फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामहानगरपालिकेची 'अदृश्य' नगरसेविका! भाऊ उचलतो पगार

महानगरपालिकेची ‘अदृश्य’ नगरसेविका! भाऊ उचलतो पगार

नागपूर,१७: नागपूर महानगरपालिकेत एकूण १५६ नगरसेवकांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये मनपाची निवडणूक लढली यात प्रभाग क्रमांक ५(ब) मधील सत्ताधारी पक्षातील नगरसेवक आणि नगरसेविका हे सख्खे भाऊ-बहीण यांनी देखील निवडणूक लढली आणि विजय मिळवला मात्र निवडणुका झाल्याबरोबर बहिण या आपल्या सासरी मुंबईला निघून गेल्या, यानंतर संपूर्ण कारभार त्यांचे लाडके नगरसेवक बंधू, हेच बघत आहेत! विशेष म्हणजे दर महिन्याला या अदृश्य नगरसेविकेचा पगार हा देखील बंधुरायाच्या स्वाक्षरीने नियमितपणे मनपा काढत आहे, याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली.

 

२०१७ पासूनच कर्मचाऱ्यांमध्ये या विषयीची कुजबुज रंगली मात्र कठोर,शिस्तप्रिय तसेच नियमांमध्ये राहून कार्यभार करणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांची नियुक्ती नागपूर महानगरपालिकेत झाली आणि सत्ताधाऱ्यांच्या अशा या कारभाराला वाचा फुटली,सत्ताधाऱ्यांचे कारभार हळूहळू कर्मचाऱ्यांच्या ओठावर येऊ लागले. अदृश्य नगरसेविका यांनी २०१७ ते २०२० पर्यंत एकदाही सभागृहात उपस्थिती लावली नाही, एकाही बैठकीत उपस्थित राहिल्या नाहीत, त्यांच्या प्रभागातील विकासकामांचे प्रस्ताव देखील त्यांच्या बंधुराया यांनी प्रशासनाकडून संमत करून घेतले,प्रभाग क्रमांक ५( ब) मध्ये दोन्ही भाऊ-बहिणींच्या ‘विकासकामांचे‘ निर्विरोध संमत झालेले बजेटची देखील बरीच चर्चा मनपात रंगली होती.

विशेष म्हणजे या ‘अदृश्य नगरसेविकेचा’ पगार ज्या लेटरहेडवर निघतो आणि या बंधुराया नगरसेवकांचा पगार ज्या लेटरहेडवर नियमितपणे निघतो, त्या लेटर हेड वरील स्वाक्षरी ही ‘एकाच’ व्यक्तीची असते, तरीदेखील महानगरपालिका एकसारख्या लेटरहेडवर, एकसारख्याच, एकाच व्यक्तीने केलेल्या स्वाक्षरी वर हजारो रुपये पगार ‘अदृश्य ‘नगरसेविकेसाठी काढत आहे

सत्ताधारी पक्षाच्या अशा अनेक सुरस कथा आता मुंडे यांच्या कार्य -कठोर काळात पुढे येऊ लागल्या आहेत. मनपाचे पदाधिकारी, कर्मचारी या अशा चमत्कारिक कारभाराविषयी कुजबुज करू लागले आहेत.सत्ताधारी पक्षाचा एक नगरसेवक हा आपल्या बहिणीसाठी संपूर्ण कारभार बघतोय, विकास निधी लाटतोय, पगार देखील घेतोय आणि नागपूर महानगरपालिका अशा या ‘अदृश्य’ नगरसेविकेसाठी देखील दरमहा ‘कायदेशीररित्या’ पगार काढत असल्याची खमंग चर्चा महानगरपालिकेत रंगली होती.

मनपा आयुक्त मुंढे यांनी सत्ताधाऱ्यांची बरीचशी विकास कामे आर्थिक स्थितीचे कारण देऊन थांबवली आहेत, आता मनपा आयुक्त अशा नगरसेविकेच्या पगाराविषयी,त्यांना मिळणारा भत्ता आणि इतर सोयीसुविधे विषयी काय भूमिका घेतात याकडे आता कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे, याशिवाय त्यांच्या नावावर आजपर्यंत त्यांच्या प्रभागात लाटण्यात आलेला ‘दुहेरी ‘विकास निधी या बाबत देखील आयुक्त काय भूमिका घेतात याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या