फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनमाना तेरी नजर में तेरा प्यार हम नही....

माना तेरी नजर में तेरा प्यार हम नही….

Advertisements

नामवंत अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचा संजीव कुमार यांच्या मृत्यू दिनीच मृत्यू
आयुष्यभर संजीव कुमारसाठी राहील्या अविवाहित
नागपूर,ता.६ नोव्हेंबर २०२५: सत्तरीच्या दशकात एका युगल गीतात किशोर कुमारसोबत नेहमीच्या पठडीपेक्षा एक वेगळा आवाज श्रोत्यांच्या कानावर पडला,‘बेकरार दिल तू गाये जा खूशियो के वो तराने’चित्रपट ‘दूर का राही’मधील हे गीत ए.इरशाद यांनी लिहले होते.या गाण्याची चाल लगेच श्रोत्यांच्या मनावर गारुड घालून गेली.सुलक्षणा पंडित यांच्या सुरेल,गोड पण तितकाच शास्त्रीय संगीतातून कसलेला आवाज खोलवर प्रभाव टाकून गेला.सुलक्षणा यांचा आवाज जितका सुरेल होता तितकेच देखणे रुप परमेश्‍वराने त्यांना भरभरुन दिले होते.जीवघेणी गालावची खळी बघून त्यात मोठमोठे चाहते बुडून गेले.लाखो ह्दयाची धडकन बनलेली ही विलक्षण प्रतिभेची धनी सुलक्षणा मात्र,नशीबाच्या बाबतीत ‘सुलक्षणा’ होऊ शकली नाही,ज्याच्यावर जीवापाड प्रेम जडले,त्यानेच लग्नासाठी नकार दिल्याने त्या आयुष्यभर अविवाहित राहील्या.देवाची लिला बघा, ज्या प्रियकरावर पारलौकीक प्रेम केलं त्याच संजीव कुमार यांच्या ६ नोव्हेंबर (१९८५)रोजी मृत्यू दिनीच ६ नाेव्हेंबर (२०२५)त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी हे जग सोडले.
संजीव कुमार खरे नाव हरिहर जरीवाला यांचे निधन वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी हार्टअटॅकने झाले.संजीव कुमारचा मृत्यू सुलक्षणाच्या सर्व तपश्‍चर्येला उधवस्त करुन गेला.या मानसिक आघातापासून त्या नंतर कधीच सावरु शकल्या नाहीत.संजीव कुमारच्या निधनानंतर अल्पकाळातच त्यांच्या आईचा देखील मृत्यू झाला.
१२ जुलै १९५४ साली त्यांचा जन्म हरियाणातील हिस्सार तालुक्यात(आताचा फतेहाबाद) एका शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात फार नावाजलेल्या पंडित घराण्यात झाला होता.त्यांचे पूर्ण  नाव सुलक्षणा प्रताप नारायण पंडित होते.महान शास्त्रीय गायक पंडित जसराज सुरक्षणाचे सख्खे काका होते.सुलक्षणा पंडित ही सहा भावंडे होती.तीन बहीणी तीन भाऊ.सुप्रसिद्ध संगीतकार जतिन-ललित सुलक्षणाचे सख्खे भाऊ असून मोठा भाऊ मंधीर पंडित याचे निधन झाले आहे तर संध्या पंडित या सर्वात लहान बहीणीची निघृण हत्या २०१२ मध्ये संध्याच्याच अम्ली पदार्थाच्या आहारी गेलेल्या मुलाने(रघुवीर) केली असल्याचा  आरोप झाला.संध्याचे शव ॲसिडमध्ये विरघळवल्याचा त्याच्यावर संशय होता मात्र,सुलक्षणाची मानसिक परिस्थिती बघता मधली बहीण सुप्रसिद्ध अभिनेत्री विजेयता पंडित (लव्ह स्टोरी फेम)यांनी सुलक्षणाच्या अखेरच्या क्षणापर्यंत संध्याच्या निघृण हत्येची माहिती कळू दिली नव्हती…!
