
गझल कटट्याचे थाटात उद्घाटन
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
गझल या कविता प्रकारावर उर्दू भाषेचा जरी पगडा असला तरी मराठी गझलने आपले वेगळेपण जपले आहे. अनेक मराठी गझलकार मागील काही काळात नावारुपाला आले असून या प्रांतात उत्तम कार्य करीत आहे. मराठी गझलेला चांगले दिवस यायचे असतील तिने सर्वसमावेश भाव स्वीकारावा, असे प्रतिपादन गिरीश गांधी यांनी केले.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी कविवर्य सुरेश भट गझल कट्ट्याचे उद्घाटन वनराईचे डॉ. गिरीश गांधी यांच्या हस्ते पार पडले. गझल कट्ट्यासाठी एकुण ५३८ गझल आल्या होत्या. त्यापैकी २४० गझलची निवड करण्यात आली.
या सत्राच्या अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व गझलकार आशा पांडे होत्या. विनायक लळित, रमेश सरकाटे, जयप्रकाश सोनूरकर, गुलाब मेश्राम, अरविंद उन्हाळे, उज्वला इंगळे, जयंत कुलकर्णी, प्रशांत भंडारे, अरुण विघ्ने या गझलकारांना प्रामुख्याने कार्यक्रमात सहभाग होता.
आशा पांडे यांनी मराठी गझलांचे सम्राट सुरेश भट यांच्या तसेच, विदर्भातल्या गझलकारांच्या योगदानावर प्रकाश टाकला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले. समन्वयक नितीन देशमुख होते.
………………………………………………………….

काव्य हा मनुष्याचा अविभाज्य भाग: भारत सासणे
कविकट्ट्याचे थाटात उद्घाटन
कविता ही मनुष्याचा अविभाज्य भाग असून ती त्यांच्या अंतरंगात असते. मनुष्याचे संपूर्ण आयुष्य कवितेने व्यापलेले असते. ही अंतरंगातील कविता ज्याला उमजली तो कवी होतो, अशा शब्दात अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांनी मत व्यक्त केले.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्रा. देविदास सोटे कविकट्टयाचे उद्घाटन भारत सासणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मंचावर विविध ठिकाणाहून आलेले कवी राजन लाखे, प्रसाद देशपांडे व समन्व्यक ज्योत्स्ना पंडित यांची उपस्थिती होती.
राजन लाखे यांनी या कविकट्टयाचे वैशिष्ट्य सांगितले. हा कविकट्टा तीनही दिवस २६ तास चालू राहणार आहे.
निवड समितीने १५०० कवितांमधून ५४६ कविता या कविकट्ट्यासाठी निवडल्या असून विविध ठिकाणाहून आलेले कवी त्या येथे सादर करणार आहेत, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री पाटील यांनी केले तर आभार प्रा. जयश्री कोटगीरवार यांनी मानले.
………………………………………..

प्रबोधनाची चळवळ ही महाराष्ट्राची देण: डॉ. श्रीकांत तिडके
‘महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा’ विषयावर परिसंवाद
भारतात प्रबोधनाची चळवळ ही फ्रेंच क्रांतीतून उद्यास आली असे बोलले जाते. परंतु, ते खरे नसून महाराष्ट्रांतील संतांनी ही चळवळ सुरू केली, असे प्रतिपादन ज्येष्ठ संत साहित्यिक श्रीकांत तिडके यांनी केले.
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर उद्घाटन सत्रानंतर कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा विषयावर परिसंवाद पार पडला. डॉ. श्रीकांत तिडके अध्यक्षस्थानी होते तर रेखा नार्वेकर, वासुदेव वले, डॉ. हनुमंत भोपाळे व डॉ. रमेश जलतारे यांनी यात सहभाग नोंदवला.
लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा दूर करण्यात संतांचे मोठे योगदान राहिले असून अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा केवळ महाराष्ट्राने स्वीकारला याचे पूर्ण श्रेय संत गाडगे महाराजांना जाते, असे सांगताना श्रीकांत तिडके म्हणाले.
संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या विचारांचा झेंडा तेजस्वीरित्या फडकवत ठेवला आहे, असे मत रेखा नार्वेकर यांनी व्यक्त केले. इतर मान्यवरांनीदेखील आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भगत यांनी केले तर डॉ. शोभा बेलखोडे यांनी आभार मानले.
………
कथाकथनाला उत्तम प्रतिसाद
सहकार महर्षी बापूरावजी देशमुख व्यासपीठात आयोजित करण्यात आलेल्या कथाकथनाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुनंदा गोरे होत्या तर एकनाथ आव्हाड, अर्जुन व्हटकर, विलास सिंदगीकर, अशोक मानकर, प्रिया जोशी, गजानन देसाई यांचा यात सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री अंबासकर यांनी केले तर प्रा. प्रमोद नारायणे यांनी आभार मानले.
………

