
तिकीट वाटप फायनल झाल्यावर पक्ष प्रवेशांचा पोळा फूटणार
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जम्बो कार्यकारीणी घोषित
शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केली प्रदेश कार्यकारीणीची घोषणा
माध्यमांनी चुकीचे वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी सत्य विचारुन घ्यावे
पक्षाची बदनामी सहन करणार नाही:प्रशांत पवार यांचा इशारा
नागपूर,ता.२४ फेब्रुवरी २०२४: नुकतेच काँग्रेस पक्षाचे दोन-तीन वरिष्ठ नेते यांनी माझी भेट घेतली.२८ तारखेला पक्षाचे सर्वेसर्वा व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नागपूरात कार्यक्रमास येण्यास मंजुरी प्रदान केल्यास त्यावेळी काँग्रेस,मनसे तसेच शिवसेना(उबाठा)चे अनेक नेते हे पक्षांतर करतील,असा दावा आज बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी पक्ष(अजित पवार गटाचे)शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी केला.याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारिणीही घोषित केली.
श्रीकांत शिवणकर हे पूर्वीप्रमाणेच कार्याध्यक्ष पदी असणार आहे तर राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा ताई पांडे यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती झाली आहे.ईश्वर बाळबुधे यांची देखील सरचिटणीस पदी तर माजी शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेश महासचिव पदी राजेश माटे,प्रदेश महिला सचिव पदी लक्षमी सावरकर,प्रदेश सचिव पदी आनंद सिंग,प्रदेश संघटक सचिव पदी हाजी सोहेल पटेल,विद्यार्थी प्रदेश सरचिटणी पदी राहुल कामडे तसेच युवक प्रदेश सचिव पदी नागेश देडमुठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय अध्यक्ष पदामध्ये पूर्व नागपूरात प्रशांत अग्रवाल,पश्चिम नागपूरात योगेश ठाकरे,उत्तर नागपूरात राकेश बोरीकर,दक्षिण नागपूरात अरविंद भाजीपाले,दक्षिण-पश्चिम नागपूरात संदिप सावरकर तसेच मध्य नागपूरात रवि पराते यांच्या नावाची घोषणा प्रशांत पवार यांनी केली.याशिवाय शहर उपाध्यक्ष,शहर महासचिव,सचिव,सहसचिव पदांची देखील त्यांनी घोषणा केली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिकेत खोब्रागडे यांची नियुक्ती झाली असून फ्रंटल सेल अध्यक्षांची देखील नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.यात राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष म्हणून जया देशमुख,युवक शहर अध्यक्ष पदी विशाल खांडेकर,विद्यार्थी अध्यक्ष पदी विश्वजित तिवारी,न्याय विभाग शहर पदी अरविंद ढेंगरे,अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष पदी वसीम अंसारी,झोपडपट्टी मोर्चा विभाग पदी मोहम्मद अंसारी,सांस्कृतिक कला शहर अध्यक्ष पदी पंकज कावरे तसेच सेवादल शहर अध्यक्ष पदी संजय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याप्रसंगी बोलताना प्रशांत पवार म्हणाले,की प्रसार-प्रचार माध्यमांनी राष्ट्रवादीबाबत कोणतेही वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी वृत्ताची शहनिशा करावी.नुकतेच एका वृत्तपत्राने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र लाऊन चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले.ते वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यावर माझी कोणतीही प्रतिक्रिया घेण्यात आली नाही किंबहूना दूसरी बाजू त्या वृत्तात मांडण्यात आली नाही,याचा अर्थ हेतूपुरस्सर पक्षाची बदनामी करण्यासाठीच ते वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. माध्यमांचे स्वातंत्र्य याचा आम्ही सन्मान करतो मात्र,बदनामीकारक तसेच चुकीचे वृत्त प्रसिद्ध करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.यामुळे त्या वृत्तपत्राला आम्ही नोटीस पाठवली असून येत्या ३० दिवसात उत्तर मागितले आहे.त्यांनी खुलासा न छापल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
याप्रसंगी त्यांनी पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व आंदोलनाची माहिती दिली.२३ सप्टेंबर २०२३ रोजी ढगफूटी सदृष्य पावसामुळे अंबाझरीसह इतर भागात जे नुकसान झाले त्याची भरपाई नागरिकांना मिळावी याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले होते.मागील दीड वर्षांपासून अत्यंत रहदारीचा रामदासपेठ विद्यापीठ ग्रंथालया समोरील पूल मुदत संपल्यानंतर देखील बांधकाम न झाल्याने मनपा व कंत्राटदाराविरुद्ध ठिय्या आंदोलन करण्यात आले.ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत अजित दादा गटाला ३९२ ग्रामपंचायतीवर सरपंच बसवण्याचा मान मिळाल्यामुळे पक्ष कार्यालयात जल्लोष साजरा करण्यात आला.स्वराज्य सप्ताह निमित्ताने १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान शहरातील सहाही विधानसभा क्षेत्रात चित्रकला स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,बाईक रॅली,स्वराज्य शपथ विधी इत्यादी विविध कार्यक्रम घेण्यात आले.महाराष्ट्र राज्य आंगनवाडी कर्मचा-यांचे दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाची दखल घेेत त्यांच्या मागण्या महिला व बाल विकास मंत्री तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला व त्यांच्या मागण्या मान्य झाल्या.
