिका केली.फक्त जरांगे यांच्या भरवश्यावर महायुती सरकार आले नसून ओबीसी मधील ३७८ जातींनी पण या सरकारला कौल दिला आहे,हे सरकार ते विसरले त्यामुळेच ओबींसींवर अन्याय होत असून ओबीसी तरुणांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.सरकारच्या या शासन निर्णयामुळे ओबीसींच्या मानेवर सुरी फिरणार असून सरकारने आताच आपली भूमिका सुधारावी नाही तर नागपूर सारखेच मुंबई,पुणे व ठाणे देखील जाम करण्याचा इशारा त्यांनी दिला.
सरकारचा डीएनए ओबीसींचा असेल तर हा शासन निर्णय रद्द करुन तुमचा डीएनए सिद्ध करा,असे आव्हानच त्यांनी केले.ओबीसी समाजात आता मराठा घुसत आहे,तो समाज पैलवान आहे.हिंद केसरी असलेला मराठा समाज तर दुसरीकडे ओबीसी समाज हा कुपोषित आहे,त्यांच्या समोर ओबीसी समाज टिकणार कसा?त्यामुळेच ओबीसींच्या ही अस्तित्वाची लढाई असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. एकीकडे सरकार म्हणते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडे ओबीसीमध्ये घुसखोरी करीत आहे.सरकारमध्ये दम असेल तर तेलंगणा सरकारप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसींना ४२ टक्के आरक्षण देण्याची मागणी वडेट्टीवारांनी केली.ओबीसींना प्रमाणपत्र मिळण्यासाठी एक वर्ष लागतं तर दूसरीकडे मराठ्यांना एका तासात प्रमाणपत्र दिली जातात,हा अन्याय नाही का?असा परखड सवाल त्यांनी केला.
आपल्या भाषणातून वडेट्टीवारांनी महायुती सरकारला खूले आव्हान दिले. या विराट महामोर्चावरुन वडेट्टीवारांनी आपली ताकद दाखवून देण्यात यश मिळवले, हे मान्य करावे लागेल.विरोधकांनी मात्र,हा ओबीसींचा मोर्चा नसून फक्त काँग्रेसचा मोर्चा होता,अशी टिका केली.काँग्रेसच्याच माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसेच नागपूर शहरातील काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी देखील या मोर्चापासून अलिप्तता दर्शवली.त्यामुळे हा महामोर्चा फक्त वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली आयाेजित असल्याचे सिद्ध झाले.राजकारणात मुरलेले वडेट्टीवारांनी हे आव्हान एकहाती पेलले.
अखिल भारतीय राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आधीच या महामोर्चापासून अलिप्त राहणार असल्याचे घोषित केले होते.तायवाडे यांच्यावर ‘भाजप प्रणित अध्यक्ष’अशी टिका देखील केली जाते.येत्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत भाजपतर्फे धक्का देणारा चेहरा असणार अशी चर्चा आहे,त्यात तायवाडे यांचे देखील नाव आघाडीवर आहे.
थोडक्यात,आजच्या विराट महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाला असला तरी कुणबी व्यतिरिक्त मायक्रो ओबीसी वडेट्टीवारांकडे स्पष्टपणे झुकलेला आढळला,गेल्या पंधरा वर्षात राज्यात व नागपूर महानगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे मात्र,ओबीसी समाजाचे नेतृत्व बावणकुळे व सुधीर मुनगंटीवार सोडले तर संपूर्ण विदर्भातच दिसून पडत नाही.त्यातल्या त्यात माळी समाजाचे प्रतिनिधित्व हे फारच अल्प आहे. मागील वर्षी महाराष्ट्राच्या विधान सभा निवडणूकी पूर्वी माळी समाजाच्या विविध संघटनांनी माळी समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावे अशी मागणी भाजपकडे केली होती मात्र,भाजपसाठी माळी समाज तसेच इतर मायक्रो समाज फक्त ‘व्होट बँक’आहे,अशी नाराजी सभास्थळी उमटली.परिणामी,वडेट्टीवारांच्या मंचावर विदर्भातील विविध संघटनांच्या माळी समाजाच्या नेत्यांची उपस्थिती ही भविष्यात भाजपसाठी धोक्याची घंटा ठरु शकते.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
Advertisements

Advertisements

Advertisements
