

‘रुबरु’च्या उपक्रमाला माध्यमकर्मींची अनुपस्थिती:.चेन्नई बंगलोर येथे गर्दी खेचणारा उपक्रम नागपूरात का दुर्लक्षित?
नागपूर,ता.१९ मार्च २०२३: अवघ्या सहा महिन्याची लहानशी बाळ असताना तिच्या डोळ्यात काही तरी चकाकलं!आईला वाटलं कोणत्याही तरी लाईटचा प्रकाश पडला असावा आणि मला ते दिसलं असावं,मात्र पुन्हा असंच घडलं..तेव्हा मात्र जन्मदात्रीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली,नेत्ररोगतज्ज्ञाकडे नेताच त्या जन्मदात्रीला धक्काच बसला.अवघ्या सहा महिन्यांच्या त्या चिमुकलीला डोळ्यांचा कर्करोग झाला होता आणि डॉक्टरांनी त्वरित तो डोळा काढून टाकण्याचा निर्णय कळवला!जगातल्या कोणत्याही जन्मदात्रीसाठी आपल्या तान्हुल्यांना ऑपरेशन थेटरच्या वातावरणात,मोठमोठ्या लाईट्स खाली,चेह-यावर मास्क असणा-या व हातात अवजारे घेऊन असलेल्या डॉक्टर्सकडे,आपल्या गर्भात घडवलेल्या आपल्या रक्तमांसाच्या गोळ्याला,काळजाच्या तुकड्याला ,चिरफाड करण्यासाठी सोपविणे हे किती कठीण असेल,तिच्या ह्दयाला किती घाव घालणारा असेल याची कल्पना देखील करवत नाही मात्र ,जगात हे असं काहीतरी कुठेतरी घडत असतं.एवढंच नव्हे तर वयाच्या सातव्या वर्षी दुसरा ही डोळा कर्करोगामुळे काढावा लागतो तेव्हा, त्या लहानश्या चिमुरडीची व आईची काय अवस्था झाली असेल,याची कल्पना ही करवत नाही,मानवी नियतीचे हे सगळे घाव घेऊन आज ही त्या माय-लेकी जगत आहेत मात्र,हे जगणं त्यांनी कसं स्वीकारलं?यासाठी मनाची उभारी कशी घेतली?हा अनुभव जगातील कोणत्याही संवेदननशील मन असणा-या माणसाला ऐकवासाच वाटेल,मात्र,नागपूरकरांना आणि नागपूरच्या माध्यमकर्मींना अश्या या मानवी पुस्तकांचे अनुभव ऐकण्यामध्ये काही एक रस नाही,हेच गेल्या वर्षभरापासून आलेल्या अनुभवातून सिद्ध होतं.
चेन्नई,बंगलोर,इंदाेरच्या धर्तीवर नागपूरात देखील हा उपक्रम ऑगस्ट २०२२ पासून ’रुबरु ह्यूमन लायब्ररी,मेरी कहानी मेरी जुबानी’ सुरु करण्यात आला.आता पर्यंत तब्बल बारा मानवी पुस्तकांनी, आपले जीवनाशी आणि जगण्याशी लढण्याचे थरारक व तितकेच प्रेरणादायी अनुभव शेअर केले मात्र,या उपक्रमाला अद्याप हवी तशी प्रसिद्धी प्रसार-प्रचार माध्यमांनी दिलीच नसल्याने नागपूरकरांपर्यंत देखील ती पोहोचली नसल्याची खंत हा उपक्रम तन-मन-धनाने राबविणारे रुबरुचे पदाधिकारी व्यक्त करतात.
ही संकल्पना सर्वात प्रथम डेनमार्क या देशात राबविण्यात आली.जगाच्या एकूण ७६ देशांमध्ये हा ‘मानवी पुस्तकाचा’ उपक्रम राबविला जातो.मुंबईत देखील पुढाकार घेऊन या उपक्रमाची सुरवात करण्यात आली,तिथे ही बरीच गर्दी उमडते.मुंबईत वास्तव्यास असणारे नाटककार विक्रम भागवत यांनी त्यांच्या रमला पुरोहित ही मानसशास्त्रज्ञ असणा-या मुलीची फेसबुक पोस्ट एकदा शेअर केली होती.ती वाचून अशी देखील आगळी वेगळी संकल्पना जगात कुठेतरी राबविली जात असल्याचे प्रथमच, नागपूरातील स्वाती धर्माधिकारी यांना कळले.
त्यांना ही संकल्पना इतकी भावली की त्यांनी लगेच समविचारी असणा-यांची एक बैठक घेतली.ज्येष्ठ पत्रकार वर्षा बासू यांनी देखील ही संकल्पना उचलून धरली व प्रत्यक्ष १६ ऑगस्ट २०२२ रोजी पहील्या मानवी पुस्तकाचे वाचन झाले.उद् घाटन सुप्रसिद्ध लेखिका सुप्रिया अय्यर यांच्या हस्ते झाले.अल्प प्रतिसाद असला तरी नवीन संकल्पना असल्याने हळूहळू नागपूरकरांच्या मानसिकतेत रुजेल अशी आशा होती मात्र एवढ्या संवेदनशील व तितक्याच प्रेरणादायी अनुभवांना नागपूरच्या प्रसार प्रचार माध्यमांकडून दखलच घेत जात नसल्याने,मग लोकशाहीचा हा चौथा स्तंभ ‘आम्ही समाज प्रबोधनचा वारसा चालवतो’अशी शेखी कोणत्या आधारावर मिरवतो?हा वारसा मिरविण्याचा अधिकार त्यांना तेव्हाच मिळू शकतो जेव्हा अतिशय व्यवसायिक झालेल्या छापील कागदांवर, कोणत्याही तरी कोप-यात, मानवी संवेदनशीलतेला ही एखादी जागा मिळेत राहील!