नायलॉन मांजाविरुद्ध ११ जानेवरी रोजी भव्य जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.याप्रसंगी पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सक्करदरा भागातील दूकानांमध्ये जाऊन विक्रेत्यांना व नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणामांची जाणीव करुन दिली.अशोक चौकात बेदरकारपणे अवजड वाहन चालवून श्रेया रोकडे हिला चिरडणा-या वाहन चालक व क्लिनरवर हत्येचा गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी करीत वाहतुक पोलिस उपायुक्त सातव यांना निवेदन देण्यात आले.गांधीबाग येथे अस्वच्छेसाठी मनपा प्रशासनाच्या विरोधात ढोल वाजवून पदयात्रा काढण्यात आली.सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्यात आले.
या पुढे देखील जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येईल,असा इशारा याप्रसंगी प्रशांत पवार यांनी दिला.जम्बो कार्यकारिणीत प्रत्येक समाजाच्या,धर्माच्या प्रतिनिधिंना स्थान दिले असून, अजून जाेमाने पक्ष कामाला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.येत्या महानगरपालिकेच्या निवडणूकीत जास्तीत जास्त जागा आमचा पक्ष खेचून आणनार असल्याचे पवार म्हणाले.कार्यकारिणीतील प्रत्येक जण जनतेमध्ये जाऊन काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रदेश सरचिटणीस आभा पांडे या राज्य महिला आयोगाच्या सदस्य आहेत.बजाज नगर येथील पक्ष कार्यालयात त्या दर शुक्रवारी बसतात.महिलांनी मोठ्या प्रमाणात आपल्या समस्या आभा पांडे यांना सांगून न्याय मिळवावा,असे आवाहन त्यांनी केले.
नुकतेच राज्य शासनातर्फे अंबाझरी येथील पुर परिस्थितीत खराब झालेले नाग नदीवरील पूल,उखडलेेले रस्ते तसेच विविध कामांसाठी २०४ कोटींच्या पॅकेजला मान्यता मिळाली असून भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनी यासाठी सरकारचे आभाराचे पत्र प्रसिद्ध केले आहे.पुढील काळात कामाचे श्रेय यावरुन भाजप-राष्ट्रवादीत तंटा उदभवणार नाही का?या प्रश्नावर बोलताना,आम्ही कामाचे अर्धे-अर्धे श्रेय घेऊ कारण भाजप आमचा सहयोगी पक्ष असल्याचा युक्तीवाद प्रशांत पवार यांनी केला.२०० कोटींचे पॅकज आले त्यात १०० कोटींचा वाटा श्रेयाच्या बाबतीत राष्ट्रवादीचा देखील असल्याचे ते म्हणाले.पूर्व,पश्चिम मध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन पूरग्रस्तांना मदत मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
मनसे,शिवसैनिक तसेच काँग्रेसचे नेते हे राष्ट्रवादीत प्रवेश घेऊ इच्छितात असे तुम्ही सांगता मात्र,पक्षात आल्यानंतर तुमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का?असा प्रश्न केला असता,आम्ही आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही उलट पक्ष वाढेल असा दावा त्यांनी केला.
लोकसभा निवडणूकीची घोषणा झाल्यावर तिकीट वाटप फायनल झाल्यावर पक्ष प्रवेशांचा पोळा फूटणार असल्याचे सूचक विधान याप्रसंगी प्रशांत पवार यांनी केले.
……………………




आमचे चॅनल subscribe करा
