

नागपूर, ता. ४ : नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठी मंगळवारी ५ जानेवारी २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक सकाळी ११.०० वाजता होणार आहे. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही निवडणूक घेतली जाईल. विद्यमान महापौर संदीप जोशी व उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उर्वरित काळासाठी महापौर व उपमहापौर पदाची निवड करण्यासाठी ही निवडणूक होत आहे.
भारतीय जनता पक्ष्ाकडून महापौर पदासाठी प्रभाग १९ ‘ड’ चे नगरसेवक दयाशंकर चंद्रशेखर तिवारी यांनी नामनिर्देशन सादर केले आहे. उपमहापौर पदासाठी पक्षाकडून प्रभाग २३ ‘ब’ च्या नगरसेविका मनीषा आशिष धावडे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे.
महाविकास आघाडीकडून प्रभाग ३३ ‘ड’ चे नगरसेवक मनोजकुमार धोंडूजी गावंडे यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले आहे. उपमहापौर पदाकरिता आघाडीकडून प्रभाग २८ ‘ब’च्या नगरसेविका मंगलाबाई प्रशांत गवरे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे.
बहुजन समाज पक्षाकडून प्रभाग ‘ड’ चे नगरसेवक नरेंद्र नत्थुजी वालदे यांनी महापौर पदाकरिता नामनिर्देशन सादर केले आहे. उमहापौर पदाकरिता पक्षाकडून प्रभाग ६ ‘क’च्या नगरसेविका वैशाली अविनाश नारनवरे यांनी नामनिर्देशन सादर केले आहे.
काँग्रेस पक्षाकडून प्रभाग २०‘क’ चे नगरसेवक रमेश गणपती पुणेकर यांनी महापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले आहे. काँग्रेस पक्षाकडून प्रभाग १० ‘ब’च्या नगरसेविका रश्मी निलमनी धुर्वे यांनी उपहापौर पदासाठी नामनिर्देशन सादर केले आहे.
महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांना प्रत्यक्ष सभागृहामध्ये उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असून इतर सर्व पदाधिकारी म.न.पा.सदस्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी व्हावे लागणार आहे. निवडणुकीच्या ४५ मिनिटे अगोदर सर्व पदाधिकारी मनपा सदस्य व अधिकाऱ्यांना ऑनलाईन सभेची लिंक पाठविण्यात येणार आहे. निवडणुकीचे पिठासीन अधिकारी हे विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी उपस्थित राहतील.
५ जानेवारीला सकाळी ११.०० वाजता सभा सुरू झाल्यानंतर पिठासीन अधिकाऱ्यांद्वारे नामनिर्देशनपत्राची छानणी केली जाईल. यानंतर वैध उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल व अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटाचा वेळ देण्यात येईल. पिठासीन अधिकारी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे घोषित करतील. यानंतर आवश्यक असल्यास मतदान घेतले जाईल. सभेच्या शेवटी पिठासीन अधिकाऱ्यांद्वारे निवडणूक निर्णयाची घोषणा केली जाईल.




आमचे चॅनल subscribe करा
