
मेयाे रुग्णालयात करोना रुग्णांची विदारक स्थिती:वृद्ध महिलेने तडफडून सोडले प्राण
करोना योद्धे म्हणतात ‘हमको मत सिखा!’
ग्रामीण भागात पसरला करोना!रुग्णांची अमरावतीपर्यंत धाव
नागपूर,ता. ९ मार्च:उपराजधानीच्या लोकसंख्येलाच शहरातील शासकीय रुग्णालयांची यंत्रणा, कोविड महामारीच्या साथीवर तोकडी पडत असताना आता ,ग्रामीण भागात देखील करोनाचा स्फोट झाला असल्याचे निर्दशनास आले आहे.जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी याच अनुषंगाने ग्रामीण भागात ऑक्सीजन बेडची उपलब्धता करण्यात येणार असल्याचा सूतोवाच केला आहे.मात्र असे असले तरी ग्रामीण भागातील रुग्ण हे विदर्भाची ‘आरोग्य पंढरी’ म्हणून ओळख असणा-या मेयो व मेडीकलकडेच धाव घेताना दिसत आहे.अशातच काल ८ एप्रिल रोजी मेयोसमोर ग्रामीण भागातून अालेल्या करोना रुग्णांनी मेयोमध्ये खाटा उपलब्ध नसल्याने तेथील परिसराचाच आसरा घेतला असल्याचे भयाण दृष्य उमटले!
अनेक रुग्ण हे रुग्णवाहिकेतच तातकळत होते तर अनेक रुग्णांचे नातेवाईक हे मेयो प्रशासनाला तातडीने रुग्णांवर उपचार करण्याची ‘याचना’करीत असताना दिसत होते. मात्र करोना योद्धे म्हणून ज्यांचे कौतूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी केले होते त्या योद्धांचे त्या रुग्णांसाठीचे शब्द होते ‘हमको मत सिखा!’
एका वृद्ध महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता,तिचा मूलगा हा मेयो प्रशासनाला वारंवार आईला ऑक्सीजन लावण्यासाठी याचना करीत होता मात्र ‘निगरगट्ट‘झालेल्या मेयो प्रशासनाला कोणतीही दया येत नव्हती.अवघ्या काही वेळातच त्या वृद्ध आईने तडफडून मुलाच्या डोळ्यांदेखत जगाचा निरोप घेतला!हतबल होऊन मूलाने हंबरडा फोडला.
ज्या आरोग्य पंढरीत रुग्णांचे प्राण वाचायला हवे त्याच परिसरात आता पटापट मृत्यू झडप घालित आहे.एका रुग्णाच्या भावाने व १२ वर्षाच्या चिमुरडीने रुग्णाला मेयोचे हे ‘रंगढंग‘बघून मेडीकलमध्ये हलविण्याचा निर्णय घेतला पण…..खूप..उशिर झाला होता.मेयोच्या परिसरातच त्याने देखील तडफडून आपले प्राण सोडले!
आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडला आहे,हे मान्य केले तरी यासाठी जनता दोषी आहे का?७० वर्षात काय केले?१३० कोटींच्या या देशात कधीही महामारी पसरु शकते,नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो,शहरी तसेच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा अद्यावत करण्याचे काम हे जनतेचे होते का?राष्ट्रीय महामार्ग व पुलांऐवढीच आरोग्य यंत्रणा महत्वाची नव्हती का?
शासकीय रुग्णालयातून डीग्री घेणारे डॉक्टर्स यांनी मोठमोठी खासगी रुग्णालये थाटली,तिथपर्यंत शहरी मध्यम वर्गीय माणसाचीच झेप पोहोचत नाही तर ग्रामीण भागातील गरीब रुग्णांची काय बिसात?खासगीत जाताच लाखोंची ‘अनामत रक्कम’आधी भरावी लागते मग रुग्णावर उपचार सुरु होतात.शासकीय रुग्णालयात पोहोचणा-या अतिसामान्य रुग्णांना किमान ऑक्सीजन सुरु करण्याची तसदी देखील मेयोमधील निगरगट्ट झालेली वैद्यकीय यंत्रणा का घेत नाही?
पांढ-या कोटमधील ’देवदू’त हे केव्हापासून जीव घेणारे जल्लाद बनलेत?प्रत्येकाचे प्राण वाचविण्याची शपथ घेतली होती ना?मग प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात का कुचराई केली जात आहे?खाट उपलब्ध नाही,दूसरीकडे घेऊन जा,हे त्यांच्यासाठी फक्त ‘शब्द’असले तरी जीवाच्या आकांताने त्यांच्या दारावर येणा-या रुग्णाच्या अाशेचा तो जिवंतपणीच मृत्यू नसतो का?
मेयोचे अधिष्ठाता डॉ.केवलिया हे कधीच फोन उचलत नाहीत,कदाचित रुग्णांचे प्राण कसे वाचवावे?या स्वरुपाच्या बैठकीतच ते जिल्हाधिकारी किवा मनपा आयुक्त किवा पालकमंत्र्यांसोबत व्यस्त राहत असावेत,मात्र हेच हाल मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांचे देखील आहे,त्याचे काय?
