

जाहिरात – परीक्षा – निकाल तिन्हीच्या अंदाजित तारखा
कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी होणार नाहीत
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या परीक्षा व त्यांचे निकाल ऑक्टोबरच्या आत
नागपूर, दि. ११ फेब्रुवारी २०२२: : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२२ वर्षी होणार असलेल्या आयोगाच्या सर्व स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. उप-प्रकारांसह वेगवेगळ्या १३ सेवांच्या परीक्षा नियोजित आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सह सचिव सुनिल अवताडे यांनी प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकानुसार, परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना यावेळी आयोगाने उमेदवारांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्याभिमुख असा वेळापत्रक देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरून, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत. उमेदवारांचे नुकसान होणार नाही. यासंदर्भात विधिमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधिमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.
राज्य सेवा परीक्षा २०२१, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२१, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१, महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२१, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१, पोलीस उप-निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१ व सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२१ या परीक्षांच्या जाहिराती डिसेंबर २०२१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. या सर्व परीक्षा व त्यांचे निकाल जाहीर करण्याचे ऑक्टोबर २०२२ च्या आत नियोजित आहे.
राज्यसेवा परीक्षा २०२२, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२२,महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रीत, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२१,महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा २०२२, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ व सहायक मोटार निरीक्षक परीक्षा २०२२ या सर्व परीक्षांच्या जाहिराती मार्च २०२२ पासून प्रसिद्ध होतील. या सर्व परीक्षा घेणे व त्यांचे निकाल जाहीर करणे २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या आत नियोजित आहे. सर्व परीक्षांमधून भरावयाच्या पदांचा तपशिल व सविस्तर अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेच्या अद्ययावत माहिती व वेळापत्रकात बदल झाल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. महाराष्ट्राच्या होतकरू विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षांची संधी उपलब्ध व्हावी, या धोरणाने आयोग काम करीत आहे असा आशावाद सहसचिवांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
0000




आमचे चॅनल subscribe करा
