

माध्यमांशी बोलताना का चिडले होते शरद पवार?झाला उलगडा महाराष्ट्राला
डॉ.ममता खांडेकर
(Seniour journalist)
नागपूर: गेल्या एक महिना दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील ‘सत्तानाट्य’’ अख्खा महाराष्ट्र ‘हतबल’होऊन नुसता बघत नाही तर ‘सोसत’होता. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या मतदानासाठी बाहेर पडणारा मतदार याने विचार ही केला नसेल की निवडणूक निकाल लागल्यानंतर त्याच्या मताचा महाराष्ट्रातील चारही अग्रगण्य राजकीय पक्ष् असा ‘घोडेबाजार’करतील!आज २६ नोव्हेंबर झाली तरी महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले नाही विशेष म्हणजे ज्यांना स्पष्ट बहूमत दिले त्यांनीच मतदारांचा सर्वाधिक अपमानच नव्हे तर ‘विश्वासघात’केला असल्याची भावना भारतीय जनता पक्ष् व शिवसेनेच्या मतदारांच्या बोलण्यात प्रकर्षाने जाणवत आहे.
२४ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यावर आणि स्पष्ट बहूमत मिळाल्यानंतर देखील विधान सभेची मुदत संपेपर्यंत भाजप-शिवसेनेने ‘मुख्यमंत्री’पदाचा विषय ताणून धरला. यातही शिवसेनेने त्यांच्या समर्थनाशिवाय आता भाजप सत्ता स्थापन करु शकत नसल्यामुळे निवडणूकीपूर्वी कधीही शिवसेनेकडून मतदारांसमोर चर्चिल्या न गेलेला शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाचा विषय अचानक अग्रस्थानी आणला आणि भाजपसोबत चर्चाच करण्यास नकार दिला. खरी अहंकाराची लढाई येथूनच सुरु झाली. भाजप पाच वर्षे तर काय अडीच वर्षेही मुख्यमंत्री पद शिवसेनेस देण्यास तयार नव्हती. कोण खोटं बालतंय,सत्य बोलण्यात कोण राजा हरिशचंद्रांचे वंशज आहे, हे पराकोटीचं ‘वस्त्रहरण’महाराष्ट्राची जनता मुकाट्याने बघत होती(कारण याशिवाय संवैधानिक लोकशाहीने दुसरा कोणताही पर्याय मतदारांसमोर अद्याप तरी ठेवला नाही,निवडून दिलेले आमदार परत बोलावणे वगैरे)कडेलोट तर तेव्हा झाला जेव्हा अचानक महाराष्ट्रातील राजकारणातील तीन परस्पर विरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्रित घरोबा करण्याचे ठरवले आणि महाराष्ट्राची जनता ‘अवाक’झाली.सत्ते पुढे तत्वनिष्ठा,विचारधारेशी बांधिलकी वगैरे ‘गेली उडत’.
ज्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च न्यायालयात भगवान श्रीरामाचेच अस्तित्व नाकारले होते,राम सेतू वगैरे या कपोल कल्पित गाेष्टी आहेत असे स्वाक्ष् रीने लिहून दिले होते,रामाचा जन्म अयोध्येत झालाच नाही असा कंठशोष ज्यांनी केला त्यांच्याकडे श्रीरामाचे भक्त असणारी शिवसेना यांनी पाठींब्यासाठी धाव घेतली! ज्या शरद पवार यांनी कधीही साधन सूचितेचे राजकारण केले नाही असा आरोप होतो त्यांच्यावरच विश्वास ठेऊन संजय राऊत यांनी कायम आपली तोफ डागली आणि मित्र पक्ष्ाला आणखी दूरावले. सत्तेसाठी हे चारही राजकीय पक्ष् यांनी विचारधारेला जी तिलांजली दिली हे बघून महाराष्ट्रातील जनता ही निश्चितच दू:खी झाली. शिवसेनेने आपले हिंदूत्व सोडले, भारतीय जनता पक्ष्ाने भ्रष्टाचाराचा मुद्दा सोडला, राष्ट्रवादीने आणि काँग्रेसचाही ‘धर्मनिरपेक्ष् तेचा’मुखवटा गळून पडला.उबग आला होता जनतेला या चारही पक्ष्ांच्या राजकारणाचा. जनतेला राष्ट्रपती भवन,राज्यपाल,केंद्रिय नेतृत्व काय करतात आहेत यात रस नव्हता तर ज्यांना बहूमताने निवडून दिले त्यांनी अद्याप सत्ता स्थापन करुन कारभाराला का सुरवात केली नाही?याची चीड मनात धगधगत होती. हवालदिल शेतकरी आणि निराश,हताश बेरोजगार तरुण यापेक्ष्ाही ज्वलंत धग होती ती विचारधारेच्या विरोधात या चारही पक्ष्ांच्या वागण्याची!
