
ऑन स्क्रीन ‘झुंड’नागपूकरांचा अभिमान वाढवणारा
नागराज मंजुळेंच्या ‘पुणेरी’ बाऊंसरच्या वैदर्भिय शिव्या
राजकारण्यांच्या उपस्थितीने दर्शकांचे हाल:झी स्टूडियोचा ढिसाळ कारभार
नागपूर,ता.६ मार्च २०२२ : प्रा.विजय बारसे यांच्या अभिमानास्पद कारकिर्दीवर आधारीत असणारा व सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या परिसस्पर्शाने साकार झालेला ‘झुंड ’हा बहूप्रतिक्षीत चित्रपट काल शुक्रवारी रिलीज झाला.आज या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन झी स्टूडियोतर्फे सदर येथल स्मृति चित्रपटगृहात सायंकाळी ६ वा.करण्यात आले होते मात्र आयोजकांच्या ढिसाळ आयोजनाचा फटका महिला वर्गाला सर्वाधिक बसला,अनियंत्रित व अलोट गर्दीचा फायदा घेत काही समाजविघातक व मनोविकृत तत्वाने महीला व तरुणींशी अश्लील चाळे केले.यावेळी राजकारण्यांच्या अनावश्यक उपस्थितीने देखील गर्दीच्या सहनशीलतेचा कळस अनुभवला.पुणेरी व नागपूरकर बाऊंसरसोबतच सदर पाेलिस ठाण्यातील पोलिस कर्मचा-यांच्या ही नियंत्रणाचा कस लागला मात्र अलोट गर्दी,संदल,फटाके,आतिषबाजी,पुष्पवर्षा या सर्व गोंधळामुळे नियोजनाचा फज्जा तर वाजलाच मात्र नागपूर शहरातील कलाकृतीवर प्रेम करणा-या रसिक प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला.
या चित्रपटाचे संपूर्ण कलावंत हे नागपूरातील गड्डी गोदाम झोपडपट्टी येथील असल्याने संपूर्ण गड्डी गोदामच नव्हे तर जणू नागपूर शहरातील संपूर्ण झोपडपट्ट्यांमधील तरुणाई स्मृति टॉकीजच्या परिसरात अवतरली होती.त्यावर कहर म्हणजे नागपूरकर प्रेक्षकांसाठी देखील सायंकाळी ६ वा.च्या शोची तिकीटे विक्री करण्यात आली होती यामुळे सभ्य समजल्या जाणा-या वर्गातून अनेक महिला व तरुणी हा चित्रपट बघण्यास आले होते.दिग्दर्शक मंजुळे,प्रा.विजय बारसे,नायिका सायली पाटील यांच्यासह चित्रपटात भूमिका बजावणारे संपूर्ण कलावंतांसोबत संदलच्या ठेक्यासोबत रोड शो काढण्यात आला.याच वेळी अलोट गर्दीने रस्ता जाम झाला होता.यानंतर चित्रपटगृहाच्या आतील परिसरात फटाकेबाजी करण्यात आली त्यासोबतच कर्णककर्श आवाजात डिजे वाजचत राहीला.चित्रपटगृहाच्या गच्चीवरुन लाल फूलांचा वर्षाव मंजुळे,बारसे व कलावंतांवर केल्या जात होता.यामुळे देखील तरुणाईला ‘झुंडशाही’चा अतिरेकी जोश चढला.पोलिसांनी फटाक्याच्या लढ्या जप्त केल्या तरी देखील तरुणांचा अतिरेकी जोश कमी झाला नव्हता.
