

झुंजार पत्रक़ार सरिता कौशिक यांची गगनभरारी झेप
[जागतिक महीला दिन विशेष]
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
‘एबीपी माझा’ या मराठी वृत्त वाहीनीच्या मुख्य संपादक पदी, उपराजधानी नागपूरच्या याच वाहिनीच्या विदर्भाच्या ब्यूरो चीफ सरीता कौशिक या ज्येष्ठ महिला पत्रकाराची वर्णी लागताच, सोशल मिडीयावर प्रचंड मळमळ व्यक्त झाली,त्यांच्या मराठी भाषेच्या उच्चारणापासून तर सादरीकरणापर्यंत!एबीपी माझा ही मराठी वृत्त वाहीनी असतानाही ज्या महिला पत्रकाराला मराठी भाषेत नीट बोलता ही येत नाही त्यांची वर्णी चक्क मुंबईतील कार्यालयात मुख्य संपादक पदी लागलीच कशी?यावर सोशल मिडीयावर प्रगाढ चर्वितचर्वण रंगले मात्र,फक्त ‘भाषा‘ ही कोणाच्याही कर्तृत्व,बुद्धिमत्ता,कामाप्रति समर्पण आणि प्रामाणिकपणाबाबत एकमेव निकष कसा ठरु शकतो?या वास्तवदर्शी सत्याबाबत मात्र याच टिंगलटवाळखोर मंडळींना शब्द सापडत नाही.
नागपूर शहर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे होम पीच असल्यामुळे व गडकरी यांच्यावर तसेच त्यांचा ड्रीम प्रोजक्ट असणा-या मेट्रो प्रकल्पावर सरीता यांनी इंग्रजी भाषेत अभ्यासपूर्ण पुस्तके लिहली असून, या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा गडकरी यांच्याच हस्ते पार पडला होता.या सोहळ्यानंतर सरीता यांना हे पद बक्षीस म्हणून मिळाले, असे देखील अकलेचे तारे सोशल मिडीयावर तोडण्यात आले मात्र,त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी मूळात, अंगी कर्तृत्व असावं लागतं,फक्त वशिलेबाजीने एवढी मोठी झेप घेणे कोणालाही शक्य नाही,तरी देखील सरीता या एबीपी माझाच्या मुख्य संपादक पदी रुजू होताच ,पोटात शूल उठणा-यांच्या हे लक्षात आले नाही किंबहूना त्यांनी सरीता यांच्या अंगी असणा-या धडाकेबाज कर्तृत्वाकडे,पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाकडे,ठायी ठायी भरलेल्या त्यांच्या बुद्धिमत्तेतील आगळ्या वेगळ्या संकल्पांकडे सोयीस्कर दूर्लक्षच केले.
मुख्य संपादक पदी फक्त मराठीच्या उच्चारणावरुन सर्वथा अयोग्य व्यक्तिची निवड करण्यात आल्याचा सोशल मिडीयावरील टिकेचा सूर, पश्चिम महाराष्ट्रातूनच नव्हे तर विदर्भ आणि उपराजधानीतील काही महाभागांकडून देखील त्यांच्या या गगनभरारी यशाबाबत लावण्यात आला.आधीच पत्रकारितेच्या क्षेत्रात महिलांना या पदापर्यंत पोहोचण्याची संधी फार कमी असते, असे ही म्हणता येत नाही कारण, मूळात एवढी मोठी व महत्वाची जबाबदारी एखाद्या कर्तृत्वान महिलेवर सोपविण्याची ‘मानसिकताच’अद्यापही या क्षेत्रातील माध्यमांच्या मालकांपमध्ये रुजली नसल्याने संधीच नसते,असेच म्हणावे लागेल तरी देखील सरिता यांनी असाध्य ते साध्य करुन दाखवले याचे कौतूकच करावे लागेल.
एखाद्या महिलेला माध्यमामध्ये सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी मिळणे म्हणजे कुजक्या विचारांच्या पुरुषांच्या पोटात शूळ उठणे स्वाभाविक आहे.त्यांनी आपली मळमळ व्यक्त करण्यासाठी फेसबूक,ट्टीटर,इन्सटाग्राम,ब्लाग्स इत्यादी पर्यायांचा आधार ही घेतला,मात्र हूशार माणसे हे जगाची परवाह न करता आपल्या कामातच आनंद शोधत असतात.सरिता कौशिक याच श्रेणीत मोडतात.