गुरु-शिष्यांच्या सहा ग्रंथांचे झाले एकत्र प्रकाशन
साहित्य संमेलनात पार पडला ऐतिहासिक सोहळा
९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ग.त्र्यं. माडखोलकर प्रकाशन मंचावर गुरु-शिष्यांच्या एकुण सहा ग्रंथांच्या प्रकाशनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. यात सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. राजेंद्र नाईकवाडे ह्यांच्या दोन पुस्तकांसमवेत त्यांच्या मार्गदर्शनात पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या तीन विद्यार्थ्यांचे प्रबंध प्रकाशित करण्यात आले.
सुप्रसिद्ध समीक्षक आणि विचारवंत डॉ. सुधीर रसाळ आणि सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. मिलिंद जोशी ह्यांच्या हस्ते एकाचवेळी प्रकाशित झालेल्या या पुस्तकांमध्ये राजेंद्र नाईकवाडे यांची ‘शब्दनिष्ठांची मांदियाळी’ व ‘सासणे यांचे अध्यक्षीय भाषण: चिंतन आणि चिकित्सा’ (संपादित)(लाखे प्रकाशन, नागपूर) ही दोन पुस्तके तसेच, डॉ. मिलिंद चोपकर, रामटेक यांचे ‘मराठी वनसाहित्य : आस्वादाची अक्षरे’(विजय प्रकाशन, नागपूर) हा महत्त्वपूर्ण समीक्षाग्रंथ, डॉ. माया पराते-रंभाळे, वर्धा यांची ‘संत कवयित्रींची भावकविता’ व ‘मोहोर(काव्यसंग्रह)’(विजय प्रकाशन, नागपूर) ही दोन पुस्तके आणि डॉ. दिनेश खुरगे यांचे ‘ग्रामीण कविता आणि लोकतत्त्वे’(लाखे प्रकाशन, नागपूर) या एकूण सहा पुस्तकांचा त्यात समावेश आहे. मिलिंद जोशी गुरू शिष्यांच्या एकत्र प्रकाशन सोहळ्याचे कौतूक केले व साहित्य संमेलनाच्या मंचावर असा सोहळा पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात प्रकाशक चंद्रकांत लाखे व प्रकाशन मंचचे समन्वयक राजेंद्र मुंढे यांची उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशित होणारी ही सर्व पुस्तके साहित्यरसिकांना विजय प्रकाशन आणि लाखे प्रकाशन यांच्या ग्रंथविक्री दालनात सवलतीच्या दरात उपलब्ध होणार आहेत.
…………………………………………..
आज दि.४ फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलनात…
आचार्य विनोबा भावे सभामंडप
सकाळी ९.३० वाजता – डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत
सकाळी ११ वाजता – भारतीय व जागतिक साहित्यविश्वात मराठीची ध्वजा फडकावणारे अनुवादक’ विषयावर परिसंवाद
दुपारी १.३० वाजता – कृषिजीवनातील अस्थिरता, प्रक्षोभ आणि मराठी लेखक’ विषयावर परिसंवाद
दुपारी ३.३० वाजता – ‘मराठी साहित्यातील उद्यम व अर्थविषयक लेखन’ विषयावर परिसंवाद
सायं. ५.३० वाजता – मुक्त संवादमध्ये नागराज मंजुळे व कवी सौमित्र यांची उपस्थिती
रात्री ८ वाजता – निमंत्रितांचे कविसंमेलन
मनोहर म्हैसाळकर सभामंडप
सकाळी ११ वाजता – ‘ग्रंथालय चळवळींचे यशापयश’ विषयावर परिसंवाद
दुपारी १.३० वाजता – ‘स्त्री-पुरूष तुलना’ विषयावर परिचर्चा
दुपारी ३.३० वाजता – ‘समाजमाध्यमांतील अभिव्यक्ती’ विषयावर परिसंवाद
सायं. ५.३० वाजता – ‘वैदर्भीय वाडमयीन परंपरा’ विषयावर परिसंवाद
सायं. ७.३० वाजता – एकांक ‘गावकथा’
इतर कार्यक्रम
सकाळी ९ वाजेपासून – स्व. मनोहर म्हैसाळकर स्मृती वैदर्भीय काव्यनक्षत्रमाला
दुपारी २ वाजता – वं. मावशी केळकर वाचन मंचाचे उद्घाटन




आमचे चॅनल subscribe करा