यावर कहर म्हणजे आयोजकांनी नागपूरचे खासदार नितीन गडकरी,माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे,पालकमंत्री नितीन राऊत,सुलेखा कुंभारे,जि.प.अध्यक्षा रश्मी बर्वे,गिरीश गांधी आदी व्हीआयपी राजकारण्यांना देखील शुभेच्छापर संदेश देण्यासाठी आमंत्रित केले असल्यामुळे त्यांना बघताच आयोजकांचा ‘जोश’ आणखी वाढत होता,अलोट व अनियंंत्रित गर्दीला स्फूरण चढत होते.कहर म्हणजे चित्रपटगृहाच्या आत जाणा-या दोन्ही गेटवर प्रेक्षकांची अलोट गर्दी आत जाण्यासाठी ताटकळत राहून धक्काबुक्की करीत असतानाही नागपूरच्या काळ्या ड्रेसवरील बाऊंसर्सनी दोन्ही दारे अडवून ठेवली होती.एक दार हे फक्त व्हीआयपींसाठीच असल्याचे सांगत दूस-या दाराकडे गर्दीला लोटत होती त्यामुळे लहान मुलंची रडारड सुरु होती,महिला मुलींना नको तिथे चिमटे काढले जाऊ लागले,त्यांना ना आत जाऊ दिले जात होते ना त्यांना गर्दीबाहेर पडता येत होते.
व्हीआयपींसाठी जरी ते दार राखीव ठेवण्यात आले असले तरी अलोट गर्दी बघता प्रसंगावधान राखून दोन्ही दारे उघडून गर्दीला आधी आत घेतल्या जाऊ शकले असते मात्र बाऊंसर्स वर्गवारीला शिवाय मुजोरीच्या, इतर भाषा कळत नाही,असाच अनुभव नागपूरकरांनी अनेकदा अनुभवला आहे.
मुख्य दारा एवढीच गर्दी प्रांगणात होती जिथे मंजुळे हे माध्यमांना बाईट देण्यासाठी सज्ज होते मात्र परिसरातही अलोट गर्दी असल्यामुळे शेवटपर्यंत ते काय बोलले हे कोणालाही ऐकू आलेच नाही आणि मंजुळे यांचे देखील अर्धे लक्ष हे गर्दीच्या गोंधळाकडेच होते.झी स्टूडियोने माध्यमांना पाठवलेल्या निरोपानुसार संदल,मिरवणूक यानंतर सायंकाळी ६ वाजता शो सुरु होईल,लगेच मंजुळे हे चित्रपट थांबवून माध्यमांशी संवाद साधतील मात्र असे काहीही घडले नाही,चित्रपटगृहाच्या परिसरातच मंजुळे हे बोलते झाले परिणामी माध्यमकर्मींचे बूम देखील एका जागी स्थिर राहूच शकले नाही,अनेक माध्यमकर्मी हे त्या गर्दीतून बाहेर निघून गेले.याच गर्दीला मंजुळे यांचे पांढ-या ड्रेसमधील ‘पुणेरी’बाऊंसर्स अस्ललखित कमरे खालच्या शिव्या झाडत होते मात्र ते कॅमराबद्ध करण्यासाठी व उभं राहण्यासाठी देखील जागा शिल्लक नव्हती,त्यांच्या अतिशय घाणेरड्या शिव्यांबाबत मंजुळे यांना सांगितले असता त्यांनी ‘मी फक्त माफी मागतो’,अश्या दोन शब्दात त्यांनी टरकावून लावले.
बारसे यांचे कुटुंबिय हे नक्कीच आनंदात हाेते,त्यांच्या वडीलांच्या जिवनावर आधारित चित्रपटाला नागपूकरांनी उत्तम प्रतिसाद दिला होता मात्र झी स्टूडियोच्या अतिशय ढिसाळ आयोजन व ‘अतिरंजित’ स्वागतामुळे मध्यम वर्गीय चित्रपट रसिक हा चांगलाच भरडला गेला.
ऑन स्क्रीन चित्रपट सुरु असताना देखील चित्रपटातील गाण्यांवर प्रेक्षक मंचावर चढून नाचत होते.थोडक्यात नागपूरकरांचा अभिमान असणा-या एका अतिशय दर्जेदार चित्रपटाच्या विशेष शो मध्ये आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे ख-या चित्रपट रसिकांना आज जो अतिशय वाईट अनुभव आला तो अवर्णातीत आहे,असेच आता म्हणावे लागेल.