सरिता यांच्यासाठी पद जरी नवीन असले तरी आव्हाने मात्र जुनीच आहेत.त्या समाजमाध्यमांवरील टिका ही वाचत नाहीत स्तृतीही वाचत नाहीत.ख-या पत्रकाराला फक्त आपलं काम करायचं असतं.आज सरिता जे पद भूषवित आहेत त्या पदावरील माणसाला(स्त्री किवा पुरुष कोणीही असो)वेगळ्या संकल्पना असने,त्या समोर फॉरवर्ड करने,त्यांची अंमलबजावणी करुन घेणे,काटेकोर नियोजन करने,टीआरपीच्या स्पर्धेचा सामना करने,यश टिकवून ठेवणे इत्यादी अनेक महत्वपूर्ण बाबी पार पाडाव्या लागतात,हे कोणत्याही ये-या गबाळ्याचे काम नाही किवा केवळ ‘वशिलेबाजीतून’ते साध्य होऊ शत नाही.
सोशल मिडीयावर फक्त भाषेला घेऊन टिंगलटवाली करणं व अंगभूत कर्तृत्वाला नजरअंदाज करनं हे फार सोपं काम असून,सरिता कौशिक यांच्यावर टिका करणा-या नेटिझन्सला ही ‘विभूती’ कळलीच नाही,असेच म्हावे लागेल. त्यांचा या क्षेत्रातील भूतकाळ,संघर्ष,जिद्द आणि यशाचा इतिहास त्यामुळेच समोर आला पाहिजे.
पत्रकारिता आणि त्यातही धाडसी पत्रकारिता प्रत्येकाला जमतेच असं नाही.अनेक माणसे या क्षेत्राकडे फक्त नोकरी म्हणून बघतात.महिनाकाठी प्रपंचापुरती पगार मिळाला की झाले मात्र,या जगात अशीही काही माणसे असतात ज्यांना एकदाच मिळालेल्या आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं असतं,वेगळं घडायचं,घडवायचं असतं आणि यासाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची देखील त्यांची मानसिक तयारी असते,सरिता कौशिक हे नाव याच श्रेणीत मोडतं.
पत्रकारिता या क्षेत्राची एक ठराविक चौकट ठरली आहे.या क्षेत्रात महिला पत्रकारांना कोणत्याही जोखिमेची समजली जाणारी ‘बिट’ देण्यास वृत्तपत्राचे मालक आजही धजावत नाहीत.आज ही बहूतांश वृत्तपत्रात महिला पत्रकार या उपजत बुद्धिमत्ता,कौशल्य,कर्तृत्व आणि धाडस असून देखील फक्त पूर्वापार ‘परंपरे’प्रमाणे‘सांस्कृतिक’बिट सांभाळताना दिसतात.त्यांचं कार्यक्षेत्र व अनुभव फार-फार मर्यादित असतं.सरिता मात्र याला अपवाद ठरतात.
मूळात या क्षेत्रात त्या अपघातानेच आल्या.खूप काही महत्वाकांक्षा ही त्यांच्या नव्हत्या.विद्यार्थी दशेत बी.कॉम ही वाणिज्य शाखेतील पदवी मिळाल्यानंतर सरिता यांनी कायद्याची पदवी घेताना ‘सहज’ पॉकेट मनी.िमळावा म्हणून त्यावेळी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिखाण सुरु केले.त्यांना असाईंटमेंट मिळत असे सरिता त्या पूर्ण करुन देत होत्या.
याच दरम्यान इंग्रजी दैनिक ‘द हितवादा’मध्ये पाच जागा निघाल्या.एका मैत्रिणीने दिलेल्या सल्ला त्यांनी अमलात आणला व मुलाखत देण्यासाठी गेल्या.बघतात तर हितवादच्या फाटका बाहेरपर्यंत मुलाखत देणा-यांच्या रांगा लागल्या होत्या.एवढी मोठी रांग बघून त्यांनी त्यावेळी त्या करीत असलेल्या एजंसीची कामे करुन परत आल्या.मात्र,परत आल्यावरही रांग तीळमात्र ही कमी झाली नव्हती.पुन्हा त्यांनी ‘कॉर्नर’साठी विशेष फिचर करण्यासाठी तिथून काढता पाय घेतला.