याच मानवी पुस्तकांमध्ये मधल्या काळात किन्नर असलेल्या माेहिनीने आपले दाहक अनुभव सांगितले होते.वयात येत असताना होत असलेले शारिरीक बदल,पालकांनी कायम केलेले दुर्लक्ष,वर्ग मित्रांकडून होणारी चेष्टा,अगदी शाळेच्या शौचालयात तो खरंच मुलगा आहे की मुलगी बघण्यासाठी चार-पाच टवाळखोर विद्यार्थ्यांनी त्याचे जबरदस्ती उतरवलले कपडे…या घटनेनंतर मनात बसलेली कायमची भीती…संपूर्ण शाळा सुटेपर्यंत मूत्रविसर्जन दाबून ठेवणे,होणा-या तीव्र वेदना,तहान लागली तरी पाणीच न पिणे…हे दाहक अनुभव कोणत्याही संवेदनशील मनांना तीव्र चटका लावून जाणारेच होते…यातूनही तिने मिळवलेले यश,प्रसिद्धी,पटकावलेले पुरस्कार हे इतकं प्रेरणादायी असतानाही माध्यमात या अनुभवांना जागाच मिळू नये?
मध्यप्रदेशच्या ब-हानपूर येथून रात्रीच्या रेल्वेने एकटी नागपूरपर्यंत प्रवास करणारी धाडसी महिला,सहप्रवाश्यांना पुरुन उरलेला तिचा तीव्र संताप,रेल्वेच्या तिकीट तपासणीस तिचा बदलून द्यावा लागणारा रेल्वे डबा,अजनीच्या तिकीट खिडकीवर, आजारी आयुष्याच्या जोडीदारासाठी सवलतीच्या दरात मुंबईत उपचारासाठी जाण्यासाठी तिकीट घेताना कर्तव्यावर असणा-या कर्मचा-यांनी केलेली थट्टा,या विरोधात नागपूरचे मुख्य रेल्वेचे तिने गाजवलेले कार्यालय,मुख्य रेल्वे अधिका-यांपर्यंत चिवटपणे दिलेला लढा,हे अनुभव,ही प्रेरणा कुठेही छापण्यासारखीच नव्हती का?
कुठेही सहजतेने फिरता येणं हा दिव्यांगाचाही कायदेशीर हक्क असताना सार्वजनिक ठिकाण व शासकीय इमारतींमध्ये त्यांना कुठल्या संकटांना,अडचणींना सामोरे जावं लागतं?अशी व्यक्ती आपल्याला दिसल्यास त्यांना कोणत्या मदतीची अपेक्षा असते?व्यक्तिगत,सामाजिक व सरकारी पातळीवर काय करायचं असतं?याचा अनुभव एक दिव्यांगच ‘रुबरु‘मध्ये जेव्हा सांगतो तेव्हा नुसता आपल्या अधिकारांविषयीचा ‘गजर’ करणा-यांना आपल्या सामाजिक कर्तव्यांची देखील नकळत जाणीव होते,का नाही मिळाली प्रसिद्धी कोणत्याही वृत्तपत्रात या ही अनुभवाला?
आज सायंकाळी ५ वाजता बजाज नगर येथील परांजपे शाळेच्या सभागृहात ,कर्करोगामुळे कायमची अंध झालेली भक्ती घाटोळे व तिच्या आईचा सुषमा घाटोळे यांच्या जिद्द व विश्वासाचे ’पुस्तक’ वाचले जाणार आहे,मिळणार का याला प्रसिद्धी?करतील का नागपूरकर गर्दी?मिळेल का वृत्तपत्रातील एखाद्या कोप-यात त्यांच्या जिद्द व चिकाटीला,दु:खांवर आत्मविश्वसाची फूंकर घालणा-या प्रयत्नांना जागा?
ही संस्था वर्षभरासाठी फक्त ५०० रुपये अल्प नोंदणी शुल्क घेते व वर्षभरात रविवारच्या दिवशी किमान १२ तरी मानवी पुस्तकांच्या सादरीकरणाचा प्रयत्न करते.यात प्रेक्षकांना चहा हा फूकट असतो.सभागृह व मानवी पुस्तकांना मानधन म्हणून दिली जाणारी रक्कम याचा खर्च ही रुबरुचे पदाधिकारी उचलतात.
माध्यमकर्मींना तर हा उपक्रम नि:शुल्क आहे.तरी देखील नागपूरातील एक ही माध्यमकर्मी या उपक्रमाला हजेरी लावताना दिसत नाही,परिणामी रुबरुच्या पदाधिका-यांनी या उपक्रमाला नव्हे, तर आयुष्यात खूप काही भोगलेल्या मानवी अनुभवांना प्रसिद्धी देण्यासाठी माध्यमकर्मी,संपादक व वृतपत्र मालकांना कळकळीचे आवाहन केले आहे.
…………………………………………..




आमचे चॅनल subscribe करा