फक्त बैठकांवर बैठका घेऊन व कागदी घोडे नाचवून,आकड्यांची जगलरी करीत रुग्णांचा जीव वाचत असतो का?प्रत्यक्ष् ग्राऊंडवर काय घडत आहे?मेयो परिसरातच रुग्ण हे तडफडून प्राण सोडत आहेत,त्यांचे नातेवाईक हतबल होऊन अश्रूंमध्ये न्हाऊन निघत आहेत,प्रशासनाकडे एकच उत्तर…१३ महिन्यात आता आम्ही खूप थकलो…त्यामुळे आता करोनाने ज्यांना मरायचे आहे त्यांनी मरावे…!
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमात पुन्हा एकदा ज्यांना बेड मिळत नाही,रेमडिसिविर मिळत नाही अश्यांनी त्यांच्या पी.ए.ला फोन करावा अशी घोषणा करुन इतिकर्तव्यता मानली,या ऐवजी ऑक्सीजनयुक्त रुग्णवाहिका का नाही धावत नागपूर शहराच्या रस्त्यांवर नागरिकांचे प्राण वाचवत? साढे आठ हजार कोटींच्या मेट्रोपेक्ष्ा मोठमोठी सुपर स्पेशलिटी रुग्णालयांची आज शहराला गरज नव्हती का?वेंटिलेटर,ऑक्सीजनयुक्त रुग्णालये असती तर अनेकांचे प्राण हे निश्चितच वाचले असते मात्र असे घडलेच नाही.
एका रुग्णाला तर रुग्णवाहिकेच्या चालकाने अमरावतीच्या सुपर स्पेशलिटीला जाण्यासाठी १० हजार रुपये दर मागितले!जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी अमरावतीचे हे रुग्णालय कोविड-१९ च्या उपचारासाठी सुसज्ज असल्याचे घोषित करुन पाठ ठोकून घेतली मात्र हे रुग्णालय नागपूरपासून १०० किलोमीटर दूर मरणाच्या दारात पोहोचलेल्या रुग्णासाठी कोणत्या उपयोगाचे?त्यापेक्ष्ा नागपूरातच का असे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले नाही?

दूसरीकडे माजी मुख्यमंत्री हे महिन्यातून एकदा उपराजधानीत फक्त ’विजिट’ देण्यासाठी अवतरतात,त्यांच्यावर सोशल मिडीयावर एक जळजळीत पोस्ट खूप व्हायरल होत आहे.ती पोस्ट वाचून तरी माजी मुख्यमंत्र्यांनी आता तरी आपल्या शहराचे श्मशान होत असताना येथेच थांबावे,असा सल्ला देण्यात आला आहे.
तिसरीकडे प्राथमिक आरोग्य व्यस्थेची ज्यांच्यावर इतकी महत्वाची जवाबदारी आहे ती नागपूर महानगरपालिका ही कोविड-१९ च्या काळात तर अक्ष् रश:मृतवत झाली आहे.कहर म्हणजे मनपा आयुक्तांनी नागरिकांनाच मनपा मुख्यालयात येण्याची मनाई केली असून मुख्य दारच बंद करुन टाकण्यात आले आहे.याचा अर्थ नागरिकांना जे काही मरायचे आहे ते मुख्यालयाबाहेरच मरावे,करोना त्यांनी मुख्यालयात पसरवू नये!ॲपवरच्या तक्रारी वातानुकूलीन कक्ष्ात बसून किती सोडवल्या जातात हा वेगळ्या संशोधनाचा भाग आहे.पगार मात्र कोविड-१९च्या महामारीच्या काळातही पूर्ण मिळतोय.हेच मनपा आयुक्त शहरात संपूर्ण ठाण बंदी अगदी चेह-यावरची रेष ही हलू न देता आरामात घोषित करतात,दूसरीकडे सदैव सुहास्य वदन असणारे जिल्हाधिकारी यांचे तर प्रयत्नच महामारी रोखण्यात किती यशस्वी झाले,हे दररोजचा मृत्यूचा आकडाच सांगत आहे.पालकमंत्री यांच्याविषयी न बोललेलंच बरं!जनतेकडे पालकमंत्र्यांच्या एकदंरित हरफनमौला कारभारासाठी शब्दच नाही.
मेडीकल रुग्णांच्या सेवेसाठी सदैव तत्पर:डॉ.अविनाश गावंडे
दूसरीकडे शासकीय मेडीकल रुग्णालय कोविड-१९ च्या रुग्णांना आपल्या परिसरात मेयोसारखे तडफडून मरणासाठी वा-यावर सोडत नाही.वेळ पडली तर एकाच खाटेवर दोघांना झोपवून आधी ऑक्सीजनचा पुरवठा सुरु केला जातो असे मेडीकल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्ष् क डॉ.अविनाश गावंडे यांनी सांगितले.
मेडीकलवर देखील रुग्णांचा प्रचंड ताण वाढला आहे,मात्र तेथील वैद्यकीय स्टाफ हा अद्याप तरी रुग्णांप्रति कर्तव्याची भावना विसरला नाही,गेल्या १३ महिन्यांपासून रुग्णांना बरं करण्यासाठी तेथील स्टाफ हा अविरत परिश्रम घेत आहे.पांढ-या कोटमधील अश्यावेळी ते खरे देवदूतच रुग्णांना भासतात.
मेयोचे अधिष्ठाता हे कागदी बैठकांमधून वेळ काढून मेडीकल प्रशासनाकडून माणूसकीचा काही बोध घेतील का?
…………………………………………
(व्हिडीयो सौजन्य:नागपूर न्यूज)




आमचे चॅनल subscribe करा