मुलाखतीसाठी सकाळी निघालेल्या सरीता यांची सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुलाखत पार पडली.हितवादचे संपादक विजय फणशीकर,आलोक तिवारी व सुर्जीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.खूप प्रश्न विचारले,वाचायला काय आवडतं?का आवडतं?शास्त्रीय संगीत म्हणजे नेमके काय?सरिता यांचे वडील गोपाल कौशिक हे गायनाच्या क्षेत्रात एक सुप्रसिद्ध नाव होते त्यामुळे गायनाच्या संदर्भातच सरिता यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
गोपाल कौशिक यांनी लोकप्रिय नाटक ‘कट्यार काळजात घूसली’यात मुख्य नायकाची भूमिका वठवली होती.दारव्हेकरांच्या प्रत्येक नाटकाला कौशिक यांनी उत्तरोत्तर लोकप्रिय केलं होतं.मुंबईत गेल्यानंतर त्यांनी ‘व-हाडी माणसं’या गाजलेल्या नाटकात काम केलं.त्यांना राज्य शासनाचा ५ वेळा उत्कृष्ट संगीतकार,गायक,दिग्दर्शनाचे पारितोषिक ही मिळाले होते.मराठी माणसाच्या ओठी असलेले ‘चंद्र नभीचा ढळला’हे सर्वांग सुंदर गीत त्यांचीच देणगी आहे.‘वेड्यात मराठे वीर दौडले सात’या मराठी अस्मितेच्या गीतात कौशिक यांनी कोरसमध्ये गायन केले,गानकोकिळा लताबाई,आशा भोसले,आशा खाडीलकर,सुरेश वाडकर आदी सर्वच गायकांनी कौशिक यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायन केले,गीत रामायणातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता.
एवढी समृद्ध मराठीची परंपरा सरिता कौशिक यांना आपल्या कूटूंबात लाभली असताना,कान्व्हेंटमधील शिक्षणामुळे इंग्रजीवरील प्रभूत्व त्यांच्या भाषेत रुजले,यात त्यांच्यातील मूळ प्रतिभेबाबत सोशल मिडीयावर ‘अ’न्याय कसं लिहल्या जाऊ शकतं?
१५ जून १९९७ हा सरिता यांचा ‘द हितवादा’ मधील नोकरीचा पहीला दिवस.त्यांना डेस्कवर काम मिळालं.वय जवळपास २५ वर्ष असावं.३ वर्ष या दैनिकात काम करुन त्यांनी पत्रकारितेचा मूळ पायवा येथेच भक्कम करुन घेतला.शास्त्रीय संगीताविषयीच्या बातम्यांमध्ये सरिता यांनी वेगळा ठसा उमटवला.त्यांचे काम बघून रात्री ११.३० पर्यंतही त्यांच्या बातमीसाठी जागा राखून ठेवली जाऊ लागली.शास्त्रीय संगीताबाबत सखोल वृत्त,ते ही इंग्रजी भाषेत मांडणे याला खरोखरच कौशल्य व दांडगा अभ्यास लागतो.सरिता यांच्या बातम्या प्रसिद्ध होण्यापूर्वी ‘द हितवादा’ या दैनिकात शास्त्रीय संगीताबाबत फक्त मान्यवरांचे स्तंभ प्रसिद्ध होत असे मात्र सरिता यांच्या बातम्यांमुळे वाचकाना ताजी बातमी,ती ही वेळेवर वाचायला मिळू लागली.
या वैशिष्ठपूर्ण लिखाणासाठी त्या नागपूरातील सुप्रसिद्ध तबला वादक सचिन बक्षी यांचे विशेष आभार मानतात कारण त्यांचे वडील गोपाल कौशिक यांनी सरिता यांना सख्त ताकीद दिली होती, की बक्षी यांच्याकडून दररोज शास्त्रीय संगीताचे अंतरंग समजून घेत जा मगच व्यक्त होत जा!याच काळात डिसेंबर महिन्यात ‘सिटी लाईन’ही नागपूर आवृत्ती लाँच झाली.परिणामी सरिता यांना डेस्कवरु रिर्पोटिंगला शिफ्ट करण्यात आलं.ही संधी होती की महत्वाकांक्षा?त्या वयात याचा उलगडा सरिता यांनाही झाला नाही.
याच दरम्यान डिसेंबरमध्ये नागपूरात हिवाळी अधिवेशन भरले.वरिष्ठांसोबत सहायक म्हणून जाण्याची,वार्तांकन करण्याची संधी सरिता यांना मिळाली.अधिवेशनातील राजकीय वातावरण,बातम्यांची भरमार यामुळे सरिता यांच्या मनात चांगलीच ईर्ष्या निर्माण झाली.हितवादचे अजय मार्डिकर,गणेश कन्हाटे या वरिष्ठांसोबत विधानभवनात जाण्याचा योग,मनात मेन स्ट्रीमच्या बिटची निर्माण झालेली ईच्छा या मुळे सरिता यांचा पत्रकारितेविषयीचा दृष्टिकोणच पार बदलून गेला.