नवी मुंबई सीवूड्स भागातील आलिशान घरातून डिसेंबर २०१२ मध्ये संध्या सिंग बेपत्ता झाल्या होत्या.दिड महिन्यांनी त्यांचे अवशेष सापडले होते ते देखील खोदकाम करताना वेगवेगळ्या ठिकाणी.रघुवीर याची नंतर निर्दोष मुक्तता झाली होती.रघुवीर हा अम्ली पदार्थाच्या आहारी गेला होता.आपली व्यसन पूर्ण करण्यासाठी तो घरातून पैसेही चोरायाचा,असा दावा संध्या सिंग यांचे शेजारी आणि घरकाम करणा-या दोन महिलांनी केला होता.पैशांवरुन रघुवीरचे आईशी वारंवार खटके उडायचे,तो आईला धमकावयाचा,असे त्यांनी पोलिसांना सांगितले मात्र,परिस्थितीजन्य पुराव्या अभावी २०१५ साली उच्च न्यायालयाने रघुवीरला निर्दोष मुक्त केले.त्यावेळी रघुवीरचे वय २२ वर्ष होते.संध्या यांचे पती इंदूर येथील केंद्रीय उत्पादन शुल्क,सीमाशुल्क आणि सेवा कर विभागात त्यावेळी आयुक्त होते.
१३ डिसेंबर २०१२ रोजी संध्या सिंग नेरुळमधील बँकेत पैसे जमा करण्यासाठी आपल्या मैत्रिणीसोबत गेल्या होत्या.घरात तीस हजार रुपये व सोन्याचे दागिने ठेवले होते ते रघुवीर  चोरेल अशी भीती संध्या यांना वाटली.मात्र,बँक बंद असल्यामुळे त्यांना तसंच परत यावे लागले.परंतु नेरुळला आलो आहोत,तर जवळच राहणा-या दुस-या मैत्रिणीकडेही जावं,असा विचार त्यांनी केला.तिथुन दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्या आपल्या घरी परतल्या,त्या नंतर त्या बेपत्ता झाल्या.रघुवीरनेच पैशांच्या वादातून आईचा गळा दाबला असल्याचा आरोप झाला.त्या पूर्वी देखील रघुवीरने आईचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.बाथटबमध्ये ॲसिड टाकून मृतदेह विरघळवला असल्याचा आरोप त्याच्यावर झाला.त्यानंतर नवी मुंबईच्या सीवूड्स भागातील एनआरआय कॉम्पलेक्सच्या दलदलीत त्याने सांगाड्याचे तुकडे टाकले,असा उल्लेख आरोपपत्रात आहे.याच कॉम्पलेक्सच्या खोदकामात हे सांगाड्याचे अवशेष सापडले होते.दोन ब्रिटीश पक्षी संशोधकांना ४५ दिवसांनंतर २८ जोनवरी २०१३ रोजी संध्या सिंग यांच्या मृतदेहाचे अवशेष (कवटी आणि सात हाडं)सापडल होते.त्यानंतर रघुवीर सिंग याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला.दरम्यान आठ वर्षांच्या कालावधीनंतर ठाण्यातील कोर्टाने रघुवीरची हत्या,दरोडा,पुरावे नष्ट करणे यासारख्या सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली.हत्येच्या वेळी रघुवीर उपस्थित असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने तसेच हत्या नेमकी कुठे,कधी झाली,मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली,हे देखील सिद्ध होऊ शकलं नाही.
लेहरेन रेट्रोला दिलेल्या मुलाखतीत विजेयता यांनी त्यांच्या बहीणीच्या हत्येबद्दल सांगताना,सुलक्षणाला इतक्या वर्षांनंतर देखील बहीणीच्या हत्येविषयी सांगितले नसल्याचे म्हटले.आम्हाला कधीच असं वाटलं नव्हतं कधी असं ही घडेल!ती तिच्या लग्नात खूप आनंदी होती.मला माहित नाही की काय चुकलं.आम्हाला ती कधीच सापडली नाही,फक्त तिचा सांगाडा सापडला.सुरवातीला तिच्या कुटूंबाने सांगितले की ती बेपत्ता आहे,म्हणून माझे भाऊ जतिन,ललित आणि मी तिला सर्वत्र शोधले.ब-याच महिन्यांनी आम्हाला तिची हाडे वेगवेगळ्या भागात विखुरलेली आढळली.आम्ही जर सुलक्षणाला तिच्या हत्येविषयी सांगितले असते तर ती त्याच क्षणी मृत्यू पावली असती,एखाद्या मृत व्यक्तिचा मृत्यू वेगवेगळी कारणे सांगून इतकी दशके लपवून ठेवणे ही फार मोठी मानसिक आणि भावनिक कामगिरी मला करावी लागली असल्याचे विजेयता यांनी त्या मुलाखतीत सांगितले.
