फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमनपा आयुक्त जनतेसाठी कि खूर्चीसाठी?

मनपा आयुक्त जनतेसाठी कि खूर्चीसाठी?

Advertisements


आयुक्त कक्षासमोर महिलेचा टाहो

बिल्डरमुळे महिलेचे राहते घर धोक्यात:रस्त्याच्या नकाशाच बदलला

दोन वर्षांपासून मनपाचे उंबरठे झिजवूनही धोक्याची टांगती तलवार

तुकाराम मुंढे म्हणाले होते ‘चुकीचे काम होणार नाही!’

बिल्डरने नाग नदीवर टाकल्या अवैध फरश्‍या:मजुरांची राहण्याची केली सोय

झोन अधिकारी ‘धृतराष्ट्राच्या’ भूमिकेत

नागपूर,ता. २२ जून २०२२: कोणत्याही शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था ही तेथील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी,नागरिकांकडून प्राप्त झालेल्या करातून शहरातील विकासकामे करण्यासाठी,आपल्या नागरिकांचे जीवन सुखी,सुसह्य करण्यासाठी संवैधानिक व्यवस्थेत निर्मित झालेली एक व्यवस्था आहे.नागपूर महानगरपालिकाही याला अपवाद नाही मात्र ज्याप्रमाणे महानगरपालिकेची एकंदरित कार्यप्रणाली सुरु आहे ते बघता,ही संस्था नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी कटिबद्ध आहे की त्यांच्या जीवापर उदार होऊन कंत्राटदार,बिल्डर्ससोबत ‘टक्केवारीतून’फक्त आपले उखळ पांढरे करुन घेण्यासाठी?मनपा आयुक्तांच्या कक्षासमोर हातात फाईल घेऊन रडवलेल्या चेह-याने,डोळ्यात अश्रूंच्या धारा घेऊन या शहरातील एक सामान्य महिला अायुक्तांच्या भेटीसाठी तातकळत उभी असतानाही आयुक्तांशी तिची भेट आजही ’नेहमीप्रमाणेच’त्यांच्या स्वीय सहायकांनी नाकारतात तेव्हा याबाबत आता, नागपूरकरांच्या मनात शंकेलाही स्थान उरत नाही!

तुकाराम मुंढे होते तेव्हा त्यांनी शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दररोज सायंकाळी ४ वाजता ’जनता दरबार’भरवला होता.जनता दरबारमुळे या शहरातील नागरिक आपल्या समस्या त्यांच्याकडे राजरोसपणे मांडत होते.चेह-यावर समाधान आणि मनात आशा घेऊन मनपा मुख्यालयातून बाहेर पडत होते. त्यांची २७ ऑगस्ट २०२० रोजी अवघ्या ७ महिन्यातच बदली झाली व त्यांच्या ठिकाणी १ सप्टेंबर २०२० रोजी विराजमान झालेले राधाकृष्णन बी. यांनी कधीही शहरातील नागरिकांच्या समस्यांशी वास्ता ठेवलाच नाही.ॲपवर समस्या सांगा,ॲपवर तक्रारी नोंदवा,आयुक्तांना या शहरातील कोणताही सामान्य नागरिक त्यांच्या कक्षात जाऊन भेटू शकत नाही,असा अजब कारभार नागपूरकर जनतेच्या जीवावर उदार झालेल्या मनपा मुख्यालयात सुरु आहे.

मनपातर्फे सध्या तुळशीबाग महाल,रामजी पालवन रोड,मते चौकातून आडव्या रस्त्याचे बांधकाम सुरु आहे.टी.चंद्रशेखर जेव्हा मनपाचे आयुक्त होते तेव्हा या रस्त्याची आखणी अगदी सरळ होती.मात्र याच रस्त्यावर उत्तम बोरकर नावाच्या एका बिल्डरने अनाधिकृत सहा मजली इमारत बांधली.अवैधरित्या वाढीव जागेवर बांधकाम केले.त्याची ईमारत वाचवण्यासाठी या महिलेचे घर तोडून आडव्या-तिडव्या रस्त्याची आखणी मनपा अधिका-यांनी केली,असा त्या महिलेचा आरोप आहे.