एवढ्यातच हितवादाचे संपादक फणशीकर यांनी बिट्सची अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला.यात सरिता यांनाही महत्वपूर्ण बिट देण्याचा निर्णय घेण्याबाबत चर्चा झाली मात्र….या निर्णयाला या बैठकीत चांगलाच विरोध करण्यात आला….!याचे कारण काय देण्यात आले?तर…जोपर्यंत रात्री अधिका-यांसोबत पिण्यासाठी बसत नाही तोपर्यंत आतमधल्या बातम्या मिळत नाही…..!
एखाद्या महिलेला एवढी महत्वाची बिट सांभाळण्यास दिल्याने यामुळे वृत्तपत्राचे नुकसान होईल!हे कारण ऐकून सरिता या स्तब्ध झाल्या!कोणत्याही स्वाभिमानी माणसाला हे कारण ऐकून संतापच आला असता.एका महिलेला आपली बिट मिळू नये, त्यासाठी सांगण्यात आलेले हे कारण संपादकाचेही मन बदलण्यास कारणीभूत ठरले अन्….!सरिता यांच्या कर्तृत्वाला आपल्या टाचेखाली चिरडण्याचा या क्षेत्रातील तो पहीला यशस्वी प्रसंग होता….!
तरीही फणशीकरांनी सरिता यांना अशी बिट दिली ज्या विभागात वृत्तपत्रांसाठी कोणत्याही बातम्या मिळतच नाही असा ठपका असणारा ‘गर्व्हमेंट एडमिस्ट्रेशन डिस्ट्रीक’ ही बिट दिली.सरितासाठी हे आव्हान होतं.या बिटमध्ये त्यांनी अश्या अश्या बातम्या आणल्या ज्या हितवादामध्ये लीड लागल्या.त्या बातम्या वाचून त्या विभागाच्या मुख्य सचिवांनी चक्क चौकश्या लावल्या.महिलांना अधिक चांगल्या संधी मिळण्यासाठी आधी स्वत:ला सिद्ध करावं लागतं हेच खरं…..!
सरिताचा संघर्ष येथूनच सुरु झाला आणि…संपला देखील!यानंतर तिने कधीही मागे वळून बघितले नाही.प्रचंड मेहनत घेतली.कुठल्याही राज्यात बातमीसाठी निघून जाने,रात्री-अपरात्रीचा प्रवास,गाडीतच झोपणे,रस्त्यातच गाडी खराब होणे,धक्का मारुन गाडी भर जंगलात सुरु करने,नक्सलवादी यांच्याशी गाठ, त्यांनी केलेली सरिता यांची चौकशी,त्यांचा वसूलीचा फंडा या सर्व अनुभवातून सरिता यांची पत्रकारिता अधिकाधिक समृद्ध होत गेली.यानंतर ‘द हितवादा’ मध्ये ‘गर्व्हमेंट एडमिस्ट्रेशन’या बिटला महत्वाचे स्थान प्राप्त झाले.
सन् २००० मध्ये सरिता यांना ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये नाेकरीची संधी मिळाली.या नोकरीसाठी सरिता यांनी चक्क अहमदाबाद गाठले. खरं तर तो काळ बुरसेटलेल्या पुरुषी मानसिकतेच्या विरोधात आतल्या आत कुढण्याचा होता.पत्रकारितेत महिलांनी मेन स्ट्रीमच्या बिट्स करु नये,तिने फक्त सांस्कृतिक,विज्ञान,संगीत,आरोग्य अशाच बिट्स कराव्यात,अशी वरीष्ठांची परंपरागत धारणा होती.या धारणेला आणि धोरणालाही तडा देण्याचे काम आजपासून २३ वर्षांपूर्वी सरिता कौशिक यांनी केले.या दैनिकात त्यांनी सहा महिने इंटरशिप केले.
याच प्रवासात त्यांच्या पत्रकारितेला कलाटणी देणारी घटना घडली.भाजपचे वरिष्ठ नेते व अर्ध्यव्यूह प्रमोद महाजन यांची त्यांचेच बंधू प्रवीण महाजन यांनी मुंबईत गोळ्या घालून राहत्या घरी हत्या केली.सारंगी महाजन यांच्यावरच सर्व बातम्यांचा रोख होता.सरिता यांनी सारंगी यांच्या भावाच्या माध्यमातून सारंगी यांची वास्तवदर्शक मुलाखत घेण्याचा चंग बांधला.यात सरिता यांना यश आले व त्या सर्व भयंकर राजकीय संशयकल्लोळात पहिली मुलाखत सारंगी यांची सरिता यांनी प्रसिद्ध केली!