विजेयता यांचे लग्न ४ सप्टेंबर १९६४ साली जन्मलेल्या सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्यासोबत झाला आहे.आदेश यांचा मृत्यू ५ सप्टेंबर २०१५ साली झाला.शास्त्रीय संगीताची आदेश यांना खोलवर जाण होती.ते स्वत: उत्तम गायक होते.पार्श्व संगीत मिळून शंभरच्या वर चित्रपटांना आदेश यांनी संगीत दिले.आपला ५१ वा वाढदिवस साजरा केल्यावर एकाच दिवसानंतर कोकिलाबेन रुग्णालयात कर्करोगाने त्यांचा मृत्यू झाला.एकीककडे आईसदृष्य बहीण अंथरुणावर खिळलेली दुसरीकडे आयुष्याचा आधारवडच कोळसला.जीवनरुपी धरणीचा कंप विजेयताने मुलांकडे बघून खूप धैर्याने साहला.
सुलक्षणाने वयाच्या ९ व्या वर्षी ‘तकदीर’चित्रपटात पहीले पार्श्वगायन केले.भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासोगबत ते गीत रेकॉर्ड झाले.ते गीत होते ‘सात समुंदर पार से’.यानंतर सुलक्षणा यांनी गायकीच्या क्षेत्रातच काम केले मात्र,१९७६ साली रघुनाथ झालानी यांनी एक कौटूंबिक रहस्यपट काढला ज्याचे नाव होते ‘उलझन’.या चित्रपटात सुलक्षणाचे हिरो होते संजीव कुमार.या चित्रपटात लता मंगेशर यांची गीते होती मात्र,सुलक्षणाने दोन गाणे या चित्रपटात गायले त्यात ’आज बडे प्यारे से लगते है आप’याला श्रोत्यांची विशेष पसंदी मिळाली.
यानंतर १९७६ साली जितेंद्रसोबत त्यांचा ‘संकोच’हा चित्रपट झळकला.या चित्रपटासाठी सुलक्षणाचे नाव फिल्म फेअरच्या नॉमिनेशनमध्ये आले.यानंतर प्रकाश मेहरा यांच्या ‘हेरा फेरी’ तसेच जे.ओमप्रकाशच्या ‘अपनापन’चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अजरामर अशी अमिट छाप सोडली.‘अपनापन’मध्ये सगळी गाणी लता मंगेशकर यांनी गायली मात्र,‘सोमवार को हम मिले मंगलवार को नैन’हे गाणे सुलक्षणाच्या अावाजात श्रोत्यांसाठी पर्वणीच ठरली.यानंतर १९७९ साली चित्रपट ‘खानदान’मध्ये पुन्हा एकदा सुलक्षणाने जितेंद्रसोबत नायिकेची भूमिका साकारली जितेंद्र, विनाेद खन्ना,शशी कपूर,कबीर बेदी,शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत देखील त्यांची जोडी प्रेक्षकांनी पसंद केली मात्र,संजीव कुमार यांच्याविषयी त्यांच्या मनात प्रज्लवित झालेला प्रेमाचा नंदादिप हा काळासोबत आणखी तेजोमय होत गेला.सुलक्षणाने १९७८ मध्ये उत्तम कुमार यांच्यासोबत ’बंदी’ या बंगाली चित्रपटात देखील अभिनय केला होता.
सुलक्षणा पंडित यांना गीतकार कैफी आझमी व संगीतकार खय्याम यांच्या ‘संकल्प‘चित्रपटातील ‘तू ही सागर तू हि किनारा’ या गीतासाठी सर्वोकृष्ट पार्श्वगायनासाठी फिल्म फेअर अवॉर्ड मिळाला होता.शबाना आझमी,रेखा पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर चित्रित गीतांना देखील सुलक्षणा यांचा मखमली,सुरेल आवाज लाभला होता.१९८१ च्या ‘साजन की सहेली’मधील ‘जिसके लिये सब को छोडा उसीने मेरे दिल को तोडा’हे सुलक्षणाने गायलेले गाणे विशेष गाजले.गायक अनवर सोबत गायलेले ‘मौसम मौसम लवली मौसम’’बोलिये सुरीली बोलिया’‘परदेसिया तेरे देस मे’’जब जब अपना मेल हूआ’’जिंदगी तुझसे बहोत प्यार किया’,’जब आती होगी याद हमारी’सुलक्षणा यांच्या आवाजातील शेकडो गाणी श्रोत्यांच्या मनावर ताहयात मखमली अधिराज्य गाजवत राहील.