या बिल्डरने १३ मीटरचे अधिकचे बांधकाम केले असून त्याला २२.२५ रुंदीची परवानगी असताना त्याने ३५.३७ मापाचे बांधकाम केले तर ४० फूटांच्या लांबीची परवानगी असताना ५४.२ फूट जागेवर अतिक्रमण करुन इमारत बांधली.त्याचे अगदी रस्त्यावर आलेली इमारत वाचवण्यासाठी या महिलेचे राहते घर आता रस्ता बांधकामात तोडले जाणार आहे.

या अन्याया विरोधात या महिलेने तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंकडे व नंतर १८ डिसेंबर २०२० मध्येच गांधी बाग झोन क्र.६ च्या सहायक आयुक्तांना पत्र दिले होते.नगर रचना विभागाचे स.संचालक प्रमोद गावंडे यांच्याकडेही रितसर तक्रार नोंदवली.दोन वर्ष झाली कोणतीही कारवाई अनाधिकृत बांधकाम करणा-या त्या बिल्डरवर करण्यात आली नाही.रस्त्याची आखणीही मनपाच्या या महाभाग आधिका-यांनी अगदी अपघातांना निमंत्रण देणारी केली असून फक्त एका बिल्डरची इमारत वाचवण्यासाठी ‘शहरातील नागरिक अपघातात मरो किवा सामान्य नागरिकांची घरे तुटो’,याच्याशी मनपा प्रशासनाला काही एक घेणे देणे नाही,असेच हे मनपाचे विविध झोन सूचित करतात.

अतिक्रमण विभागाचे अधिकारी अशोक पाटील हे या महिलेला नगर रचना विभागात टोलवतात.नगर रचना विभागाचे गावंडे म्हणतात,अायुक्तांकडून आदेशच आला नाही तर कारवाई कशी करणार?मूळात आयुक्तांपर्यंत सामान्य नागरिकांचे प्रश्‍न पोहोचवण्यासाठी व त्यांचे न्याय समाधान मिळवून देण्यासाठीच, मनपा प्रशासकीय अधिका-यांच्या नोक-या असतात मात्र सामान्य नागरिकांना प्रसंगी उधवस्त करुन कंत्राटदार व बिल्डर्स लोकांना फायदा पोहोचवण्यासाठी मनपाचे विविध विभाग कश्‍यापद्धतीने तत्पर असतात,याची अनेक उदाहरणे माध्यमात प्रसिद्ध झाली आहेत.आयुक्तांपर्यंत फक्त ‘मलाईवाल्याच’ फाईली पोहोचविल्या जातात का?असा प्रश्‍न यातून उपस्थित होतो.आमच्या हातात काहीच नाही सगळं आयुक्तांच्या हातात आहे,असे गावंडे या महिलेला सांगतात,आयुक्तांकडे गेले असता कोणालाही भेटूच दिले नाही,मग या शहरातील सामान्य नागरिक आपली गा-हाणी,समस्या मांडणार कुठे?कोणाकडे?ॲपवर!त्यावर कहर म्हणजे आयुक्त मुंबईला जाऊन उत्तम ‘कारभाराचे’सन्मानपत्र आणि पारितोषिकही घेऊन येणार!

या महिलेला दोन अपत्य आहेत.एक मुलगी दहावीत शिकतेय तर मुलगा सातवीत शिकतोय.हे घर त्यांचे सासरे मृतक बाबूराव उमाळे यांच्या नावाने आहे.मृत्यू पूर्वी त्यांनी हजार चौ.मी.च्याही वर असणारे हे राहते घर मुलाच्या नावे केले नव्हते त्यामुळे महिला व तिच्या पतीला कोणताही मोबदला मिळणार नसल्याचे गांधी बागचे झोन अधिकारी सांगतात.

