

मनपाचा समाज कल्याण विभाग चौथ्या माळ्यावर!
नागपूर,ता. ३ मार्च: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय (ईएसआयएस) नागपूर येथे कोव्हिड लस घेण्यास येणा-या नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तिस-या माळ्यावर सुरू असलेले लसीकरण केंद्र पहिल्या माळ्यावर स्थानांतरीत करण्याच्या मनपाच्या सूचनेवर लसीकरण केंद्र बंद करण्याचे उत्तर देत आदेशाची अवहेलना करणा-या ईएसआयएसच्या वैद्यकीय अधीक्षकांवर कारवाई करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले मात्र त्यांच्याच मनपा मुख्यालयात दिव्यांगासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करणारा समाज कल्याण विभाग हा चक्क चौथ्या मजल्यावर आहे,त्याचे काय?असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय येथे तिस-या माळ्यावर लसीकरणाचे कार्य सुरू आहे. महापौरांनी याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांना गैरसोय दूर करण्याचे निर्देश दिलेत. लसीकरणासाठी येणा-या वृद्ध व आजारी व्यक्तींना तिस-या माळ्यावर चढणे गैरसोयीचे ठरत असल्याची तक्रार प्राप्त होताच मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिका-यांनी स्वत: रुग्णालयाची पाहणी केली. त्यानंतर पत्राद्वारे सदर केंद्र तिस-यावरून पहिल्या माळ्यावर स्थानांतरीत करण्याची सूचना केली. लसीकरण सुरळीत पार पाडता यावे व नागरिकांची गैरसोय होउ नये यासाठी २४ तासाचे आत केंद्र स्थानांतरीत करण्याचे पत्र बुधवारी (ता.३) मनपाच्या आरोग्य अधिका-यांमार्फत देण्यात आले.
मात्र महापौरांनी नुकतेच दिव्यांगांसाठी साढे सात कोटींच्या विविध योजनांचा घोषणा दिल्या.या योजनांचा लाभ घेण्यासाठी दररोज दिव्यांग बांधव हे मनपा मुख्यालयात येत आहे.यातील अनेक दिव्यांग हे ७० ते ८० टक्के दिव्यांग आहेत.लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेल्यानंतर देखील कार्यालय हे लिफ्टपासून बरेच अंतरावर आहे.तिथपर्यंत अनेक दिव्यांग हे जमीनीवरुन घासत चालतानाचे दृष्य अनेकांना दिसून पडंतय.
महापौर आपल्याच नाकाखालील अंधार दूर करतील का?असा प्रश्न आता दिव्यांग बांधव करीत आहेत. पूर्वी हा विभाग जुन्या इमारतीत होता.मात्र समाज कल्याण सारख्या अतिशय महत्वाचा विभाग नवीन इमारतीत हलविण्यात आला तो ही चक्क चौथ्या मजल्यावर!या मजल्यापर्यंत दिव्यांग हे दिव्य पार करुन कार्यालयापर्यंत पोहोचलेच तर…अधिकारी व कर्मचारी अनेकदा जागेवरच नसतात!अश्यावेळी दिव्यांगांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महापौरांनी घोषित केलेल्या साढे सात कोटींच्या योजनांमधून लाभ मिळावा यासाठी शहरातील दिव्यांग बांधव येन-केन प्रकारे समाज कल्याण विभाग गाठत आहेत.मात्र अधिकारीच गैरहजर राहत असल्यामुळे दिव्यंगांना बराच मनस्ताप सहन करावा लागत आहे.हा विभाग तळ मजल्यावर आणावा अशी आता त्यांची मागणी आहे.
जे अधिकारी वा कर्मचारी उपस्थित असतात तेच या योजनांविषयी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे सांगितले जात आहे.यामुळे महापौरांनी घोषित केलेल्या योजनांचे गांर्भीय प्रशासकीय कर्मचा-यांना किती आहे,हे कळत असल्याचे दिव्यांग बांधव सांगतात.दिव्यांगांच्या समस्यांच्या सोडवणूकीऐवजी मनपा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी हे थंड एसी व गलेलठ्ठ पगार यासाठीच मुख्यालयात व झोन कार्यालयात येतात,असा आरोप करीत महापौरांनी यांच्या वतर्वणूकीवर देखील कोणतीतरी ‘उपाययोजना’काढावी,असा टोला देखील एका दिव्यांग बांधवांने खास ‘सत्ताधीश’कडे लगावला.
केंद्राच्या सुगम्य भारत उपक्रमाचीही थट्टाच!
केंद्र सरकारने देशातील दिव्यांगांसाठी सुगम्य भारत या उपक्रमाची सुरवात केली मात्र शासनाचीच एक स्वायत्त संस्था असणारी नागपूर महानगरपालिका केंद्राच्या या उपक्रमाविषयी किती गंभीर आहे?हे समाज कल्याण विभाग चौथ्या मजल्यावर ठेवल्यामुळे दिसून पडत आहे,असा संताप व्यक्त केला जात आहे.एवढंच नव्हे तर मनपाच्या सर्वच झोन कार्यालयात देखील दिव्यांगांसाठी कोणत्याही सोयी नाहीत,महापौरांनी घोषित केलेल्या योजनांसाठी दिव्यांग बांधव झोन कार्यालये गाठत आहेत मात्र तिथे ही त्यांना दूसरा-तिसरा मजला चढावा लागत आहे.हे केंद्रांच्या सुगम्य भारत उपक्रमाचे उल्लंंघन नाही का?असा सवाल आता ते करीत आहेत.
एकीकडे शहरातील मॉल्स,उद्याने आणि भट सभागृहात दिव्यांगासाठी उत्तम सोयी उपलब्ध करीत असताना महानगरपालिकेसारखी स्वायत्त संस्था हीच समाज कल्याण सारखा महत्वाचा विभाग चौथ्या माळ्यावर ठेऊन दिव्यांगांची थट्टा करीत असल्याचा आरोप केला जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
