

मुलाच्या लग्नासाठी दोन दिवस रस्ता अडवला: महापालिकेची कारवाई
नागपूर,ता. २३ डिसेंबर: माजी महापौर व प्रभाग ३७ मधील भाजपच्या नगरसेविका नंदा जिचकार यांच्यावर महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनने चक्क नियमांची पायमल्ली केल्याने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला!
मुलाच्या लग्नाच्या मंडपासाठी घरासमोरील रस्त्याच्या बाजूला १९ व २० डिसेंबर रोजी त्यांच्या प्रतापनगर निवासस्थानी १५० वर्ग मीटर जागेची परवानगी त्यांनी घेतली होती. पंरतू त्यांनी संपूर्ण रस्त्यावरच दोन दिवस मंडप उभारला!
महापौर संदीप जोशी यांच्यापूर्वी महापौर म्हणून त्यांनी अडीच वर्षे शहरातील प्रथम नागरिकाचे पद भूषवले होते.असे असताना त्यांनाच नियमांचा विसर पडावा,याबात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किंबहूना अर्जामध्ये फक्त १५० वर्ग मीटरची परवानगी मागितली असताना खोटारडेपणा करुन संपूर्ण रस्ताच दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली,नागरिकांना मनस्ताप झाल्याने परिसरातील नागरिकांनीच लक्ष्मीनगर झोन कार्यालयात याबाबतची तक्रार नोंदवली.
आपण माजी महापौर असल्याने आपल्यावर मनपाचे नियम,अटी लागू होत नाही,असा समज नंदा जिचकार यांचा झाला असावा मात्र तक्रार प्राप्त होताच झोन अधिका-यांनी तात्काळ माजी महापौरांकडून टाकण्यात आलेल्या मंडपाची तपासणी करण्यासाठी पथक पाठवले.
यात नियमांची सर्रास पायमल्ली झाल्याचे पथकाला आढळून आले.महापौरांनी संपूर्ण रस्ताच कवेत घेऊन २० बाय २० क्ष्ेत्रफळात भव्य-दिव्य मंडप उभारणी केल्याचे आढळून आले.यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने मंडप काढला.यासोबतच माजी महापौर नंदा जिचकार यांच्यावर ५ हजार रुपयांचा दंड ही ठोठावला.
माजी महापौरांनी हा दंड भरल्याचे एका अधिका-याने नमूद केले. सोनेगाव वाहतूक विभागाने देखील माजी महापौर नंदा जिचकार यांचे पती,निवृत्त आरटीओ अधिकारी शरद जिचकार यांना नोटीस बजावली असल्याची माहिती आहे.
यापूर्वी देखील महापौर पदी असताना स्वीय सहायकाच्या नावाखाली आपल्या मूलालाच आपल्यासोबत मनपाच्या पैश्यांवर परदेश वारी घडवल्याने नंदा जिचकार या चांगल्याच वादात सापडल्या होत्या,हे विशेष!




आमचे चॅनल subscribe करा