चार पिढ्यांच्या पूर्वीचे घर हे एका रस्त्याच्या बांधकामात तोडल्या गेल्यावर आपले सेवानिवृत्त झालेले व सध्या भाजी विकून उदरनिर्वाह चालवणा-या पतीसह दोन मुलांना घेऊन त्या अक्षरश:रस्त्यावर येणार असल्याने ,गेल्या दोन वर्षांपासून त्या सर्व अर्जांची,कागदपत्रांची फाईल घेऊन मनपा मुख्यालयात व झोन कार्यालयात डोळ्यात अश्रू घेऊन चकरा मारत आहे.

विशेष बाब म्हणजे त्यांचाच घराला लागून असणारी आमदार माेहन मते यांच्या नातेवाईकांचीही घरे आहेत मात्र त्या घरांना महान मनपा आधिका-यांनी धक्का देखील लागू दिला नाही,त्यांच्या घराचे फक्त ओटेच तुटणार आहेत…..!अश्‍यारितीने रस्त्याची आखणी झाली.हे जनप्रतिनिधी मत मागताना ‘जनतेच्या सेवेसाठी’ मत मागत असतात मात्र निवडून आल्यानंतर सेवा तर सोडा त्यांच्या जगण्या-मरण्याच्या प्रश्‍नांशी देखील त्यांना काहीच घेणं-देणं नसतं,याचे ही उधवस्त महिला प्रातिनिधिक उदाहरण आहे.

या बिल्डरने सर्रास नाग नदीवर टाईल्स टाकून बांधकाम करणा-या मजुरांच्या राहण्याची,त्यांच्या दैनदिन नैसर्गिक गरजांची उत्तम व्यवस्थाही केली आहे.या महिलेच्या अगदी घराला लागून हा सर्व कारभार राजरोसपणे सुरु आहे.घाणी आणि दुर्गंधीमुळे वाद घातला असता,मजूर या महिलेच्या अंगावरच मारायला धावतात,बिल्डर धमकावतो,तुझे घर पाडणार म्हणजे पाडणारच…!घर फोडून टाकणार…..!कारण स्थानिकांच्या जीवावर उदार झालेली महाभ्रष्ट अशी महानगरपालिका नावाची स्थानिक स्वराज्य संस्थाच ‘आधुनिक लोकशाही’मार्गाने या बिल्डरसह अनेकांनी गिळंकृत केली आहे, त्यामुळे आयुक्तांच्या वातानुकुलीत कक्षासमोर एखाद्या सामान्य नागरिकाने,एखाद्या महिलेने,दोन अपत्यांच्या भविष्याने धस्तावलेल्या जन्मदात्रीने कितीही टाहो फोडला तरी तो राधाकृष्णन.बी.यांना ऐकू जाणे शक्यच नाही कारण त्यांच्यापर्यंत फक्त पोहोचतात,त्यांच्या लाडक्या अधिका-यांद्वारे ’फक्त मलाईवाल्या फाईली!’

गांधी बाग झोनच्या सहायक अभियंताने तर या महिलेच्या तक्रारीला उत्तर देताना’आपण स्वत:संबंधित विभाग अथवा न्यायालयात दाद मागावी!’असा उरफाटा सल्ला देणारे कागदोपत्री उत्तर दिले आहे.या महिलेजवळ तेवढी आर्थिक क्षमता,वेळ,आत्मविश्‍वास आहे की नाही?हे देखील तपासून बघण्याची ‘माणूसकी’मनपा नावाच्या महाभ्रष्ट संस्थेच्या पदाधिका-यांकडे उरली नाही.

त्यामुळेच तुकाराम मुंढे फक्त सत्ताधा-यांनाच नव्हे तर मनपातील काही महाभ्रष्ट प्रशासकीय अधिका-यांनाही का नको होते आणि राधाकृष्णन.बी हे का मनपा अधिका-यांना इतके प्रिय आहेत?याचे उत्तर सामान्य नागपूरकरही आता शोधत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या