

साम,दाम,दंड,भेद नीतीचा ‘परिपाक’
अखेर जीवे मारण्याचा प्रयत्नाची कलम पोलिसांनाही आरेपीविरुद्ध करावी लागली दाखल
पोलिस ठाण्याची पायरी चढणे पत्रकारासाठी ठरला तब्बल बारा तास मानसिक वेदनेचा प्रवास
सुदर्शन बागडे आता मागणार न्यायालयात दाद
नागपूर,ता. ३० जानेवारी २०२२ : फिर्यादी सुदर्शन बागडे काल शुक्रवार दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११.५० वा.दरम्यान बातमीसाठी नागपूर महानगरपालिकेसाठी घरुन निघाले असता,पागलखाना चौक ओलांडल्यानंतर स्पर्श मेडीट्यून्स दूकानालगतच्या गल्लीतून अचानक विरुद्ध दिशेने होन्डा वर्ना cgo4-hs-1123 क्रमांकाच्या कारने वेगात येऊन पत्रकार सुदर्शन बागडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यामुळे बागडे हे आपल्या दुचाकीवरुन उसळून खाली पडले मात्र कारचालकाने अपघात झाल्यानंतर देखील थांबून फिर्यादीची विचारपूस न करता चारचाकी पुढे दामटली.यामुळे बागडे यांनी कारचा मोबाईलने फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल देखील फूटला असल्याचे बागडे यांच्या लक्षात आले.टच स्क्रीन फूटल्यामुळे त्यांना मोबाईल उघडताच आला नाही त्यामुळे चारचाकी चालक हा पळून जाऊ नये म्हणून बागडे हे सरळ चारचाकीसमोर उभे झाले व कार थांबवण्याचा प्रयत्न केला.मात्र कार चालकाने सरळ बागडे यांच्या अंगावर कार घातली.अचानक उद् भवलेल्या या परिस्थितीत बागडे यांना कारच्या बोनटवर चढू कि बाजूला होऊ असा त्यांचा गोंधळ उडाला.नेमक्या त्याच वेळी कारचालकाने तीस ते चाळीस फूट अंतरापर्यंत बागडे यांच्या अंगावर गाडी चढवली,सुदैवाने बागडे हे लगेच बाजूला झाले,एवढंच नव्हे तर माझ्याच कारचे पंचवीस हजारचे नुकसान झाले असे सांगून कार मालकाने शेजारच्या इमारतीत जाऊन कार पार्क केली.
बागडे यांनी त्या इमारतीत जाऊन त्यांना जाब विचारला.या अपघातानंतर जमा झालेल्या लोकांनी देखील ‘अंकल तुम्हारी गलती है‘असे कार चालकाला बजावले.गल्लीतून येताना एवढ्या वेगाने कार चालवत सरळ मुख्य रस्त्यावर येऊन एका दुचाकी चालकाला धडक देऊन खाली पाडले असतानाही अपघात स्थळी न थांबता कार सरळ फिर्यार्दीच्या अंगावरच पळून जाण्यासाठी चढवण्याचा प्रयत्न केला.यावेळी बागडे यांनी १०० क्रमांकावर वारंवार फोन केले मात्र प्रतिसाद मिळाला नाही.
हीच संधी साधत कार मालाकाचा मुलगा,एका नगरसेविकेचा मुलगा,रसूख असणारे कार मालकाचे आप्त-स्वकीय यांनी एकत्रित जमून बागडे यांनाच धारेवर धरण्यास सुरवात केली.बागडे हे पोलिस कारवाईवर अटल असल्याचे बघून मग बागडे यांना तडजोडीसाठी सुरवातीला पाच हजार रुपयांचे आमिष दाखवण्यात आले यानंतर ही रक्कम पंचवीस हजार रुपयांपर्यंत पोहोचली.या सर्व संभाषणाची ऑडियो क्लिप फिर्यादी यांनी पुरावा म्हणून जपून ठेवल्या आहेत.
यानंतर १०० क्रमांकावर एकदाचा कॉल लागला.मार्शल हे घटनास्थळी पोहोचले.त्यांनी पार्किंगमधील कार कोणाची आहे?अशी सुरक्षा रक्षकाला विचारणा केली.त्यावेळी पाचव्या मजल्यावर राहणारे हरिश जगदीश छाबडा(वय वर्षे ६२)यांची असल्याचे सांगण्यात आले.मार्शल यांनी फिर्यादी यांना पाचव्या मजल्यावर घेऊन गेले व घटनेशी शहनिशा केली.बागडे यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत झाली असून त्यांच्या दूचाकीचे नुकसान झाले सोबतच मोबाईलचा टच स्क्रिन देखील फूटला.पोलिसांनीच मेयो येथे उपचार करुन सदर पोलिस ठाण्यात छाबरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सांगितले.
सदर पोलिस ठाण्यात बागडे तक्रार नोंदवण्यास गेले असता तेथील पोलिसांनी तक्रार नोंदवण्या ऐवजी तक्रार नोंदवण्यापासून ‘परावृत्त‘ करण्याचाच निरंतर प्रयत्न घडला.पोलिस ठाण्यामधूनच अनेक ‘फोनाफोनी’ सुरु झाली.यात नागपूर शहरातील दोन ’गणमान्य’पत्रकारांनी देखील आपले कर्तव्य चोख बजावित बागडे यांच्याशी संपर्क साधला व तडजोड करुन तक्रार न नोंदवण्याचा ‘व्यवहारी’ सल्ला दिला.छाबडा हे घटनास्थळी थांबले असते,भांबावलेल्या व मानसिक धक्का बसलेल्या बागडे यांची थांबून फक्त विचारपूस केली असती तर बागडे यांनी हे प्रकरण आत्मसन्मानाच्या लढ्या पर्यंत नेले नसते.कार चालकाचे वय बघता, स्वत:चे नुकसान सहन करुन देखील निघून गेले असते मात्र असे घडले नाही.
