


नागपूर,१३ ऑगस्ट २०१९: आगामी १७ ते २४ ऑगस्ट दरम्यान मनपातर्फे महापौर चषक राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी निविदा न काढताच ४२.२२ लाखाचा खर्च प्रस्तावित करण्यात आला असून, असा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी येणार आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रपरिषदेसाठी एक लाखाचा खर्च करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात मनपातर्फे काही महोत्सव व स्पर्धांसाठी निविदा न काढताच लाखो व कोट्यावधीचा निधी देण्यात येत आहे. या स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावणाऱ्यांनाही २.७० लाख रुपये देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी क्रीडा विभागाने प्रस्ताव तयार केला आहे. प्रस्तावातील खर्चाची रक्कम बघून अनेकांनी त्यावर शंका घेणे सुरू केले . प्रस्तावात खेळाडूंची भोजन व राहण्याची व्यवस्था, बिछायत, उद्घाटन व समारोपीय कार्यक्रमाचा खर्च प्रस्तावित केला आहे.
महापौर चषक असल्याने मनपा मुख्यालयातच ही पत्रपरिषद होईल, असे मानले जात आहे. महापौर कक्षात ही पत्रपरिषद झाल्यास त्यावर अत्यंत किरकोळ खर्च होत आहे. स्पर्धेसाठी प्रेसनोट काढून अतिरीक्त माहिती पत्रपरिषदेत देण्यात येते. त्यानंतर साधारणत: चहापान होतो. मात्र, त्यावरही एवढा लाखोंचा खर्च होत नाही. मनपा मुख्यालयाबाहेर शहरातील प्रतिष्ठित हॉटेलात ही पत्रपरिषद घेण्यात आली तरच एवढा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खर्चाच्या विवरणावरच क्रीडा विभागावर आक्षेप घेण्यात येत आहे. पंचांना साधारणत: किमान २०० रुपये मानधन देता येणे शक्य आहे, असे बास्केटबॉमधील छत्रपती पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले यांचे म्हणणे आहे. तर, प्रस्तावात एकूण ३०० मॅचेसवर ९०० रुपये प्रती असा दर दाखविण्यात आला आहे. दोनशे रुपये प्रति पंच खर्च केल्यास आर्थिक संकटातून जाणाऱ्या मनपाला किमान दीड लाख रुपयाचा खर्च वाचविता येणे शक्य आहे. ही मनपाच्या निधीची उधळपट्टी असल्याची टीका होत आहे.
……




आमचे चॅनल subscribe करा
