फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनमहाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे प्रहसन व नागपूरकांचे हास्य

महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे प्रहसन व नागपूरकांचे हास्य

Advertisements
‘खासदार सांस्‍कृतिक महोत्सव -२०२५ ‘च्या पाचव्या दिवशी उधळले हास्यरंग 

नागपूर, ११ नोव्हेंबर २०२५: हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव–२०२५’ च्या पाचव्या दिवशी सायंकाळी हास्याचे फवारे उडाले. लोकप्रिय दूरदर्शन कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकारांनी सादर केलेल्या प्रहसनांनी रसिक प्रेक्षकांचे अक्षरशः पोट धरून हसवले.
या हास्यरात्रीत प्राजक्ता माळी, सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले, नम्रता संभेराव, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, वनिता खरात, रसिका वेंगुर्लेकर आणि प्रभाकर मोरे यांनी आपल्या खास शैलीत मंच गाजवला.
लाल चुटुक साडीत आकर्षक दिसणारी प्राजक्ता माळी आणि जांभळ्या रंगाच्या लाच्छामध्ये सजलेली सई ताम्हणकर यांची जोडी मंचावर अवतरताच टाळ्यांचा कडकडाट झाला. सई वऱ्हाडी भाषेत बोलायला सुरुवात करत नागपूरकरांचे मन जिंकले.

“नागपूर हा दिलाचा तुकडा आहे. इथले तर्री पोहे-सावजी रस्सा, गुपचुपचं नाव घेताच पाणी सुटतं!” असं म्हणत सईने प्रेक्षकांना आपलेसे केले. पुण्याच्या पाणीपुरी आणि विदर्भाच्या गुपचुपवर तिचे आणि प्राजक्ताचे दिलखुलास संवाद रंगले. “विदर्भात काहीच  गुपचुप नसतं, सगळं उघड असतं – नितीन गडकरी साहेबांसारखं!” या वाक्यावर प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

अपघातग्रस्त पेशंट (पृथ्वीक प्रताप), त्याचा मित्र (रोहित माने), आणि पेशंटची पत्नी (वनिता खरात) यांच्या स्कीटमध्ये नर्स रसिका वेंगुर्लेकर आणि कोकणचा लाडोबा प्रभाकर मोरे यांचं फ्लर्टिंग पाहून हास्याचा वर्षाव झाला. त्यात डॉ. प्रसाद खांडेकरच्या एन्ट्रीने आणखीनच रंगत वाढवली.
नम्रता संभेराव आणि समीर चौगुले यांनी सादर केलेल्या रस्ता सुरक्षा विषयावरील प्रहसनात विनोदासोबत सामाजिक संदेशही दिला. त्यांच्या अभिनयासह विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यामुळे प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गजर झाला.
महोत्सवाच्या या हास्यजत्रेच्या सत्राने नागपूरकरांना हास्याचा ताजातवाना डोस देत सायंकाळ संस्मरणीय केली.शिवाली परब, श्याम राजपूत, ईशा डे, ओंकार राऊत, प्रियदर्शिनी इंदलकर, प्रथमेश शिवलकर, निखिल बने, दत्तू मोरे, मंदार मांडवकर, विराज जगताप आदी कलावंतांनी नागपूरकरांच्या हास्यात आणखी भर पाडली.सचिन मोटे लेखक दिग्दर्शक निर्माता, सोनी मराठीचे अमित फाळके याचंी देखील विशेष उपस्थिती होती.
सुरुवातीला देवा श्रीगणेशा या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. लख्ख पडला प्रकाश मशालीचा चैतन्य देवडेने गाणी सादर केली.
आजच्या कार्यकमाला केंद्रीय मंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सवाचे प्रणेते नितीन गडकरी, कांचनताई गडकरी, नागपूर विभागाचे माहिती आयुक्त गजानन निमदेव, लोकमतचे संपादक श्रीमंत माने, महाराष्ट्र टाईम्सचे संपादक श्रीपाद अपराजित, सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे, पुण्यनगरीचे संपादक रमेश कुलकर्णी, नवराष्ट्रचे संपादक संदीप भारंबे या सर्वांनी दीपप्रज्वलन करून पारंपरिक पद्धतीने सुरवात झाली.
खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव आयोजन समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, सचिव जयप्रकाश गुप्‍ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, योगेश बन,अॅड. नितीन तेलगोटे, आशिष वांदिले यांनी पाहुण्याचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे बाळ कुळकर्णी व रेणुका देशकर यांनी सूत्रसंचालन केले. राजधानी दिल्ली येथे दुर्देवी घटनेतील मृताना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिल्ली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी : नितीन गडकरी
दिल्ली येथे काल घडलेली घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. या घटनेची निंदा करावी तेव्हढी कमी आहे. आज त्या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशा भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
आजचे कार्यक्रम: 
सकाळचे सत्र 
सकाळी ७ वा: श्री हरिपाठ पठण कार्यक्रम
सायंकाळचे सत्र
युवा गायक, संगीतकार अखिल सचदेवा यांची लाईव्‍ह इन कॉन्‍सर्ट
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या