संजीव कुमार यांच्यावर सुलक्षणाचे अतोनात प्रेम जडले होते.त्यांनी मंदिरात जाऊन फक्त भांगेत कूंकू भरण्यासाठी संजीव कुमार यांना भावनिक मागणी केली होती जी संजीव कुमार यांनी नाकारली कारण त्यावेळी संजीव कुमार यांचे मन ‘ड्रीम गर्ल’हेमा मालिनीवर जडले होते.मात्र,हेमा मालिनीसोबत त्यांचे लग्न होऊ शकले नाही कारण संजीव कुमार हे ज्या कौटूंबिक पार्श्वभूमीतून चित्रपट सृष्टित आले होते,त्या कुटूंबात त्यांना ‘घरेलू’जोडीदार हवी होती जी त्यांच्या वयोवृद्ध आईची सेवा करु शकेल.मात्र,हेमा मालिनी या चित्रपटसृष्टित देशभरातील रसिकांच्या मनातील  ‘सरताज‘झाल्या असल्याने, विवाहबंधनात अडकून आपले स्थान गमावू इच्छित नव्हत्या त्यामुळे संजीव कुमार व हेमा मालिनी विवाहच्या गठबंधनात अडकू शकले नाहीत.
 सुलक्षणाने ‘आहिस्ता आहिस्ता’चिटपटात गायलेल्या ‘माना तेरी नजर में तेरा प्यार हम नही..कैसे कहे के तेरे तलबगार हम नही,तन को जला के राख बनाया बिछा दिया,लो अब तुम्हारी राह मे दिवार हम नही,जिसको निखारा हमने तमन्नाओ के खून से,गुलशन मे उस बहार के हकदार हम नही,धोका दिया है खुद को मोहब्बत के नाम पर,ये किस तरह कहे के गुनहगार हम नही’या गझलरुपी गीतातून जणू आपल्या जिवनातीत सर्व वेदनाच ओतली होती. ज्याच्यावर प्रेम जडले होते ताे दुस-या कोणाच्या तरी प्रेमाची आस लावून बसला होता.नियतीने केलेली ही क्रूर थट्टाच होती.
हळूहळू संजीव कुमार यांनी दारु आणि सिगारेटमध्ये स्वत:ला बुडवून घेतले.त्यांच्या ह्दयाचा त्रास देखील वाढला.अमेरिकेत जाऊन त्यांनी ह्दयाची बायपास सर्जरी करुन घेतली.मात्र,भारतात परतल्यावर ६ नोव्हेंबर १९८५ रोजी वयाच्या ४७ सा व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.या मानसिक धक्क्यातून सुलक्षणा कधी नंतर सावरलीच नाही.काळासोबत फक्त श्‍वास सुरु असतानाच त्या एक दिवस न्हाणीघरात कोसळल्या ज्यात त्यांच्या कमरेचे हाड कायमचे मोडले.
यानंतर मधली बहीण विजेयता पंडित व सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव जे विजेयताचे पती होते त्यांनी सुलक्षणा यांना २००६  साली आपल्या घरी आणले व त्यांची खूप सेवा केली.गेल्या काही वर्षांपासून त्यांची पकृती अत्यंत खालावली होती,असं बहीण विजेयता यांनी सांगितलं.‘ई-टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत विजेयता यांनी सांगितले की सुलक्षणा ही माझ्यासाठी माझी दूसरी आईच होती.गेली १६ वर्ष ती अंथरुणाला खिळून होती.कंबरेला झालेली दुखापत आणि अनेक शस्त्रक्रियांमुळे त्या अंथरुणालाच खिळून होत्या.
कदाचित देवा घरी गेल्यावर संजीव कुमार यांना सुलक्षणाचं ‘विलक्ष्ण ’प्रेम कळलं असावं,सुलक्षणा यांचा ६ नोव्हेंबर हा त्यांचा निधनाचा दिवस हा जणू संजीव कुमार यांच्यासोबत त्या पारलौकिक जगात ‘मिलनाचा’ दिवस असावा,असे आता लाखो रसिकजण सोशल मिडीयावर व्यक्त होत आहेत.हे दोघेही शेवटपर्यंत अविवाहित राहीले.इतिहासात प्रेमाची गरिमा,मैत्री, त्याग आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत प्रेमाच्या नात्याप्रती प्रामाणिक राहणे याचे सर्वांगसुंदर उदाहरण म्हणजे सुलक्षणा पंडितचे संजीव कुमार यांच्या प्रति प्रेमपाच्या नात्यालाच द्यावे लागेल. या मखमली आवाजाच्या सुरेल,गुणी गायिका व सर्वांगसुंदर अभिनेत्रीला ‘सत्ताधीश’तर्फे विनम्र श्रद्धांजली.
‘ईश्‍क अधुरा रह जाये तो नाज करना,
सच्चा प्यार मुकम्मल नही होता…!
फिर आयेंगे एक उम्र प्यार की लिखवा कर,
फिर तेरे होकर रहेंगे सदा के लिए…!
…………………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या