सदर पाेलिस ठाण्यात देखील तक्रार नोंदवण्याची तत्परता दाखवलीच गेली नाही.तक्रार दाखल होऊच नये यासाठीच प्रयत्न करण्यात आले ते देखील पोलिसांकडूनच.सकाळी १२ वा.दरम्यान घडलेल्या दूर्घटनेची तक्रार रात्री दीड वाजता नोंदवण्यात आली,ती देखील साम,दाम,दंड,भेदाची नीती अपयशी झाल्यामुळेच.
शहरातील नामांकित पत्रकाराने देखील बागडे यांना पचंवीस हजार रुपये मिळत असतील तर ते घेऊन प्रकरण मिटवून टाकण्याचा सल्ला दिला तर एका पत्रकाराने पंचवीस हजार नसेल मिळत असेल तर तक्रार नोंदवूनच टाक असे संभ्रमित केले.
महत्वाचे म्हणजे बागडे हे आपल्या तक्रारित जीवे मारण्याचा प्रयत्न या आरोपावर ठाम होते आणि तक्रार नोंवणारे पोलिस अधिकारी कलम ३०७ पासूनच आरोपीला वाचवण्याचा भरकस प्रयत्न करीत होते.हा एकमेव आरोप सोडून संपूर्ण तक्रार नोंदविण्याचे दडपण बागडे यांच्यावर सर्वप्रकारे करण्यात आला.
अखेर बागडे यांनी एवढ्या कडाक्याच्या थंडीत आपल्या पत्नी व लहानग्या मुलीला सदर पोलिस स्टेशनसमोर बोलावून तक्रारीत कलम ३०७ दाखल होईपर्यंत रात्रभर बसवून ठेवणार असा दम दिला.
बागडे हे काहीही केले तरी बधत नसल्याचे बघून अखेर सदर पोलिसांना बागडे यांच्या तक्रारीत जीवे मारण्याचा प्रयत्न अर्थात कलम ३०७ नमूद करावीच लागली.बागडे यांनी तेथील पोलिस निरीक्षकांसोबत ॲड.बागडे तसेच शहरातील नामांकित वकील ॲड.फिरदोस मिर्झा यांचे देखील बोलणे करुन दिले की अश्या प्रकारच्या घटनेत कलम ३०७ ची नोंद होऊ शकते किवा नाही.या दोन्ही वकीलांनी या घटनेत कलम ३०७ लागू होईलच अशी कानउघाडणीही पोलिसांची केली.
अखेर मध्यरात्री सदर पोलिस ठाण्यात हरिश जगदशी छाबडा,वय वर्षे ६२ यांच्या विरोधात दुचाकीने धडक दिल्याने,खाली पडल्याने त्यांच्या अंगावर कार चढवण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीस जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम २७९,३३७,३०७,४२७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
मात्र मध्यरात्रीच लगेचच छाबरा यांच्याकडून देखील बागडे यांच्यावर खंडणी मागण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला,हा गुन्हा नोंदवण्यात सदर पोलिसांची ‘तत्परता’ इतकी ‘वाखाण्याजोगी’ होती, त्यांनी फिर्यादीचे स्टेटमेंट देखील या संदर्भात नोंदवले नाही.
‘
शहाण्याने पोलिस ठाण्याची पायरी चढू नये’असे का म्हणतात?याचा अनुभव काल एका पत्रकाराला देखील आला.त्यांनी तक्रार नोंदवू नये यासाठी ‘जातीचा’देखील दाखला देण्यात आला.मी तुझ्याच जातीचा आहे,माझं तरी ऐक वगैरे वगैरे.या जातीच्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची गळे काढून ओरड करणारे काही महाभाग, न्यायाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईत एका आंबेडकरी अनुयायालाच त्यापासून ‘परावृत्त’ करीत असल्याचे महापातक या घटनेत घडल्याचे दिसून पडतंय.
ऐन करोनाच्या काळात २०२० मध्ये पहील्या लाटेत लकडगंज पोलिस ठाण्यात भटक्या श्वानांसाठी जेवण ठेवले त्यामुळे वाद झाल्याने लकडगंज पाेलिस ठाण्यात फिर्यादी ॲड.अंकिता शहा व तिच्या पतीलाच जी मारहाण झाली त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते.हा आत्मसन्मानाचा लढा ॲड.शहा यांची राज्य मानवाधिकार आयोगापर्यंत लढण्यात आपली संपूर्ण शक्ती खर्ची पडली.यात पोलिस आयुक्तांनी आरोपी पोलिस अधिका-यावर शिक्षा काय केली?तर लकडगंज पोलिस ठाण्यातून त्यांची बदली अंबाझरी पोलिस ठाण्यात केली,एवढंच!
पत्रकार बागडे यांच्यावर देखील खंडणीचा गुन्हा नोंदवून सदर पोलिस ठाण्यातील अधिकारी हे कायद्याचे कितपत पालन करीत आहेत व एका सर्वसामान्य नागरिकाच्या संवैधानिक हक्काचे त्याच्या नैसर्गिक न्यायाचे कितपत संरक्षण करीत आहेत,याचा प्रत्यय येतोय.
बागडे यांचा हा लढा आता लवकरच न्यायालयाची पायरी चढणार असून यात सदर पोलिस ठाण्यातील पाचही पोलिस अधिका-यांना देखील सहआरोपी करणार असल्याचा मानस ते व्यक्त करतात.




आमचे चॅनल subscribe करा