बैठका वर बैठका, तडजोडी,एकेकाळी मातोश्रीवर माथा टेकणाऱ्यांच्याच घरी उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी माथा टेकणे अनेकांना रुचले नाही. महाराष्ट्राच्या निवडणूकीत जे फिरकलेच नाही त्या काँग्रेसमधील गांधी घराण्याच्या निर्णयाला सत्ता स्थापनेत पुन्हा प्राप्त झालेले महत्व हे महाराष्ट्रातील काँग्रेसी नेतृत्वाची हतबलताच पुन्हा एकदा अधोरेखीत करुन गेली..विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता तयार झाली असताना राष्ट्रवादीला अचानक सत्तेचं दिवास्वप्न पडावं तसा क्षणाक्षणाला सुटलेला ‘लोभ’याचेही दर्शन महाराष्ट्राला घडले.
यातही शरद पवार यांची पंतप्रधान मोदींसोबत झालेली एकांतातील चर्चा याने गूढ आणखी वाढले.या बैठकीत भाजप-राष्ट्रवादीने मिळून सत्ता स्थापन करावी असे ठरले होते असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी कालच केला. नंतर शरद पवार यांनी भूमिका बदलली आणि त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचे ठरवले,त्यातही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदावरुन शरद पवार व अजित पवार यांच्यात बिनसले. पार्थ पवार यांच्या पराभवाचे शल्य, तिहेरी आघाडीत राष्ट्रवादीच्या वाट्याला येणारे मोजके मंत्रालय त्यातही सुप्रिया सुळे व रोहित पवार यांचे वाढलेले महत्व या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी केलेले बंडं(ही देखील शरद पवार यांचीच खेळी होती भाजपला त्यांच्याच खिंडीत पकडण्याची व संपवण्याची अशी चर्चा आहे)शेवटी मुख्यमंत्र्यांना विधान सभेच्या पटलावर बहूमत.सिद्ध करण्यापूर्वीच द्यावा लागणारा ‘लाजिरवाणा’राजीनामा हे नाट््य म्हणजे ‘वस्त्रहरण’नाटकातील दूसराच अंक होता. या पुढील अंक आता महाशिवआघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर रंगणार असल्याचे म्हटले जाते.
प्रश्न होता तो शरद पवार हे माध्यमांवर चिडण्याचा…! शरद पवार व अजित पवार यांच्यातील चर्चेनंतर त्यांच्यात असे काय बिनसले होते की ते थेट मी बारामतीला चाललोय…बैठक रद्द झाली असे माध्यमांना खोटे सांगून निघून गेले होते!याबाबत शरद पवार यांना विचारताच मोठे पवार साहेब जाम भडकलेत…त्यांचेच शब्द आहे ’तुम्ही जर अजित पवार निघून जाण्याचा असाच अर्थ घेणार असाल तर मी या पुढे तुमच्याशी बोलणार नाही…कोणतीच प्रतिक्रिया देणार नाही..!आणि तिथे उपस्थित प्रचार-प्रसार माध्यमांनी लगेचच साहेबांची माफी मागून ‘सॉरी सर,सॉरी सर’वादावर पडदा टाकला.शरद पवार यांचा त्या क्ष् णी पराकोटीच्या चिडण्यामागे कोणती ‘खिचडी’शिजत होती याचा उलगडा मंगळवारी अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे झाला.अजित पवार यांना भाजपसोबत जायचे होते तर शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपचं अस्तित्वंच मिटवायचं होतं,ते ही शिवसेनेच्या सहाय्याने!
अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर विश्वास ठेऊन जी ‘आंधळी कोशंबिर’खेळली त्यामुळे ते चांगलेच तोंडघशी पडलेत. आतापर्यंत जनतेची सहानूभूती तरी त्यांच्या पाठीशी होती कि सर्वात मोठा पक्ष् असताना भाजपला तिन्ही पक्ष् मिळून सत्तेबाहेर ठेवले जात आहे…अजित पवार यांच्याशी हातमिळवणी करुन फडणवीस यांनी ती सहानूभूती देखील गमावली आहे. अजित पवार यांनी देखील आपलं संपूर्ण राजकीय अस्तित्वं पणाला लावलं असलं तरी राष्ट्रवादीतच त्यांनी स्वत:ला संपवलं आहे. या कोलांटीउडीत त्यांचा एकच फायदा झाला ४८ तासांच्या उपमुख्यमंत्री पदादरम्यान त्यांच्यावरील ९ केसेस या मागे घेण्यात आल्या. फडणवीस सरकार किती वेगाने काम करु शकतं याचे हे नेत्रदिपक उदाहरण होते.जर अजित पवार यांनी ही खेळी शरद पवार यांच्या सांगण्यावरुन केली नसेल तर त्यांनी आपली विश्वासहर्ताच गमावली आहे त्यांच्या राष्ट्रवादीतील भवितव्यावर कायमचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. ते फक्त शरद पवार यांचे पुतणे म्हणून उरलेत आणि म्हणूनच भाजपच्या लेखी देखील त्यांची किंमत ‘शून्य’झाली.
या सत्तानाट्यमुळे चांगले काही घडलेच असेल तर संस्कार,विवेकाची गाठोडी घेऊन मिरवणारे चारही पक्ष् हे जनतेसमोर ‘उघडे’पडले हीच जमेची बाजू म्हणावी लागेल. यांचा खरा चेहरा जनतेला बघायला मिळाला.सत्तेसाठीची लाचारी यांना रात्रीच्या अंधारात आणि दिवसाच्या उजेडात काय-काय करायला लावते याचा अनुभव नवीन पिढीने तरी पहील्यांदा घेतला आहे.अर्थात पवारांचा राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना वेगळे काही सांगायला नको.
आता महाशिवआघाडीने बहूमत सिद्ध केले तरी त्यांचा ‘संसार’कसा होतो याचे उत्तर येणारा काळच देईल. महाराष्ट्राचा मतदार मात्र या सर्व खेळात चांगला फसवला गेल्याची भावना आहे. युतीमुळे शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये भाजपचा मतदार होता तर राष्ट्रवादीला किंवा काँग्रेसला मतदान करणाऱ्या मतदारांमध्येच निश्चितच शिवसेनेचा मतदार हा नव्हता त्यामुळे या चार ही पक्षाने मिळून शेवटी मतदारांचीच फसवणूक केल्याची भावना जनतेमध्ये आहे.पुन्हा निवडणूक घेऊन या चारही पक्ष्ाने संपूर्ण २८८ जागांवर निवडणूक लढवून आपापले बाहूबल तपासावे व जनतेचा स्पष्ट कौल घेऊन महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात, संतांची भूमी म्हणून ओळख असणाऱ्या तसेच ज्यांनी देशाला संविधान दिले त्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या भूमीत जनतेच्या मताचा आदर करुनन सत्ता स्थापन करावी अशी त्यांची भावना आहे. आमदारांनी निवडणूकीत किती कोटी खर्च केले,विदर्भाच्या आमदारांनी ३-४ कोटी तर पश्चिममधील आमदारांनी १३-१४ कोटी या निवडणूकीत खर्च केल्याची चर्चा आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा लगेच निवडणूक नको हवी आहे,महाराष्ट्राच्या जनतेला या व्यवहाराशी काही एक घेणे-देणे नाही त्याला फक्त त्यांनी ठराविक पक्षाच्या विचारधारेशी बांधिलकी स्वीकारुन केलेले मतदान याची त्याला प्रामाणिक परतफेड हवी आहे बस एवढेच.




आमचे चॅनल subscribe करा
