

नागपूर,ता. ७ डिसेंबर: पदवीधर निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर तसेच महापौर पदाचाही कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत असल्याने महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याची आज सोमवारी दिवसभर चांगलीच चर्चा रंगली.काही मराठी वृत्तवाहीन्यांमध्ये या बाबीचे वृत्त झळकताच,प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे अनेक नागरिकांनी याबाबत चौकशी केली.एवढेच नव्हे तर नगरसेवक,पदाधिकारीही नागरिकांच्या फोन चौकशीमुळे चांगलेच त्रस्त झालेत. आमदार व भाजप शहराध्यक्ष् प्रवीण दटके यांनी देखील या वृत्ताचे खंडन केले.मनपातील सत्ता पक्ष् नेते संदीप जाधव यांनी देखील ही निव्वळ अफवाह असल्याचे सांगितले तर दयाशंकर तिवारी यांनी मनपाच्या अधिकृत व्हॉट्स ॲप ग्रूपवर या वृत्ताचे खंडन करण्याची सूचना केली.
मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये नंदा जिचकार यांचा महापौरपदाचा कार्यकाळ संपुष्टात येताच दयाशंकर तिवारी यांनी महापौरपदावर दावा केला होता.त्यांच्यासोबत जोशी यांचे ही नाव चर्चेत होते.त्यामुळे शहर भाजपाध्यक्ष् आ.प्रवीण दटके यांनी संदीप जोशी व तिवारी यांना प्रत्येकी सव्वा वर्ष महापौर पद देण्यात येईल,अशी घोषणा केली.
पक्ष्ात ठरल्याप्रमाणे संदीप जोशी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात संपत आहे.त्यानंतर दयाशकंर तिवारी शहराचे ५४ वे महापौर म्हणून सूत्रे स्वीकारतील. मात्र,यासाठी तांत्रिक बाबीची पूर्तता करावी लागणार आहे.जोशी यांना राजीनामा द्यावा लागेल.त्यानंतर समिती विभागाकडून नव्या महापौरांच्या निवडीसाठी सभागृहाकडे प्रस्ताव पाठवला जाईल.
जाेशी यांची महापौर पदी निवड झाली होती तेव्हा त्यांना भाजपच्या १०४ नगरसेवकांनी मते दिली होती. आता नवीन महापौरांच्या निवडीसाठी आधी २० डिसेंबरला सभागृहात प्रस्ताव येण्याची शक्यता आहे मात्र असा प्रस्ताव २० जानेवारीच्या सभागृहातच येण्याची दाट शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.
जोशी यांच्या राजीनाम्यानंतर ज्येष्ठ नगरसेवक दयाशकंर तिवारी यांना संधी मिळणार आहे मात्र मुदतीपूर्वीच महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिल्याची अफवाह आज चांगलीच गरम राहीली,याचा थेट संबध पदवीधर निवडणूकीशी जोडून काही माध्यम प्रतिनिधी हे मोकळे ही झालेत.परिणामी आज भाजपच्या गोटात दिवसभर ‘वैतागाचे’वातावरण होते.
महापौर हे आज शहरातच नाहीत,अशी देखील माहिती आहे.




आमचे चॅनल subscribe करा