‘झुंड‘स्टार रेटिंगमध्ये पाच पैकी पाच गूण मिळवण्यासारखा चित्रपट:सबकुछ अमिताभ
दोन वर्षांपूर्वी नागपूरच्या कडकडत्या थंडीत जेव्हा कधी नव्हे तो पारा ३.७ डिग्री सेल्सियसपर्यंत घसरला होता,शहरात अस्थमा आणि दमाच्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत होते,अश्या विपरित स्थितीत वयाची सत्तरी ओलांडलेला एक महानायक अमिताभ बच्चन नागपूरात गड्डी गोदामसारख्या झोपडपट्टीत सलग चित्रीकरण करीत होता. त्यावेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिेयत त्यांनी नागपूरच्या थंडीविषयी भाष्य ही केले होते.नागपूरची थंडी असहनीय असल्याचे ते म्हणाले होते मात्र तरीदेखील आपल्या कलेप्रति समर्पित या महान कलावंताने संपूर्ण चित्रीकरण करुनच मुंबई गाठले.‘झुंड’ चित्रपट पाहताना त्यांच्या अंगावरील गरम उनीवस्त्र याची पदोपदी जाणीव करुन देत होते.नागपूरचे क्रीडा क्षेत्रातील महनीय विभूती प्रा.विजय बारसे यांच्या जिवनावरील ‘झुंड’ अतिशय प्रेरणादायी चित्रपट असून हा चित्रपट व त्याचे नागपूरातील चित्रिकरण पाहताना मन अभिमानाने भरुन येतं.
मंजुळे यांच्यासारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने पुन्हा एकदा आपली प्रतिभा व कल्पकता सिद्धहस्त केली.अजय-अतुलचे संगीत अर्थातच तरुणाईमध्ये जोश निर्माण करणारे आहे,याचा प्रत्यय पदोपदी चित्रपटगृहात देखील आला.नवखे कलावंत घेऊन त्यांच्याकडून सहज सुलभ अभिनय करुन घेणे ही मंजुळे यांची हातोटी पुन्हा एकदा सिद्ध झाली.झोपडपट्टीतील मुलांचा विद्यापीठाच्या खेळाडूंसोबतची स्पर्धा ही पडद्यावर बघण्यासारखी आहे.सदीचा महानायक हा तर या वयात देखील संपूर्ण पडदा आपल्या भारदस्त अभिनयाने व्यापून टाकतो.मराठी दिग्दर्शक मंजुळे,नागपूरची मुले व अमिताभ यांच्या सहजसुंदर अभिनयाचा आनंद लृटण्यासाठी प्रत्येक नागपूरकराने एकदा तरी बघावा असा चित्रपट म्हणजे ‘झुंड‘आहे.
सोशल मिडीयावर या चित्रपटाविषयी अतिशय दूर्देवी पोस्ट व्हायरल होत आहे की काही सवर्ण नेटीझन्स हेतूपुरस्सर या चित्रपटाला पाच पैकी फक्त एक मानांकन देत आहे कारण त्यात भीमगीत आहे,डॉ.बाबासाहेबांना अभिवादन आहे,त्यांना चोख उत्तर द्या.एखादा कलावंत किवा एखाद्या अप्रतिम कलाकृतीला ‘जात’किवा ‘धर्माच्या’आधाराव जाेखने हा त्या दिग्दर्शकासोबत,कलाकृतीसोबत आणि कलावंतांसोबत अन्याय करण्यसारखाच आहे.त्यामुळे उगाच सोशल मिडीयावर भडकाऊ पोस्ट व्हायरल करुन आपण आपल्याच नागपूरकरांचा अपमान करीत आहोत,याचे भान देखील राहत नाही.
‘झुंड‘ही एक अप्रतिम कलाकृती साकारली गेली असून या चित्रपटाचे खरे नायक प्रा.विजय बारसे यांना ‘सत्ताधीश’चा मानाचा मुजरा.




आमचे चॅनल subscribe करा
