

द्वारकानाथ संझगिरी यांनी उलगावला रुपेरी पडद्यावरील इतिहास
नागपूर, ता.२८ ऑगस्ट २०२२: हिंदी चित्रपट सृष्टीचा पाया रचलाच तो मराठी माणसाने. दादासाहेब फाळके यांनी रुपेरी पडद्याला खऱ्या अर्थाने ग्लॅमर मिळवून दिले. त्याचाच वारसा पुढे चालवत मराठी नट्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक काळ आपली दादागिरी कायम ठेवली. या नट्यांनी अभिनय, नृत्य, सौंदर्याच्या बळावर रुपेरी पडद्याला वलय निर्माण करून दिले, असा संवाद साधत द्वारकानाथ संझगिरी यांनी दर्दी नागपूरकर रसिकांच्या आठवणीतील शेकडो प्रसंगांना उजाळा दिला.
निमित्त होते, सप्तकच्या वतीने आयोजित केलेल्या अनोख्या संवादाचे. पर्सिस्टंट सिस्टिमच्या कवी कुलगुरू कालीदास सभागृहात आम्ही मराठी अभिनेत्री गाजवतो हिंदी चित्रपट सृष्टी हा मुक्त संवादाचा कार्यक्रम बहरत गेला. एक दोन नव्हे तर चार पिढ्यांमधील लाखो सिनेरसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजविणाऱ्या मराठी नट्यांचा जीवनप्रवासच जणू या मुक्त संवादातून उलगडत गेला.
हिंदी चित्रपटसृष्टीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या काळात कुलीन घरातील मुली चित्रपटात काम करण्यासाठी पुढे यायच्या नाही, असे सुरुवातीलाच नमूद करीत संझगिरी यांनी रसिकांच्या हृदयाचा वेध घेतला. दुर्गा खोटे या अभिनेत्रीने कुलीन घराण्यातील मुलींसाठी हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे सताड उघडे केले. त्यानंतर आलेल्या शोभना समर्थ यांनी तर नुतन आणि तनुजा सारखी रत्ने हिंदी चित्रपटसृष्टीला दिली. शोभना समर्थ यांच्या मामाची मुलगी नलिनी जयवंत यातर हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिल्या गाजलेल्या अभिनेत्री झाल्या. सौंदर्याला जात नसते पण जातीला सौदर्य असतं हे नलिनी जयवंत यांच्याकडे पाहिल्यांतर पटायचं. मात्र या अभिनेत्रीचा शेवट अत्यंत दुर्दैवी झाला.
मेहमुद, किशोर कुमार सारख्या नटांशी केमेस्ट्री जुळवणे सोपे नव्हते. हे शक्य झाले ते उषा किरण आणि शोभा खोटे यांच्या दमदार अभिनयामुळे. शशिकला या नटीने तर हिंदी चित्रपटसृष्टीतला खलनायिकेचा इतिहासच रचला. वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी आईची भूमिका ताकदीने वठविणाऱ्या सुलोचना यांनी तर हिंदी चित्रपटसृष्टीचा पडदाच जणू व्यापून टाकला. ललिता पवार या अभिनेत्रीने तर या सगळ्या यशावर कळस रचणाऱ्या अनेक भूमिका जीवंत केल्या. त्यांच्या अभिनयाची चित्रपटसृष्टीतील कारकिर्द ७० वर्षांची राहिली आहे. यावरून या अभिनेत्रीचा आवाका आणि हिंदी चित्रपटातील दबदबा स्पष्ट होतो.
मास्टर विनायक यांची मुलगी नंदा हीने तर शशी कपूर, राजेश खन्ना सारख्या अभिनेत्यांचे भविष्य घडविले. त्यामुळे हे अभिनेते देखील कायम नंदाच्या ऋणात राहिले. त्या काळातील नूतनकडे पाहिल्यानंतर तर प्रत्येक पुरुषाला वाटायचं, बायको असावी तर नुतनसारखी, असे ते म्हणाले.
आयुष्याच्या अखेरपर्यंत व्ही. शांताराम यांची सेवा करणाऱ्या संध्याने तर समर्पणाचे प्रतिक समाजासमोर ठेवले.
हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे स्मिता पाटील होती. दुर्दैवाने तिची पाठ सोडली असती तर स्मिता ही माधुरी दिक्षीतच्या आधी पहिली सुपरस्टार झाली असती. इतके सामर्थ्य तिच्या अभिनयात आणि सौदर्यात होते.
सिमा, जयश्री गडकर, लिना चंदावरकर, रिमा लागू, स्मिता जयकर, निना कुलकर्णी, उर्मिला मातोंडकर आणि सोनोली बेंद्रे यांनी देखील आपली कारकिर्द सौदर्य आणि अभिनयाच्या बळावर गाजविली.
माधुरी दिक्षीतला नट्यामधील लेडी अमिताभ म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कुलकर्णी आडनावाला डाग लावणारी ममता वगळली तर मराठी नट्यांनी सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केले म्हटले तरी अतिशकयोक्त ठरणार नाही, असेही संझगिरी यांनी नमूद केले.
आपल्या अनोख्या अंदाजात मिश्किल कोट्या करीत संझगिरी यांनी या कार्यक्रमाला एका सूत्रात बांधून ठेवले. त्यांचे स्वागत निलेश साठे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ उदय गुप्ते यांनी केले. कार्यक्रमाला सुप्रिया संझगिरी, परसिस्टंट सिस्टिम चे समीर बेंद्रे, दिपाली बेंद्रे, राजेश आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