अतिशय संवेदनशील विषयाला सरिता यांनी तिच्यातील उपजत कौशल्याने शब्दबद्ध केले.सरिता यांची ही मुलाखत दिल्ली,मुंबई अश्या सर्वच आवृत्त्यांमध्ये प्रसिद्ध झाली.त्यावेळी सर्व वृत्तपत्रे व वाहिन्यांना सरिता यांच्या या मुलाखतीचा आधार आपल्या बातम्यांसाठी घ्यावा लागला.यावेळेपर्यंत अनेक राष्ट्रीय बातम्या देत असलेल्या सरिता यांना मात्र या एकाच बातमीने माध्यम जगतात कमालीचे प्रसिद्ध केले.
याच सरिता कौशिक यांनी नक्सल भागात वार्तांकन करताना पोलिसांच्या मृतदेहांचे तुकडे अक्षरश:झाडांवर लटकताना बघितले!त्यांची गाडी पूलावरुन गेली अन् क्षणार्धात त्याच पुलाचा ब्लास्ट झाला…!कंत्राटदाराच्या डोक्यावर बंदूक रोखून त्याला जमीनीखाली बॉम्ब पेरण्यास बाध्य केल्याचा थरारक अनुभवही त्यांच्या नजरेने टिपला.. रस्त्यांवर झाडे आडवे टाकून किर्रर अंधारात नक्सलवादांनी त्यांची गाडी थांबवली अन् ….गांजा,िचलम फंूकलेले दरोडेखोर यांनी देखील हातात कु-हाडी घेऊन पैसे हिसकले तेव्हा…!
जीवन आणि मृत्यमूधला फक्त तो ही एक क्षण….पत्रकारितेतील अनुभवांना समृद्ध करुन जाणारा ठरला…!या सगळ्या ख-या अनुभवांचा त्यांच्या ख-या आयुष्याशी काडीचाही संबंध नव्हता मात्र त्यात तिचं इतकं अंर्तमन गुंतलं होतं की…व्यक्ती म्हणून स्वत:पासून पत्रकारितेला त्या वेगळ्या कधीही करु शकल्या नाहीत…!
एकदा एका बेशुद्ध,बेवारस महिलेला रस्त्यावरुन उचलले तेव्हा कळले ती आठ महिन्यांची गरोदर आहे….!तिला योग्यवेळी उपचार मिळाला,तिचं मूल सुखरुप जन्माला आलं आणि माणूस म्हणून समाधान ही लाभलं…राजकीय बातम्यांपेक्षाही पत्रकारितेत त्यांना समाजकारण खूप भावलं.पुरुष पत्रकारांना असलं समाजकारण असाध्य नसलं तरी इतकं सहज ही नसतं….! शंभर टक्के समाज हा पुरुष पत्रकारांपेक्षा महिला पत्रकारांचे ‘स्वागत’ करतो,असा अनुभव या विदुषीचा जगजाहीर आहे.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील ‘अनमास्कींग इंडिया’या पुस्तकाचे संपादन,वेगवेगळ्या क्षेत्रात सतत संशोधनाची वृत्ती,बेसिक वेबिनारवरील पुस्तकाची जय्यत तयारी,करोनानंतर देशाची विस्कटलेली आर्थिक घडी याचा मागोवा,यावर मात करुन कसे पुढे जाऊ शकतो?याचा चाललेला शोध,हायवे,ईंधन,इकोनॉमी,कृषि इत्यादी वेगवेगळ्या चॅप्टर्सवर भरपूर लिखाणाचा पिंड….!
नेटीझन्सनी फक्त मराठी भाषेच्या उच्चारणावरुन आपला फोकस आता तरी काढून सरिता यांच्या या उत्तुंग भरारीकडे आपली दृष्टि वळवावी ,यासाठी हे एवढं लिखाण पुरेसं नाही का?
सरिता यांच्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील या उत्तुंग व तितक्याच सर्वोकृष्ट भरारीला जागतिक महिला दिनानिमित्त ‘सत्ताधीश’चा मानाचा मुजरा.
………………………………




आमचे चॅनल subscribe करा
